वेद व वेदांगे : भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद ह्या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या असा आहे. विद्या व कला ह्यांनाच आरंभी वेद ही संज्ञा होती आणि विविध विद्यांचा  निर्देश‘वेद’ ह्या संज्ञेने केला जात असे. उदा., आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद, इतिहासवेद इत्यादी. वेदोत्तरकाली हा व्यापक अर्थ जाऊन ⇨ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद हे चारच वेद धर्मविद्या म्हणून स्वत: प्रमाण ठरले आणि ⇨ वेदकाल व वेदनिर्मितीचे स्थान ह्यांबद्दल विविध मते मांडण्यात आली.

भारतीय तत्त्वज्ञानातील आस्तिक षड्‌दर्शनांपैकी एक असलेल्या ⇨पूर्वमीमांसा (इ. स. पू. सु. तिसरे शतक) ह्या दर्शनावरील ⇨जैमिनीप्रणीत ग्रंथात मांडण्यात आलेल्या मूलभूत सिद्धांतानुसार वेद हे स्वत:प्रमाण व अपौरूषेय आहेत. वेद हे अपौरूषेय आहेत ह्याचा अर्थ असा, की ते ईश्वराने किंवा माणसाने निर्माण केलेले नाहीत (‘पुरुष’ ह्या शब्दाचा अर्थ ईश्वर वा माणूस असा आहे). पूर्वमीमांसेचे मूलभूत सिद्धांत असेही सांगतात, की ईश्वर हा मानवी बुद्धीने सिद्ध होत नाही आणि ईश्वर वेदांच्या आधारे सिद्ध होतो असे म्हटले, तरी ईश्वर हा वेदांचा प्रवक्ता व उपदेशक आहे वेदांचा कर्ता नव्हे. धर्म म्हणजे मनुष्याचे कर्तव्य काय हे वेद सांगतात, त्याचप्रमाणे अधर्म म्हणजे काय, हेही ते सांगतात. धर्माचे वा अधर्माचे पारलौकिक फळ काय, हे मानवी बुद्धीस कळू शकत नसल्यामुळे धर्म वा अधर्म हा वेदांवाचून मानवी बुद्धीस कळत नाही. काही भारतीय तत्त्वज्ञाने–उदा., न्याय-वैशेषिक, वैष्णव, शैव इ.–वेद हे ईश्वरप्रणीत आहेत, असे म्हणतात. वेद ब्रह्माची नि:श्वसिते होत, असे बृहदारण्यकोपनिषदात सांगितले आहे (२.४.१०).

आर्यनामक मानवगणांची धार्मिक प्रतीती व धार्मिक जीवन हे वेदांमध्ये मुख्यत: प्रतिबिंबित झालेले आहे. वेदांना धर्मग्रंथ म्हणून मिळालेले प्रामाण्य जगातल्या इतर कोणत्याही धर्मग्रंथांच्या प्रामाण्यापेक्षा अगदी वेगळ्या पद्धतीने आलेले आहे, असे दिसते. वेदांचे प्रामाण्य हे सामाजिक संमतीने स्थिरावत गेले आहे. वेदांची रचना ज्या क्रमाने होत गेली, त्या क्रमाने हळुहळू ही सामाजिक संमती प्राप्त होत गेली. म्हणजे धार्मिक जीवनपद्धती प्रथम सिद्ध झाली व वेद हे त्या पद्धतीचे प्रतिबिंब म्हणून क्रमाने बनत गेले व पुढील पिढ्यांना प्रमाण झाले. सर्व समाजाची स्थिरावलेली मान्य परंपरा म्हणजे शिष्टाचार हा हिंदूंच्या धार्मिकतेचा आधार होय. वेदकाली जो प्रतिष्ठित समाज होता, त्याच्या धार्मिक जीवनपद्धतीचे वा शिष्टाचाराचे प्रतिबिंब वेदांमध्ये पडले. वेद हे ‘महाजन परिगृहीत’ म्हणून प्रमाण, असे प्राचीन हिंदू पंडित म्हणतात, ते ह्याच अर्थाने.

