पुराणे व उपपुराणे : हिंदूंचे विशिष्ट धार्मिक ग्रंथ. या ग्रंथाचे ‘महापुराणे’ व ‘उपपुराणे’ असे दोन प्रकार आहेत. बहुतेक वेळा महापुराणांचा निर्देश करताना ‘महापुराणे’ असे न म्हणता ‘पुराणे’ ही संज्ञा वापरली जाते. किंबहुना, पुराणे हेच त्यांचे मूळचे नाव असून नंतर निर्माण झालेल्या उपपुराणांहून त्यांचे वेगळेपण दाखविण्यासाठी त्यांना ‘महापुराणे’ म्हटले जाऊ लागले. पुराणे या संज्ञेने महापुराणे व उपपुराणे या दोहोंचा निर्देश करण्याची पद्धतही आहे.

पुराणांविषयी येथून पुढे केलेली विधाने ही सामान्यतः स्थूलमानाने केलेली आहेत. कारण पुराणांची नावे,संख्या,त्यांच्यातील अध्यायांची व श्लोकांची संख्या, त्यांचा काळ, त्यांचे विषय, त्यांच्यातील प्रक्षेप इ. बाबतीत त्या त्या पुराणांची स्वत:ची मते, त्यांच्याविषयीची इतर पुराणांची व ग्रंथाची मते, विद्वानांनी त्यांविषयी काढलेले निष्कर्ष इत्यादींचा आपापसांत मेळ बसणे, हे अत्य़ंत अवघड आहे. एवढेच नव्हे, तर एकाच विद्वानाने केलेल्या दोन विधानांत मेळ बसत नाही, असेही अनेकदा दिसते. पुराणसंहिता या वेदसंहितांप्रमाणे निश्चित व अपरिवर्तनीय स्वरूपात राहिलेल्या नसल्यामुळेही त्यांच्याविषयी काही निश्चित निर्णय घेणे अवघड ठरते.

पुराणांची संख्या : पूर्वी शंभर कोटी श्लोकांचे एकच पुराण होते आणि व्यासांनी त्याची ४ लाख श्लोकांच्या १८ पुराणांत विभागणी केली, असे मत्स्यपुराणात म्हटले आहे. तसेच, प्रारंभीच्या अथर्ववेदादी ग्रंथांतून पुराण हा शब्द एकवचनी वापरलेला आहे. त्यामुळे प्रारंभी एकच पुराण होते, असे काही विद्वानांना वाटते परंतु हे एकवचन पुराण हा वाङ्‌मयाचा एक प्रकार या अर्थी वापरले आहे, असेही काहीजण मानतात. पा. वा. काणे यांच्या आणि इतर अनेकांच्या मते प्रारंभी एकच पुराण असण्याची शक्यता आहे परंतु पुराण एक असल्याचे मत बहुधा काल्पानिक असावे, असेही काणे यांनी म्हटले आहे. तैत्तिरीय आरण्यकात पुराणांचा बहुवचनी निर्देश असल्यामुळे त्या काळापर्यंत कमीत कमी तीन पुराणे तरी तयार झाली असली पाहिजेत, असे त्यांनी म्हटले आहे. हरप्रसाद शास्त्रींच्या मते वायुपुराणांच्या मूळच्या भागात पुराणांची संख्या दहा सांगितलेली होती परंतु उत्तरकालीन परंपरेनुसार महापुराणांची संख्या अठरा ठरली. भारतीय संस्कृतीत १८ या संख्येला विशिष्ट महत्त्व आल्यानंतर त्यांची संख्या अठरावर स्थिर झाली, असे दिसते. त्यांची नावे  बहुतेक सर्व महापुराणांतून आढळतात. ती पुढीलप्रमाणे : ब्रह्म, पद्म, विष्णू, वायु, भागवत, नारदीय, मार्कंडेय, अग्नि, भविष्य, ब्रह्मवैवर्त, वराह, लिंग, स्कंद, वामन, कूर्म, मत्स्य, गरुड ब्रह्मांड. काही पुराणांतून वायूपुराणा ऐवजी शिवपुराण आणि भागवतपुराणा ऐवजी देवी-भागवत ही नावे आढळतात. भागवताला वैष्णव भागवत असेही नाव आहे. पार्जिटरने शिववायु या दोहोंचा समावेश करून पुराणांची संख्या १९, तर फार्‌कवरने त्या एकोणिसांमध्ये हरिवंशाचा समावेश करून ती वीस अशी मानली आहे.

पुराण संज्ञेचा अर्थ : ‘पुराण’ या शब्दाचा वाच्यार्थ ‘प्राचीन’ असा आहे. वायूपुराणाच्या मते पुरा(पूर्वी) आणि अन् (अस्तित्वात असणे) ह्या शब्दांपासून ‘पुराण’ हा शब्द बनलेला असून ‘पूर्वी अस्तित्वात असणारे’ असा त्याचा अर्थ आहे. यास्काचार्यांच्या मते ‘पुरा नवम‌्’ म्हणजे ‘प्राचीन काळी नवे असणारे’ आणि पद्मपुराणाच्या मते परंपरेची इच्छा करणारे, ते पुराण होय. पुराणसंज्ञेच्या या सर्व व्युत्पत्ती पुराणाचा प्राचीन काळाशी संबंध जोडतात. पुराण हा शब्द ‘प्राचीन’ या अर्थाने ऋग्वेदात अनेकदा आला आहे. प्रारंभीच्या काळात प्राचीन कथा व आख्यायिका या परंपरागत वाङ्‌मयालाच पुराण हे विशेषण लावले जात असावे. त्या काळात त्यांच्या संहिता मात्र बनल्या नव्हत्या, असे दिसते. अशा कथांच्या स्वरूपात पुराणे ही वेदसंहितांच्याही आधीपासून अस्तित्वात असण्याची शक्यता आहे. प्रांरभीच्या या विशेषणार्थी शब्दाचे नंतर नामात रूपांतर झाले.

पुराणांची निर्मिती व विकास : मत्स्यवायु ह्या पुराणांच्या मते ब्रह्मदेवाने आधी पुराणांची निर्मिती केली व नंतर त्याच्या तोंडून वेद बाहेर पडले. भागवतानुसार ब्रह्मदेवाने एकेका मुखाने एक-एक वेद निर्माण केला आणि नंतर एकदम चारही मुखांनी इतिहास-पुराणांची निर्मिती केली.(ईश्वराच्या वा यज्ञातील) उच्छिष्टापासून चार वेद व देव यांच्यासह पुराणांची निर्मिती झाली, असे अथर्व वेदात म्हटले आहे. वेद, इतिहास, यज्ञ, सूत्रे, विद्या, व्याख्याने व उपव्याख्याने, इह व परलोक, सर्व भूते यांच्या प्रमाणे पुराण हेही परमेश्वराचे निःश्वसित आहे. असे बृहदारण्यक उपनिषदात(४·५·११) म्हटले आहे. विष्णूने व्यासांच्या रूपाने अवतरून देवलोकात असलेल्या पुराणसाहित्याची १८ पुराणांत विभागणी केली, असेही मत आढळते. पुराणांची उत्पत्ती दैवी मानली जात होती, असे या सर्व मतांवरून दिसते. पुराणसंहितांच्या निर्मितीचे श्रेय व्यासांना देण्याची परंपरा अत्यंत प्रसिद्ध आहे. शंभर कोटी श्लोक असलेल्या मूळच्या पुराणाची व्यासांनी ४ लाखांच्या १८ पुराणांत रचना केली, असे मानले जाते. म्हणूनच, बलदेव उपाध्याय यांनी पुराणांच्या विकासात, व्यासपूर्व आणि व्यासोत्तर असे दोन प्रवाह स्पष्टपणे दिसतात, असे म्हटले आहे. त्यांच्या मते व्यासांपूर्वी पुराणे ही लोकप्रचलित, परंतु अव्यवस्थित होती आणि ती लोकवृत्तात्मक विद्याविशेष या स्वरूपात होती. ऋग्वेदात आलेला ‘पुराण’ हा शब्द ‘प्राचीन’ या अर्थाने असला, तरी अथर्ववेदात मात्र तो ‘एक विशिष्ट विद्या’ या अर्थाने आला आहे, असे दिसते. गोपथ ब्राह्मणासर्पवेद ,पिशाचवेद, असुरवेद, इतिहासवेदपुराणवेद यांंच्या निर्मितीची चर्चा आहे. शतपथ ब्राह्मणआश्वलायन गृह्यसूत्रांत पुराणांचा समावेश ‘स्वाध्याया’ त केलेला आहे.शतपथ ब्राह्मणाच्या मते (११·५·६·८) अश्वमेधातील पारिप्लव आख्यानाच्या नवव्या दिवशी ‘होता’ हा ऋत्विज पुराण सांगे. वर्षभर चालणाऱ्या  या यज्ञांत हे एकुण ३६ वेळा घडत असे.शांखायन श्रोतसूत्रआश्वलायन श्रौतसूत्र यांनीही पारिप्लवात होणाऱ्या पुराणपठनाचा निर्देश केला आहे. डॉ. हाझरा यांनी अश्वमेध यज्ञ आणि विशेषतः त्यातील पारिप्लव आख्याने ही पुराणांचे मूळ आहेत, असे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. या वैदिक काळातील पुराणांचे एकंदरीत स्वरूप काय होते, हे मात्र नेमके सांगता येत नाही.

प्रारंभीच्या विस्कळीत पुराणसाहित्यातून व्यासांनी पुराणसंहिता निर्माण केली, असे म्हटले जात असले, तरी प्रत्यक्षात पुराणे ही अनेकांनी रचलेली आहेत. व्यास हे एका व्यक्तीचे नाव नसून ते पदाधिकाऱ्याचे नाव आहे, असेही मानले जाते. स्वतः निर्माण केलेली पुराणसंहिता व्यासांनी आपला शिष्य रो (लो) महर्षण याला दिली. त्याने त्या संहितेवर आधारलेली नवी संहिता आपल्या सहा शिष्यांना दिली. त्या सहाजणांपैकी काश्यप, सावर्णी व शांशपायन या तिघांनी प्रत्येकी एक संहिता निर्माण केली. रोमहर्षणाच्या संहितेसह या चार संहिता झाल्या. यांतील प्रत्येक संहितेत प्रक्रिया, उपोद‌्घात, अनुषंग, व उपसंहार असे चार पाद होते. त्या सर्व संहितांचा आशय एक असला, तरी वेदांच्या शाखांप्रमाणे त्यांत पाठभेद होते. शांशपायनाखेरीज इतर तिंघाच्या संहितांत चार-चार हजार श्लोक होते. याच पुराणांच्या मूळ संहिता मानल्या जातात. परंतु सध्या त्यातील कोणतीच संहिता उपलब्ध नाही.

बदलत्या काळानुसार आणि स्थानिक, सांप्रदायिक व धार्मिक गरजेनुसार पुराणांच्या स्वरूपात बदल होत गेले. त्यांचे स्वरूप वेदांप्रमाणे अपरिवर्तनीय राहिले नाही. त्यांच्या संहितांतील काही भाग गाळले गेले, तर काही भाग त्यात नव्याने घुसडण्यात आले. पुराणांची श्लोकसंख्या १२ हजांरावरून ४ लाखांवर गेली, हे भविष्यपुराणाचे मत या दृष्टीने लक्षणीय आहे. अनेक पुराणांच्या मूळ स्वरूपात इतका बदल झाला, की आजची उपलब्ध पुराणे आणि त्याच नावाने प्राचीन ग्रंथ ही दोन्ही एक नव्हेत, असेही एक मत मांडण्यात आले आहे. अनेक पुराणांतून ज्यांचा उल्लेख येतो ती आदिपुराणे म्हणजे व्यासोक्त पुराणे असून, त्या आदिपुराणांवरुन इसवी सनाच्या प्रारंभी म्हणजेच विक्रमादित्यानंतर, हल्लीची पुराणे तयार करण्यात आली, असे वैद्य त्र्यं. गु. काळे यांनी म्हटले आहे. अनेक पुराणांतून विलक्षण साम्य आहे. उदा., मत्स्य पद्म, वायू ब्रह्मांड इत्यादींमध्ये उतारेच्या उतारे समान आढळतात. यावरून विल्सन, पा. वा. काणे इत्यादींनी असे मत मांडले आहे, की प्रारंभी पुराणांचा एक छोटासा गट होता त्यात १८ पुराणे नव्हती नंतर या गटातील पुराणांचेच वेगवेगळे अंश घेऊन त्यांचा विस्तार करण्यात आला आणि मग सध्याची १८ पुराणे तयार झाली.

