फलज्योतिष : आकाशस्थ ग्रह-नक्षत्रादि स्थिती जन्मकाळी कशी होती यावरून व त्यानंतर त्यांमध्ये होणाऱ्या बदलांवरून मनुष्याच्या एकंदर जीवनाबद्दलचे आणि आगामी काळाबद्दलचे भाकित करण्याचे शास्त्र म्हणजे फलज्योतिषशास्त्र अशी कल्पना आज रूढ आहे. ज्योतिर्गणितावर अवलंबून असणारी पण त्याहून सर्वथैव भिन्न अशी ही विद्याशाखा आहे. इंग्रजीत याला ‘ॲस्ट्रॉलॉजी’ असे म्हणतात. ॲस्ट्रो म्हणजे तारा लागोस म्हणजे तर्क. ग्रह-ताऱ्यांवरून केलेला तर्क (वर्तविलेले भविष्य) अशीच कल्पना पाश्चात्त्यांमध्ये रूढ आहे.

फलज्योतिष हे शास्त्र आहे काय ? : सिद्धांतांची पद्धतशीर मांडणी ज्या प्रबंधात केलेली असते, त्या प्रबंधरचनेस शास्त्र म्हटले जाते. या दृष्टीने फलज्योतिष हे शास्त्र म्हटले, तर त्यात कोणाला गैर वाटणार नाही परंतु तर्कशास्त्रीय कार्यकारण संबंधावर आधारलेले सिद्धांत म्हणजेच शास्त्रीय सिद्धांत या दृष्टीने या फलज्योतिष सिद्धांताचे निरीक्षण करावयाचे ठरल्यास प्रतिकूल उत्तर मिळते. उदा., गुरु-चंद्र युती भाग्यस्थानी झाली, तर ती विद्वत्ता, धर्मभावना यांना पोषक ठरून माणसाला चांगली दशा प्राप्त करवून देते हा सिद्धांत कदाचित अनुभवास येईलही पण ग्रहांच्या या स्थितीचा क्ष व्यक्तीच्या जीवनाशी या स्वरूपात परिणाम का व्हावा याचे समाधानकारक उत्तर ज्योतिषी देऊ शकत नाही. ग्रहांचा परिणाम होतो हे सिद्ध करण्याचे काम आजवर कोणास जमलेले नाही. मोठमोठ्या नामांकित ज्योतिषांची भाकितेही चुकलेली आढळतात. त्यामुळे इतर भौतिक शास्त्रांचा दर्जा फलज्योतिषशास्त्राला राहिलेला नाही. एकोणिसाव्या शतकात यूरोपीय देशांत तत्कालीन विचारवंतांनी या शास्त्रावर घणाघाती हल्ले चढविले आणि आज बौद्धिक जगतात फलज्योतिषास शास्त्र म्हणून मुळीच प्रतिष्ठा उरलेली नाही. महाराष्ट्रातही न. चिं. केळकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर वगैरे मान्यवर विद्वानांनीही फलज्योतिषशास्त्राचे मूलभूत तत्त्व नाकारले आहे व ते तर्काच्या कसोटीवर फोल ठरविले आहे. वैद्यक, कायदा ही शास्त्रे असूनही व्यवहारोपयोगाच्या दृष्टीने कला आहेत, त्याप्रमाणे फलज्योतिष सांगणे ही कलाच आहे. फलज्योतिषशास्त्रीय नियम वाचूनही प्रत्यक्ष भविष्यकथन करताना तारतम्य भरपूर प्रमाणात वापरावे लागते, त्यामुळेही फलज्योतिष सांगणे ही कलाच मानण्याकडे काहींचा कल झाला, तर ते अवास्तव ठरू नये.