वेद हे अनेक पिढ्यांनी निर्माण केलेले साहित्य आहे. ते साठत आणि वाढत गेलेले आहे. त्याचप्रमाणे एका पिढीने दुसऱ्या पिढीला तोंडी पढवून सु. तीन हजार वर्षे ते मोठ्या परिश्रमाने सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

वर निर्दिष्ट केलेल्या चार वेदांचे साहित्य चार प्रकारचे आहे : संहिता, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे.

संहिता : संहिता म्हणजे संग्रह. वेळोवेळी ऋषींनी रचलेले गद्य व पद्य मंत्र विषयवारीने एकत्र केले, त्याच संहिता होत. ऋग्वेद हा पद्यमंत्रांचा संग्रह आहे. हे पद्यमंत्र म्हणजे निरनिराळ्या देवतांच्या मुख्यत: प्रार्थना किंवा स्तोत्रे होत. सामवेद  हा गायनाच्या विविध शैलींचा संग्रह आहे. ह्या संहितेत ऋग्वेदातील बहुतेक पद्ममंत्रांचाच संग्रह आहे. यजुर्वेदात पद्यमंत्रांबरोबरच बरेचसे गद्यमंत्रही आहेत. यजुर्वेदाच्या मंत्रांमध्ये प्रार्थना, यज्ञात दिल्या जाणाऱ्या आहुतींचे ‘स्वाहा’ असे पद ज्या वाक्याच्या शेवटी येते, ते मंत्र, यज्ञातील विविध क्रियांचा निर्देश करणारे आणि यज्ञात म्हणावयाचे मंत्र आणि प्रार्थना वा आदेश बोधित करणारे मंत्र संगृहीत केले आहेत. अथर्ववेदातील बरेच मंत्र पद्यमय असून काही गद्यमय आहेत. बुद्धी, शौर्य, आरोग्य, रोगनिवारण, शत्रुनाश, युद्धविजय, राज्याभिषेक, गर्भाधान, नामकरण, विवाह, वशीकरण, राक्षसपिशाच इत्यादिकांपासून होणाऱ्या बाधांचे निवारण अशा प्रकारच्या उद्देशांनी वापरायचे मंत्र आहेत.

प्रत्येक वेदाच्या शाखा आहेत. त्या शाखांच्या भिन्नभिन्न संहिता आहते. शाखाप्रवर्तक ऋषींनी प्रवृत्त केलेली त्या त्या वेदाची परंपरा म्हणजे शाखा होय. आज उपलब्ध असलेल्या एका एका वेदाच्या अनेक शाखांच्या संहिता पाहिल्या तर असे दिसून येते, की त्यांच्यामध्ये असलेले बहुतेक गद्य किंवा पद्य मंत्र सारखेच आहेत. मधूनमधून पाठभेद व काही थोडे अधिक मंत्र दिसतात. म्हणजे प्रत्येक मुख्य वेद एकच असतो. शाखाभेदाने त्या त्या वेदात पाठभेद व थोडेसे निराळे मंत्र एवढाच फरक राहिला. यजुर्वेदाच्या कृष्ण आणि शुक्ल अशा मुख्य शाखा आहेत. कृष्णयजुर्वेदाच्या संहितांमध्ये मंत्रांबरोबर, यज्ञांचे विवेचन करणारा ब्राह्मणभाग अंतभूत आहे तर शुक्लयजुर्वेदाच्या संहितांत फक्त मंत्रांचाच संग्रह केलेला आहे.