पां. वा. काणे यांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून पुराणांच्या विकासाचे  काही टप्पे मानले आहेत. अथर्ववेद, शतपथ ब्राह्मण व प्राचीन उपनिषदातून उल्लेखिलेल्या पुराणाचे स्वरूप नेमके माहीत नाही परंतु त्या वेळीही इतिहासाची निगडित असे पुराण पवित्र मानले जात होते. हा पहिला टप्पा होय. तैत्तिरीय आरण्यकातील पुराणांच्या बहुवचनी उल्लेखावरून त्यावेळी कमीत कमी तीन पुराणे असल्याचे दिसते. आपस्तंबधर्मसूत्राने कोण्या एका पुराणातील चार श्लोक उद्‌घृत केले आहेत. तसेच एका ठिकाणी भविष्यपुराणाचा नावानिशी निर्देश केला आहे. याचा अर्थ इ.स.पू. पाचव्या-चौथ्या शतकांत एक भविष्यपुराण व दुसरे एखादे पुराण अस्तित्वात होते व त्यात सर्ग-प्रतिसर्गाची माहिती होती. हा दुसरा टप्पा होय. याज्ञवल्क्य स्मृतीने (१·३) पुराण ही एक विद्या वा धर्माचे एक साधन मानले आहे, त्या अर्थी त्या स्मृतीच्या आधी, म्हणजेच इसवी सनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकांच्या आधी काही पुराणे तयार झाली असली पाहिजेत. हा तिसरा टप्पा होय. त्यानंतर बहुतेक महापुराणे पाचव्या-सहाव्या शतकांपासून ते नवव्या शतकापर्यंतच्या काळात तयार झाली. हा चौथा टप्पा होय.सातव्या-आठव्या शतकापासून ते तेराव्या शतकापर्यंतच्या काळात  उपपुराणे तयार झाली. हा शेवटचा टप्पा होय.


पुराणांचा काळ : पुराणसंहिता कालानुसार सदैव बदलत गेल्यामुळे  त्यांचा काळ निश्चितपणे सांगता येत नाही. त्यांतील काही अंश वेदपूर्वकाळापासून चालत आले आहेत, तर काही अंश इंग्रंजांच्या अमदानीतही घुसडलेले आहेत. भिन्न भिन्न काळातील हे अंश पुराणसंहितेत मात्र एकमेकांच्या शेजारी शेजारी आढळतात. म्हणूनच पां. वा. काणे यांनी असे म्हटले आहे, की पुराणांच्या प्रत्येक श्लोकाचा काळ स्वतंत्रपणे ठरवला पाहिजे. पुराणांची निर्मिती व विकास यांची चर्चा करताना त्यांच्या काळाविषयी बरीचशी माहिती आली आहेच. या ठिकाणी, त्यांचा काळ ठरविण्यास साहाय्यक असे आणखी काही मुद्दे केवळ दिग्दर्शनार्थ मांडले आहेत. पुराणांची निर्मिती गेल्या एक हजार वर्षांत झालेली आहे, हे एके काळी प्रचलित असलेले मत आता अगदीच चुकीचे ठरले आहे. उलट, नवव्या-दहाव्या शतकानंतर महापुराणांंतून भर पडलेली असली, तरी त्या काळापूर्वी सर्व महापुराणे तयार झाली होती, असेच आता मानले जाते. पुराणांतर्गंत व पुराणबाह्य अशा अनेक पुराव्यांनी पुराणांचा काळ ठरवायला मदत होते. विशिष्ट पुराणात विष्णूच्या कोणकोणत्या अवतारांची चर्चा आहे, त्यात देशातील कोणकोणत्या जातीजमातींचे व वंशाचे निर्देश आहेत इ. गोष्टींवरून काळाविषयी अनुमान करता येते. आपस्तंबधर्मसूत्राने केलेला भविष्यपुराणांचा व बाणभट्टाने केलेला वायूपुराणाचा निर्देश, अग्निपुराणाने दंडीच्या काव्यादर्शातून घेतलेली माहिती इत्यादींवरून त्या त्या पुराणांचा काळ ठरवता येतो. पां. वा काणे  यांच्या मते मत्स्यपुराणाने आंध्र राजांचे अधःपतन नोंदवले पण गुप्तांचा निर्देश केला नाही, म्हणून ते तिसऱ्या शतकाच्या मध्यावरचे आहे वायूब्रह्यांडाने गुप्तांचा निर्देश केला पण कोणत्याही गुप्त राजाचे नाव सांगितले नाही, म्हणून त्याचा काळ इ.स ३२० ते ३२५ होय. बलदेव उपाध्यायांनी कालानुसार पुराणांच्या तीन श्रेणी मानल्या आहेत. वायू, ब्रह्यांड, मार्कंडेय, मत्स्यविष्णूपुराण ही प्राचीन म्हणजे इ.स १ ते ४ या शतकांतील, भागवत, कुर्म, स्कंद,व पद्म ही पुराणे मध्यकालीन म्हणजे इ.स ५०० ते ९०० या काळातील आणि ब्रह्मवैवर्त ,ब्रह्म लिंग ही अर्वाचीन म्हणजे इ.स.९०० ते १००० या काळातील होत. बहुतेक पुराणांतून अठराही पुराणांचा निर्देश येतो. याचा अर्थ सर्व पुराणे एकाच वेळी तयार झाली, असा मात्र नाही. कारण १८ पुराणांचा निर्देश करणारा हा भाग नंतर घुसडण्यात आला आहे.

सूत-समस्या : व्यासांचा शिष्य सूत रोमहर्षण हा सध्याच्या पुराणांचा निवेदक असल्याचे आढळते. काही वेळा त्याचा पुत्र सौती हा निवेदक आहे. ‘सूत’ या शब्दाचा ‘रथकार’ असा एक अर्थ असून क्षत्रिय पुरुष व ब्राह्मण स्त्री यांच्या पुत्रालाही सूत म्हटले जात असे. ब्राह्मणेतर सूत हा पुराणांचा वक्ता असल्यामुळे (आणि पुराणांतील नायक प्राधान्याने क्षत्रिय असल्यामुळे) पुराणे क्षत्रियांची आहेत, असे मत पार्जिटरने मांडले आहे. परंतु अनेक विद्वानांनी या मताचे खंडन केले आहे. सूत हा निःसंशय ब्राह्मण नव्हता, पौराणिकांची जुनी परंपरा नष्ट झाल्यावर पुराणग्रंथ वेदसंपन्न ब्राह्मणांच्या हाती न जाता, कमी दर्जाच्या उपाध्यायांच्या हाती गेले आणि त्यांनी उदरनिर्वाहासाठी त्यांचा विस्तार केला, असे ज्ञानकोशात म्हटले आहे. बलदेव उपाध्यायांनी लोमहर्षणाला ब्राह्मणच मानले आहे. परंतु त्यांच्या मते प्रारंभीच्या काळात पुराणांचे वाचन व श्रवण यांच्याशी वेदज्ञ ब्राह्मणांचा संबंध नव्हता. त्या काळी बहुजनसमाजच पुराणांचा श्रोतृवर्ग असल्यामुळे पुराणांचा वक्तादेखील त्यांच्यापैकीच असणे, हे योग्य होते. सूताला राजवंशाचे ज्ञान असल्यामुळे पुराणांतून वंश आणि वंश्यानुचरित येणे, हेही स्वाभाविकच होते. सूत रोमहर्षणाला ब्राह्मण मानण्याची पद्धत कौटिल्यापूर्वीच रूढ झाली होती. कौटिल्याने पौराणिक सूत हा क्षत्रिय व ब्राह्मण ह्यांच्याहून श्रेष्ठ असून क्षत्रियपुत्र सूताहून तो वेगळा असतो, असे म्हटले आहे. पौराणिक सूताचा जन्म यज्ञातून झाल्याच्या कथाही आढळतात. पां. वा. काणे यांच्या मते या कथा कौटिल्याच्या आधीच्या काळात तयार झाल्या असून त्या काल्पानिक आहेत. शौनकासारख्या ब्राह्मण ऋषींनी एका प्रतिलोमज सूताकडून पुराणे ऐकली, हे ब्राह्मणांना कमीपणाचे वाटू लागले (आधी तसे वाटत नव्हते) तेव्हा या कथा तयार झाल्या, असे ते म्हणतात.

प्राकृत पुराणांचे संस्कृतीकरण : पार्जिटरच्या मते मूळची क्षत्रिय परंपरेतील पुराणे ही प्रथम जुन्या साहित्यिक प्राकृतात लिहिलेली होती. नंतरच्या काळात ब्राह्मणांकडून त्यांचे संस्कृतमध्ये रूपांतर करण्यात आले. हे करताना त्यांनी भूतकाळाची रूपे भविष्यकाळी केली वृत्तांचा भंग होऊ दिला नाही पादपूरणार्थ अव्यये वापरली आणि क्वचित वाक्यरचना बदलली. पार्जिटर याने या मताला सहा कारणे दिलेली असून, अनेक विद्वानांनी त्याच्या मताचे खंडन केले आहे. नंतरच्या काळात पुराणांवर प्राकृताचा प्रभाव पडलेला असला, तरी पुराणे मूळची प्राकृत नव्हेत, असे त्यांचे म्हणणे आहे.

पुराणांचे वर्गीकरण : विशिष्ट पुराणाने कोणत्या देवतला प्राधान्य दिले आहे, ते पाहून पुराणांचे वैष्णव, शैव, ब्राह्म इ. वर्ग पाडले जातात. तमिळ ग्रंथांत व स्कंदपुराणात पुराणांचे शैव, वैष्णव,ब्राह्म, आग्नेय आणि सावित्र(सूर्याची) असे वर्गीकरण आढळते. मत्स्यपुराणानुसार वैष्णव पुराणे ही सात्त्विकब्रह्मदेव आणि अग्नी यांचे वर्णन करणारी राजस शिवाचे वर्णन करणारी तामस आणि सरस्वती व पितर यांचे वर्णन करणारी पुराणे ही संकीर्ण होत. गरुडपुराणाने सात्त्विक पुराणांचे आणखी तीन प्रकार पाडले असून मत्स्यकुर्म यांना सत्त्वाधम वायूपुराणाला सात्त्विकमध्यम आणिभागवत,गरुड विष्णूपुराण यांना सात्त्विक-उत्तम म्हटले आहे परंतु प्रत्यक्षात कूर्मवायु ही पुराणे शैव असल्यामुळे ही विभागणी शास्त्रशुद्ध म्हणता येत नाही. पद्मपुराणाने वर्गीकरण पुढीलप्रमाणे दिले आहे :

सात्तविक पुराणे : विष्णु, नारदीय,भागवत,गरुड, पद्म, वराह. 

राजस पुराणे : ब्रह्मांड, ब्रह्मवैवर्त, मार्कंडेय, ब्रह्म, वामन, भविष्य

तामस पुराणे : मत्स्य, कुर्म, लिंग, शिव, अग्नि, स्कंद.

ब्रह्मांड, मत्स्य, वायू विष्णू ही पुराणे प्राचीन कारण त्यांत पुराणांची पंचलक्षणे आढळतात आणि इतर पुराणे ही प्राचीनोत्तर, अशी एक विभागणी आढळते. हरप्रसाद शास्त्रींनी पुराणांचे पुढीलप्रमाणे सहा वर्ग पाडले आहेत. गरुड, नारद आणि अग्नि ही विश्वकोशात्मक, तर पद्म, भविष्यस्कंद ही तीर्थे व व्रते यांचे वर्णन करणारी आहेत.भागवत ,ब्रह्म आणि ब्रह्मवैवर्त यांच्या दोन-दोन आवृत्या झाल्या आहेत परंतु त्यांचा मूळ भाग टिकून राहिला आहे. ब्रह्मांड व नामशेष झालेले वायु ही कलियुगातील राजांची माहिती देणारी, म्हणून ऐतिहासिक आहेत. हरप्रसाद शास्त्रींच्या मते मूळ वायुपुराण नामशेष झाले असून, त्याचा फार थोडा भाग उपलब्ध आहे. वामनलिंगमार्कंडेय ही सांप्रदायिक आहेत. वराह, मत्स्यकूर्म ही पुराणे अत्यंत रूपांतरित झाल्यामुळे त्यांचे मूळचे रूप उरलेलेच नाही.

