खेचर : गाढव (नर) व घोडी यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या संकरजाला खेचर म्हणतात आणि घोडा व गाढवी यांच्या संकरापासून उत्पन्न होणाऱ्या प्राण्याला ‘हिनी’ म्हणतात. हिनी खेचरापेक्षा लहान आणि पुष्कळ बाबतींत त्याच्यापेक्षा कनिष्ठ प्रतीचा असतो. खेचर व हिनी ही दोन्हीही सामान्यतः वांझ असतात. खेचरीला शिंगरू झाल्याची कित्येक उदाहरणे दिलेली आढळतात, पण ती संशयास्पद आहेत. खेचर प्रजोत्पादनक्षम असल्याचे कोठेही नमूद केलेले आढळत नाही. अलीकडील संशोधनावरून असे दिसून आले आहे की, घोडा, गाढव आणि खेचर यांत गुणसूत्रांची (एका पिढीतून दुसऱ्या पिढीत आनुवंशिक लक्षणे नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांची) संख्या प्रत्येकी ६६ असते. याविषयी संशोधन करणाऱ्या सगळ्या शास्त्रज्ञांचे मत असे आहे की, खेचरांच्या शुक्राणु-उत्पादनाच्या क्रियेत घडून येणारे अर्धसूत्रण (पेशीतील केंद्रकाच्या विभाजनाने गुणसूत्रांची द्विगुणित संख्या कमी होऊन एकगुणित म्हणजे निम्मी होणे) अतिशय अनियमित असल्यामुळे त्यांच्यात प्रजोत्पादनक्षमता नसावी.

खेचर

मातापित्यांचे जोम आणि कणखरपणा हे गुण खेचरात एकत्रित झालेले असल्यामुळे ते संकरज ओजाचे (मातापित्यांतील गुणधर्मांची संकरजात जोमाने वाढ होण्याचे, हेटेरोसिस) एक उत्तम उदाहरण होय. उंची, मान व पुठ्ठा यांचा आकार आणि शरीरावरील केसांच्या आवरणाचा एकसारखेपणा या बाबतींत खेचराचे घोडीशी साम्य असते आणि आखूड डोके, लांब कान, बारीक पाय, लहान खूर, आखूड आयाळ, घोड्याच्या आतल्या बाजूला असणाऱ्या शृंगी (शिंगासारख्या पदार्थांच्या) उंटवट्यांचा अभाव, शेपटीच्या बुडाजवळील थोडके केस इ. बाबतींत त्याचे गाढवाशी साम्य दिसून येते. गुणांच्या बाबतीत सांगावयाचे झाले तर वेग, जोम व शक्ती हे गुण खेचरात आईकडून आलेले असतात तर रूप, स्वभाव, कणखरपणा, चिकाटी, सोशिकपणा, दीर्घायुष्य, रुक्षता, दृढपादता इ. गुण त्याने पित्याकडून उचललेले असतात.

आशिया मायनरमध्ये निदान ३,००० वर्षांपूर्वी खेचरांची पैदास होत असे आणि ओझी वाहण्याकरिता आणि स्वारीकरिता ती वापरीत असत. इतर भारवाहक प्राण्यांना अतिशय कठीण वाटणाऱ्या परिस्थितीत काम करण्याची त्यांची शक्ती आणि सर्व प्रकारच्या कष्टांना टक्कर देण्याचे त्यांचे सामर्थ्य यांमुळे आजदेखील जगाच्या पुष्कळ भागांत त्यांचा उपयोग केला जातो.

सर्वसाधारण खेचरे १·३ मी. उंचीची व २७५ किग्रॅ. वजनाची असतात, पण काही खेचरे १·९ मी. उंचीची व ७५० किग्रॅ. वजनाचीही असतात. त्यांच्या शरीरावरील केसांच्या आवरणाचा रंग तपकिरी किंवा तांबूस तपकिरी वा काळपट तपकिरी असतो. खेचराचे ओरडणे घोड्याच्या खिंकाळण्यासारखे नसून काहीसे गाढवाच्या ओरडण्यासारखे असते. खेचरांच्या अंगयष्टीप्रमाणे त्यांचा निरनिराळ्या कामांकरिता उपयोग करतात. वयाच्या चौथ्या वर्षी ओझे वाहण्याला ती लायक होतात व वयाच्या पाचव्या वर्षापासून अवघड कामे करू शकतात.


