पाणिनि : (इ. स. पू. सु. पाच वा चवथे शतक). संस्कृतातील पहिल्या सर्वांगपूर्ण अशा व्याकरणाचा कर्ता. पाणिनीच्या काळासंबंधी विद्वानांत मतभेद आहेत. अष्टाध्यायी, अष्टक  किंवा शब्दानुशासन  ह्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या, पाणिनीच्या व्याकरणग्रंथातील पुराव्यांवरून त्याचप्रमाणे अन्य ग्रंथांत आलेले पाणिनीविषयक उल्लेख लक्षात घेऊन पाणिनीचा काळ वर दिल्याप्रमाणे इ. स. पू. पाचवे वा चवथे शतक असा सामान्यतः मानला जात असला, तरी काही संशोधकांनी पाणिनीचा काळ इ. स. पू. आठव्या शतकापर्यंत मागे नेलेला आहे. पाणिनीच्या एका सूत्रात शलातुर देशाचा उल्लेख आहे. ह्याच देशाचा तो रहिवासी असावा, असा विद्वानांचा तर्क आहे. शलातुर ह्या शब्दाचे प्राकृत रूप सलाउर असे होते. अनेक प्रांतांत ‘स’ च्या ऐवजी ‘ह’ उच्चारला जात असल्यामुळे सलाउरचे रूप हलाउर होऊन आणि ‘ह’ व ‘ल’ ह्यांच्यात वर्णव्यत्यत होऊन सलाउरचे ‘लहाउर’ असे रूप होऊ शकते. ह्या ‘लहाउर’ चेच पुढे ‘लहोर’ झाले असावे. असे अनुमान करून शलातुर म्हणजेच आजचे लाहोर असण्याची शक्यता नमूद केली जाते. पाणिनीच्या सूत्रांतून येणारे सिंधु, तक्षशिला, कच्छ इ. उल्लेखही बोलके आहेत. पाणिनीचे शिक्षण तक्षशिलेस झाले असावे, असा तर्क आहे. पाणिनीचा ‘दाक्षीपुत्र’ असाही उल्लेख केला जातो, हे पाहता त्याच्या आईचे नाव ‘दाक्षी’ असावे, असा तर्क केला जातो.

पाणिनीने वैदिक भाषेबरोबर तत्कालीन बोलीभाषेचा अभ्यास करून दोहोंसाठी वर्णनात्मक व्याकरण लिहिले. सु. ४,००० सूत्रे असलेल्या ह्या व्याकरणग्रंथाचे आठ अध्याय असल्यामुळे त्याला अष्टाध्यायी  किंवा अष्टक  असे नाव रूढ झाले. अष्टाध्यायीमधील सूत्रे बीजगणितातील सूत्रांप्रमाणेच तांत्रिक परिभाषेत लिहिली गेली असून योजिलेल्या तंत्राचा नीट उलगडा व्हावा, म्हणून त्याने संज्ञासूत्रे आणि परिभाषासूत्रे दिलेली आहेत. 

वाक्यांतील पदांचा परस्परसंबंध, सामासिक पदांचा प्रकृतिप्रत्ययात्मक विभाग, संधी ह्यांचा विचार केला असून त्यासाठी अनुबंध, प्रत्याहार, स्थानिन्, आदेश, आगम इ. तांत्रिक साधनांचा उपयोग केला आहे. ग्रंथातील तपशील व बारकावे ह्यांवरून अष्टाध्यायी हा ग्रंथ म्हणजे शतकानुशतके चालू असलेल्या व्याकरणविषयक विचारांचे (व कदाचित ग्रंथांचेही) शेवटचे संस्करण असावे, असे दिसते. पाणिनीने आपल्या पूर्वीच्या दहा वैयाकरणांचा उल्लेख केलेला आहे. ‘गणपाठ’ व ‘धातुपाठ’ अशी परिशिष्टे त्याने अष्टाध्यायीला जोडलेली आहेत. गणपाठात शब्दांचे गट केलेले असून त्यासाठी समान प्रत्यय अथवा स्वर इ. कसोट्या लावल्या आहेत. तो तो गट त्या त्या गटातील पहिल्या शब्दापुढे ‘आदी’ हा (किंवा या अर्थाचा) शब्द लावून ओळखला जातो. उदा., ‘स्वरादि’. पाणिनीच्या सुत्रांवर ⇨ कात्यायनाने (इ. स. पू. सु. तिसरे शतक) चिकित्सक दृष्टिकोणातून वार्त्तिके लिहिली आहेत. ह्या वार्त्तिकांवर ⇨ पतंजलीने ⇨ महाभाष्य  नावाची प्रसिद्ध टीका लिहिली (इ. स. पू. सु. १५०). सातव्या शतकात जयादित्य आणि वामन ह्यांनी अष्टाध्यायीवर काशिका  नावाची टीका लिहिली. इंग्रजी, जर्मन व फ्रेंच भाषांत अष्टाध्यायीचे अनुवाद झालेले आहेत. 

जोशी, शि. द.