नेमॅटोडा : हा गोलकृमींचा (सूत्रकृमींचा) संघ आहे. मुक्तजीवी (स्वतंत्ररीत्या जगणारे) आणि परजीवी (दुसऱ्या जीवांवर जगणारे) असे दोन्ही प्रकारचे गोलकृमी असतात. मुक्तजीवी गोलकृमींची निवासस्थाने अनेक प्रकारची आहेत. ओलसर वाळू, चिखल, साचलेले पाणी, वाहते पाणी, जलीय वनस्पतींच्या आसपास, माती, समुद्र या सर्व ठिकाणी आणि वेगवेगळ्या हवामानांत मुक्तजीवी गोलकृमी आढळतात. परजीवी गोलकृमी प्राण्यांचा किंवा वनस्पतींचा आश्रय घेतात. जरी यांची निवासस्थाने भिन्न असली, तरी त्याचा यांच्या शरीररचनेवर फारसा परिणाम झालेला आढळून येत नाही.

या संघात वेगवेगळ्या ५,००,००० जाती आहेत. या कृमींच्या माणसाच्या व माणसाळलेल्या प्राण्यांच्या शरीरात राहणाऱ्या अनेक उपद्रवी जाती आहेत म्हणून नेमॅटोडा संघाच्या अभ्यासास महत्त्व आलेले आहे. जवळजवळ सर्व पृष्ठवंशी (पाठीचा कणा असलेल्या) प्राण्यांत एखाद्या तरी जातीचा गोलकृमी आढळतो.

आ.१. ॲस्कॅरिस : (अ) पुढचे टोक वरून पाहिले असता (आ) पुढचे टोक खालून पाहिले असता (इ) मादीचे मागचे टोक (ई) नराचे मागचे टोक, पार्श्व दृश्य : (१) पृष्ठीय रेखा, (२) पृष्ठीय ओठ, (३) पिंडिका, (४) अधर रेखा, (५) उत्सर्जन छिद्र, (६) अधर ओष्ठ, (७) गुदद्वार, (८) मैथुन-कंटिका.

गोलकृमीचे शरीर द्विपार्श्व-सममित (फक्त एकाच पातळीत शरीर विभागले असता त्याचे दोन सारखे भाग पडणारे) व त्रिस्तरी (तीन स्तर असलेले) असते. ते दंडगोलाकार व खंडरहित असून दोन्ही टोकांकडे निमुळते होत जाते. त्यावर पक्ष्माभिका (ज्यांच्या लयबद्ध फटकाऱ्यांनी प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतात वा द्रव पदार्थात प्रवाह उत्पन्न करू शकतात अशा केसांसारख्या वाढी) व उपांगे नसतात. देहभित्तीवर उपत्वचेचा प्रतिरोधी स्तर असतो. या स्तरावर पाचक रसांची क्रिया होत नाही. आभासी देहगुहा (जिच्यात आतडे इ. इंद्रिये असतात अशी शरीरातील खोटी पोकळी) असते. पचनमार्ग सरळ व पूर्ण (मुख, ग्रसिका, आंत्र-आतडे-आणि मलाशय असलेला) असून मुख आणि गुदद्वार विरुद्ध टोकांकडे असतात. मुखाभोवती ज्ञानेंद्रिये असलेल्या पिंडिका (मऊ पेशीसमूहाचे निमुळते लहान उंचवटे) असतात. या ज्ञानेंद्रियांमुळे नेमॅटोडला (गोलकृमीला) अन्न व पोषक (ज्यावर परजीवी उपजीविका करतो तो प्राणी) यांचे ज्ञान होते, असे समजले जाते. नेमॅटोडांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिंडिका आढळतात व त्यांचा वर्गीकरण करण्यासाठी उपयोग केला जातो. परिवहनांगे (रक्ताचे अभिसरण करणारी इंद्रिये) किंवा श्वसनांगे नसतात. उत्सर्जन तंत्र (निरुपयोगी द्रव्ये शरीराबाहेर टाकणारी संस्था) पार्श्व रेखांमधून जाणाऱ्या अंतःकोशिकी (कोशिकांच्या-पेशींच्या-आत असलेल्या) नलिकांचे बनलेले असते. तंत्रिका तंत्रात (मज्जासंस्थेत) ग्रसिकेभोवती एक तंत्रिकावलय (मज्जातंतूंचे कडे) असून त्याच्यापासून अग्र (पुढच्या) टोकाकडे सहा आणि पश्च (मागच्या) टोकाकडे एक मुख्य अधर (खालच्या) आणि इतर पृष्ठीय (वरच्या) व पार्श्व (बाजूच्या) तंत्रिका गेलेल्या असतात. लिंगे बहुत करून भिन्न असतात व नर मादीपेक्षा लहान असतो. नरात सामान्यतः एकच वृषण (पुं-जनन ग्रंथी) असून ते सुतासारखे असते. त्याच्यापासून एक शुक्रवाहक (पुं-जनन कोशिका वाहून नेणारी नलिका) निघून तो रेताशयात उघडतो व याच्यापासून एक स्खलनवाहिनी निघून ती अवस्करात (एक प्रकारच्या कोष्टात) उघडते. मादीमध्ये बहुधा दोन अंडाशय (स्त्री-जनन ग्रंथी) असून ते वेटोळी पडलेल्या बारीक नळीसारखे असतात ते दोन नलिकाकार गर्भाशयांत उघडतात दोन्ही गर्भाशय एका समाईक योनिमार्गात उघडतात आणि हा योनिमार्ग मध्य-अधर रेषेवर एका छिद्राने उघडतो. अंड्याचे निषेचन (फलन) आंतरिक (शरीरात) असते.