ब्राह्मणे : ब्राह्मणे वा ब्राह्मणग्रंथ हे गद्य वाङ्‌मय आहे. विविध यज्ञ कसे करावयाचे, ह्याचे तपशीलवार विवरण त्यांत असते. यज्ञातील प्रधान कर्म, अंगभूत कर्मे, कर्माची साधने, प्रधान कर्मे व अंगभूत कर्मे ह्यांची विविध नामे, यज्ञांचे अधिकारी व यज्ञांची विविध फले ह्यांत सांगितलेली असतात. यज्ञकर्मे रीतसर पार पाडण्याचा महिमा सूचित करणाऱ्या देव, ऋषी, असुर इत्यादिकांच्या कथा, योग्य पद्धतीने पार पाडलेल्या कर्माची व साधनांची अतिशयोक्तिपूर्ण वर्णने, तसेच अयोग्य रीतीने अनुष्ठिलेल्या कर्मांच्या व निषिद्ध पदार्थांच्या दुष्परिणामांची अतिशयोक्तिपूर्ण वर्णने, तसेच अयोग्य रीतीने अनुष्ठिलेल्या कर्मांच्या व निषिद्ध पदार्थांच्या दुष्परिणामांची अतिशयोक्तिपूर्ण वर्णने ह्यांत आलेली असतात. ह्या ब्राह्मण–वाङ्‌मयातील बराचसा भाग रुक्ष व सैल शैलीने भरलेला आहे. असे असले, तरी वैदिक संस्कृतीच्या अभ्यासकाला ह्या वाङ्‌मयाचे फार महत्त्व आहे. वेदांपासून संस्कृत भाषेच्या झालेल्या परिवर्तनाचा अखंड इतिहासही त्यामुळे समजतो. ऐतिहासिक भाषाशास्त्राचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून वैदिक संहितांचे संदर्भात ब्राह्मण-वाङ्‌मयाला महत्त्व आहे. [→ ब्राह्मणे].


आरण्यके : अरण्यातच ज्या ब्राह्मणभागाचे व्रतस्थ राहून पठन करावयाचे तो भाग म्हणजे ‘आरण्यक’ होय. सर्व आरण्यके म्हणजे ब्राह्मणग्रंथांची अखेरची प्रकरणे होत. यांत यज्ञधर्माच्या विधानात्मक विवेचनापेक्षा यज्ञाचे तात्त्विक विवेचन आढळते.

उपनिषदे : सामान्यतः जीव, ब्रह्म आणि जगत्‌ यांचे संबंधात विवेचन करणारे तत्त्वज्ञानात्मक ग्रंथ उपनिषदे म्हणून ओळखली जातात. अनेक प्राचीन उपनिषदे ही वर्तमान आरण्यकांचे भाग असावेत. तसेच आज प्रसिद्ध असलेली प्राचीन उपनिषदे ज्या आरण्यकांचे भाग आहेत, त्यांतील उपनिषदांव्यतिरिक्त भागांनाही, ‘उपनिषद’ ही संज्ञा आरण्यकांमध्ये दिलेली असते. उदा., ‘बृहदारण्यक’ (मोठे आरण्यक) हा शतपथ ब्राह्मण नामक ब्राह्मणग्रंथाचा भाग असून हेच बृहदारण्यकोपनिषद म्हणून निर्दिष्ट केले जाते. अगदी प्राचीन काळी ‘आरण्यक’ व ‘उपनिषद’ हे दोन्ही शब्द पर्यायशब्द असावेत.‘गुरूच्या जवळ बसून शिकावयाची अध्यात्मविद्या’ हा उपनिषदाचा व्युत्पत्त्यर्थ आहे. तथापि उपासना, रहस्य किंवा गूढ ज्ञान असाही त्याचा अर्थ आहे.‘वेदांचा अखेरचा भाग’ ह्या अर्थाने उपनिषदे ह्यांना ‘वेदान्त’ असेही म्हणतात. [→ आरण्यके व उपनिषदे].

उपर्युक्त चार वेद, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे ह्यांची माहिती मराठी विश्वकोशात स्वतंत्र नोंदींच्या रूपाने यथास्थळी दिलेली आहे.

वेदांगे : वेदांना पूर्ण प्रमाण आणि पवित्र मानणाऱ्या वैदिकांची अशी श्रद्धा होती, की वेदांतील विधिनिषेधांच्या पालनानेच आपल्या भावी पिढ्यांचे ऐहिक व पारलौकिक कल्याण होईल. त्यामुळे वेदांचे पठन पिढ्यान्‌पिढ्या चालू ठेवून वैदिक साहित्य जिवंत ठेवले गेले. त्याच कारणाने वेदांचे बौद्धिक चिंतन सुरू झाले व त्या चिंतनातून वैदिकांना बौद्धिक ज्ञानाचा पाया घालता आला. त्यातून वेदांगे निर्माण झाली. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरूक्त, छंद आणि ज्योतिष अशी एकूण सहा वेदांगे आहेत.