महत्त्व : तर्कशास्त्री बुद्धिवाद्यांनी या शास्त्रात प्रतिष्ठा दिलेली नसली, तरी पूर्वपरंपरेने चालत आलेल्या मानवी श्रद्धेने मात्र फलज्योतिषशास्त्रास आपल्या पसंतीचा कौल दिला आहे. भविष्यकालाची जिज्ञासा, आशावाद या नैसर्गिक मानवी भावना आहेत. त्याशिवाय अवाढव्य, विचित्र व विविध प्रकारच्या घटनांनी भरलेल्या सृष्टीत आणि मानवी जीवनात काहीतरी एक सूत्र असणारच ही मानवी मनाची आवडती कल्पना असते. कर्मवादाचा सिद्धांत या कल्पनेतूनच उगवला. हा कर्मवाद म्हणा, पूर्वसंचित म्हणा, जे काही असते तेच ग्रहरूपाने वाट्यास येते, अशी मानवी श्रद्धा आहे. श्रद्धेमुळे अनुभव येतो. काहींची अनुभवामुळे श्रद्धा निर्माण होते व देशोदेशी निरनिराळ्या कालखंडांत आपल्या अचूक भविष्यवाणीने चकित करणारे ज्योतिषी झाले, ही वस्तुस्थिती आहे. उदा., आजही काही भूर्जपत्रांवर हस्तलिखित अशा भृगुसंहितेमध्ये किंवा नाडीग्रंथांमध्ये जातकाचे नाव, गाव इत्यादीपर्यंतचा अचूक तपशील सापडू शकतो. ज्या व्यक्तीची काहीच माहिती ज्योतिषास नाही अशाचे फक्त जन्मटिपण सादर केले, तर भृगुसंहितावाला ज्योतिषी त्या व्यक्तीचे भूतवर्तमान पोथीतून तंतोतंत बरोबर वाचून दाखविताना आजही आढळू शकतो. म्हणजे ज्याचा उलगडा तर्काने किंवा भौतिक शास्त्रीय कसोट्यांच्या साहाय्याने करता येत नाही, असे हे अनुभवनिष्ठ शास्त्र आहे. ते गूढ शास्त्र आहे. सर्व देशांतील जनसामान्यांना त्याचे वेड असते. आजमितीला भारतात व परदेशांत या विषयावर लाखो प्रती खपणारी पुस्तके व मासिके प्रतिवर्षी निघतात आणि या शास्त्रावर मोठ्या प्रतिष्ठेने विपुल धन मिळविणारे पुष्कळ व्यावसायिकही सर्वत्र आढळतात. ज्योतिषी चाणाक्ष, अनेक शास्त्रांची माहिती असणारा, बहुश्रुत, व्यवहार जाणणारा आणि नीतिमान असला, तर तो अनेकांना आधार होतो आणि रोगनिदान करणे, अभ्यासक्रम निवडणे, व्यवसाय ठरविणे, जीवनसाथी निश्चित करणे, आर्थिक धोरण आखणे इ. अनेक महत्त्वाच्या बाबतींत योग्य मार्गदर्शक ठरतो.

स्वरूप आणि प्रकार : सिद्धांत, संहिता आणि होरा या तीन प्रकारांत प्राचीन भारतीय ज्योतिष विभागले होते. ज्योतिर्गणित, फलज्योतिष, होरा (मुहूर्त) याप्रकारे त्याचे भाग होते. आजही कुंडली मांडून जीवनात येणाऱ्या सुखदुःखांचा अंदाज बांधणे, योग्यता ठरविणे आणि भविष्याचा अंदाज बांधणे हा मुख्य प्रकार सर्वत्र रूढ आहे. त्याशिवाय भविष्यकथनाच्या पोटशाखा पुष्कळच निर्माण झाल्या आहेत. उदा., भविष्यकालीन शुभाशुभ ठरविण्यासाठी गोचर, दशा, दिनवर्ष, विलोम दिशा इ. पद्धती बनल्या आहेत, तर जन्मकाली सूर्य ज्या राशीत ज्या अंशात असेल तेथे दरवर्षी सूर्य ज्या वेळेस येईल त्या वेळची कुंडली मांडून वर्षभविष्य सांगण्याचा प्रकार ‘ताजिक’ या नावाने रूढ आहे. प्रश्नसमयीची कुंडली मांडून पृच्छकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचे प्रश्नजातक हे स्वतंत्र प्रकरणच आहे. शुभाशुभ कर्मे इच्छेप्रमाणे घडावी म्हणून योग्य मुहूर्त ठरविण्याचा प्रकार ही आणखीच निराळी शाखा आहे. त्याव्यतिरिक्त जन्मदिनांक इत्यादींच्या साह्याने संख्याशास्त्राधारे ग्रहांचे शुभाशुभ ठरवितात. प्राचीन भारतीय परंपरेत नाक्षत्र ज्योतिषास विशेष मान होता आणि आजही नक्षत्रांचा मुहूर्त, होरा व फलज्योतिष ह्या सर्व प्रकारांमध्ये आधार घेतला जातो. फलज्योतिषातील कालनिर्णय ज्या दशा पद्धतीच्या पायावर उभा आहे, त्या दशा नक्षत्रांवरच आधारलेल्या आहेत. एवढेच नव्हे, तर केवळ नक्षत्रावर आधारित अशी भविष्यकथनाची स्वतंत्र पद्धतीही बरीच प्रचारात आहे. त्यानंतर केरलीय ज्योतिष, सहदेव-भाडळी, म्हालुगी इ. प्रकार भारतात उत्पन्न झाले. भृगुसंहिता, नाडीग्रंथ हा ज्योतिषशास्त्रातला स्वतंत्र प्रकार आहे. पर्जन्यमान, पेरण्या, वास्तुशांती, यज्ञ या दृष्टीने काही धर्मसंबंद्ध अशी याची एक शाखा आहे. मेदीनीय ज्योतिष या नावाची सामाजिक, राष्ट्रीय घटनांचे भाकित करणारी निराळी शाखा यातूनच उद्‌भवली आहे. फलज्योतिष या नावाने ओळखली जाणारी रूढ पद्धती म्हणजे कुंडलीवरून भविष्यकथन करण्याची पद्धती होय. या पद्धतीला पाश्चात्त्य ‘गुणदोषविवेचक फलज्योतिष’ असे म्हणतात. या रूढ पद्धतीची ओळख करून घेण्यापूर्वी आपणास फलज्योतिषाचा पूर्वेतिहास थोडक्यात पाहणे हे मनोरंजक वाटेल. कारण कुंडलीची निर्मिती ज्या राशिकल्पनेवर आहे त्या राशी (मेष, वृषभ इ.) अगदी प्रारंभीच्या भारतीय वा बॅबिलोनियन ज्योतिषांना ज्ञात नव्हत्या.

इतिहास : इ. स. पूर्वीच्या अनेक प्राचीन संस्कृतींत म्हणजे ॲसिरियन, बॅबिलोनियन, ईजिप्शियन, चिनी व भारतीय आर्य संस्कृतींमध्ये फलज्योतिष या विद्येचे ज्ञान थोडेफार होते. पाश्चात्त्यांच्या मते या शास्त्राचे पहिले संशोधक बॅबिलोनियन हे होत. त्यांना ग्रह तर माहीत होतेच, शिवाय हामुराबी या राजांच्या काळात (इ. स. पू. सु. १९५५-१९१३) ती चलसंपातबिंदूच्या [⟶ संपातचलन] कल्पनेपर्यंत त्यांची मजल गेलेली होती. ग्रह म्हणजे देवतांची रूपे अशी त्यांची कल्पना होती. देवता त्यांचे कार्य ग्रहांद्वारा करतात. बॅबिलोनमधून हे शास्त्र इ. स. पू. चौथ्या शतकात ग्रीस देशात गेले. हिपार्कस (इ. स. पू. सु. १९०-१२५) व त्यानंतर टॉलेमी (इ. स. सु. ९०-१६९) यांनी ज्योतिर्गणिताबरोबर फलज्योतिषाचा विचार केला होता. टॉलेमी यांचा Tetrabiblos हा ग्रंथ फलज्योतिषावरील पाठ्यपुस्तक म्हणून समजला जात असे. ग्रीक फलज्योतिष्यांनी बारा राशी व बारा घरे यांवरून कुंडली मांडण्याचा शोध लावला, असे फरमिकस माटरनस (इ. स. सु. ३३०-३५४) यांच्या Mathesis या ग्रंथावरून आढळते.


ग्रीकांकडून ईजिप्त, अरब, रोम या संस्कृतींतील मानवसमाजास त्या विद्येचा वारसा लाभला. चीन देशाने स्वतंत्रपणे नक्षत्रे, ग्रह इत्यादींचा शोध लावलेला असावा परंतु चीन व भारतीय कल्पनांवर पाश्चात्त्यांच्या ज्ञानाचाच परिणाम झाला, अशी पाश्चात्त्य पंडितांची कल्पना आहे. तथापि तेराव्या-चौदाव्या शतकापर्यंत पाश्चात्त्य फलज्योतिषाची प्रगती मर्यादित झाली होती. ग्रहांचा परिणाम फक्त राजा व राजघराण्यातील व्यक्तींवरच मुख्यतः होतो, अशी कल्पना होती. राजाच्या सुखदुःखावर व बरेवाईटपणावर प्रजेचे सुखदुःख असते, ही कल्पना त्यामागे असावी. ग्रहणे, चंद्राचे खळे, उल्कापात, धूमकेतू यांचा संबंध सामान्य मानवाशी जोडला जात नव्हता, हे मात्र खरे. अरबांनी हे शास्त्र विकसित केल्यानंतर पुन्हा एकदा पाश्चात्त्यांचे लक्ष या शास्त्राकडे लागले आणि त्यातून नंतर (तेराव्या शतकानंतर) गुणदोषविवेचक फलज्योतिषाचा (ज्युडिशियल ॲस्ट्रॉलॉजीचा) म्हणजे व्यक्तिगत जातकास प्रारंभ झाला. काही धर्मगुरूंनी या शास्त्रास थोडा विरोध केला, काहींनी त्यास जादूटोण्याच्या (ब्लॅक मॅजिकच्या) पंगतीस बसविले परंतु विद्यापीठांचा उदय झाल्यावर अठरावे शतक संपेपर्यंत या शास्त्रास प्राश्चात्त्य विद्यापीठांतील अभ्यासक्रमात स्थान मिळाले. फ्रान्सिस बेकन इ. अर्वाचीन भौतिक शास्त्रज्ञांनी या शास्त्रास विरोध सुरू केल्यापासून आजपर्यंत त्याची प्रतिष्ठा (विद्वत्तेच्या क्षेत्रापुरती) संपल्यात जमा आहे. आज पाश्चात्त्य परंपरा कोणते सिद्धांत मानते व ते भारतीय शास्त्राहून कोणत्या बाबतींत निराळे आहेत हे पुढे दिलेच आहे परंतु आज रूढ असणाऱ्या पाश्चात्त्य व पौर्वात्य ज्योतिषकल्पनांत विलक्षण साम्य आहे व एकमेकींचा एकमेकींवर भरपूर परिणाम झालेला आहे.

भारतीय परंपरा : फलज्योतिष हे अरबांच्या द्वारा ग्रीकांकडून भारतात आले असे पाश्चात्त्य मत आहे. गर्गाचार्य हे आपल्या बृहत्‌गर्गसंहितेत एक उल्लेख असा करतात की, म्लेंच्छ-यवन यांच्यात हे शास्त्र पूर्णपणे विकसित झालेले आहे (अध्याय २) परंतु ही कल्पना पटत नाही. अरब आणि खाल्डिअन यांच्याकडून या शास्त्राची काही देणगी मिळाली ही वस्तुस्थितीच आहे. ‘होरा’ [⟶ ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] ही कल्पना hour शी अधिक जवळची वाटते, तर मेष ते मीन या राशींची कल्पना यांच्याकडूनच भारतात आलेली आहे. तथापि ज्योतिर्गणितासमवेत फलज्योतिषातही भारतीय प्रतिभेने स्वतंत्रपणे मोठा पल्ला गाठलेला होता. वेदांमध्ये सर्वांत जुना ऋग्वेद असून त्यामध्ये संवत्सर, अयन, दिनमान, ग्रह व नक्षत्र यांचा उल्लेख असून तेव्हा त्यांच्या शुभाशुभत्वाबद्दलच्या कल्पना निर्माण झालेल्या होत्या. तैत्तिरीय ब्राह्मण १·५·२ या ऋचेत ‘कन्या (पतीला) प्रिय व्हावी अशी इच्छा असेल, तर ती निष्ट्या (स्वाती) नक्षत्रावर द्यावी’ असे म्हटले आहे. शिक्षा, कल्प, छंदस, निरुक्त, व्याकरण यांबरोबर ज्योतिष हे वेदांग सर्व शास्त्रांत ‘मूधीने’ स्थित (अग्रस्थानी) होते. अथर्ववेद हा तुलनेने अलीकडचा परंतु अथर्वज्योतिष शकापूर्वी ५०० वर्षे अस्तित्वात होते, असे शं. बा. दीक्षित या गणितज्ञांचे मत होते. अथर्वज्योतिषात ग्रह, नक्षत्र आणि वार यांचा उल्लेख आहे. राशींचा व ‘योग’ या पंचागातील अंगाचा उल्लेख नाही. तिथी, नक्षत्र, करण यांचे शुभाशुभत्व त्यात वर्णिले होते. जन्मनक्षत्रापासून दहावे नक्षत्र हे कर्मनक्षत्र असते. त्यानंतर पुढे संपत, विपत्, क्ष्येम्य इ. नक्षत्रे वर्णिली आहेत. आजचे ज्योतिष कुंडलीतील दहाव्या घरास कर्मस्थान मानते. अथर्वज्योतिष दहावे नक्षत्र कर्मनक्षत्र मानते. म्हणजे आजची कल्पना पूर्वीपासून भारतात स्वतंत्रपणे हळूहळू प्रगत होत होती, यात शंका नाही. याज्ञवल्क्य स्मृतीत ग्रहयज्ञाचा उल्लेख असून त्यामध्ये राहुकेतूंचा समावेश होता. रामायण, महाभारतात वार व ग्रह यांच्या शुभाशुभत्वाचे भरपूर उल्लेख आहेत. महाभारतीय युद्ध होण्यापूर्वी एका महिन्यात दोन ग्रहणे झाल्याचा, मंगळ ज्येष्ठा नक्षत्रात वक्री झाल्याचा व असाच अन्य अशुभ योगांचा उल्लेख कृष्ण-कर्ण संवादात व धृतराष्ट्र-व्यास संवादात आलेला आहे. पुष्ययोगावर युद्धादिकार्थ गमन करणे शुभकारक असल्याचे महाभारतात अनेक ठिकाणी सांगितले आहे.

फलज्योतिष-ग्रंथकार : भारतीय ज्योतिषात दोन प्रकारचे फलज्योतिष-ग्रंथकार झाले : (१) पौरुषेय, (२) अपौरुषेय, अपौरुषेय ग्रंथांमध्ये कालचक्रजातक, गौरीजातक या दैवी ग्रंथांचा, बृहत्‌पाराशरी, लघुपाराशरी या आर्षग्रंथांचा आणि भृगुसंहितादि नाडीग्रंथाचा समावेश होतो. जैमिनिसूत्रे आणि पराशरांची पाराशरी मूळ स्वरूपात आज उपलब्ध नाहीत. त्या ग्रंथांवर पुष्कळ टीका, टिपण्या शतकोशतकी होत राहिल्या त्यांपैकी भटोत्पल किंवा उत्पल यांची टीका प्रसिद्ध आहे. भृगुसंहितांचे इतके प्रकार आणि इतक्या प्रती झाल्या आहेत की, त्यांतील तथ्य असणारी प्रत दुर्मिळ होत चालली आहे. पौरुषग्रंथांत सर्वांत जुने वराहमिहिर यांचे बृहज्जातक लघुजातक आणि त्यांच्या मुलाने लिहिलेले षटपंचाशिका आज प्रचलित आहे. वराहमिहिर, लल्ल, गर्ग इ. ज्योतिर्गणितज्ञांची जी परंपरा आहे तीच फलज्योतिष सांगणाऱ्या ग्रंथकारांची परंपरा आहे.

