टॉलेमी : (लॅटिन नाव क्लