बन्यन, जॉन :(१ नोव्हेंबर १६२८-३१ ऑगस्ट १६८८). इंग्रज धर्मोपदेशक आणि द पिल्‌ग्रिम्स प्रोग्रेस ह्या विख्यात ग्रंथाचा कर्ता. एल्‌स्ट, बेडफर्डशर येथे जन्मला. त्याचे वडील पेशाने तांबट होते. वयाच्या पंधराव्या वर्षापासून तो त्यांना ह्या कामात मदत करू लागला. तथापि १६४४ मध्ये, इंग्लंडच्या राजाविरुद्ध लढणाऱ्या ⇨ऑलिव्हर क्रॉमवेलच्या सैन्यात एक सैनिक म्हणून तो भरती झाला. ह्या सैन्यात तो १६४६ पर्यंत होता. १६४९ च्या सुमारास त्याने विवाह केला. त्याची पत्नी धर्मपरायण होती. तिच्या व्यक्तिगत प्रभावामुळे तो उत्कटपणे धर्माकडे वळला. तिच्या मृत्युनंतर (१६५६) त्याला एक साक्षात्कारात्मक अनुभव आला व आपण पापमय आहोत आणि केवळ ख्रिस्तच आपला उद्धार करू शकेल अशी भावना त्याच्या मनात बद्धमूल झाली. १६५३ मध्ये बेडफर्ड येथील सेंट जॉन्स चर्चचा तो सदस्य झाला होता. हे चर्च नॉन-कन्‌फॉर्मिस्ट-म्हणजे प्रॉटेस्टंट परंतु ‘चर्च ऑफ इंगंलंड’शी मतभेद असलेले असे-होते. तेथील धर्मोपदेशक जॉन गिफर्ड ह्याचे मार्गदर्शन त्याला लाभले. ह्याच चर्चमध्ये तो धर्मोपदेश करू लागला. त्याचे वक्तृत्व उत्तम असल्यामुळे त्याला मोठा श्रोतृवृंद मिळत गेला. लवकरच आपल्या वक्तृत्वाइतकेच प्रभावी लेखनही तो करू लागला. सम गॉस्पेल ट्रूथ्स ओपन्ड (१६५६), ए व्हिंडिकेशन देअर ऑफ (१६५७), ग्रेस अबाउंडिंग टू द चीफ ऑफ सिनर्स (१६६६), द पिल्‌ग्रिम्स प्रोग्रेस (दोन भाग-१६७८, १६८४), द लाइफ अँड डेथ ऑफ मिस्टर बॅडमन (१६८०), द होली वॉर (१६८२) असे त्याचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले.

जॉन बन्यन

बन्यनसारखे नॉन-कन्‌फॉर्मिस्ट धर्मोपदेशक इंग्लंडात सर्वत्र होते तथापि अँग्लिकन-म्हणजे चर्च ऑफ इंग्लंडच्या-धर्मोपदेशकांचा त्यांच्या धर्मोपदेशाला विरोध होता. १६६० मध्ये प्यूरिटन लोकसत्ताक संपुष्टात आले आणि फ्रान्समध्ये परागंदा झालेला इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स हा पुन्हा गादीवर आला. त्यामुळे इंग्लंडमधील सामाजिक-राजकीय परिस्थितीला वेगळेच वळण लागले. नॉन-कन्‌फॉर्मिस्ट हे राजद्रोही असल्याचा संशय सरकारी पातळीवर व्यक्त होऊ लागला. अनेकांना अटक करण्यात आली. बन्यनही पकडला गेला (१६६०). धर्मोपदेश करण्याचे सोडून देण्याच्या अटीवर त्याची सुटका करण्याची तयारी सरकारने दाखवली परंतु बन्यनने ही अट स्पष्टपणे अमान्य केल्यामुळे त्याला तुरुंगात डांबण्यात आले. तेथे तो बारा वर्षे होता. १६७५ मध्ये त्याला पुन्हा एकदा अटक करून सहा महिने तुरुंगात ठेविले गेले. धर्मोपदेशाची संधी मिळत नसल्यामुळे त्याने तुरुंगात लेखनाचा मार्ग पतकरला. ग्रेस अबाउंडिंग टू द चीफ ऑफ सिनर्स आणि द पिल्‌ग्रिम्स प्रोग्रेस ह्यांसारख्या ग्रंथांचे लेखन बन्यनने कारावासात केले. आयुष्याच्या अखेरीपर्यंत तो धर्मोपदेश करीत राहीला. लंडनमध्ये तो निधन पावला.