आ. १. कुंडलीतील घरे व त्यांच्या पर्यायी संज्ञा भारतीय फलज्योतिष-सिद्धांत : आपले पूर्वकर्म या जन्मात संभाव्य सुखदुःखात्मक भोगांच्या रूपाने आपण अनुभवतो तेच कुंडलीच्या (पत्रिकेच्या) रूपाने कळत असते. कुंडलीत बारा स्थानके असतात. पृथ्वीसभोवतालच्या अवकाशाची विभागणी या बारा स्थानांत म्हणजे घरांत झालेली असते. पूर्वक्षितिजावर उगवणारी राशी म्हणजे त्या वेळचे लग्न व हे लग्न म्हणजे कुंडलीतील पहिले घर होय. आ. १ मधील चौकटीत बारा घरांच्या पर्यायी संज्ञा त्या त्या घरात लिहिल्या आहेत, त्यांवरून त्या त्या घरावरून कोणकोणत्या गोष्टींचा बोध व्हावयाचा हे लक्षात यावे. उदा., आर्थिक गोष्टींचा विचार करावयाचा तर १, ५, ९, ११ आणि ८ याही स्थानांवरून करावयाचा. उगवता ग्रह किंवा राशी पहिल्या घरात असते. आकाशात डोक्यावर असणारा ग्रह किंवा राशी दशमस्थानी (दहाव्या घरात) असते. पश्चिम क्षितिजावर असणारा ग्रह वा राशी सप्तमस्थानी असतात. चतुर्थस्थानाला त्या दृष्टीनेच पातालकेंद्र अशी संज्ञा आहे.


  आ. २. कुंडलीचा एक नमुना कुंडलीत घरे बारा असली, तरी ग्रह बारा नाहीत. पूर्वी नऊ ग्रह मानीत आता प्रजापती (युरेनस किंवा हर्शल), वरुण (नेपच्यून) व कुबेर (प्लूटो) यांचा शोध लागला. त्यामुळे सर्व घरांत ग्रह असतात असे नाही. काही घरे रिकामीच असतात. त्या घरांत ग्रह नसले, तरी त्या घरांवर कोणती ना कोणती राशी मात्र असते व तिचा अंमल त्या स्थानावर असतो व त्यानुसार शुभाशुभ फल मिळते. कुंडलीत १ ते १२ जे आकडे मांडले जातात ते राशींचे निदर्शक असतात. उदा., आ. २ मधील कुंडली पहा. या कुंडलीतील ४ हा आकडा पहिल्या घरात आहे. म्हणजे चौथी-कर्क ही राशी-लग्नी आहे. म्हणजे या कुंडलीत कर्कलग्न आहे व तेथे गुरुचंद्र आहेत. धनस्थानी कोणी नाही. तेथे सिंह राशी आहे. आत या राशींचे गुण कळावेत यासाठी त्यांचे अधिपती खालील कोष्टकात दाखविल्याप्रमाणे ठरविले आहेत.

राशी

ग्रह (स्वामी) 

मेष 

मंगळ 

वृषभ 

शुक्र 

मिथुन 

बुध 

कर्क 

चंद्र 

सिंह 

रवी 

कन्या 

बुध 

तूळ 

शुक्र 

वृश्चिक 

मंगळ 

धनू 

गुरू 

मकर 

शनी 

कुंभ 

शनी 

मीन 

गुरू 

म्हणजे प्रस्तुत पत्रिकेत धनस्थानी सिंह ही राशी आहे. तिचा अधिपती रवी हा झाला. धनेश रवी झाला. रवीची जी शुभाशुभ स्थिती असेल, तशी सांपत्तिक फले अनुभवण्यास मिळतील.

राशींचे स्वभाव : राशी या केवळ ग्रहांचे प्रतिनिधित्व करतात असे नाही, तर ग्रहांचा श्रेष्ठकनिष्ठपणा राशींवर अवलंबून राहतो. यांशिवाय राशी स्वतंत्रपणे कशा ना कशाचे प्रतिनिधित्व करतात. मेष-डोके, वृषभ-गळा या क्रमाने मीन-पावले याप्रमाणे त्यांचा संबंध मानवी शरीरावर असल्याने रोगनिदान कार्यात त्यांचे महत्त्वाचे कार्य असते. वृषभ व तूळ या दोन्ही शुक्राच्या राशी असल्या, तरी त्यांचे स्वभाव परस्परभिन्न आहेत. बुद्धिप्रधान व्यक्ती मिथुन, तूळ, कुंभ राशींत सापडतात, तर व्यवहारनिष्ठांच्या राशी वृषभ, वृश्चिक इ. असतात. चर, स्थिर, द्विस्वभाव असे राशींचे यथार्थ वर्गीकरण करण्यात आले आहे.

