शंकर बाळकृष्ण दीक्षित

दीक्षित, शंकर बाळकृष्ण : (२०–२१ जुलै १८५३–२७ एप्रिल १८९८). भारतीय ज्योतिषशास्त्र व गणिती. भारतीय ज्योतिषशास्त्राच्या इतिहासाचा आढावा घेऊन त्यावरून त्यांनी काही ग्रंथांचे व घटनांचे काळ ठरविले तसेच भारतीय ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासाला पुनश्च चालना दिली.

त्यांचा जन्म व प्राथमिक शिक्षण रत्‍नागिरी जिल्ह्यातील मुरूड गावी झाले. याच काळात त्यांनी घरी संस्कृत व वैदिक विषयांचा प्राथमिक अभ्यास पूर्ण केला. नंतर दोन वर्षे त्यांनी दापोलीच्या कोर्टात उमेदवारी केली व त्याच काळात इंग्रजीचे थोडे अध्ययनही केले. नंतर ते पुण्याच्या प्रशिक्षण महाविद्यालयात दाखल झाले व १८७४ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. याच काळात त्यांनी दुसऱ्या शाळेत इंग्रजीचे अध्ययनही केले. तद्‌नंतर त्यांनी रेवदंडा, ठाणे व बार्शी येथे मुख्याध्यापक आणि पुढे धुळे व पुणे येथील प्रशिक्षण महाविद्यालयांत अध्यापक म्हणून काम केले. या काळातच त्यांनी ज्यातिषशास्त्र व गणित यांचा तपशीलवार अभ्यास केला आणि भारतीय ज्योतिषशास्त्रातील विविध सिद्धांतांची माहिती करून घेतली. यासाठी त्यांनी पाचशेहून अधिक संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला होता. अशा प्राचीन भारतीय ग्रंथांमधील उल्लेखांवरून काही ग्रंथांचे काळ त्यांनी निश्चित केले. उदा., शतपथ ब्राह्मणातील एका ऋचेच्या आधारे त्यांनी त्या ग्रंथाचा काळ इ. स. पू. ३००० वर्षे, तसेच वेदांगज्योतिषाचा काळ इ. पू. १४०० वर्षे असा निश्चित केला. यावरून इतिहास व ज्योतिषशास्त्राचा विकास यांच्यात संगती लावण्याचा प्रयत्‍न त्यांनी केला. शिवाय वैदिक काळात कोणत्या ज्योतिषशास्त्रीय गोष्टी माहित होत्या, तेही त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. ग्रीक आणि भारतीय ज्योतिषशास्त्रीय विचारांचा तुलनात्मक अभ्यास करून भारतीय ज्योतिषशास्त्र हे स्वतंत्र वेध व संशोधन यांद्वारे भारतातच विकसित झालेले शास्त्र आहे, हे त्यांनी सिद्ध केले. पंचांग शोधनाचे शास्त्र, नक्षत्रसंस्था व अंकगणित हे भारतीयांनी जगाला दिल्याचे त्यांनी दाखवून दिले. उलट राशी व वार ही मूळची भारतीय नव्हेत, असेही त्यांना आढळून आले. त्यांचा फलज्योतिषावर विशेष विश्वास नव्हता, पण ते त्यावर विचार करीत होते.

त्यांनी मराठी व इंग्रजीत विपुल लेखन केले असून त्याद्वारे सोप्या व मनोरंजक भाषेत विविध शास्त्रीय विषयांची माहिती त्यांनी करून दिलेली आहे. विद्यार्थिबुद्धिवर्धिनी  (१८७६), सृष्टचमत्कार  (१८८२), ज्योतिर्विलास  (१८९३), भारतीय ज्योति:शास्त्र  (१८९७), धर्ममीमांसा  (१८९५–९७) आणि सोपपत्तिक अंकगणित (१८९७), धर्ममीमांसा (१९८५-९७) आणि सोपपत्तिक अंकगणित (१८९७) हे ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत. ज्योतिर्विलास (अथवा रात्रीच्या दोन घटका मौज किंवा अंतरिक्षांतून फेरुटका) या ग्रंथात त्यांनी विश्वाची रचना, त्याचे अनंतत्त्व व त्यासंबंधीचे अढळ नियम तसेच प्राचीन व अर्वाचीन ज्योतिषशास्त्रीय विचार यांची सोप्या व मनोरंजक भाषेत माहिती दिली आहे. या ग्रंथांची सुधारित व आधुनिक माहिती घातलेली सहावी आवृत्ती रामचंद्र शंकर दीक्षित या त्यांच्या पुत्राने १९४८ साली प्रसिद्ध केली. इंडियन कॅलेंडर  (१८९५) हा इंग्रजी ग्रंथ त्यांनी आणि रॉबर्ट सेवेल यांनी मिळून लिहिला असून त्यातील इ. स. ३०० ते १९०० पर्यंतच्या तिथीतारखांचा मेळ घालणारी सारणी दीक्षितांची आहे. गुप्ताज इन्स्क्रिप्शन  हा ग्रंथ लिहिण्यासही फ्लीट यांना दीक्षितांनी मदत केली होती. यांशिवाय इंडियन अँटिक्वेरी एपिग्राफिका इंडिका, शालापत्रक  व ज्योतिषकल्पतरू  या मासिकांत व नेटिव्ह ओपिनियन या दैनिकात विविध शास्त्रीय विषयांवर त्यांनी लेख लिहिले होते. लेले व मोडक यांच्या सहाकार्याने त्यांनी सायन पंचांग काही दिवस काढले. या सहकाऱ्यांच्या मृत्यूनंतरही त्यांनी ते थोडे दिवस पदरमोड करून चालविले होते. ते विषमज्वराने पुण्याला मृत्यू पावले.

ठाकूर, अ. ना.