महानाटक : संस्कृतातील एक विलक्षण आणि विसतृत रचना. तिचा कर्ता अज्ञात आहे. संपूर्ण रामायणकथा हा महानाटकाचा विषय. महानाटकाच्या नावात ‘नाटक’ असले, तरी त्यात संवाद फारसे नाहीत त्यातील बहुतेक भाग पद्यमय आहे. पद्यांपैकी बरीच रामायण कथेवर प्रसिद्ध संस्कृत साहित्याकांनी लिहिलेल्या नाट्यकृतींतून उचललेली आहेत. महानाटकात अनेक पात्रे आहेत पण कसल्याही रंगसूचना नाहीत. नांदी आहे परंतु प्रारंभक नाही. नाटकापेक्षा एका विस्कळित कथाकाव्याचे रुप महानाटकाला आले आहे.

हा ग्रंथ कसा निर्माण झाला, गह्याबद्दलची कसलीच ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही. रामसेवक हनुमंताने तो रचिला परंतु वाल्मिकीच्या नावाला बाध येऊ नये म्हणून समुद्रात बुडविला, अशी समजूत आहे.

ह्या साहित्यकृतीच्या दोन पाठावृत्त्या मिळतात : एक दामोदर मिश्राची. ही हनुमन्नाटक म्हणून ओळखली जाते. तीत १४ अंक व ५४८ श्लोक आहेत. दुसरी मधुसुदनाची . ही महानाटक म्हणून ओळखली जाते. तीत अंक १० असून श्लोक ७२० आहेत. ह्या दोन पाठावृत्त्यांपैकी दामोदर मिश्राची पाठावृत्ती आधीची असावी, असे अलीकडील संशोधनावरून दिसते.

हनुमंताने समुद्रात बुडविलेले हे ‘नाटक’ शिलांवर कोरले होते. त्या शिला सापडल्यानंतर त्यांची जुळणी भोजराजाच्या आदेशावरून दामोदर मिश्राने केली, ही समजूत आहे. भोजाराजाच्या आज्ञेवरून दामोदर मिश्राने ही रचना केली एवढाच अर्थ ह्या समजुतीतून घेतला आणि हा भोजराजा धाराचा भोजराजा असला, तर त्याच्या कारकीर्दीत नुसार दामोदर मिश्राची ही पाठावृत्ती अकराव्या शतकातली ठरते.

महानाटकाच्या एकदंर स्वरूपावरून, संस्कृत नाटकाच्या विकासाच्या प्राचीनतम अवस्थेतील ही कृती असावी, असे विद्वानांचे मत झालेले असले, तरी उपलब्ध पाठावृत्त्या प्राचीन दिसत नाहीत. त्यामुळे संस्कृत नाटकाच्या विकासालापेक्षा ऱ्हासकालातच महानाटकाची निर्मिती झाली असावी, असे मानण्याकडे अभ्यासकांचा कल आहे.

भट, गो. के.