शुभाशुभ ग्रह : बुध, चंद्र, शुक्र, गुरू हे सामान्यतः शुभ ग्रह आणि शनी, मंगळ, रवी, राहू, केतू हे अशुभ ग्रह समजण्याची वहिवाट सामान्यतः भारतीय व पाश्चात्त्य दोन्ही शास्त्रांत आहे परंतु पाश्चात्त्य रवी शुभ मानतात. ग्रहांचे शुभाशुभत्व ठरविण्याची भारतीयांची एक फार महत्त्वाची स्वतंत्र कसोटी आहे. गुरूसारखा ग्रह शुभ्र आहे हे खरे आहे पण जर अष्टस्थानासारख्या मृत्युस्थानाचे नियंत्रण त्याची राशी करीत असेल, म्हणजे तो जर अष्टमेश असेल, तर (अष्टमाशिवाय अन्य) कोणत्याही ठिकाणी त्याचे शुभ फल मिळणे अशक्य आहे. म्हणजे हा अष्टमेश असून सप्तमात पडला, तर तो विवाहसुखात विघ्न आणील. पाश्चात्त्य शास्त्रात भावेशाला एवढे महत्त्व नाही. त्यांच्या मते गुरू तो शुभच, तो कोणत्याही स्थानांचा अधिपती असला, तरी तो शुभच होय. शनी पाप ग्रह खरा पण लग्न जर वृषभ किंवा तूळ असेल, तर भारतीयांच्या मते कुंडलीत शनी हा शुभफलदायी ठरेल.

शुभाशुभ योग : गुरूसारखा शुभ ग्रह भाग्येश असून लग्नेशासह उच्च राशीत असेल, तर तो पूर्ण शुभ मानला जाईल परंतु त्याबरोबर त्याच्याशी कोणाचा अशुभयोग असता कामा नये. सामान्यतः शुभग्रहांच्या युती शुभ मानल्या जातात अशुभग्रहांच्या अशुभ मानल्या जातात. युती म्हणजे दोन ग्रहांमध्ये शून्य अंश अंतर. हे अंतर १८०° झाले की, प्रतियुती मानली जाते. पाश्चात्त्य शास्त्र हा प्रतियुती योग सर्वथा अशुभ मानतात. भारतीयांच्या मते शुभग्रहांची प्रतियुती शुभच असते. उदा., गुरु-चंद्र प्रतियुती हा गजकेसरी योग मानतात. एक शुभ व एक अशुभ यांचा प्रतियोग संमिश्र फले, तर दोन अशुभ ग्रहांचा प्रतियोग पूर्ण अशुभ फले देतो. उदा., एखाद्याच्या पहिल्या घरात मंगळ व सप्तमात प्रतियोगात शनी असेल, तर त्याचे वैवाहिक जीवन अडथळ्यांचे ठरेल. १२०° अंतर असणाऱ्या योगास त्रिकोण व ६०° अंतर असणाऱ्या योगास लाभयोग किंवा त्रिरेकादशयोग मानतात. त्रिकोण व लाभयोग शुभ आणि ९०° चा केंद्रयोग वाईट समजण्याची वहिवाट पाश्चात्त्यांमध्ये आहे. भारतीय ज्योतिषात अशा अंतरनिष्ठ योगांना महत्त्व नसून दृष्टियोगांना महत्त्व आहे. उदा., शनीला ३, ७, व १० आणि मंगळाला ४, ७, ८ व १२ या दृष्टी आहेत. गुरूला ५, ७ व ९ या दृष्टी आहेत. बाकी सर्व ग्रहांना फक्त ७ वी दृष्टी असते. शुभग्रहांची दृष्टी शुभ व पापग्रहांची दृष्टी अशुभ मानली जाते. उदा., आ. २ मध्ये दिलेल्या कुंडलीत गुरूची दृष्टी ५, ७ व ९ या स्थानांवर आहे म्हणजे त्या घरांची शुभफले मिळतील पण शनीची दृष्टी दशमावर आणि दशमातल्या ग्रहांवर आहे म्हणून पितृसौख्यात, व्यवसायात अनंत अडचणी येतील. पाश्चात्त्य ज्योतिषी फक्त योग पहातात, त्यांच्यात दृष्टिविचार नाही [⟶ अवस्थिति].