खेचर काटक असून तहान व भूक खूप वेळपर्यंत सहन करू शकते. खाण्याच्या बाबतीत ते चोखंदळ नसते. निकृष्ट प्रतीचे व अपुरे अन्न खाऊनही ते वेळ काढू शकते. लष्करातील खेचरांना घोड्याप्रमाणे खाद्य देतात. हवामानाच्या फेरबदलाचा विशेषतः अतिशय उष्ण हवामानाचा खेचरावर फारसा परिणाम होत नाही.  ते उत्तम पोहणारे असल्यामुळे खोल नद्यानाले सहज पार करू शकते. जड ओझी घेऊन अरुंद रस्त्यांवरून आणि उभी चढण असलेल्या डोंगरावर ते बिनधोक जाऊ शकते.

अमेरिकेत निरनिराळ्या कामांकरिता खेचरांचा उपयोग करतात. जॉर्ज वॉशिंग्टन यांनी १७८५ मध्ये खेचरांची पैदास सुरू केली. काही खेचरे केवळ जड ओझी वाहण्याकरिता उपयोगात अणातात काही शेतीच्या कामांकरिता वापरतात उसाच्या व कापसाच्या शेतांवर काम करणारी काही खेचरे असतात आणि काही फक्त खाणीत काम करणारी असतात. कामाप्रमाणे त्यांची निवड होत असल्यामुळे अमेरिकेत खेचरांचे पाच वर्ग पाडण्यात आलेले आहेत.

स्पेन आणि अमेरिकेमधील खेचरे अत्युत्कृष्ट असून त्यांच्या खालोखाल पोर्तुगाल व इटलीतील असतात. शेतीमध्ये दिवसेंदिवस यांत्रिक अवजारे जास्त प्रमाणात वापरण्यात येऊ लागल्यामुळे खेचरे व घोडे यांच्याकडे दुर्लक्ष होऊन त्यांची विशेष गरज भासेनाशी झाली आहे.

भारतीय सैन्यामध्ये सामान्यतः दोन प्रकारची खेचरे उपयोगात आणली जातात : सर्वसाधारण लष्करी कामे करणारी ओझ्याची हरकामी खेचरे आणि पहाडी तोफखान्याची कामे करणारी खेचरे. लष्कराच्या नियमानुसार हरकामी खेचरे ४–१८ वर्षे वयाची, १·३२–१·४७ मी. उंचीची व २२५–३०० किग्रॅ. वजनाची असावी लागतात आणि पहाडी तोफखान्याची खेचरे ४–१८ वर्षे वयाची, १·४२–१·५० मी. उंचीची व ३५० किग्रॅ. वजनाची असणे आवश्यक असते. हरकामी खेचर ७३ किग्रॅ. व तोफखान्याचे खेचर १४५ किग्रॅ. वजन वाहून नेऊ शकते. तोफा किंवा तोफखान्याचे इतर सामान वाहून नेण्याकरिता मोठ्या व अतिशय मजबूत खेचरांची आवश्यकता असते.

सैन्याला खेचरे पुरविण्यासाठी उत्तर प्रदेशात सहराणपूर व बाबूगढ या दोन ठिकाणी लष्करी पैदास केंद्रे आहेत, पण ती सैन्याची गरज पुरेशी भागवू शकत नाहीत. म्हणून चौथ्या पंचवार्षिक योजनेत हिमाचल प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि भारताचा पूर्व भाग यांत प्रत्येकी एक केंद्र स्थापण्याची योजना आहे.

भारतातील खेचरांची संख्या स्थिरपणे वाढत आहे. १९६१ मध्ये ही संख्या नऊ लाख होती. १९५६ पेक्षा ती ३० टक्क्यांनी जास्त वाढलेली होती. उत्तर प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात खेचरांची संख्या बरीच जास्त असून इतर राज्यांत त्यामानाने ती जमेस न धरण्यासारखी आहे. घोडा आणि खेचर यांचे रोग एकच आहेत, त्याकरिता घोडा ही नोंद पहावी.

पहा : गाढव घोडा.

संदर्भ : 1. CSIR, The wealth of India, Raw Materials, Vol., VI, Supplement Livestock, New Delhi, 1970.   

            2. Walker, E. P. Mammals of the world, vol. II, Baltimore, 1964.

गद्रे, य. त्र्यं.