आ.२. ॲस्कॅरिसाची आंतरिक संरचना : पचन आणि जनन तंत्रे दाखविली आहेत : (अ) मादी (आ) नर : (१) मुख, (२) ग्रसिका, (३) उत्सर्जन छिद्र, (४) उत्सर्जन-नाल, (५) आंत्र, (६) गुदद्वार, (७) अंडाशय, (८) अंडवाहिनी, (९) गर्भाशय, (१०) योनिमार्ग, (११) जनन-रंध्रे, (१२) शुक्रवाहक, (१३) वृषण, (१४) रेताशय, (१५) मैथुन-कंटिका.

अंडी बारीकअसून प्रत्येकाभोवती कठीण कायटिनी कवच असते. अंड्यातून बाहेरपडलेले डिंभ (भ्रूणानंतरची स्वतंत्रपणे अन्न मिळवून जगणारी व प्रौढाशीसाम्य नसणारी सामान्यतः क्रियाशील असणारी अवस्था) कित्येकवेळा कात टाकतात. अलिंगी प्रजोत्पादन नसते.

गोड्या पाण्यातील व जमिनीवरील नेमॅटोडांचा उभयलिंगतेकडे (नर व मादीची जननेंद्रिये एकाच प्राण्यात असण्याकडे) कल दिसून येतो. उभयलिंगी नेमॅटोडांमध्ये जनन ग्रंथी प्रथम शुक्राणू (पुं-जनन कोशिका) उत्पन्न करतात आणि नंतर त्याच जनन ग्रंथी अंडाणू (स्त्री-जनन कोशिका) तयार करतात. प्रथम तयार झालेल्या शुक्राणूंमुळे त्यांचे निषेचन होते.

जवळजवळ सर्व देशांत लहान मुले व मोठी माणसे यांच्या लहान आतड्यांत अनेकदा स्कॅरिस (जंत) हा गोलकृमी आढळतो. म्हणून स्कॅरिसव त्याचे जीवनचक्र या विषयाचा बराच अभ्यास झाला आहे. [→ जंत].

सर्व परजीवी प्राणी एका वेळी अनेक अंडी घालतात आणि स्कॅरिसाची मादी याला अपवाद नाही. ती एकावेळी जवळजवळ २,००,००० अंडी घालते. ही अंडी मलाबरोबर बाहेर टाकली जातात. या अंड्यांमुळे संदूषित झालेले पाणी प्यायले असता किंवा अन्न खाल्ले असता ही अंडी पचनमार्गात येतात. लहान आतड्यात अंडी फुटून पिल्ले बाहेर पडतात. ती आतड्याची भित्ती छेदून रक्तप्रवाहात शिरतात. रक्तप्रवाहाबरोबर ती फुफ्फुसात येतात. तेथून श्वसनीत (श्वसनाल फुफ्फुसांना जोडणाऱ्या नलिकेत), श्वसनीमधून मुखात व मुखातून गिळली जाऊन पुन्हा एकदा पचनमार्गात येतात. अखेरीस ही पिले लहान आतड्यात येतात. येथे त्यांची वाढ होऊन जननकार्य सुरू होते. एका पोषकामध्ये ५,००० पर्यंत गोलकृमी आढळले आहेत. अँकिलोस्टोमा ड्युओडिनेल (अंकुशकृमी), वुच्छेरेरिया बॅन्क्रॉफ्टी (हत्ती रोगाचा कृमी), एंटेरोबियस व्हर्मिक्युलॅरिस, स्ट्राँगायलॉयडिस स्टर्कोरॅलिस, लोआ लोआ (डोळ्यातील गोलकृमी), ट्रायक्युरिस ट्रायकियूरा (चाबकासारखा कृमी), ड्रॅकन्क्युलस मेडिनेन्सिस (नारूचा कृमी) हे माणसाशी संबंधित असलेले काही उपद्रवी नेमॅटोड आहेत.