पुराणांची लक्षणे : पुराणे पाच लक्षणांनी युक्त असतात, असे अनेक पुराणांत आणि विशेषतः अमरकोशात म्हटले आहे. सर्ग (निर्मिती), प्रतिसर्ग ( प्रलयानंतर पुननिर्मिती), वंश (देवता, चंद्र-सूर्य इत्यादींच्या वंशाची माहिती), मन्वंतरे (मनूचे विशिष्ट कालखंड) आणि वंशानुचरित वा वंश्यानुचरित (सूर्य, सोम इ. क्षत्रिय वंशांतील व्यक्तींचे इतिहास) ही ती पाच लक्षणे  होत, ‘वंशानुचरित’ याऐवजी ‘भूम्यादेः संस्थान’ (भूगोल) असा पाठभेदही आढळतो. प्रत्यक्षात मात्र या पंचलक्षणांना पूर्णपणे अनुसरणारे एकही पुराण नाही. विष्णुपुराण तेवढे या लक्षणांना बऱ्याच प्रमाणात अनुसरते पण त्यातही इतर अनेक विषय़ आहेत. काही पुराणांनी पंचलक्षणांची पूर्णपणे उपेक्षा केली आहे, तर काही पुराणांत पंचलक्षणांच्या जोडीने इतर अनेक विषय आले आहेत. पुराणांच्या एकूण भागांपैकी ३ टक्क्यांहूनही कमी भाग पंचलक्षणांच्या चर्चेला उपलब्ध झाला आहे, यावरून पंचलक्षणांचे गौणत्व ध्यानात येते. पुराणांच्या व्याख्येत पंचलक्षणांखेरीज इतर विषयांचा समावेश करून घेण्यासाठी भागवत आणि ब्रह्मवैवर्त यांनी महापुराणांची लक्षणे दहा असतात व उपपुराणांची पाच असतात, असे म्हटले आहे. भागवताच्या बाराव्या स्कंधातील दहा लक्षणे अशी : सर्ग, विसर्ग (प्रलय, प्रलयानंतर पुनर्निर्मिती वा विविध जीवांची निर्मिती), वृत्ती (उदर-निर्वाह), रक्षा (विश्वरक्षणासाठी ईश्वराने घेतलेले अवतार), अन्तरे (मन्वंतरे), वंश, वंशानुचरित, संस्था (प्रलय), हेतू (निर्मितीला कारणीभूत होणारा अज्ञानी जीव) आणि अपाश्रय (जीवांचा आश्रय असलेले ब्रह्म). भागवताच्या दुसऱ्या स्कंधातील दहा लक्षणे अशी: सर्ग, विसर्ग, स्थान (वैकुंठविजय म्हणजे ईश्वराचा विजय), पोषण (भगवंताचा अनुग्रह), ऊती (कर्मवासना), मन्वंतरे, ईशानुकथा,निरोध (प्रलय), मुक्ति व आश्रय (परब्रह्म). परंतु प्रत्यक्ष पुराणांत आढळणारे सर्व विषय या दहा लक्षणांतही सामावले जात नाहीत.कौटिलीय अर्थशास्त्रावरील (१·५) जयमंगला या टीकेत सृष्टी, प्रवृत्ती, संहार, धर्म आणि मोक्ष ही पाच पुराणलक्षणे आहेत, असे सांगणारा एक श्लोक उद्‌घृत केलेला आढळतो.


पुराणांचे विषय : कालक्रमानुसार पुराणांचे विषय सदैव बदलत गेले आहेत. पुराणांच्या संहिता तयार होण्यापूर्वी लोकसाहित्याच्या स्वरूपातील पुराणात प्रामुख्याने प्राचीन आख्याने होती. व्यासांनी आख्याने, उपाख्याने, गाथा व कल्पशुद्धी या विषयांच्या आधारे पुराणसंहिता तयार केल्या. आख्यान व उपाख्यान ही दोन्ही कथानकेच असतात. स्वतः पाहिलेल्या घटनेचे वर्णन हे आख्यान  व ऐकलेल्या घटनेचे वर्णन हे उपाख्यान असे एक मत असून, दुसऱ्या एका मतानुसार आख्यान हे आकाराने मोठे आणि उपाख्यान छोटे असते. ज्यांचा कर्ता कोण आहे, हे माहीत नाही, अशी जी अनेक परंपरागत व लोकप्रसिद्ध पद्ये वैदिक वाङ्‌मयात व पुराणांत आढळतात, त्यांना गाथा म्हणतात. त्यांत प्रसिद्ध राजांच्या पराक्रमांची आणि दानांची वर्णने असतात. ऋग्वेदसंहितेतील अशा गाथांना ‘नाराशंसी’ असे म्हणतात. या गाथांना ‘श्लोक’ असेही म्हटले जाई. कल्पशुद्धी या शब्दाच्या अर्थविषयी मतभेद असून त्याचे श्राद्धकल्प, धर्मशास्त्रातील सर्व विषय इ. अर्थ करण्यात आले आहेत. ‘कल्पशुद्धी’ ऐवजी ‘कल्पजोक्ती’ असा पाठभेदही आढळतो व निरनिरळ्या कल्पांत निर्माण झालेल्या घटनांची वर्णने असा त्याचा अर्थ केला जातो.

पुराणांचे स्वरूप सदैव बदलतच होते. पुढे त्यांची जी पाच लक्षणे सांगितली गेली, ती म्हणजे पुराणांचे त्या वेळचे विषयच होत. पुराणांत विश्व, देवता, मानव इत्यादींच्या सर्गाची म्हणजे निर्मितीची वर्णने आहेत. या सर्गविद्येवर सांख्य तत्त्वज्ञानाचा प्रभाव असला, तरी बहुतेक वेळा सांख्य व वेदान्त यांच्या तत्त्वांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न आहे. पुराणांनी प्राकृत ३, वैकृत ५ व प्राकृत-वैकृत १ असे एकूण ९ सर्ग मानलेले आहेत. ब्रह्मा, विष्णू वा शिव यांना विश्वनिर्मिता मानणाऱ्या विविध कथा पुराणांत आहेत. पुराणांनी प्रतिसर्गाचे वर्णन करताना नैमित्तिक, प्राकृत, नित्य व आत्यन्तिक असा चार प्रकारचा प्रलय सांगितलेला आहे. ब्रह्मदेवाचा दिवस संपला की नैमित्तिक, त्याचे आयुष्य संपले की प्राकृत, पदार्थांत प्रतिक्षणी होणारे परिवर्तन म्हणजे नित्य आणि अज्ञानाचा नाश झाल्याबरोबर आत्यन्तिक असे ते चार प्रलय आहेत.

मन्वंतर ही कालमापनाची एक पौराणिक संकल्पना आहे. मानवांचे सहा महिने म्हणजे एक दिव्य (देवाचा) दिवस आणि मानवांचे तितकेच महिने म्हणजे एक दिव्य रात्र होय. अर्थातच मानवांची ३६० वर्षे म्हणजे देवांचे एक वर्ष होय. त्रेचाळीस लाख वीस हजार मानवी वर्षे किंवा बारा हजार दिव्य वर्षे म्हणजे एक महायुग होय.  ते महायुग कृत (वा सत्य), त्रेता, द्वापर व कली अशा चार युगांत विभागले जाते. त्यांचा अवधी अनुक्रमे ४,८०० ३,६०० २,४०० व १,२०० दिव्य वर्षे इतका म्हणजे ४:३:२:१ या प्रमाणात आहे. या युगांची मानवी वर्षे अनुक्रमे १७,२८,००० १२,९६,००० ८,६४,००० आणि ४,३२,००० अशी होतात.युगांची कल्पना वारंवार बदलत गेली आहे[→ युग]. एक हजार महायुगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि तितकीच महायुगे म्हणजे त्याची एक रात्र होय. त्याचे आयुष्य शंभर वर्षांचे असते. त्याच्या दिवसाला एक ð कल्प म्हणतात. अशा एका कल्पात १४ मन्वंतरे असतात. प्रत्येक मन्वंरात ७१ महायुगे म्हणजे ३० कोटी ६७ लाख २० हजार मानवी वर्षे असतात. सर्व मन्वंतराची एकूण ९९४ महायुगे होतात. एक मन्वंतर संपल्यानंतर दुसरे येईपर्यंत प्रत्येक वेळी जो संधिकाळ येतो, त्याची एकूण ६ महायुगे होतात. प्रत्येक मन्वंतरामध्ये मनू, सप्तर्षी, देव, इंद्र व मनुपुत्र हे पाच अधिकारी असतात. भागवताने विष्णूचा अंशावतार हा सहावा अधिकारी मानलेला आहे. मन्वंतर बदलेले की पहिले अधिकारी जाऊन त्याच म्हणजे मनू वगैरे नावांचे दुसरे अधिकारी येतात. चौदा मन्वंतरांमध्ये येणारे मनू क्रमाने पुढीलप्रमाणे आहेत: स्वायंभुव, स्वारोचिष, उत्तम, तामस, रैवत, चाक्षुष, वैवस्वत, सावर्णी, दक्षसावर्णी, ब्रह्मसावर्णी, धर्मसावर्णी, रुद्रसावर्णी, देवसावर्णी (किंवा रुची) आणि इंद्रसावर्णी(वा भौम). उत्तम, तामस व रैवत हे प्रियव्रताचे म्हणजे स्वायंभुव मनूच्या ज्येष्ठ पुत्राचे मुलगे होते. सध्या सातवे म्हणजे वैवस्वत मनूचे मन्वंतर सुरू आहे. सध्याच्या ब्रह्मदेवाला ५१ वे वर्ष चालू आहे. त्यातील पहिला दिवस (कल्प) चालू असून त्याचे नाव श्वेतवाराहकल्प असे आहे.

वंश व वंश्यानुचरित हे पुराणांचे दोन महत्त्वाचे विषय होत. विशेषतः क्षत्रियवंश व त्या वंशातील राजांच्या चरित्रांची वर्णने, हे या विभागाचे वैशिष्ट्य होय. ही वर्णने म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाची मांडणी करण्यासाठी खात्रीलायक नसला, तरी एक महत्त्वाचा पुरावा आहे. मत्स्य, वायू, ब्रह्मांड, विष्णु, भागवत, गरुडआणि भविष्य या सात पुराणांतून राजवंशांची माहिती आहे. पुराणांनी कालाच्या दृष्टीने राजांचे अतीत (भूतकालीन), वर्तमान व भविष्य असे तीन प्रकार पाडले आहेत. पुराणे व्यासांनी रचल्याची आणि पुन्हा सूत रोमहर्षणाने सांगितल्याची परंपरा द्दढ झालेली असल्यामुळे त्यांच्या पूर्वीचे राजे अतीत, त्यांच्या वेळचे राजे वर्तमान व नंतरचे राजे भविष्यकालीन, असे मानले गेल्याचे दिसते. महाभारतयुद्धापूर्वीचे  राजे, पांडव, त्यांचे काही वंशज व त्यांचे समकालीन राजे हे अतीत मानले आहेत. पुराणे प्रत्यक्ष सांगितली गेली तेव्हा वर्तमान असलेल्या राजांमध्ये सोमवंशी अधिसो (सी) मकृष्ण हा एक होता. अर्जुनाचा पणतू असलेल्या जनमेजयाचा तो पणतू होता. सूर्यवंशातील बृहद् बलाचा वंशज दिवाकर आणि मगध देशाच्या जरासंधाचावंशज सेनाजित हेही वर्तमान राजे होते. या तिघांनंतरचे म्हणजे कलियुगातील राजे हे भविष्यकालीन म्हटले आहेत.

