विश्वनाथ : (सु. १३००-१३८४). संस्कृतातील ⇨ साहित्यदर्पण ह्या काव्यशास्त्रविषयक ख्यातनाम ग्रंथाचा कर्ता. त्याच्या जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध होत नाही. त्याच्या ग्रंथातून कोठे कोठे जी थोडीशी माहिती मिळते, ती अशी : त्याचा जन्म विद्यासंपन्न अशा एका ब्राह्मणकुलात झालेला होता. त्याच्या नारायणनामक खापरपणजोबांनी काव्यशास्त्रावर एक ग्रंथ लिहिला होता, असे दिसते. साहित्यदर्पणात विश्वनाथाने त्यांचा उल्लेख ‘प्रपितामह’ असा केला आहे. तथापि काव्यप्रकाशदर्पणात त्यांचाच उल्लेख तो ‘पितामह’ असा करतो. नारायण ह्या नावाच्या दोन व्यक्ती (एक त्याचे खापर-पणजोबा आणि दुसरे त्याचे आजोबा) असू शकतील. भारतात नातवालाही आजोबांचे नाव देण्याची प्रथा आहेच. यात एकच बारीकशी अडचण आहे. पितामहांचे आजोबा म्हणजेच खापर-पणजोबा हा अर्थ व्यक्त होण्यासाठी नुसते ‘प्रपितामह’ म्हणून चालणार नाही. ‘परप्रपितामह’ म्हणावयास हवे. त्याचे वडील चंद्रशेखर हे कवी आणि विद्वान होते. त्यांच्या दोन ग्रंथांची नावे स्वत: विश्वनाथाने निर्देशिलेली आहेत. एक पुष्पमाला आणि दुसरा भाषार्णव. भाषार्णवात संस्कृत, शौरसेनी, माहाराष्ट्री आणि इतर प्राकृत भाषांची वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. विश्वनाथाने आपल्या वडिलांची काव्यरचना आपल्या साहित्यदर्पण ह्या ग्रंथात उद्‌धृत  केली आहे. काव्यप्रकाशावरील  आपल्या भाष्यात विश्वनाथ संस्कृतातील काही आशयासाठी समानार्थक अशी काही ओडिया भाषेतील उदाहरणे देतो, त्याअर्थी तो ओरिसात राहणारा असावा, असा एक तर्क आहे. विश्वनाथाच्या वडिलांनी आणि खुद्द विश्वनाथाने एखाद्या-बहुधा कलिगांच्या-राजदरबारी महत्वाचे पद भूषविले असावे. ‘सांधिविग्राहिक महापात्र’ म्हणून ह्या दोघांचाही निर्देश येतो. साहित्यदपर्णाच्या पहिल्या परिच्छेदाच्या अखेरीस, त्याचप्रमाणे त्या ग्रंथाच्या अखेरच्या श्लोकात येणाऱ्या पुष्पिकेवरून (कोलोफोन) विश्वनाथ हा वैष्णव पंथाचा होता, हे स्पष्ट होते. विश्वनाथ हा स्वत:एक कवी असल्यामुळे संस्कृत-प्राकृतांतील स्वत:ची रचना तो त्याच्या काव्याशास्त्रविषयक विवेचनात उदाहरणे म्हणून देतो. काव्यलक्षणाच्या बाबतीत तो रसपंथाचा होता- ‘वाक्यं रसात्मकं काव्यम्।’ (साहित्यदर्पण-१) अशी त्याची काव्याची व्याख्या आहे. साहित्यदर्पणाखेरीज त्याने केलेल्या अन्य ग्रंथरचनेत राघवविलास ह्या नावाचे संस्कृत महाकाव्य,कुवल्याश्वचरित हे प्राकृत काव्य, प्रभाषती परिणय व चन्द्रकला नावाच्या दोन नाटिका आणि प्रशस्तिरत्नावली हा सोळा भाषांतील एक करंभक ह्यांचा अंतर्भाव होतो. नरसिंहविजय हे काव्य आणि काव्यप्रकाशदर्पण हे काव्यप्रकाशावरील भाष्य ह्यांचाही त्याच्या ग्रंथनिर्मितीत निर्देश केला पाहिजे. काव्यप्रकाशावरचा एक भाष्यकार चंडीदास हा विश्वनाथाच्या आजोंबाचा धाकटा भाऊ होय.

विश्वनाथ हा बाराव्या शतकातील ग्रंथकारांचा उल्लेख आपल्या ग्रंथात करतो. त्याचप्रमाणे विश्वनाथाचा उल्लेख पंधराव्या – सोळाव्या शतकांतील ग्रंथकार करतात. जम्मू येथे उपलब्ध असलेले साहित्यदर्पणाचे एक हस्तलिखित विक्रम संवत् १४४० म्हणजे इ. स. १३८४ मधले आहे. विश्वनाथाने अलाउद्दीन नावाच्या एका राजाचा उल्लेख केलेला आहे. हा अलाउद्दीन निश्चितपणे अलाउद्दीन खल्‌जी होय. १३१६ मध्ये त्याच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. विश्वनाथाने केलेला अलाउद्दीनाचा निर्देश त्या सुलतानाच्या हयातपणी केला असल्यास साहित्यदर्पणाचा काळ १३०० च्या अलीकडे जाणार नाही.

ह्या सर्व पुराव्यांचा विचार करता विश्वनाथाच्या काळाची पूर्वोत्तर मर्यादा १३०० ते १३८४ अशी ठरते.

कुलकर्णी, अ. र.