विल्यम ड्‌वाइट व्हिटनीव्हिटनी, विल्यम ड्‌वाइट : (९ फेब्रुवारी १८२७ – ७ जून १८९४).  अमेरिकन प्राच्यविद्या पंडित. जन्म नॉर्दमट्न (मॅसॅचूसेट्स). पदवीधर झाल्यावर (१८४५) नोकरी सांभाळून त्यांनी येल विद्यापीठात संस्कृतचे अध्ययन केले (१८४९-५०). त्यानंतर ते बर्लिनला गेले.  तेथे ⇨ फ्रांट्स बोप आणि ⇨ आल्ब्रेख्त वेबर ह्यांच्याकडे आणि नंतर ट्यूबिंगेन येथे रुडोल्फ फोन रोट ह्या प्राच्यविद्या पंडिताकडे त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले. तौलनिक भाषाशास्त्राचा अभ्यासही त्यांनी केला. १८५४ साली अमेरिकेला परतल्यानंतर येल विद्यापीठात संस्कृत व तौलनिक भाषाशास्त्र ह्या विषयांचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्या पदावर ते आमरण होते.

रोट ह्यांच्या सहकार्याने १८५६ मध्ये त्यांनी अथर्ववेदाची संहिता संपादून प्रसिद्ध केली, तसेच १८६२ मध्ये अथर्ववेद–प्रातिशाख्याची मूळ संहिता तिचे इंग्रजी भाषांतर व विवेचक टीपांसह प्रसिद्ध केली. त्यांचे इतर लेखन/संपादन असे : १) लाटप्रणीत सूर्यसिद्धान्त ह्या ज्योतिषविषयक ग्रंथाचे भाषांतर (१८६०). हे अमेरिकन प्राच्यविद्या संस्थेच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले. २) लँग्विज अँड द स्टडी ऑफ लँग्विज (१८६७). व्हिटनी यांची व्याख्याने ह्या ग्रंथात आहेत. तौलनिक भाषाशास्त्राच्या तत्त्वांचे उत्कृष्ट विवेचन ह्या व्याख्यानांतून केलेले आहे. ३) यजुर्वेदाच्या तैत्तिरीय प्रातिशाख्याची संपादित आवृत्ती(१८७१). ह्या ग्रंथाला जर्मन अकॅडमीचे बोप पारितोषिक मिळाले. ४) ओरिएंटल अँड लिंग्विस्टिक स्टडीज (१८७३-७४). ५) द लाइफ अँड ग्रोथ ऑफ लँग्विज (१८७५). ६) ए संस्कृत ग्रामर : इन्क्लूडिंग बोथ द क्लॅसिकल लँग्विज अँड द ओल्डर डायलेक्ट्स ऑफ द वेदाज अँड ब्राह्मणाज (१८७९). हा त्यांचा प्रमुख ग्रंथ मानला जातो. ७) इंडेक्स व्हर्बोरम टू द अथर्ववेद (१८८१). १८६४ साली निघालेल्या वेब्स्टर्स डिक्शनरीचे ते संपादक होते त्याचप्रमाणे द सेंच्युरी डिक्शनरी : ॲन एनसायक्लोपीडिक लेक्सिकॉन ऑफ द इंग्लिश लँग्विजचे (६ खंड, १८८९-९१) ते प्रमुख संपादक होते. 

युरोप-अमेरिकेतील अनेक प्रतिष्ठित विद्यापिठे व संस्था यांचे मानसन्मान त्यांना लाभले. 

न्यू हेवन (कनेक्टिक) येथे त्यांचे निधन झाले.  

                            इनामदार, वि. बा.