मृच्छकटिक : कवी ⇨ शूद्रककृत विख्यात, दहा अंकी, संस्कृत प्रकरण नाटक. त्याच्या रचनाकालासंबंधीची वेगवेगळी मते पाहता, इ. स. पू. दुसरे शतक ते इ. स. पू. सहावे शतक ह्या कालखंडात ते केंव्हा तरी रचिले गेले असावे, असे दिसते.

ह्या नाटकाचे कथानक थोडक्यात असे: उज्जैन नगरीत चारूदत्त नावाचा एक सद्‍गुणसंपन्न पण निष्कांचन असा तरुण राहत असतो. तो एके काळी खूप श्रीमंत असतो. आपल्या दरिद्री अवस्थेतही धैर्य व नीती जपणाऱ्या ह्या चारूदत्तावर उज्जैन नगरीतील एक लावण्यसंपन्न गणिका वसंतसेना ही अनुरक्त झालेली असते. चारुदत्ताशी स्नेहसंबंध प्रस्थापित करण्यासाठी काही निमित्त मिळावे म्हणून ती एके दिवशी, सूर्यास्तानंतर चारुदत्ताच्या घरी जाण्यास निघते. वाटेत मूर्ख राजशालक शकार हा तिच्या मागे लागतो. वसंतसेना त्याला चकवून चारुदत्ताच्या घरी शिरते आणि आपल्या अंगावरील मौल्यवान अलंकार त्याच्या पुढे करून त्याला म्हणते, की मला चोरांची भीती वाटत असल्यामुळे हे दागिने आपण कृपया ठेवून घ्यावे. तिचा आग्रह मोडता न आल्यामुळे चारुदत्त तसे करतो. परंतु नंतर एके रात्री शर्विलक नावाचा एक चोर चारुदत्ताचे घर फोडून ते दागिने चोरून नेतो. त्यांची भरपाई करण्यासाठी चारुदत्त आपली पत्नी धूता हिची एक मौल्यवान रत्नमाला वसंतसेनेकडे पाठवून देतो आणि तिला कळवतो, की तुझे अलंकार मी द्यूतात हारलो. त्यांच्या बदल्यात ही रत्नमाला तू ठेवून घे. वसंतसेनेची दासी मदनिका हिचा शर्विलक हा प्रियकर. वसंतसेनेच्या सेवेतून तिला मुक्त करून तिच्याशी विवाह करण्याच्या हेतूने त्याने दागिने चोरलेले असतात. तो मदनिकेस ते नेऊन देतो. मदनिका ते अलंकार ओळखते आणि वसंतसेनेला परत करण्याचा सल्ला त्याला देते. आपण चारुदत्ताकडून आलो, असे सांगून शर्विलक ते दागिने वसंतसेनेला परत करतो. ह्या संदर्भात मदनिका आणि शर्विलक ह्यांच्यात झालेले संभाषण वसंतसेनेने चोरून ऐकलेले असते. ही घटना चारुदत्ताचा खराखुरा दूत मैत्रेय (विदूषक) हा रत्नमाला घेऊन वसंतसेनेकडे येण्यापूर्वीच घडलेली असते. वसंतसेना शर्विलक आणि मदनिका ह्यांचा विवाह घडवून आणते. 

नंतर आपले मौल्यवान दागिने आणि चारुदत्ताने दिलेली रत्नमाला घेऊन वसंतसेना चारुदत्ताच्या घरी जाते. वसंतसेनेच्या प्रेमाला चारुदत्ताचा प्रतिसाद मिळतो. त्या रात्री वसंतसेना चारुदत्ताच्या घरीच राहते. दुसऱ्या दिवशी सकाळी चारुदत्त पुष्पकरंडक नावाच्या उद्यानात जातो व गाडीवानास सांगतो, की नंतर वसंतसेनेला गाडीतून पुष्पकरंडक उद्यानात घेऊन ये. गाडीवान गाडी तयार करतो.

चारुदत्ताचा मुलगा रोहसेन हा खेळण्यासाठी सोन्याच्या गाडीचा हट्ट धरून रडत असतो. दाईने त्याला मातीची गाडी दिलेली असते त्याला रडताना पाहून वसंतसेना आपले सुवर्णालंकार, सोन्याची गाडी तयार करण्यासाठी, रोहसेनाला देऊन टाकते. 

घराबाहेर चारुदत्ताचा गाडीवान वसंतसेनेची वाट पाहत असतानाच राजशालक शकाराची गाडी त्याचा गाडीवान, गाड्यांची खूप गर्दी झाल्यामुळे, तेथेच आणून लावतो. वसंतसेना राजशालकाच्या गाडीला चारुदत्ताची गाडी समजून तिच्यात जाऊन बसते. 

चारुदत्ताच्या घराच्या दाराआड आर्यक नावाचा एक गवळ्याचा मुलगा लपून बसलेला असतो. हा उज्जैनचा राजा होणार, असे भाकीत कोणा सिद्ध पुरुषाने करून ठेवलेले असल्यामुळे उज्जैनच्या पालकनामक राजाने त्याला तुरुंगात घातलेले असते आणि मित्रांच्या साहाय्याने तो पळालेला असतो. वसंतसेनेसाठी तयार ठेवलेल्या गाडीत आर्यक बसतो आणि गाडीवानही, वसंतसेना बसली असे समजून गाडी चालू करतो. गाडी चारुदत्तापाशी जाते तेव्हा वसंतसेनेऐवजी आर्यकाला तेथे पाहून तो चकित होतो. पण तो आर्यकाला पळून जाण्यास साहाय्य करतो. 

