चितळ

चितळ : स्तनी वर्गाच्या समखुरी गणातील (ज्यांच्या खुरांची संख्या सम असते अशा प्राण्यांच्या गणातील) मृगकुलात याचा समावेश होतो. हा मृग ऑक्सिस  वंशाचा असून या वंशात तीन जाती आहेत. चितळाचे शास्त्रीय नाव क्सिस ॲक्सिस  असे आहे.

हिमालयाच्या पायथ्याजवळच्या जंगलात आणि जेथे चरण्याकरिता कुरणे आणि मुबलक पाणी आहे, अशा भारतातील सर्व जंगलात चितळ आढळतो. आसामच्या काही भागात तो सापडतो, पण पंजाब आणि राजस्थानातील रखरखीत प्रदेशांत तो मुळीच आढळत नाही.

सगळ्या मृगांत चितळ हा अतिशय सुंदर आहे. याचा रंग तकतकीत तांबूस पिंगट असतो आणि अंगावर सगळीकडे पांढरे ठिपके असतात. वयस्क नर जास्त तपकिरी असतो. पाठीच्या मधोमध एक लांब काळा पट्टा असतो. शिंगे डौलदार असून त्यांना तीन अणकुचीदार शाखा असतात. पहिली शाखा कपाळाजवळ आणि शिंगाच्या बाकीच्या भागाशी जवळजवळ काटकोन करणारी असते. बाकीच्या दोन शाखा वर टोकाकडे असतात.

 चितळांचे नेहमी कळप असतात सामान्यतः एका कळपात १० ते ३० चितळ असून त्यांत दोनतीन नर असतात. पुष्कळदा शंभर किंवा त्यांपेक्षाही जास्त चितळांचे कळप दिसून येतात आणि त्यांत निरनिराळ्या वयांचे नर, माद्या आणि पिल्ले असतात. हे प्राणी दिनचर आहेत. सकाळी व तिसऱ्या प्रहरी ते चरत असतात आणि दुपारी सावलीत विश्रांती घेतात. गवत यांचे मुख्य खाद्य होय, पण कधीकधी ते पाने खातात जंगलातील झाडांवरून गळून पडलेली फुले आणि फळे त्यांना विशेष आवडतात. उभ्या पिकातही हे शिरतात. जंगलातील बऱ्याच प्राण्यांच्या सहवासात हे पुष्कळदा असतात, पण माकडांशी यांची विशेष मैत्री असते.

 नरांची मृगशृंगे (मृगांची शिंगे) गळून पडण्याचा काळ वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळा असतो. मध्य प्रदेश व दक्षिण भारतात ती ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुमारास गळून त्यांच्या जागी नवी उगवतात. शिंगे गळून पडण्याच्या सुमारास नर आपला कळप सोडून जंगलात जातात व नवीन शिंगे आल्यावर कळपात परत येतात.

मध्य प्रदेशात प्रजोत्पादनाचा काळ मे महिन्यात शिगेला पोहोचतो. पण उत्तर भारतात हा काळ हिवाळ्यात असतो, असे म्हणतात. या दिवसांत माद्यांवरून नरांच्या वारंवार भयंकर झुंजी चालू असतात. सामान्यतः मादीला एका वेळी एकच पिल्लू होते आणि ते मोठे होऊन कळपाबरोबर हिंडू फिरू लागेपर्यंत मादी त्याची फार काळजी घेते.

पहा  :  मृगशृंगे आणि शिंगे.

भट, नलिनी