पुराणांनी अतीतकालीन राजांच्या वंशांच्या प्रारंभ वैवस्वत मनूपासून मानला आहे. स्वायंभुव मनूच्या उत्तानपाद व प्रियव्रत या पुत्रांनी आणि त्यांच्या वंशजांनी देखील राज्ये केली. परंतु वैवस्वत मनू हाच मुख्य वंशप्रवर्तक होता. कारण सूर्य, सोम व सौद्युम्न या तीन प्रमुख वंशांच्या प्रवर्तनास तोच कारणीभूत झाला होता. विवस्वान (सुर्य) हा ब्रह्मदेवाचा पुत्र होता आणि त्या विवस्वानाचा पुत्र असलेला मनू हा सूर्यवंशाचा पहिला राजा होता. त्याला नऊ पुत्र व इला नावाची कन्या होती. इक्ष्वाकू हा त्याचा ज्येष्ठ पुत्र होता. म्हणूनच या वंशाला सूर्य, मानव व ऐक्ष्वाकव अशी नावे मिळाली आहेत. अयोध्या ही इक्ष्वाकूची राजधानी होती. नाभानेदिष्ठ, कारुष, धृष्ट, नाभाग, शर्याती, नरिष्यन्त, पृषध्र व प्रांशू हे मनूचे इतर आठ पुत्र असून त्यांच्यापैकी बहुतेकांनी राज्ये केली. इक्ष्वाकूच्या वंशवृक्षाचे वर्णन अनेक पुराणांनी केले आहे. वैवस्वत मनूपासून ते महाभारतकालीन बृहदबलापर्यंत पुराणांनी या वंशातील जवळजवळ शंभर राजांची नावे दिली आहेत. इक्ष्वाकूच्या निमी, दंड, विकुक्षी इ. पुत्रांनी राज्ये स्थापन केली. याच वंशात मांधाता, हरिश्चंद्र, सगर, भगीरथ, रघु, राम इ. प्रसिद्ध राजे होऊन गेले. अत्रिपुत्र सोम हा ब्रह्मदेवाचा नातू होता आणि सोमाच्या बुध या पुत्राशी मनूची मुलगी इला हिचा विवाह झाला होता. त्यांचा मुलगा पूरूरवा याने प्रतिष्ठान (प्रयाग) येथे राज्य केले. त्याच्यापासून झालेल्या वंशाला सोम, चंद्र, ऐल इ. नावे मिळाली. पूरूरव्याच्या पुत्रांपैंकी आयूने प्रतिष्ठान येथे व अमावसूने कान्यकुब्ज येथे राज्य केले. आयूचा ज्येष्ठपुत्र नहुष आणि नहुषाचा पुत्र ययाती होता. ययातीनंतर त्याचा कनिष्ठ पुत्र पुरू हा प्रतिष्ठान येथे गादीवर बसला. ययातीचे यदू, तुर्वसू, द्रुह्यू, अनू व पुरू असे एकूण ५ पुत्र होते आणि त्यांच्यापासून प्रसिद्ध असे ५ क्षत्रिय वंश सुरू झाले.  यदू हा यादव वंशाचा, तर पूरू हा पौरवंशाचा प्रवर्तक ठरला. यादवांतच हैहय, अंधक, वृष्णी इ. शाखा निर्माण झाल्या. वृष्णिशाखेत कृष्ण, बलराम वगैरे, तर हैहयशाखेत कार्तवीर्य अर्जुनासारखे वीर निर्माण झाले. पौरववंशात दुष्यन्त, भरत, कुरू, कौरव, पांडव इ. वीर निर्माण झाले. एका पुराणकथेनुसार मनूची कन्या इला ही शिवकृपेने पुरुष बनली. तोच सुद्युम्न होय. तो पूर्वेकडे मगध देशात गेला आणि त्याच्या गय, उत्कल व हरिताश्व नावाच्या पु्त्रांनी तिकडे राज्ये केली. त्या तिघाचे वंशज सौद्युम्न म्हटले गेले. अशा रीतीने, वैवस्वत मनूच्या इक्ष्वाकू, इला व सुद्युम्न या अपत्यांपासून तीन वंश सुरू झाले. पार्जिटरच्या मते मानव हे द्रविडी, ऐल हे आर्य व सौद्युम्न हे मुंडा लोक होत. 

या भूतकालीन राजांच्या वर्णनापेक्षा पुराणांतील भविष्यकालीन राजांची वर्णने अधिक विश्वसनीय आहेत, असे मानले जाते. पां.वा. काणे यांच्या मते पुराणांनी भविष्यकालीन राजांचे दोन गट पाडले आहेत. पहिल्या गटात ऐक्ष्वाक, ऐल व मागध वंशांतील राजांचे वर्णन होते. उदा., ऐक्ष्वाक वंशातील दिवाकरापासून ते सुमित्रापर्यंतच्या आणि ऐल वंशातील अधिसीमकृष्णापासून ते क्षेमकापर्यंतच्या राजांचे वर्णन आढळते. या राजांची वर्णने बहुधा प्राचीन भविष्यपुराणात होती. सध्याच्या पुराणांनी त्या पुराणातूनच घेतली असावीत. राजांच्या दुसऱ्या गटात प्रद्योत, शुंग, आंध्र, शक इ. वंशांतील राजे होते. या राजांची माहिती प्राचीन भविष्यपुराणात नव्हती. कारण त्याच्या रचनेच्या वेळी (इ.स.पू.सु ५००–४००) ते राजे अस्तित्वातच नव्हते. सध्याच्या पुराणांनी त्यांची माहिती तोंडी वा अन्य परंपरांतून घेतली असावी. सध्याच्या पुराणांत पहिल्या गटातील राजाविंषयी अनुवंश श्लोक व गाथा आहेत परंतु दुसऱ्या गटातील राजांविषयी नाहीत, यावरूनही हे स्पष्ट होते. 

भविष्यकालीन राजांची वर्णने प्रामुख्याने मगध राज्याशी संबंधित आहेत. आपण फक्त प्रमुख राजांची वर्णने केली आहेतसर्व राजांची नव्हे, असे पुराणांनी म्हटले आहे. जरासंधाच्या वंशातील बृहद्रथापासून बार्हद्रथवंशाचे राज्य सुरू झाले आणि त्याच्या वंशातील ३२ राजांनी मगधावर एक हजार वर्षे राज्य केले. रिपुजन्य हा या वंशातील शेवटचा राजा होता. पुलक नावाच्या त्याच्या मंत्र्याने त्याचा वध करून प्रद्योतवंशाची स्थापना केली.  या वंशातील पाच राजांनी १३८ वर्षे राज्य केल्यानंतर शिशुनागाने त्यांचे राज्य जिंकले. शिशुनाग वंशातील १० राजांनी ३२१ वर्षे राज्य केल्याचे मत्स्यपुराणात म्हटले आहे. या वंशातील शेवटचा राजा महापद्मनंद हा होता. अभिमन्यूच्या पुत्र परीक्षित याच्या जन्मानंतर १०१५, १०५०, १११५ वा १५०० वर्षांनी नंदराजाचा राज्यभिषेक झाला, असे वेगवेगळ्या पुराणांनी सांगितले आहे. मौर्यवंशीयचंद्रगुप्ताने नंदवंशाचा नाश केला. मौर्यवंशात चंद्रगुप्त, अशोक इ. राजे होऊन गेले. राजांच्या नावांविषयी पुराणांत मतभेद आहेत.परंतु मौर्यांचे राज्य १३७ वर्षे टिकले, याबाबतीत एकमत आहे. मौर्यवंशाचा शेवटचा राजा बृहद्रथ हा होता. त्याचा सेनापती असलेल्या शुंगवंशीय पुष्पमित्राने त्याचा  वध करून राज्य घेतले. पुष्पमित्रापासून ते देवभूमी वा देवभूतीपर्यंत शुंगवंशीय राजांनी १२० वर्षे राज्य केले. देवभूतीला मारून त्याचा अमात्य वसुदेव याने कण्ववंशाचे राज्य स्थापन केले. या वंशातील चार राजांनी ४५ वर्षे राज्य केल्यावर आंध्र राजांनी कण्वांचा पाडाव केला. पुराणांनी सातवाहन राजांनाच आंध्र म्हटले आहे, मत्स्यपुराणाच्या मते त्यांनी ४५० वर्षे, तर वायुपुराणाच्या मते ३०० वर्षे राज्य केले. सिमुक नावाच्या राजाने त्यांचे राज्य स्थापन केले होते. मत्स्यपुराणात आंध्र राजांच्या वृत्तांत व्यवस्थित दिलेला असून पार्जिटरने त्याच्याच आधारे ३० आंध्र राजांची यादी दिलेली आहे. यानंतर गुप्त राजांचे राज्य आल्याचा पुराणांनी उल्लेख केला आहे, परंतु त्यांची नावे व इतर तपशील मात्र दिलेला नाही. पुराणांनी यांखेरीज इतर अनेक वंशांची वर्णने केलेली आहेत. 

सध्याच्या पुराणातून गुप्त व त्यानंतरच्या राजवंशांचे वर्णन का आलेले नाही, हे समाधानकारक रीत्या सांगता येत नाही, असे म्हणून पां. वा. काणे यांनी त्याविषयी काही संभाव्य कारणे सांगितली आहेत. गुप्तांचे राज्य सुरू होण्यापूर्वीच मत्स्यादी काही पुराणांचा मूळ भाग तयार झाला होता आणि वायु व ब्रह्मांड यांसारखी पुराणे त्यांचे राज्य चालू असताना लिहिली गेली, हे एक कारण होय. दुसरे असे की, अनेक पुराणे इसवी सनाच्या पाचव्या शतकात वा त्यानंतर लिहिली गेली. त्या वेळी उत्तर भारतात हूण वगैरेंची आक्रमणे चालू होती. तसेच, बौद्ध धर्म व इतर काही संप्रदायांचा प्रचार वाढला होता. अशा वेळी सर्वसामान्यांना बौद्ध धर्मापासून परावृत्त करून त्यांना परंपरेवर आधारलेली एक नवी विचारसरणी देणे, हे पुराणकर्त्यांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे काम होते. म्हणून त्यांनी वंशावळींची उपेक्षा केली. वंशावळी सांगण्याचे काम ज्यांच्याकडे होते, त्या सूतांना कनिष्क, कुशाण, हुण इत्यादींनी प्रोत्साहन  दिले नसावे आणि कदाचित सूतांनी बौद्ध धर्म स्वीकारून जातककथा सांगण्यास प्रारंभ केला असावा आणि त्यामुळे त्यांचे राजवंशकथनाचे काम बंद झाले असावे. या बाबतीत पार्जिटरचे मत वेगळेच आहे. मूळची सूतपरंपरेतील पुराणे पुढच्या काळात ब्राह्मणांच्या हाती गेली आणि त्यांना इतिहासाच्या अध्ययनाची दृष्टीच नसल्यामुळे त्यांनी जरी पूर्वीच्या वंशावळी पुराणात राहू दिल्या, तरी त्यांत नवी भर मात्र टाकली नाही असे त्याने म्हटले आहे. 


धर्म हे पुराणांचे एक लक्षण असल्याचे जयमंगला टीकेतील मत यापूर्वी उल्लेखिले आहेच. सध्या उपलब्ध असलेल्या पुराणांतून धर्मशास्त्रांतर्गत विषयांची विपुल चर्चा आहे. वर्तमान हिंदू धर्माचे स्वरूप प्रामुख्याने पुराणाधिष्ठित असून, हिंदू धर्माला अंगभूत असलेल्या अंसख्य तात्त्विक व व्यावहारिक संकल्पना पुराणांनी विशद केल्या आहेत. त्यांनी वैदिक धर्मातील यज्ञादींचे महत्त्व कमी करून हिंदू धर्माला एक नवे वळण देण्याचे काम केले. वैदिक मंत्रांच्या बरोबरीने पौराणिक मंत्र वापरले जाऊ लागले. देवपूजा, राज्याभिषेक, मूर्तिस्थापना इ. बाबतींत पौराणिक पद्धत पुढे आली. पुराणांनी पुण्यप्राप्तीचे अनेक सोपे मार्ग दाखविले. त्यांनी विविध प्रकारची व्रते व उपासना सांगितल्या. उपवासांचे महत्त्व वाढवले. तीर्थक्षेत्रांच्या महिमा सांगणारी स्वतंत्र माहात्म्ये अनेक पुराणांतून आहेत. तीर्थयात्रा व तीर्थस्नान यांचे महत्त्व वाढले. भक्तिचे माहात्म्यही पुराणांनी वाढविले. भक्तीचे लौकिकी, वैदिकी व आध्यत्मिकी मानसी, वाचिकी व कायिकी आणि सात्त्विकी, राजसी व तामसी इ.विविध प्रकार करण्यात आले. जप, नामस्मरण, मूर्तिपूजा, मंदिराची निर्मिती इत्यादींना पुराणांकडून प्रोत्साहन मिळाले. पूर्तधर्म म्हणजेच तलाव, विहिरी, धर्मशाळा, अन्नछत्रे इ.निर्माण करून परोपकार करणे, हे पुण्यकारक असल्याचे त्यांनी सांगितले. दान-विशेषतः अन्नदान- हे अत्यंत पुण्यकारक मानून त्याचे महत्त्व वाढवले. श्राध्दांची आणि त्या वेळच्या अन्नदानांची वर्णने करण्यात आली. धर्म, अर्थ, काम व मोक्ष या पुरुषार्थांचे विवेचन केले. चार वर्ण व चार आश्रय यांच्या कर्तव्यांची चर्चा केली. निष्काम कर्मयोगाचेही महत्त्व सांगितले. ईश्वरी अवतारांचे वर्णन हा पुराणांचा एक महत्त्वाचा विषय आहे. विष्णूचे दहा अवतार प्रसिद्धच आहेत. त्यांखेरीज त्याचे १२, १६, २२, २३, २४, ३२, वा असंख्य अवतार आहेत, असे पुराणांनी मानले आहे. अवतारांच्या नावांविषयी व संख्येविषयी पुराणात खूप मतभेद आहेत. विष्णुपुराणाच्या मते प्रत्येक अवतारात विष्णूबरोबर लक्ष्मीही असते. कूर्मपुराणात शिवाच्या २८ अवतारांची चर्चा आहे. पुराणकालात इंद्रादी प्रमुख वैदिक देवता मागे पाडल्या. विष्णू, शिव, ब्रह्मा, गणपती व सूर्य या पुराणांतील महत्त्वाच्या देवता होत. सांख्य, योग, वेदान्त इ. दर्शनातील तत्त्वांचे विवेचनही पुराणांतून आले आहे. जैन, बौद्ध व चार्वाक ही दर्शने नास्तिक असल्याचे पुराणांचे मत असून असुरांची दिशाभूल करण्यासाठी विष्णूनेच मायामोहाचे रूप घेऊन ही दर्शने प्रवृत्त केली, असे त्यांनी म्हटले आहे. भागवत, पांचरात्र, पाशुपत, कापालिक, तांत्रिक इत्यादींच्या संप्रदायांची वर्णनेही पुराणांतून आली आहेत. धर्मशास्त्रातील या विविध विषयांचे विवेचन करताना शेकडो पुराणकथांचा आधार घेण्यात आला आहे. 