निराश मनाने घरी परतलेल्या चारुदत्ताला वसंतसेनेने आपल्या मुलाला सोन्याचे दागिने दिल्याचे कळते तेव्हा ते दागिने तिला परत देण्यासाठी तो मैत्रेयाच्या स्वाधीन करतो. 

वसंतसेना राजशालकाच्या गाडीतून पुष्पकरंडक उद्यानात पोचण्याऐवजी शकाराकडे पोचते. तो तिला वश करण्याचा प्रयत्न करतो. त्यात यश मिळत नाहीसे पाहून तो तिचा गळा दाबतो. वसंतसेना मूर्च्छित होऊन पडते. ती मेली, असे समजून शकार तिथून पळतो आणि तिच्या वधाचा आरोप चारुदत्तावर लादतो. द्रव्यलोभाने चारुदत्ताने वसंतसेनेला मारले, असे तो सांगतो. इकडे मैत्रेय वसंतसेनेचे दागिने तिच्याकडे पोचते करण्यासाठी निघालेला असतो. चारुदत्ताला न्यायसभेत धरून नेले, हे कळताच तोही तेथे जातो आणि त्याच्या हातातले दागिन्यांते गाठोडे चारुदत्ताविरुद्धचा पुरावा ठरून चारूदत्ताला प्राणदंडाची शिक्षा सांगितली जाते. 

इकडे वसंतसेना शुद्धीवर येऊन चारुदत्ताच्या घराच्या दिशेने जाऊ लागते. वाटेतच चारुदत्ताला सुळी देण्याची तयारी चाललेली असते. गर्दी पाहून वसंतसेना चौकशी करते आणि तिला जिवंत पाहिल्यावर चारुदत्त निर्दोष ठरतो. त्याच वेळी वार्ता येते, की आर्यकाने पालक राजाला ठार मारून उज्जैनची गादी प्राप्त करून घेतली आहे. नवा राजा चारुदत्ताला त्वरित मुक्त करतो. 


चारुदत्त आणि वसंतसेना ह्यांच्या प्रणयकथेच्या जोडीला शर्विलक आणि मदनिका ह्यांची प्रेमकथा आणि आर्यकाला उज्जैनच्या गादीवर बसवण्यासाठी झालेली रक्तरंजित राज्यक्रांती अशी दोन उपकथानके ह्या नाटकात आहेत. प्रेमासाठी चोरी करणारा शर्विलक हा राज्यक्रांतीचा एक नेताही आहे आणि गाड्यांचा घोटाळा सांगून, वसेतसेनेचा खून केल्याच्या आरोपाला चारुदत्त उत्तर देत नाही. ते आर्यकाच्या पलायनाला त्याने मदत केलेली असते म्हणून. म्हणजे ह्या दोन्ही उपकथा राज्यक्रांतीशी निगडित आहेत. एक विशाल सामाजिक पट शूद्रकाने चित्रणासाठी निवडलेला आहे. 

मृच्छकटिकातील प्रेमदर्शन चाकोरीबाहेरचे आहे. गणिकेच्या दासीच्या प्रेमात पडलेला, तिच्या मुक्ततेसाठी घरफोडी करणारा राजकीय नेता शर्विलक आणि स्वभावतःच प्रमाणिक अशी मदनिका हे युगुल तसेच चारुदत्तावर प्रेम करणारी, सामान्य जीवनात प्रवेश करण्यासाठी धडपडणारी, प्रेमापुढे संपत्तीला तुच्छ लेखणारी वसंतसेना आणि औदार्याचा पुतळा चारुदत्त हे दुसरे युगुल ह्याची साक्ष देते.

मृच्छकटिकातील व्यक्तिरेखनात लक्षणीय वैविध्य असून काही व्यक्तिरेखा विशेष स्मरणात राहतात. उदा., आपल्याच दारिद्र्याची आपणच थट्टा करणारा दर्दूरकासारखा एक जुगारी त्यात आहे. दुष्टपणा, क्रौर्य, कामुकता ह्यांचे अजब मिश्रण असलेला शकार मूर्तिमंत मित्रप्रेम असा मैत्रेय ह्या व्याक्तिरेखांचाही ह्यात अंतर्भाव करावा लागेल.

पौराणिक कथा आणि राजदरबारी प्रणय ह्यांनी गजबजलेल्या संस्कृत नाट्यसृष्टीत मृच्छकटिक वेगळे उठून दिसते. जुगाऱ्यांचे जीवन, घरफोडी, न्यायालयातील घटना इ. प्रसंग आणि वातावरण रंगवून जीवनातील वास्तवतेशी ह्या नाटकाने नाते जोडले आहे. 

विनोद हा मृच्छकटिकाचा आणखी एक विशेष. विदूषकाचा सांकेतिक विनोद येथे नाही, तर विविध विसंगतींमधून अस्सलपणे निर्माण झालेला विनोद आहे. तो हसवतो आणि डोळ्यांत पाणीही आणतो. 

भासाच्या नावावर असलेल्या नाटकांत चारुदत्त नावाचे एक नाटक आहे. ते नाटक आणि मृच्छकटिक ह्यांच्यात लक्षणीय साम्य असल्यामुळे दोन नाटकांचा परस्परसंबंध अभ्यासकांत अद्याप विवाद्य ठरलेला आहे. 

इंग्रजी, जर्मन, फ्रेंच अशा विविध भाषांत मृच्छकटिक अनुवादिले गेले आहे. मराठीत परशुरामपंत तात्या गोडबोले ह्यांनी त्याचा केलेला अनुवाद (१८६२) प्रसिद्धच आहे.

भट, गो. के.