अभिनवगुप्त : (सु. ९५०-सु. १०२०). काश्मीर शैव संप्रदायाचा महान आचार्य आणि संस्कृत भाषेतील श्रेष्ठ साहित्यशास्त्रविवेचक. त्याने लिहिलेल्या ग्रंथांवरून त्याच्या चरित्रासंबंधीचे काही तपशील उपलब्ध झाले आहेत. त्याच्या पूर्वजांपैकी अत्रिगुप्त हा अंतर्वेदीत, म्हणजे गंगा आणि यमुना या नद्यांच्या दुआबात, राहत असे. याच्या विद्वत्तेने प्रभावित झालेल्या काश्मीरच्या ललितादित्य (सु. ७२५- सु. ७६१) नामक राजाच्या आग्रहावरून तो काश्मीरात राहावयास आला. अभिनवगुप्ताच्या पित्याचे नाव नृसिंहगुप्त किंवा नरसिंहगुप्त असे होते. तथापि चुखल या नावानेच तो ओळखला जाई. विमलकला अथवा विमला हे त्याच्या आईचे नाव असून त्याच्या धाकट्या भावाचे नाव मनोरथगुप्त असे होते. त्याच्या कुटुंबातच ज्ञानोपासनेची परंपरा होती. स्वतः अभिनवगुप्ताने विविध विषयांचे ज्ञान संपादन करण्यासाठी अनेक गुरू केले होते. काश्मीर शैवमताचा अथवा प्रत्यभिज्ञानदर्शनाचा अभ्यास त्याने लक्ष्मणगुप्त नामक गुरूपाशी केला. साहित्यशास्त्राच्या बाबतीत भट्टेंदुराजाचे शिष्यत्व त्याने स्वीकारले होते. भट्टतौताकडे तो नाट्यशास्त्र शिकला. शंभुनाथ हा त्याचा तंत्रशास्त्रातील  गुरू. न्याय-वैशेषिक दर्शन, बौद्ध धर्म व तत्त्वज्ञान आणि वैष्णव पंथाची तत्त्वे यांचा अभ्यास करण्याच्या हेतून तो त्या त्या विषयांतील गुरूंकडे गेला. योगाभ्यासातही त्याने प्रावीण्य संपादन केले होते. त्यास ‘म्‌हामाहेश्वर’ आणि ‘आचार्यपद’ अशा गौरवयुक्त पदव्या प्राप्त झाल्या होत्या. 

त्याच्या नावावर चाळिसाहून अधिक ग्रंथ मोडतात. त्याच्या ग्रंथांचे सर्वसाधारणतः चार वर्ग करण्यात येतात.तंत्रालोक,मालिनीविजयवार्तिक,परात्रिंशिकाविवरण,तंत्रसारयांसारख्या तंत्रविषयक ग्रंथांचा एक वर्ग होतो. दुसऱ्या वर्गातभैरवस्तव,क्रमस्तोत्र, बोधपंचदशिकायांसारखी काव्यरचनायेते.अभिनवभारती,लोचनकाव्यकौतुकविवरणअसे नाट्यशास्त्रविषयक व साहित्यशास्त्रविषयक ग्रंथ तिसऱ्या वर्गात येतात.अभिनवभारतीही भरताच्यानाट्यशास्त्रावरील टीका आहे. या ग्रंथासनाट्यवेदविवृत्तीअसेही नाव आहे.लोचनकिंवाध्वन्यालोकलोचनही आनंदवर्धनाच्याध्वन्यालोकावरील टीका होय. भट्टतौताच्याकाव्यकौतुक या ग्रंथावर त्याने लिहिलेली टीकाकाव्यकौतुकविवरण  यानावाने ओळखण्यात येते.ईश्वरप्रत्यभिज्ञाविमर्शिनी आणिईश्वरप्रत्यभिज्ञाविवृत्तिविमर्शिनी सारखेप्रत्यभिज्ञादर्शनविषयक ग्रंथचौथ्या वर्गात मोडतात.ईश्वरप्रत्यभिज्ञाविमर्शिनी  या ग्रंथास लघुवृत्ति असेही म्हणतात. हा ग्रंथ उत्पलदेवाच्याईश्वरप्रत्यभिज्ञाकारिका या ग्रंथावरील टीकाहोय. ईश्वरप्रत्यभिज्ञाविवृत्तिविमर्शिनी  या ग्रंथासबृहतीवृत्तिअसे दुसरे नाव आहे.ईश्वरप्रत्यभिज्ञाकारिकाया आपल्या ग्रंथावर उत्पलदेवानेचलिहिलेल्या ईश्वरप्रत्यभिज्ञाविवृतिया टीकेवर यानेईश्वरप्रत्यभिज्ञाविवृतिविमर्शिनी लिहिली. या उत्पलदेवाचा उल्लेख अभिनवगुप्ताने आपल्यालोचनया ग्रंथात‘परमगुरू’असा केला आहे.

तंत्र आणि प्रत्यभिज्ञादर्शन या दोन्ही विषयांवरील अभिनवगुप्ताचे ग्रंथ तद्विषयक अभ्यासास प्रमाणभूत मानले गेले आहेत. साहित्यशास्त्रात ध्वनिमताचा पुरस्कर्ता म्हणून अभिनवगुप्ताचे नाव विख्यात आहे.अभिनवभारतीचे सर्व अध्याय आज उपलब्ध नाहीत. तथापि संशोधकांच्या हाती असलेला तिचा भाग भरताच्यानाट्यशास्त्राचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. भरताचे निरनिराळे भाष्यकार आणि नाट्यशास्त्रविषयक लेखन करणारे अनेक लेखक अभिनवभारतीमुळे अभ्यासकांस परिचित झाले. याच ग्रंथात भरताच्या नाट्यशास्त्रातील रससिद्धांताची त्याने केलेली चर्चा अतिशय मौलिक स्वरूपाची आहे.

काश्मीरात अशी आख्यायिका रूढ आहे, की आपल्या बाराशे शिष्यांना बरोबर घेऊन भैरवस्तोत्र म्हणत अभिनवगुप्त एका गुहेत शिरला आणि त्यानंतर पुन्हा कोणास दिसला नाही. ही गुहा श्रीनगरच्या नैर्ऋत्येस सुमारे २१ किमी. अंतरावर असलेल्या भैरव या ठिकाणी दाखविण्यात येते, असे डॉ. ग्रीअर्सन यांनी म्हटले आहे. 

पहा : काश्मीर शैव संप्रदाय. 

संदर्भ : 1. Kane, P. V. History of Sanskrit Poetics, Delhi, 1961.

           2. Pandey, K. C. Abhinavagupta, Varanasi, 1963.

           ३. देशपांडे, ग. त्र्यं. भारतीय साहित्यशास्त्र, मुंबई, १९६३. 

पाटील, ग. मो.