ग्रहांचे गुणधर्म : पाश्चात्त्य व पौर्वात्य या दोन्ही परंपरांमध्ये ग्रहविषयक कल्पना आणि त्यांचे गुणधर्म समान मानले आहेत. ग्रहांच्या स्वगृह, उच्च, नीच यांबद्दलच्या कल्पनाही समान आहेत. उदा., मंगळ हा मेषेत व वृश्चिकेत स्वगृही, मकरेत उच्च आणि कर्केत नीच असतो. रवी हा आत्माकारक ग्रह आहे. माणसाची जीवनशक्ती, त्याची कार्यशक्ती, प्रतिष्ठा, यशापयश, पितृसुख, वरिष्ठांशी संबंध ह्या गोष्टींचा बोध रवीवरून होतो. चंद्र हा मानसिक व प्रापंचिक सौख्याचा कारक आहे. भौतिक सुखांचा बोध शुक्रावरून होईल. गुरू हा ज्ञान, प्रसिद्धी, नेतृत्व व धर्मभावनांचा ग्रह आहे. बुद्धिमत्तेची देणगी बुधावर अवलंबून असते. तत्त्वदृष्टी, मुत्सद्दीपणा, चिकाटी हे मानसगुण व दैन्य, दारिद्र्य, दीर्घ काळ टिकणारी संकटे व व्याधी या गोष्टी शनीच्या कक्षेत असतात. घणाघाती संकटे, उघड विरोध, अपघात, आघात, पराक्रम, साहस, शौर्य इ. सर्वांचा बोध मंगळामुळे होतो. रवी हा शासनसंस्था किंवा सरकार दर्शवितो, तर चंद्र सर्व प्रजा व सार्वजनिक कल्याण करणाऱ्या संस्था दर्शवितो. करमणुकीच्या व चैनीच्या पदार्थांवर शुक्राची सत्ता असते. मुद्रण, लेखन, प्रकाशन, वक्तृत्व इ. कार्ये करणाऱ्या व्यक्ती, संस्था व पदार्थ बुधाच्या अंमलाखाली असतात. याप्रमाणे ग्रहांचे विविध गुणधर्म राशिपरत्वे, स्थानपरत्वे, योगपरत्वे कसेकसे भिन्नभिन्न मिळतात, हे ज्योतिषग्रंथात विस्ताराने सांगितलेले असते. भारतीय जुन्या परंपरेप्रमाणे फक्त नऊ ग्रह विचारात घेतले जात. आता प्रजापती, वरुण व कुबेर यांचे शोध लागल्यापासून त्यांच्या गुणधर्माचा विचार पाश्चात्त्य आणि त्यांबरोबर भारतीय आधुनिक ज्योतिषी करू लागले आहेत. आकस्मिक संकटे, प्रचंड उलथापालथी, अचानक लाभ किंवा नुकसान, तीव्र कल्पनाशक्ती आणि संशोधन यांचा संबंध प्रजापतीशी जोडला जातो. उदा., शुक्र-प्रजापती, चंद्र-प्रजापती युतीवर महान प्रतिभावंत कलावंत जन्मतात. वरुण हा गूढ अतींद्रिय अनुभव, अनाकलनीय रोग, मानसरोग इत्यादींचा व दीर्घकाल टिकणाऱ्या व्याधींचा किंवा संकटांचा कारक ग्रह समजला जातो. कुबेराबद्दल विशेष संशोधन झालेले नाही. लग्न, रवी, चंद्र यांच्या अंशात्मक युतीत प्रतियोगातच तो जास्त महत्त्वाचा ठरतो. एरवी त्याला स्वतंत्र फलित फारसे नाही. मानवाने पृथ्वीची कक्षा ओलांडून चंद्रावर पाऊल ठेवलेले असले आणि दुसरे पाऊल मंगळाच्या दिशेने उचललेले असले तरी चंद्र, मंगळ इ. ग्रहांनी आपली कक्षा न सोडता आपले कार्य पूर्ववत चालू ठेवले आहे, अशी आधुनिक ज्योतिषांची श्रद्धा आहे.


स्थिर तारे व वर्गबल : पाश्चात्त्य आणि भारतीय फलज्योतिषांत आणखी एक फरक आहे. ग्रहांचे बलाबल आणि कुंडलीचा दर्जा ठरविण्यासाठी भारतीयांनी राशींचे नवमांश, द्रेष्‌काण, होरा, त्रिशांश इ. सहा प्रकारचे भाग पाडले. जो ग्रह त्या पोटविभागातही स्वगृही बलवान किंवा मित्रक्षेत्री अथवा उच्च राशीत असेल, तो ग्रह अधिक बलवान मानतात. जुन्या पुराणकथांमध्ये अवतारी पुरुषांच्या जन्माचे वर्णन करताना असा उल्लेख येतो, की त्याच्या जन्मकाळी अमुक इतके ग्रह उच्च राशीत होते व अमुक इतके ग्रह उच्च नवमाशांत होते अथवा वर्गबली होते. पाश्चात्त्यांनी (उदा., ॲलन लीओ यांनी) या भारतीय परंपरेचा वापर केलेला असला, तरी त्यांचे मुख्य लक्ष स्थिर ताऱ्यांवर असते. नक्षत्रांप्रमाणे अनेक तारे काही राशींच्या काही अंशावर कायम वास्तव्य करून असतात. नक्षत्रांचे योगतारे हे पुष्कळदा नक्षत्रदृष्ट्या असणाऱ्या राशिविभागाबाहेर असतात. त्यांच्या सान्निध्यामुळे ग्रहांचे बलाबल जाणण्याची वहिवाट पाश्चात्त्यांमध्ये असते. शिवाय एखाद्या कुंडलीचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी निरनिराळ्या सहमबिंदूंचा (कारक ग्रहाचे पत्रिकेतील रवीपासूनचे अंतर लग्न बिंदूत मिळवून येणाऱ्या काल्पनिक बिंदूंचा) ते उपयोग करतात.

कुडली कशी पाहतात? : लग्नकुंडली व राशिकुंडली पत्रिकेत मांडण्याची वहिवाट आहे. महत्त्व असते ते लग्नकुंडलीला. लग्न, लग्नेश, रवी आणि चंद्र यांची स्थिती जर चांगली असेल, तर आयुष्य, आरोग्य, कर्तुत्व आणि सुख या बाबतींत त्या प्रमाणात त्या व्यक्तीचा दर्जा मोठा राहतो. त्यानंतर मग एका एका दृष्टीने त्या पत्रिकेचा विचार करतात. उदा., विवाहसुखाचा विचार करावयाचा असेल, तर शुक्र, चंद्र, सप्तमस्थान, सप्तमेश आणि सप्तमातील ग्रह यांच्या अवलोकनावरून विवाह कसा ठरेल येथपासून पुढे वैवाहिक जीवनाबद्दलच्या सर्व गोष्टींचा अंदाज बांधण्यात येतो.