शिक्षा : वेदमंत्रांचे उच्चारण शुद्ध व अचूक होण्याच्या दृष्टीने ध्वनिशास्त्राचा अभ्यास करून रचण्यात आलेल्या शास्त्रांना ‘शिक्षा’ असे म्हणतात. काही प्राचीन शिक्षा-ग्रंथ आज उपलब्ध नसले, तरी ध्वनिशास्त्राविषयी मान्यताप्राप्त अशा सर्वसामान्य निष्कर्षांचा आपापल्या शाखेनुसार विचार करणारे ग्रंथ मिळतात. त्यांना प्रातिशाख्ये म्हणतात. [→ शिक्षा].

कल्प : ह्या वेदांगास ‘कल्पसूत्रे’ असेही म्हणतात. कल्पसूत्रांमध्ये श्रौतसूत्रे, शुल्बसूत्रे, गृह्यसूत्रे आणि धर्मसूत्रे ह्यांचा समावेश होतो. संहिता व ब्राह्मणग्रंथ ह्यांतील यज्ञसंस्थेचे सांगोपांग स्वरूप व्यवस्थित, एकत्र आणि विषयवारीने उपलब्ध करण्यासाठी श्रौतसूत्रे निर्माण झाली. काही श्रौतसूत्रांना–उदा., बौधायन, मानव, आपस्तंब व कात्यायन – ‘शुल्बसूत्र’ नावाचा अध्याय जोडलेला असतो. यज्ञकुंड, यज्ञवेदी, यज्ञमंडप तयार करताना घ्यावयाच्या मोजमापांचे गणित शुल्बसूत्रांत सांगितलेले असते. भारतीय भूमितीचे प्राथमिक स्वरूप शुल्बसूत्रांत दिसते. गृह्यसूत्रांत नामकरण, उपनयन, विवाह इ. सोळा संस्कार तसेच श्राद्धे ह्यांचे विधी सांगितले आहेत. आश्वलायन, शाखायन, बौधायन, आपस्तंब, पारस्कर, गोभिल, कौशिक इ. १७ गृह्यसूत्रे आज उपलब्ध आहेत. धर्मसूत्रांत त्रैवर्णिक समाजाचे आश्रमधर्म व लौकिक आचारधर्म म्हणजे कायदे व राजधर्म सांगितले आहेत. वर्णधर्म व आश्रमधर्म हे धर्मसूत्रांचे मुख्य विषय होत. मनू, याज्ञवल्क्य इत्यादींच्या स्मृतींच्या पूर्वी झालेले आणि मुख्यतः गद्यात्मक सूत्रशैलीत लिहिलेले हे ग्रंथ आहेत. [→ कल्पसूत्रे].

व्याकरण : वेदमंत्रांतील शब्द अपभ्रष्ट होऊ नयेत, तसेच संधी होऊन शब्दात बदल होत असल्यामुळे मूळ शब्द कसा आहे तो कळावा तसेच अर्थही कळावा ह्यांसाठी वैदिक मंत्रांचा पदपाठ तयार करण्यात आला. तो करताना व्याकरण अगोदरच तयार होते. पदपाठ तयार झाल्यानंतर संस्कृत भाषेत बदल झालेले होते. तेव्हा सबंध शिष्ट संस्कृतचे व्याकरण तयार झाले. अनेक व्याकरणे झाली. त्यांत ⇨पाणिनीचे व्याकरण श्रेष्ठ ठरले.

निरुक्त : वेदांची भाषा कालांतराने समजणे कठीण जाऊ लागले. त्यामुळे शब्दांची व्युत्पत्ती व अर्थ सांगण्याचे शास्त्र निर्माण झाले. तेच निरुक्त होय. वेदांतील शब्दांचे व धातूंचे संग्रह म्हणजे ‘निघंटू’ वा शब्दकोश. वैदिक समानार्थक व अनेकार्थक पदांचा वा धातूंचा जो सर्वप्राचीन उपलब्ध कोश आहे, त्याला निघंटू असे नाव आहे. ह्या कोशावर यास्काने लिहिलेले भाष्यही निरुक्त ह्या नावाने प्रसिद्ध आहे. [→ निघंटु-२निरुक्त].