पुराणांचे विषय धर्मशास्त्रापुरतेही मर्यादित राहिले नाहीत. नारद, गरुड, अग्नि विष्णूधर्मोत्तर यांसारखी काही पुराणे व उपपुराणे ही विश्वकोशात्मक व सर्वस्पर्शी बनली आहेत. राजधर्म, काव्यशास्त्र, छंदःशास्त्र, व्याकरण, आयुर्वेद, पशुवैद्यक, वृक्षायुर्वेद, धनुर्वेद, धातुशास्त्र, रत्नविद्या, शिल्पशास्त्र, नृत्यसंगीतादी कला, वास्तुशास्त्र, मूर्तिशास्त्र, ज्योतिष, गणित, सामुद्रिकशास्त्र इ. विषयांची चर्चा अनेक पुराणांनी केली आहे. अनुलेपनविद्या (पायाला लेप लावल्यावर अर्ध्या दिवसात हजारो योजन चालू शकण्याची विद्या), वशीकरणविद्या, अंतर्धानविद्या, धन कमी पडू न देणारी पद्मिनीविद्या, स्वेच्छारूपधारिणीविद्या, त्रैलोक्यविजयविद्या इ. विविध विद्यांची माहिती अनेक पुराणांतून आली आहे. 

ब्रह्मांडरचना व भूगोल हाही पुराणांचा एक महत्त्वाचा विषय आहे. ब्रह्मांडात १४ भुवने असून त्यांपैकी पृथ्वीच्या वर सहा व खाली सात भुवने आहेत, अशी कल्पना होती. खालच्या भुवनांना पाताळ म्हणतात. त्याखेरिज स्वर्ग, नरक, ब्रह्मलोक, पितृलोक इत्यादींची वर्णनेही आढळतात. भारतीयांनी अती प्राचीन काळी केलेल्या भौगोलिक परिक्रमणाच्या सूचक कथा पुराणांत आढळतात, असे एक मत आहे. पुराणांतील तीर्थक्षेत्रांची वर्णनेही भौगोलिक ज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. पौराणिक भूगोल यथार्थ आहे फक्त त्याचा पूर्ण अर्थ अजून लागलेला नाही, असे बलदेव उपाध्याय मानतात. पुराणांनी केलेल्या कुशद्वीपातील नीलनदीच्या वर्णनावरून कॅप्टन स्पीक यांनी ईजिप्तमधील नाईल नदीच्या उगम शोधून काढला, या ऐतिहासिक घटनेमुळे पुराणांतील वर्णनांचे महत्त्व वाढले आहे. तरीदेखील पुराणांतील भूगोलवर्णने बऱ्याच प्रमाणात पुराणकथात्मक वाटतात. पुराणांनी जंबुद्वीपातील इलावृत्तवर्षात असलेला मेरू पर्वत ही पृथ्वीची नाभी मानली आहे. पृथ्वीवर जम्बुद्वीप वगैरे सात द्वीपे असून प्रत्येकाभोवती एक समुद्र आहे, अशी पौराणिक कल्पना होती. भारत वर्षाचे नऊ खंड मानले आहेत. पर्वतांचे वर्षपर्वत व कुलपर्वत असे दोन प्रकार पाडले आहेत. पुराणांतील मय-असुर म्हणजे मेक्सिकोतील ‘मय’ लोक, पुराणांतील आस्तिक या शब्दापासून मेक्सिकोतील ‘अज‌्टेक’ लोकांचे नाव तयार झाले, असुरदेश म्हणजे ॲसीरिया, बर्बरदेश म्हणजे बॅबिलोनिया, रम्यकवर्ष म्हणजे इटली, इक्षुसमुद्र म्हणजे काळा समुद्र,स्कंदनाभी म्हणजे स्कँडिनेव्हिया इ. प्रकारे समीकरणे मांडण्याचा प्रयत्न विद्वानांनी केला आहे. 

 पुराणांचा इतर ग्रंथांशी संबंध : पुराणांचा व वेदांचा संबंध अनेक प्रकारांनी दाखवला जातो. गोपथब्राह्मणात ‘पुराणवेदा’चा(पुराणरूपी वेदाचा) निर्देश असून छांदोग्य उपनिषदात ‘इतिहासपुराण'(इतिहास आणि पुराण) हा पाचवा वेद असल्याचे म्हटले आहे. सायणाचार्यांनी इतिहासपुराण हा अथर्ववेदाचा उपवेद असल्याचे मानले आहे. बलदेव उपाध्याय यांच्या मते पुराणे ही अथर्ववेदाप्रमाणेच लोकजीवनाशी संबंधित असल्यामुळे ती अथर्ववेदाच्या परंपरेतच निर्माण झाली आहेत. पुराणांद्वारे वेदांचे उपबृंहण (विवेचन) करावे, असे मानले जाई.  वेदांचे पूरण करते ते पुराण, अशी एक व्युत्पत्तीही देण्यात आली आहे. प्रत्येक वेदाची ब्राह्मणे व उपनिषदे जशी वेगवेगळी आहेत, तशीच प्रत्येक वेदाची पुराणेही वेगवेगळी होती आणि ऋग्वेद, यजुर्वेदसामवेद याची अनुक्रमे अग्नि, वायू सूर्य ही पुराणे होती, असे बी.सी. मुजुमदारांचे मत आहे. पुराणे लोकप्रिय असली, तरी श्रुतिस्मृतींपेक्षा त्यांचे प्रामाण्य कमी मानले जाई. वेदानुसारी पुराणेच तेवढी प्रमाण मानण्याकडे लोकांचा कल होता. मीमांसक आणि वेदान्ती यांनी पुराणांना स्मृती म्हटल्याचेही दिसते. 

तत्त्वतः पुराण आणि इतिहास हे वाङ्‌मयप्रकार भिन्न दिसत असले, तरी त्यांतील भेद स्पष्ट नव्हता. प्रचीन ग्रंथांतून अनेकदा इतिहासपुराण म्हणजे पाचवा वेद इ. प्रकारे दोहोंचा उल्लेख एकत्रितपणे केलेला आहे. ‘इतिहास म्हणजे पुरावृत्त’ (पूर्वी घडलेले) आणि ‘पुराण म्हणजे पुरावृत्त’ या व्याख्याही दोन्हींचे ऐक्य दाखवतात. स्वतःला इतिहास म्हणवून घेणाऱ्यामहाभारताने स्वतःला पुराण असेही म्हटले आहे आणि पुराण असलेल्या वायुपुराणाने स्वतःला इतिहास असेही म्हटले आहे. त्यांखेरीज इतर अनेक ग्रंथांशी पुराणांचा संबंध होता. महाभारत, काही स्मृती व काही पुराणे यांनी श्लोकांच्या बाबतीत परस्परांची उसनवारी केल्याचे आढळते. रामायणमहाभारत यांचा बराचसा भाग पुराणांसारखा असून हरिवंश तर पुराणच मानले गेले आहे. ललितविस्तर या बौद्ध ग्रंथाने स्वतःला पुराण म्हणवून घेतले आहे. महाभाष्यकार पतंजली, शबरस्वामी , बाणभट्ट, कुमारिल भट्ट, शंकराचार्य अल्बेरुणी इत्यादींच्या ग्रंथांवरून त्यांचा पुराणांशी परिचय असल्याचे दिसते. अनेक धर्मनिबंधांनी पुराणांची वचने उद्‌धृत केली आहेत. कालिदास, बाणभट्ट इत्यादींच्या काव्यग्रंथांचा व पुराणांचा कल्पनांची देवघेव करण्याच्या दृष्टीने संबंध आलेला आहे. 

पुराणांची भाषाशैली : वेद हे राजाच्या आदेशाप्रमाणे शब्दप्रधान, पुराणे ही मित्राच्या सल्ल्याप्रमाणे अर्थप्रधान आणि काव्य हे कान्तेच्या उपदेशाप्रमाणे रसप्रधान असते, या मम्मटाच्या विधानात पुराणांच्या भाषाशैलीचे मर्म अचूकपणे आले आहे. पुराणे ही वेदांप्रमाणे रूक्ष नाहीत आणि काव्याप्रमाणे रसाळही नाहीत. ती आपल्या आशयाला योग्य व सर्वसामान्यांना समजेल अशी व्यावहारिक, लोकरंजक व प्रासादिक  भाषा वापरतात. त्यांनी अलंकारांचा व सुभाषितवजा वचनांचाही उपयोग केलेला आहे. भागवतातील भ्रमरगीतासारखे काही भाग काव्याच्या दृष्टीनेही अत्यंत आकर्षक आहेत. परंतुअनेक अपाणिनीय प्रयोग, पाल्हाळ, पुनरुक्ती, अतिशयोक्ती, भाकडकथांची वर्णने, परस्परविसंगती इत्यादींमुळे पुराणांची शैली डागाळलेली आहे. 

पुराणांचे महत्त्व व कार्य : पुराणे ही वेदांप्रमाणेच अपौरुषेय व अनादी आहेत पुराणांची उत्पत्ती दैवी आहे वेदांपेक्षा पुराणे श्रेष्ठ आहेत  पुराण हा वेदांचा आत्मा आहे श्रुतिस्मृती हे डोळे असले, तर पुराण हे हृदय आहे पुराण ऐकणाऱ्या व्यक्तीची सर्व पापे नष्ट होतात इ. प्रकारे पुराणांची स्तुती करण्यात आली आहे. शुक्राचे मुख असलेल्या व्यक्तीच्या स्वरूपात पुराणांचे मानवीकरण करण्यात आले आहे होते. पुराण वाचणाऱ्या व्यक्तीला पुराणिक वा पौराणिक म्हटले जाई. पुराणिकाने मंदिरात भक्तांपुढे पुराण वाचण्याची प्रथा भारतात शेकडो वर्षांपासून चालू आहे. 

सध्याच्या मूर्तिपूजक हिंदू धर्माचे स्वरूप प्रामुख्याने पुराणांवरच आधारलेले आहे. याज्ञवल्क्यस्मृतीने पुराणांची १४ विद्यांमध्ये, तर शुक्रनीतीने ३२ विद्यांमध्ये गणना केली आहे. भारतीय राजांचा इतिहास जाणून घेण्याच्या दृष्टीने पुराणांतील वंशवर्णने अत्यंत उपयुक्त आहेत. बहुजनसमाजापर्यंत धर्माचे ज्ञान पोहोचविण्याची मोठी कामगिरी पुराणांनी पार पाडली आहे. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रभाव वाढवला, स्त्री-शुद्रांनाही मोक्षाचा मार्ग खुला केला, बौद्धधर्माकडे वळलेल्या लोकांना परत हिंदू धर्मात आणले, जैनधर्माचा प्रभाव कमी केला आणि तीर्थयात्रा, दान, व्रते, जप इत्यादींचे महत्त्व वाढवून हिंदू धर्माचे सध्याचे स्वरूप सिद्ध केले, ही त्यांची कार्ये ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्वाची आहेत. त्यांचे स्वरूप पंथीय असूनही त्यांनी पंथद्वेष न वाढवता समन्वयवादी दृष्टी जोपासली हेही एक वैशिष्ट्य होय. 