अँकिलोस्टोमा (अंकुशकृमी) व ॲस्कॅरिस यांच्या जीवनचक्रांत बरेच साम्य आहे. अँकिलोस्टोमाचे डिंभ पोषकाच्या त्वचेला छिद्रे पाडून शरीरात प्रवेश करतात. लहान आतड्यातील रक्त व ऊतकातील (समान रचना व कार्य असलेल्या कोशिकांच्या समूहातील) द्रव पदार्थ हे त्यांचे अन्न होय [→ अंकुशकृमि रोग].

नारूचा गोलकृमी (गिनी वर्म अथवा ड्रॅकन्क्युलस मेडिनेन्सिस) आफ्रिका व भारतात जास्त प्रमाणात आढळतो. हा माणसाच्या त्वचेखाली रहातो. तेथे तो ९० सेंमी.हून अधिक वाढू शकतो. हात, पाय व खांदे या ठिकाणी हा कृमी आढळतो. ज्यावेळी हे भाग पाण्यात बुडलेले असतात त्यावेळी नारूचे डिंभ त्वचेबाहेर येऊन पाण्यात शिरतात. पाण्यात जर हा डिंभ सायक्लॉप्स या क्रस्टेशियन (कवचधारी) प्राण्याकडून खाल्ला गेला, तर जीवनचक्र चालू राहते. हे सायक्लॉप्स असलेले पाणी माणूस प्यायला, तर हे डिंभ माणसाच्या शरीरात येतात व तेथे त्यांची वाढ होऊन जीवनचक्र चालू राहते. पाणी गाळून पिणे व नारू झालेल्या माणसाला पाण्यात येऊ न देणे हे नारू टाळण्याचे उपाय आहेत [→ नारू]. अमेरिकेत काही सरीसृपांमध्ये (सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये) ड्रॅकन्क्युलसच्या जाती आढळतात. त्यांच्या जीवनचक्रातही सायक्लॉप्स हाच मध्यस्थ पोषक असतो.

काही नेमॅटोडांचे जीवनचक्र अत्यंत गुंतागुंतीचे असते व ते पूर्ण होण्यास दोन विशिष्ट पोषकांची जरूरी असते.

विशिष्ट नेमॅटोडला विशिष्ट पोषकाची जरूरी असते. माणूस व डुक्कर यांच्यामध्ये आढळणारे गोलकृमी बाहेरून सारखे दिसतात पण एका गोलकृमीची दुसऱ्या पोषकात प्रौढावस्थेपर्यंत वाढ होऊ शकत नाही.

ज्या नेमॅटोडात वनस्पती पोषक असतात त्यांत ही विशिष्टता कमी असते. त्या त्या नेमॅटोडाच्या अनेक पिढ्यांवर प्रयोग करून पोषक बदलता येतो.

टॉक्झोकॅरा कॅनिस हा नेमॅटोड कुत्र्याच्या पिलात आढळतो. पिले गर्भावस्थेत असताना मातेच्या शरीरातून अपरेमार्फत (वारेमार्फत) संदूषण होते. हेंटेरिकिस गॅलिनी हा नेमॅटोड कोंबड्याच्या अंधनालात (अन्नमार्गाच्या एखाद्या भागापासून निघालेल्या व बाहेरच्या टोकाशी बंद असलेल्या पिशवीत) व स्ट्राँगायलस व्हल्गॅरिस हा नेमॅटोड घोड्याच्या अंधनालात वा बृहदांत्रात (मोठ्या आतड्यात) आढळतो.

पहा : सूत्रकृमिजन्य वनस्पतिरोग.

जोशी, मीनाक्षी