छंद : छंद ह्या वेदांगाला ‘छंदोविचिती’ अशीही संज्ञा आहे. वेदांतील बरेच मंत्र छंदोबद्ध असून छंद हे वेदमंत्रांप्रमाणे वेदमंत्रांनी करावयाच्या यज्ञकर्माशीही निगडित आहेत. बाह्मणग्रंथांमध्ये छंदाच्या गूढ व अद्‌भुत सामर्थ्याची वर्णने येतात. ⇨पिंगल यांचा छंदः सूत्र हा ग्रंथ ह्या वेदांगाचा प्रतिनिधी मानला जातो. [→ छंदोरचना].

ज्योतिष : वेदकाली ज्योतिष हे सहावे वेदांग तयार झाले होते. सत्तावीस नक्षत्रे, चंद्राच्या अवस्था, सूर्याचे संक्रमण, ऋतूंची परिवर्तने ह्या सर्वांचे पद्धतशीर परिगणन यज्ञाच्या निमित्ताने वैदिक ऋषीला काळजीपूर्वक करावे लागे. श्रौत व गृह्य कर्मांसाठी लागणारे पंचांग वैदिक काळी अस्तित्वात आले. सत्तावीस नक्षत्रांची आकाशातील मांडणी ही प्रथम वेदकाली वैदिकांनी शोधली. शुक्लयजुर्वेदात ‘नक्षत्रदर्श’ म्हणजे ज्योतिषी ह्याचा उल्लेख आलेला आहे. वेदांगज्योतिषाचे बरेच ग्रंथ लुप्त झाले असून लगध नामक आचार्यांचा  ‘ज्यौतिषम्‌’ (इ. स. पू. १४००) हा एकच लहानसा निबंध शिल्लक राहिला आहे. ह्या निबंधाचे ऋग्वेद शाखेत ३६ व यजुर्वेद शाखेत ४४ श्लोक मिळतात. यांतील अनेक श्लोक क्लिष्ट असून त्यांचा अर्थ नीट लागत नाही. त्यात ३६६ दिवसांचे वर्ष व पाच वर्षांचे एक युग होते, असे म्हटले आहे. उत्तरायण व दक्षिणायन केव्हा होते, ह्याचे गणित त्यात सांगितले आहे. लगध यांच्या कालखंडात गर्ग ह्या आचार्यांनी केलेली गर्गसंहिता आज लुप्त झालेली असली, तरी तिच्यातील संदर्भ नंतरच्या ग्रंथांमध्ये घेतलेले आढळतात. ह्या आचार्य गर्गांचा महाभारतात ज्योतिषशास्त्रज्ञ म्हणून निर्देश केलेला आहे. पितामहसिद्धांत हा ग्रंथही ह्याच कालखंडात झाला. त्याचा सारांश ⇨वराहमिहिराने पंचसिद्धांतिकेत दिला आहे. वेदकालीन ज्योतिषनिबंध नष्ट का झाले, हे सांगणे कठीण आहे. तथापि त्याचे एक कारण दिसते, ते असे : इसवी सनानंतर पुराणांचा प्रसार झाला. पुराणांमध्ये अतिशयोक्ती करण्याची व साध्या माहितीला अद्‌भुत रूपे देण्याची प्रवृत्ती वाढली. परिणामत: वेदांगज्योतिषातील साधी व वास्तविक कालगणनापद्धती पुराणिकांनी सोडून दिली व अवास्तव कालगणनेत इतिहास सांगण्यासाठी युग व कल्प ह्यांच्या वर्षसंख्या फारच फुगवल्या. त्यामुळे वेदांगज्योतिष नष्ट झाले असावे, असा तर्क आहे.

संदर्भ : जोशी, लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास, वाई, १९७२.

जोशी, लक्ष्मणशास्त्री