अठरा पुराणांची महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत : 

ब्रह्मपुराण : ब्रह्मदेवाने दक्षाला सांगितल्यामुळे ब्रह्मपुराण म्हटले जाणारे हे पुराण पुराणांच्या यादीत पहिले असल्यामुळे त्याला ‘आदिपुराण’ म्हटले जाते. त्यात सूर्योपासना वर्णिलेली असल्यामुळे त्याला सौरपुराण असेही म्हणतात. आदिपुराण आणि सौरपुराण या नावांच्या उपपुराणांहून मात्र ते वेगळे आहे. आदिब्रह्यपुराण या नावाचे दुसरे एक पुराण असून ही दोन्ही पुराणे एकच असावीत, असे एक मत आहे. हे पुराण इ.स.च्या सातव्या-आठव्या शतकांपूूर्वी बनले असावे आणि दहाव्या, बाराव्या व पंधराव्या शतकांत त्यात भर पडली असावी त्याचा काही भाग ओरिसात, तर काही भाग दंडकारण्यात तयार झाला असावा इ. मते आढळतात. या पुराणात २४५ अध्याय असून सु.१४ हजार श्लोक आहेत. त्यात ओरिसातील तीर्थक्षेत्रे, कृष्णचरित्र, सांख्यतत्त्वज्ञान, वैदिक ग्रंथांतील उपाख्याने इ. महत्त्वाचे विषय आले आहेत. दंडकारण्यातील गौतमी नदी व तेथील तीर्थांचे माहात्म्य १०६ अध्यायांत आले आहे. 

पद्मपुराण : या पुराणात ब्रह्मदेवाने पद्मातून विश्वनिर्मिती केल्याची कथा असल्यामुळे त्याला पद्म हे नाव मिळाले असून ते वैष्णवपुराणांत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ह्या पुराणाचा बराचसा भाग इ.स.च्या पाचव्या शतकानंतर बनलेला असला, तरी त्याचा काही भाग त्याही आधीचा आहे आणि त्याचा उत्तरखंड मात्र सोळाव्या शतकानंतरचा असावा, असे मत आढळते. बंगाली व देवनागरी अशा दोन प्रतींत आढळणारे हे पुराण सु. ५५ हजार श्लोकांचे असून श्लोकसंख्येच्या बाबतीत ते स्कंदपुराणाखालोखाल आहे. ते सृष्टी, भूमी, स्वर्ग, पाताल व उत्तर अशा पाच खंडात विभागलेले असून त्याचे ६२८ अध्याय आहेत. देवनागरी प्रतीत मात्र त्याचे आदी, भूमी, ब्रह्मा, पाताल, सृष्टी व उत्तर असे सहा खंड मानले आहेत. पौराणिक देवता, मानव, नागसर्प, अप्सरा इत्यादींच्या कथा व तीर्थमाहात्म्ये हे विषय प्रामुख्याने आलेले आहेत. उत्तरखंडाला जोडलेले ‘क्रियायोगसार’ हे परिशिष्ट वैष्णवधर्माच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कालिदासाचे शांकुंतल हे नाटक या पुराणातील शाकुंतल उपाख्यानावर आधारलेले आहे, असे मानले जाते. पद्मपुराण या नावाची दोन जैन पुराणेही आढळतात. 

विष्णूपुराण : विष्णुभक्तिला प्राधान्य दिल्यामुळे विष्णूचे नाव प्राप्त झालेले हे पुराण भागवतपुराणाखालोखाल महत्त्वाचे असून वैष्णवदर्शनांचा आधार मानले जाते. राक्षसांचा पूर्वज पुलस्त्य याच्या वरदानामुळे पराशराने हे पुराण रचले, असे म्हटले आहे. इ.स.च्या ३ ते ५ या शतकांच्या दरम्यान ते तयार झाले असावे, असे दिसते. बलदेव उपाध्यांच्या मते इ.स.पू.दुसरे शतक हा त्याचा काळ होय. हे पुराण सहा अंशांत विभागलेले असून त्याचे १२६ अध्याय आहेत. त्याच्या उपलब्ध प्रतीत सु. सहा-सात हजार श्लोक आहेत. या पुराणात फार कमी प्रमाणात फेरफार झाले आहेत. पंचलक्षणांचे या पुराणाइतके व्यवस्थित विवेचन बहुधा दुसऱ्या कोणत्याही पुराणात आढळत नाही. यात अनेक आख्यानांबरोबरच कृष्णचरित्रही वर्णिलेले आहे. विल्सनने या पुराणाचे इंग्रजीत केलेले भाषांतर प्रसिद्ध आहे. 

वायूपुराण : वायूने सांगितल्यामुळे वायुपुराण म्हटले जाणारे हे पुराण सर्वात जुने आहे, असे डॉ. भांडारकरांचे मत असून काहीजणांनी त्याचा काळ सु.इ.स.३०० हा मानलेला आहे. प्रक्रिय, उपोद‌्घा‌त, अनुषंग आणि उपसंहार या चार पादांत विभागलेल्या या पुराणात ११२ अध्याय असून त्याची श्लोकसंख्या सु.११ हजार आहे. यात पंचलक्षणे स्पष्टपणे आढळत असून पाशुपतयोग, गयातीर्थ इत्यादींचीही वर्णने आढळतात. यात शिवचरित्राचे विस्तृत वर्णन असून भौगोलिक वर्णनांसाठीही हे पुराण प्रसिद्ध आहे. 

भागवतपुराण : भागवतधर्माचे विवेचन करणारे आणि सर्वश्रेष्ठ मानले जाणारे हे पुराण अत्यंत लोकप्रिय आहे. ते व्यासांनी आपला पुत्र शुक याला सांगितले, असे म्हटले जाते. परंतु बोपदेव नावाच्या पंडिताने ते लिहिले, असेही एक मत आहे. त्याचा काळ इ.स.पू. तिसरे शतक, इ.स.चे पाचवे ते दहावे शतक, असा वेगवेगळा सांगितला जातो. हे पुराण दक्षिणेत तमिळनाडूमध्ये लिहिले गेले, असे मत आढळते. १२ स्कंधांत विभागलेल्या या पुराणात सु. १८ हजार श्लोक आहेत. हे पुराण दहा लक्षणांनी युक्त असून कृष्ण हा नायक आहे. भक्ती, तत्त्वज्ञान इ. दृष्टींनी ते महत्त्वाचे आहे. त्याचे भ्रमरगीत, रासपंचाध्यायी इ, भाग प्रसिद्ध आहेत. इतर कोणत्याही पुराणापेक्षा त्यावर जास्त टीका झाल्या असून त्याची प्रादेशिक भाषांत व इंग्रजीतही भाषांतरे झाली आहेत. चातुर्मास्यात भागवतसप्ताह करण्याची पद्धत सर्व भारतात आहे. 

नारदीय : या पुराणाच्या स्वरूपाविषयी बरीच अनिश्चितता दिसते. नारदीय पुराण, नारदपुराण आणि बृहन्नारदीयपुराण अशी समान नावांची तीन पुराणे आढळतात. यांपैकी महापुराण कोणते, यांविषयी संदिग्धाच आहे. यात नारदाने विष्णूभक्तीचे वर्णन केले, म्हणून हे नारदीय पुराण होय. इ.स. ७०० ते १००० या काळात ते तयार झाले, अशी मते आढळतात. याचे दोन भाग असून पूर्वभागात १२५ आणि उत्तरभागात ८२ अध्याय आहेत. यातील श्लोकसंख्या बलदेव उपाध्यायांच्या मते २५ हजार तर पां.वा. काणे यांच्या मते ५,५१३ इतकी आहे. याच्या ९२ ते १०९ या अध्यायांत १८ पुराणांची विस्तृत विषयानुक्रमणी आलेली असल्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या हे पुराण महत्त्वाचे आहे. यात अनेक विषय आलेले असल्यामुळे त्याचे स्वरूप बरेचसे विश्वकोशात्मक झाले आहे. 

मार्कंडेयपुराण : मार्कंडेय ऋषींनी सांगितल्यामुळे त्यांचे नाव प्राप्त झालेले हे पुराण अत्यंत प्राचीन असून त्याचा प्राचीन भाग इ. स. तिसऱ्या शतकाच्याही आधीचा असावा, असे म्हणतात. बलदेव उपाध्यायांच्या मते गुप्तकालीन संस्कृतीचे दर्शन घडविणारे हे पुराण गुप्तकाळात म्हणजे इ.स.च्या चौथ्या-पाचव्या शतकांत झाले असावे. ते गोदावरीच्या उगमप्रदेशांत लिहिले गेले असावे, असे मत आढळते. यात सामान्यतः पंचलक्षणे आढळत असून केवळ १३७ अध्यायांच्या या पुराणात सु. ६,९०० श्लोक आहेत. यात द्रौपदीचे पंचपतित्व, तिच्या अल्पवयीन मुलांची हत्या इ. प्रश्नांची चर्चा असून हरिचंद्र, ब्रह्यवादिनी मदालसा, कृष्ण, मार्कंडेय इत्यादींच्या कथा आहेत. अग्नि,सूर्य, देवी इत्यादींची स्तोत्रे असून ‘दुर्गासप्तशती’ या नावाने विख्यात असलेले देवीमाहात्म्य १३ अध्यायांत वर्णिलेले आहे. पार्जिटरने याचे इंग्रजी भाषांतर केलेले असून प्रारंभीच्या काही अध्यायांचे जर्मन भाषेतही भाषांतर झाले आहे. 

अग्निपुराण : अग्नीने वसिष्ठांना सांगितल्यामुळे अग्नीचे नाव प्राप्त झालेले हे विश्वकोशात्मक पुराण इ.स.च्या सातव्या ते नवव्या शतकांच्या दरम्यान तयार झाले असावे, असे म्हणतात. यातील अनेक तांत्रिक अनुष्ठाने बंगालात आढळत असल्यामुळे ते तेथेच तयार झाले असावे, असे एक मत आहे. ३८३ अध्यायांच्या या पुराणात पंचलक्षणे आढळत असली, तरी परा व अपरा विद्यांचे वर्णनच महत्त्वाचे आहे. रामायणमहाभारताचे सार, बुद्धावतारासह इतर अवतार इ. विषयांबरोबरच छंद, व्याकरण, अलंकार, योग, ज्योतिष मंदिरे, मूर्ती, धर्म इत्यादींची शास्त्रे यात वर्णिलेली आहेत. यात गीतासार व यमगीता आलेली असून आयुर्वेद, वृक्ष आणि पशूंचे वैद्यक, रत्नपरीक्षा, धनुर्विद्या, मोहिनी व इतर काही इ. विषयांचे विवेचन आलेले आहेत. 

भविष्यपुराण : वस्तुतः पुराण हे प्राचीन असल्यामुळे भविष्यपुराण या नावात आत्मविसंगती आहे. परंतु भविष्यकालीन घटनांची व व्यक्तिंची वर्णने करण्याची भूमिका घेतल्यामुळे याला भविष्यपुराण हे नाव मिळाले आहे. भविष्योत्तर पुराण या नावाचे एक स्वतंत्र पुस्तक असून काहींच्या मते ते भविष्यपुराणाचे उत्तर पर्व आहे. काहींच्या मते ते स्वतंत्र पुराण आहे. याचा काळ सु. सहावे-सातवे वा दहावे शतक हा मानला जात असला, तरी आपस्तंबधर्मसूत्रात त्याच्या नावानिशी उल्लेख असल्यामुळे त्याचा निदान काही भाग तरी अत्यंत प्राचीन असला पाहिजे. नारदपुराणानुसार याची ब्राह्म, विष्णू, शिव, सूर्य व प्रतिसर्ग अशी पाच पर्वे असून श्लोकसंख्या सु. १४ हजार आहे. याच्या वेगवेगळ्या चार प्रती मिळालेल्या आहेत. इतर कोणत्याही पुराणापेक्षा यात जास्त भर पडली असल्यामुळे याचे मूळचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. यात इंग्रजी अमदानीतील घटनांचीही वर्णने आली आहेत. उदा., व्हिक्टोरिया राणीला यात विकटावती म्हटले आहे, तर रविवारला संडे म्हणतात, असे सांगितले आहे. यात सूर्योपासना विशेषत्वाने आली असून कित्येक घटनांची व राजवंशांची वर्णने ऐतिहासिक दृष्टीने महत्त्वाची आहेत. 