बन्यनच्या विशेष उल्लेखनीय ग्रंथांपैकी ग्रेस अबाउंडिंग टू द चीफ ऑफ सिनर्स हे बन्यनचे आध्यात्मिक आत्मचरित्र होय. आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा इतिहास बन्यनने ह्या ग्रंथात दिलेला आहे. आपल्या मनाच्या विविध अवस्थांचे चित्रण त्यात बन्यनने प्रभावीपणे केलेले आहे. आपले मानसिक अनुभव विविध प्रतिमांच्या द्वारा वाचकांसमोर तो साक्षात उभे करतो सामान्यांच्या दैनंदिन जीवनातले दाखले देतो.

द पिल्‌ग्रिम्स प्रोग्रेस हे एक रूपक आहे. आपल्या एका स्वप्नाचे वर्णन लेखक त्यात करतो. पाठीवर ओझे घेऊन चाललेला एक ख्रिस्ती लेखकाला स्वप्नात दिसतो. आपले वसतिस्थान असलेल्या नगरीला आग लागणार असल्याची वार्ता त्याला समजलेली असते. ह्या विनाशनगरीपासून (सिटी ऑफ डिस्ट्रक्शन) तो पळून जात असतो. ह्या प्रवासात त्या गृहस्थाला नैराश्यचा चिखल, अवमानाची दरी, अहंकारमेळा, संदेहाचा दुर्ग इ. स्थळे लागतात. आशा, निराशा, श्रद्धा, व्यावहारिक शहाणपण ह्यांची प्रतीके असलेल्या होपफुल, जायंट डिस्पेअर, फेथफुल, मिस्टर वर्ल्ड्‌ली वाईज-मन अशा व्यक्तीरेखाही बन्यनने ह्यात निर्माण केल्या असून ही सर्व मंडळीही नायकाला प्रवासात भेटतात, असे त्याने दाखविले आहे. हा माणूस अखेरीस दिव्य, स्वर्गीय नगरीत (सिलेस्टिअल सिटी) जाऊन पोहोचतो (येथे ग्रंथाचा पहिला भाग संपतो).

त्याच्या आर्जवांना न जुमानता विनाशनगरीतच राहीलेली त्याची पत्नी व मुलेही नंतर एक सूचक स्वप्न पाहिल्यानंतर त्या दिव्य, स्वर्गीय नगरीकडे निघतात. त्यांच्याबरोबर त्यांची शेजारीण दया-मर्सी-ही असते. अडचणींना आणि अडथळ्यांना तोंड देत हे लोकही अखेर त्या स्वर्गीय नगरीत येतात (येथे ग्रंथाचा दुसरा भाग संपतो).

साधेपणाच्या निरागस सौंदर्याने बन्यनची भाषाशैली विलोभनीय झालेली आहे. बायबलच्या शैलीचा आदर्श बन्यनच्या समोर होता. बन्यनची तळमळ आणि मानवी सत्प्रवृत्तींना त्याने केलेले उत्कट आवाहन लक्षणीय आहे. मानवी स्वभावाचे त्याचे ज्ञान व त्याचे निसर्गप्रेमही ठिकठिकाणी प्रत्ययास येते. रूपक वाङ्‌मयात अग्रेसर असलेल्या या ग्रंथाचे जगातील अनेक भाषांतून अनुवाद झालेले आहेत. अठराव्या शतकात अवतरलेल्या इंग्रजी कादंबरीच्या रूपाची जडणघडण इंग्रजी साहित्यपरंपरेतील ज्या ग्रंथांनी केली, त्यांत द पिल्‌ग्रिम्स प्रोग्रेसचा अंतर्भाव करण्यात येतो. एच्. स्टेबिंग ह्याने त्याचे ग्रंथ संपादिले आहेत (४ खंड, १८५९).

संदर्भ : 1. Brittain, Vera, Valiant Pilgrim, New York, 1951.

           2. Brown, John, John Bunyan, His Life, Times and Works.London, 1885.

           3. Froude, James Anthony, John Bunyan, London, 1880.

          4. Harrison, G. B. John Bunyan : A Study in Personality, London, 1928.

          5. Sharrock, Roger, John Bunyan, London, 1954.

          6. Talon, Henry, John Bunyan, The Man and His Works, London.1951.

कुलकर्णी, अ. ऱ.