सायन व निरयन : पाश्चात्त्य सर्व सायनवादी आणि भारतीय परंपरा निरयनवाद्यांची आहे. निरयन पक्षातही दोन-तीन पोटपक्ष आहेत. वास्तविक हा जो फरक आहे हा गणिताचा फरक आहे. राशिचक्रास जेथून आरंभ होतो तो संपातबिंदू चल असतो. त्याची गती लक्षात घेऊन गणित करणारे ते सायनवादी. निरयनवाद्यांनी राशिचक्राचा आरंभ एकदा एका विशिष्ट ताऱ्यापासून जो मानला आहे, त्या ताऱ्याप्रमाणेच कायम मानला आहे. त्यामुळे सूर्य मकरवृत्तात २३ डिसेंबरला जात असला, तरी भारतीयांची मकरसंक्रांत १४ जानेवारीस होते. प्राचीन भारतीय ज्योतिर्गणिती व फलज्योतिषी सायनवादी असावेत. अर्वाचीन भारतीय ज्योतिषांमध्ये शं. बा. दीक्षित, ग. प्र. दीक्षित, वि. गो. नवाथे, य. के. प्रधान, जी. ब. चिटणीस, द्वा.ना. राजेअसेअनेकमहाराष्ट्रीयज्योतिषीसायनपक्षाचापुरस्कारफलितदृष्ट्याकरूलागलेहोते. हावादतसामिटलेलानाही. अनुभवहीचफलज्योतिषाचीकसोटीआहे. ग्रह(आणित्यांचेगुणधर्म), त्यांचेस्थान, त्यांचीदृष्टीअथवायोगहेदोन्हीपद्धतींच्याकुंडलीतसमानचराहतात. बदलपुष्कळदाहोतोतोराशींचा. त्यामुळेकोठल्याहीपद्धतीनेविचारकेला, तरीफलितातफारसाफरकपडूनये. भारतीयपरंपरेतीलज्योतिषीभावचलितपत्रिकेचाविचारकमीप्रमाणातकरतात.

 पाश्चात्त्यपरंपरेतकालनिर्णयासगोचरग्रहवदिनवर्षपद्धतीवापरतात, तरभारतीयपरंपरात्यासाठीगोचरग्रहआणिदशापद्धतीचावापरकरते. [⟶ निरयन-सायन].

योगअटळअसतातकाय ? होणारेजरचुकणारनसेल, तरजेकाहीहोणारतेआधीकळूनउपयोगकाय ? आणित्यातबदलकरतायेणारअसेल, तरमगतेयोगहेनियमयादर्जालाकसेप्राप्तहोणार ? अशीरास्तशंकाफलज्योतिषाबाबतअनेकांच्यामनातयेते. त्याबाबतभारतीयफलज्योतिषाचेउत्तरअसेआहेकी, योगअटळअसतातहेतरखरेचआहे, कोणत्याहीलौकिकउपायांनीतेटळणारनाहीत परंतुआध्यात्मिकसामर्थ्यानेत्यांनाइष्टतेवळणलावतायेते. अर्थवकामहेपुरुषार्थफारसेस्वाधीननाहीत पणधर्मवमोक्षहेपुरुषार्थग्रहांच्याआधीननसतात, असायाम्हणण्याचाआशयआहे. ज्याप्रमाणेकाहीरोगऔषधोपायांनीबरेहोतातवकाहीबरेनहोणारेअसतात, त्याप्रमाणेकाहीयोगांवरमातकरतायेतेवकाहीयोगअटळअसतात. जेअटळआहेतेजरआधीकळले, तरमनुष्यआपलीकार्यशक्तीत्यासाध्यनहोणाऱ्यागोष्टीपेक्षाइतरअनेकचांगल्याउपयोगातवापरूशकेलआणिआपल्याशक्तीचावजीवनाचाअधिकातअधिकउपयोगकरूशकेल, हायथार्थफलज्योतिषसमजण्याचामोठाचउपयोगआहे.

पहा: कुंडली नक्षत्र पंचांग मुहूर्तशास्त्र राशिचक्र हस्तसामुद्रिक. 

संदर्भ: 1. Hone, M.H. The Modern Textbook of Astrology, London, 1951.

   2. Lee, Alan, How to Judge a Nativity, London, 1922.

   3. Lyndoe, Edward, Practical Astrology, London, 1938.

   ४. दीक्षित, शं. बा. भारतीयज्योतिःशास्त्र, पुणे, १८९७.

   ५. नवाथे, वि. गो. सुलभजातक, पुणे, १९२९.

   ६. प्रधान, य. के. जातकमार्गोपदेशिका, मुंबई, १९४९.

दीक्षित, प्र. ना.