ब्रह्मवैवर्तपुराण : कृष्णाने ब्रह्याचे विवरण केल्याचे वर्णन यात असल्यामुळे याला ब्रह्मवैवर्त हे नाव मिळाले आहे. याला दक्षिणेत ब्रह्मकैवर्तपुराण असे म्हणतात.आदिब्रह्मवैवर्त या नावाचे एक प्राचीन पुराणही आढळते. आठवे, नववे वा दहावे शतक हा त्याचा काळ मानलेला असून काहींच्या मते ते पंधराव्या शतकानंतरचे आहे. बहुधा बंगालमध्ये लिहिल्या गेलेल्या या पुराणाविषयी बंगाली वैष्णवांना फार आदर आहे. याचे २७६ अध्याय असून श्लोक सु. १८ हजार( एका मतानुसार सु.१० हजार) आहेत. ब्रह्म, प्रकृती, गणेश व कृष्णजन्म अशा चार खंडांत विभागलेल्या या पुराणाचा कृष्णजन्म खंड १३३ अध्यायांचा आहे. यात गणेश हा कृष्णाचा अवतार मानलेला असून उत्तान रासक्रीडा, अनेक माहात्म्ये इ. गोष्टी आढळतात.  

वराहपुराण : वराहावतारी विष्णूने हे पुराण पृथ्वीला सांगितले अशी समजूत असून, ते नवव्या-दहाव्या शतकांत तयार झाले असावे आणि त्याचा काही भाग अकराव्या व काही भाग पंधराव्या शतकातील असावा, असे मत आढळते. याचा पहिला भाग उत्तर भारतात व शेवटचा नेपाळात लिहिला गेला असावा, असा तर्क आढळतो. याचे गौडीय व दक्षिणात्य असे दोन पाठभेद आढळतात. याचे २१८ अध्याय असून त्यांपैकी काही गद्यात्मक आहेत, तर काहींमध्ये गद्य व पद्य यांचे मिश्रण आहे. यात २४ हजार श्लोक असल्याचा उल्लेख आढळत असला, तरी प्रत्यक्षात मात्र सु. १० हजार श्लोकच आढळतात. द्वादशीच्या व्रतासारखी अनेक वैष्णव व्रते यात असून रामानुज संप्रदायाने यातून अनेक वैष्णव अनेक विषय स्वीकारले आहेत. यात मथुरामाहात्म्य, नचिकेत्याने उपाख्यान इ. विषय प्रामुख्याने आले आहेत.  

लिंगपुराण : शिवाने अग्निलिंगात प्रवेश करून या पुराणाद्वारे मोक्षादींचे विवेचन केले, या समजुतीमुळे याला लिंगपुराण हे नाव मिळाले आहे. याचा काळ सु. सातवे-आठवे शतक असण्याची शक्यता आहे. याचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग असून, पूर्वार्धाचे १०८ व उत्तरार्धाचे ५५ अध्याय आहेत. त्यांपैकी उत्तरार्धाचे काही अध्याय गद्य आहेत.  याची श्लोकसंख्या सु. अकरा हजार असून सु. सहा हजार श्लोकांचे आणखी एक छोटे लिंगपुराण होते, असे दिसते. यात ब्रह्मांडरूपी लिंगाची उत्पती, लिंगपूजा, शैवव्रते, शिवाचे २८ अवतार, काशीचे वर्णन, तंत्रविद्या इ. विषय प्रामुख्याने आले असून हा लिंगायतांचा एक प्रमुख धर्मग्रंथ मानला जातो. 

स्कंदपुराण : स्कंदाने सांगितल्यामुळे त्याचे नाव मिळालेले हे पुराण इ.स.च्या सातव्या व नवव्या शतकांच्या दरम्यानचे असावे, असे म्हटले जाते. सर्व पुराणांत आकाराने मोठे असलेले हे पुराण ८१ हजार श्लोकांचे आहे. ते सनत्कुमार, सूत, शंकर, वैष्णव, ब्राह्म व सौर अशा सहा संहितांमध्ये विभागलेले असून माहेश्वर, वैष्णव, ब्राह्म, काशी, रेवा, तापी व प्रभास या सात खंडांतील दुसरीही एक विभागणी आढळते. याच्या सूतसंहितेत ब्रह्मगीता व सूतगीता आहेत, तर रेवाखंडात सत्यनारायणव्रताची कथा आहे.

  

वामनपुराण : यात वामनावताराचे वर्णन विशेषत्वाने असून पहिल्या श्लोकात वामनालाच नमस्कार केलेला आहे. हे पुराण पुलस्त्य ऋषीने नारदाला सांगितले, अशी समजूत आहे. इ.स.च्या पहिल्या-दुसऱ्या  वा सहाव्या ते नवव्या शतकांत हे पुराण तयार झाले असावे, अशी मते आढळतात. याची निर्मिती कुरुक्षेत्राला परिसरात झाली असावी, असे दिसते. याच्या उपलब्ध प्रतींत ९५ अध्याय व सु. ६ हजार श्लोक आहेत. याचा उत्तरभाग लुप्त झाला आहे. यात शैव, कालदमन, पाशुपत व कापालिक अशा चार शैव संप्रदायांचे वर्णन असून वैष्णव व पाशुपत शैव या दोहोंना समान महत्त्व दिलेले आहे. यात असुरांच्या कथा असून शिवपार्वतीचे विस्तृत चरित्र आलेले आहे. कालिदासाचे कुमारसंभववामनपुराण यांत बरेच साम्य आढळते. 

कूर्मपुराण : विष्णूने कूर्मावतारात इन्द्रद्युम्न राजाला हे पुराण सांगितले, अशी समजूत आहे. इ.स.च्या दुसऱ्या, पाचव्या वा सहाव्या-सातव्या शतकांत ते तयार झाले असावे, अशी मते आहेत. याचे पूर्वार्ध (५३ अध्याय) व उत्तरार्ध (४६ अध्याय) असे दोन भाग असून उपलब्ध ग्रंथात सु. ६ हजार श्लोक आहेत. नारदसूचीप्रमाणे याच्या ब्राह्मी, भागवती, सौरी व वैष्णवी अशा चार संहिता होत्या परंतु सध्या फक्त ब्राह्मी संहिताच उपलब्ध आहे. याचे नाव वैष्णव असले, तरी हे शैवपुराण असल्यामुळे शिव व दुर्गा याचे माहात्म्य हेच याचे मुख्य विषय आहेत. यात पाखंड मते दिलेली असून वाममार्गीयांच्या यामलयंत्र या ग्रंथाची माहितीही दिलेली आहे. याच पुराणात ‘ईश्वरगीता’ व ‘व्यासगीता’ अशा दोन गीता आलेल्या आहेत. तेन‌्काशीच्या एका राजाने सोळाव्या शतकात या पुराणाचे तमिळमध्ये भाषांतर केलेले आहे. 

मत्स्यपुराण : विष्णूने मत्स्यरूपाने मनूला सांगितलेले हे पुराण इ.स.च्या दुसऱ्या  ते चौथ्या शतकांच्या दरम्यान तयार झाले असावे आणि त्याचा मूळचा भाग इ.स.पू ६००ते ३०० च्या दरम्यानचा असावा, असे म्हणतात. दक्षिण भारत, आंध्र प्रदेश, नासिक वा नर्मदातीर या ठिकाणी ते लिहिले गेले असावे, अशी मते आढळतात. याचे २९१ अध्याय असून श्लोक सु. १४-१५ हजार आहेत. स्वल्पमत्स्यपुराण या नावाने याचे एक संक्षिप्त स्वरूपही आढळते. यात फार कमी प्रमाणात भर पडलेली असून यातील राजवंशाची हकीकत विश्वसनीय आहे. याच्या ५३ व्या अध्यायात सर्व पुराणांची विषयानुक्रमणी आलेली आहे. यात वितृवंश, ऋषिवंश, राजवंश, राजधर्म, हिमालय, तीर्थे इ. विषयांचे वर्णन प्रामुख्याने आलेले आहे.


गरुडपुराण : विष्णूच्या सांगण्यावरून गरुडाने या पुराणाद्वारे वैष्णव तत्त्वांचे वर्णन केले, म्हणून याला गरुडाचे नाव प्राप्त झाले. हे इ.स.च्या सातव्या ते दहाव्या शतकांत तयार झाले असावे, असे दिसते. डॉ हाझरा यांच्या मते हे मिथिलेत लिहिले गेले. याचे अध्याय २६४ असून श्लोक सु. ७ हजार आहेत. याच्या पूर्वखंडात व्याकरण, छंद साहित्य, वैद्यक इ. विषयांची माहिती असल्यामुळे हे विश्वकोशात्मक बनले आहे. याच्या उत्तरखंडाच्या ‘प्रेतकल्पा’ त और्ध्वदेहिराची माहिती आहे. एखाद्याच्या मृत्यूनंतर दहा दिवसपर्यंत घरी  गरुडपुराणाचा पाठ करण्याची प्रथा आहे. याच्या उत्तरखंडाचे जर्मन भाषांतर झाले आहे. 

ब्रह्मांडपुराण : ब्रह्मांडाची उत्पती आणि विस्तार यांचे वर्णन हा याचा मुख्य विषय असल्यामुळे याला ब्रह्मांड हे नाव मिळाले आहे. हे वायूने व्यासांना सांगितले असल्यामुळे याला वायवीयब्रह्मांडपुराण असेही म्हणतात. वायुब्रह्मांड ही पुराणे एकच असून वायुपुराणात थोडा फरक करून ब्रह्मांडपुराण बनविलेले आहे. त्यातील परशुरामचरित्राचा भाग हा वायुपुराणापेक्षा अधिक आहे. इ.स.च्या चौथ्या ,पाचव्या ला सहाव्या शतकात हे तयार झाले असावे, अशी मते आहेत. गोदावरीच्या उगमाचा प्रदेश वा सह्याद्री हे याचे निर्मितिस्थान असावे, असे दिसते. याचे प्रक्रिया, अनुषंग, उपोद‌्घात व उपसंहार  असे चार पाद असून श्लोक सु. १२ हजार आहेत. यात परशुराम व कार्तवीर्य यांचा संघर्ष, ललितादेवीचे आख्यान, क्षत्रियराजवंशाचे वर्णन इ. विषय प्रमुख आहेत. अध्यात्मरामायण हा ग्रंथ आणि ललितासहस्त्रनाम, सरस्वतीस्तोत्र, गणेशकवच इ. भाग या पुराणातून घेतलेले आहेत. जावा-सुमात्रा बेटांतील भाषेत त्याचे भाषांतर झाले असून ते अजूनही तेथे प्रचारात आहे. 

उपपुराणे : १८ महापुराणांहून वेगळी अशी जी पुराणे आहेत, त्यांना उपपुराणे  म्हणतात. 

निर्मिती : उपपुराणे व्यासांनी रचली, असे मानले जात नाही. १८ पुराणे ऐकून मुनींनी तयार केलेली संक्षिप्त पुराणे म्हणजे उपपुराणे, असे कूर्मपुराणात म्हटले आहे. महापुराणांची १८ ही संख्या निश्चित झाल्यावरही स्थानिक गरजांतून पुराणवाङ्‌मय निर्माण होत होतेच. सौर, शाक्त यांसारखे नव्याने निर्माण झालेले पंथ आणि काही जुने पंथही आपापले वाङ्‌मय लिहीत होते. त्यातील काही भाग १८ महापुराणांतूनच घुसडला गेला, तर काही स्वतंत्र ग्रंथांच्या रूपाने पुढे आला. या स्वतंत्र अशा नवीन ग्रंथांना पुराणे मानणे आता शक्य नव्हते कारण १८ या संख्येभोवती पावित्र्याचे एक वलय निर्माण झालेले असल्यामुळे पुराणांची संख्या अठरावरच स्थिर झालेली होती, असे असले. तरी नव्या ग्रंथांच्या  लोकप्रियेतेमुळे त्यांची उपेक्षा करणेही शक्य नव्हते. म्हणून त्यांना उपपुराण हे नाव देऊन पुराणवाङ्‌मयात सामावून घेतले गेले आणि १८ पुराणांना  महापुराणे हे नाव दिले गेले. 

संख्या  : महापुराणांप्रमाणे उपपुराणांचीही संख्या अठरा मानली जाते. कूर्म, पद्म देवी भागवत १८ उपपुराणांची नावे दिली आहेत. असे असले, तरी उपपुराणांची संख्या अठरावर स्थिर करण्याचा प्रयत्न फारसा यशस्वी झालेला नाही. त्यांची संख्या शंभराहून अधिक आहे, असे डॉ. हाझरा म्हणतात. डॉ. हाझरांनी १८ उपपुराणांची नावे देणाऱ्या २३ भिन्न भिन्न याद्या दिलेल्या आहेत. यावरून त्यांच्या नावांविषयी असलेल्या मतभेदांची कल्पना येते. त्यांनी कूर्मपुराणाच्या आधारे दिलेली यादी पुढीलप्रमाणे आहे : आद्य (सनत्कुमारप्रोक्त), नारसिंह, स्कांद (कुमारप्रोक्त), शिवधर्म, दुर्वाससोक्त, नारदीय, कापिल, वामन, उशनसेरित, ब्रह्मांड, वारुण, कालिका, माहेश्वर, सांब, सौर, पराशरोक्त, मारीच, भार्गव . काही वेळा एकच पुराण वेगवेगळ्या याद्यांत वेगवेगळ्या नावांनी आलेले दिसते. काही उपपुराणांची व महापुराणांची नावे समानच आहेत. इतर काही उपपुराणांची नावे पुढीलप्रमाणे : विष्णुधर्म, विष्णुधर्मोत्तर, नंदी, गणेशक, गारुड, प्रमासक, आखेटक, देवी, बार्हस्पत्य, नंदिकेश्वरयुग्म, एकपाद, मृत्युंजय. कौर्म, मानव, वायवीय, बृहद‌्वैष्णव, आंगिरसक, बृहद्वर्म, लीलावती, बृहन्नाकसिंह, दैव पाद्म, आणू, भास्कर, शौक्र, लघुभागवत, एकाम्र, बृहन्नन्दीश्व इत्यादी. 

काळ : उपपुराणे बऱ्याच उशीरा तयार झालेली असली, तरी काही उपपुराणे ही अनेक महापुराणांच्याही आधीची आहेत, असे डॉ. हाझरा मानतात. त्यांच्या मते उपपुराणे ही गुप्तकाळात निर्माण होऊ लागली. त्यांच्या मते  विष्णुधर्म, विष्णुधर्मोत्तर, नारसिंह सांब ही उपपुराणे अनुक्रमे इ.स. २०० ते ३००, ४०० ते ५००, ४०० ते ५०० आणि ५०० ते ८०० या काळात तयार झाली. १८ उपपुराणांचा समूह इ.स. ६५० ते ८०० या दरम्यान तयार झाला, असे ते मानतात. म.म. काणे यांना हे मान्य नसून त्यांच्या मते उपपुराणे बरीच उत्तरकालीन आहेत नारसिंह, विष्णुधर्मोत्तरदेवी एवढीच इ.स.च्या सातव्या-आठव्या शतकांइतकी जुनी मानता येतील. त्यांच्या मते सातव्या-आठव्या शतकांत उपपुराणांच्या निर्मितीला प्रारंभ होऊन तेराव्या शतकांपर्यंत वा त्यानंतरही ते काम चालू होते. प्रारंभीच्या धर्मनिबंधांनी उपपुराणांचा अजिबात उल्लेख केलेला नाही वा क्वचितच केलेला आहे, यावरूनही त्यांची उत्तरकालीनता स्पष्ट होते. अमरकोशाने पुरांणाची व्याख्या दिली आहे परंतु उपपुराणांचा निर्देश केलेला नाही.  

विषय : सौरपुराणाच्या मते उपपुराणे ही महापुराणांना पुरवणी वजा असल्यामुळे तीही पुराणांप्रमाणेच पंचलक्षण असतात. भागवतब्रह्मवैवर्त पुराणांच्या मते महापुराणे ही दशलक्षण, तर उपपुराणे ही पंचलक्षण असतात. प्रत्यक्षात जवळजवळ कोणतेच उपपुराण पंचलक्षण या व्याख्येबरहुकूम नाही. त्यांत राजे व ऋषींच्या वंशावळी दिलेल्या नाहीत वा निष्काळजीपणाने दिलेल्या आहेत. उपपुराणांचे विषय सामान्यतः महापुराणांशी मिळतेजुळते आहेत. 

गौणता : उपपुराणे ही महापुराणांहून दुय्यम आहेत, अशी परंपरागत धारणा असून ती त्यांच्या नावातील ‘उप’ या अंशावरूनही सूचित होते. ही धारणा बऱ्याच अंशी योग्य आहे. मत्स्यपुराणाने त्यांना पुराणांचे उपभेद मानले असून, १८ महापुराणांहून वेगळे असे जे पुराण असेल, ते त्या महापुराणांपासून निर्माण झाल्याचे मानावे, असे म्हटले आहे. स्वतः उपपुराण असलेल्या सौरपुराणानेच उपपुराणे ही खिल (पुरवणी) असल्याचे सांगून स्वतःला ब्रह्मपुराणाचे खिल मानले आहे. काही उपपुराणे ही खरोखरच महापुराणांना पुरवणीवजा आहेत परंतु काही स्वतंत्र आहेत. काही उपपुराणे स्वतःला गौण तर लेखत नाहीतच, पण उलट पक्षी स्वतःला महापुराणांइतकीच वा त्यांहूनही श्रेष्ठ समजतात. उपपुराणे दुय्यम आहेत, या समजुतीमुळे त्यांच्या अध्ययनाची विद्वानांकडून उपेक्षा झाली आहे. वस्तुतः धर्मशास्त्र, संस्कृती, विज्ञान, इतिहास इ. दृष्टींनी उपपुराणांचा अभ्यासही अत्यंत उपयुक्त आहे. विशेषतः महापुराणांमध्ये जशी भर पडत गेली, तशी उपपुराणांत न पडल्यामुळे त्यांचे मूळ स्वरूप बरेचसे  टिकून राहिले असून, त्यामुळे ती बऱ्याच प्रमाणात विश्वसनीय आहेत, असे डॉ. हाझरा मानतात. परंतु म.म.काणे यांच्या मते या बाबतीत उपपुराणाची स्थिती महापुराणांसारखी वा त्यांहूनही वाईट आहे महापुराणे ही बहुसंख्य उपपुराणांपेक्षा अधिक विश्वसनीय आहेत. 

वर्गीकरण : डॉ. हाझरांनी उपपुराणांचे वैष्णव, शैव, शाक्त, गाणपत्य, सौर व पंथातीत असे सहा प्रकार पाडले असून, संकीर्ण या सातव्या प्रकारचीही चर्चा केली आहे. त्यांपैकी काही उपपुराणांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.  

विष्णुधर्मोत्तर, विष्णुधर्म, नारसिंह, बृहन्नारदीय, क्रियायोगसार, भार्गव, पुरुषोत्तम, कल्की, आदि, धर्म इ. उपपुराणे वैष्णव आहेत. विष्णूधर्म विष्णूधर्मोत्तर ही मूळची  शास्त्रे  नंतरच्या काळात उपपुराणे बनली, तसेच ती दोन्ही मिळून एकच उपपुराण असल्याची परंपराही आढळते. पंजाब वा काश्मीरमध्ये तयार झालेले विष्णुधर्मोत्तर हे पुराण, सर्व उपपुराणांत महत्त्वाचे मानले जाते. ते विश्वकोशात्मक असून व्रते, श्राध्दे, पुराणकथा, धर्मशास्त्र, ज्योतिष, खगोल, भूगोल, कृषिविद्या, काव्यशास्त्र, व्याकरण, पशुविद्या, धनुर्विद्या, वैद्यक, कला इ. असंख्य विषयांची त्यात चर्चा आहे. विष्णुधर्मपुराणात वैष्णव तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, स्त्रियांची कर्तव्ये इत्यादींची चर्चा आहे. नारसिंह हे पुराण बहुधा सर्वांत जुने असून, त्यात नरसिंहाचे वर्णन आहे. पद्मपुराणाचा भाग असलेले क्रियायोगसार हे स्वतंत्र उपपुराण मानले जाते. बंगालमध्ये निर्माण झालेल्या या पुराणात भक्तिचे विस्तृत विवेचन आहे. बृहन्नारदीयपुराणातही विष्णूभक्तीचे वर्णन असून तेही बंगाल वा ओरिसात तयार झालेले दिसते.  आदिपुराणात कृष्णाच्या लीला, तर कल्कीपुराणात अवतारांचे वर्णन आहे. विष्णुधर्म, विष्णुधर्मोत्तर, नारसिंह बृहन्नारदीय ही पांचरात्रांची, तर क्रियायोगसार हे भागवतांचे पुराण आहे. शिव, सौर, शिवरहस्य, शिवधर्म, शिवधर्मोत्तर, एकाम्र, वसिष्ठ-लैंग, पराशर इ. उपपुराणे शैव होत. अनेकदा वायुपुराणाऐवजी शिवपुराणाचा महापुराणांत अंतर्भाव केला जातो.  सौरपुराणात शिवपार्वतीच्या कथा आहेत, तर एकाम्रपुराणात ओरिसातील एकाम्र क्षेत्राचे माहात्म्य आहे. शिवधर्मपुराणात लिंगपूजा, शैव व्रते इ. विषय आहेत. देवी, कालिका, महाभागवत देवीभागवत ही महत्त्वाची शाक्त उपपुराणे असून भगवती, चंडी, सती (काली) इ. उपपुराणे ही अगदीच गौण आहेत. बंगालमध्ये लिहिलेल्या देवीपुराणाचा मूळचा एकच भाग अवशिष्ट असून त्यात  विंध्यवासिनी देवीचे पराक्रम, अवतार, शिवाशी नाते, तीर्थे, व्रते इ. विषय आले आहेत. इ.स.च्या दहाव्या-अकराव्या शतकांत आसाममध्ये झालेल्या कालिकापुराणात कालीचे पराक्रम , राजधर्म, किल्ल्यांची निर्मिती इ. विषय आहेत. काली ही प्रथम विष्णूची योगनिद्रा व माया होती आणि नंतर शिवपत्नी बनली, असे म्हटले आहे. आसामचा सामाजिक, धार्मिक व राजकीय इतिहास कळण्याच्या दृष्टीने हे पुराण महत्त्वाचे आहे. बंगालमध्ये लिहिलेल्या महाभागवतातही कालीचे पराक्रम असून स्वतःला महापुराण मानणाऱ्या देवीभागवतात देवी श्रीभुवनेश्वरी ही परब्रह्माशी एकरूप मानली आहे. गणेशमुदगल ही दोन गाणपत्य पुराणे आहेत. गणेशपुराणात गणेशाच्या विविध कथा व त्याची ५६ रूपे सांगितली आहेत. मुद‌्गलपुराणात त्याची ३२ रूपे सांगून त्याच्या वक्रतुंडादी नऊ अवतारांची चर्चा केली आहे.  सांब या सौरपुराणात कृष्णपुत्र सांबाने सूर्यपूजा केल्यामुळे त्याचा कुष्ठरोग बरा झाल्याची कथा आली आहे. सूर्यपूजेसाठी शाकद्वीपातून मॅगी पुरोहितांची १८ कुटुंबे आणल्याचाही निर्देश आहे. बृहद्धर्म भविष्योत्तर ही दोन उपपुराणे पंथातील मानलेली आहेत.  तेराव्या शतकात बंगालमध्ये झालेले बृहद्धर्म हे बंगालमधील ३६ जातींचे व व्रतादींचे वर्णन करीत असून बंगालच्या सामाजिक व धार्मिक इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. व्रते, उत्सव व दाने यांचे वर्णन करणारे भविष्योत्तर हे भविष्यपुराणाचा भाग म्हणूनही छापलेले आढळते. नीलमत, आत्म, भूगोल ब्रह्मवैवर्त, जैमिनी, केदार, कापिल, कन्यका, ब्रह्मनारद, लघुभागवतामृत  इ. पुराणे संकीर्ण मानलेली असून त्यांपैकी नीलमत हे काश्मीरच्या इतिहासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. यांखेरीज आदित्य, आखेटक, आंगिरस, औशनस, बार्हस्पत्य, बृहदवामन इ. अनेक उपपुराणे नामशेष झाली, असे डॉ. हाझरा म्हणतात.  

संदर्भ : 1. Diksitar, V. R. Ramchandra, Purana Index, 3 Vols., Madras, 1955.

2. Hazra, R. C. Studies in the Upapuranas, 2 Vols., Calcutta, 1960, 1963.

3. Hazra, R. C. Studies in the Puranic Records of Hindu Rites and Customs, Dacca, 1940.

4. Kane. P. V. History of Dharmashastra Vol. V Part II and Vol. l Parts l, Poona, 1962.

5. Kirfel, W. Das Purana Panchalakshana, Bonn. 1927.

6. Pargiter, F. E. Purana Text of the Dynasties of the  Kali Age, London, 1913.

7. Pargiter. F. E. Ancient Indian Historical Traditional, Delhi, 1962.

8. Pusalkar, A. D. Studies in the Epics and Puranas  of India, Bombay 1963.

9. Wilson, H. H. The Vishnu Purana, Vol.l, Caclcutta,1961.

10.  Winternitz, M. A. History of Indian Literature Vol.l Cacutta,1927.

११. उपाध्याय, बलदेव, पुराणविमर्श, वाराणसी, १९६५.१२. पाण्डेय, राजबली, पुराणविषयानुक्रमणी, काशी, १९५७.  

साळुंखे, आ. ह.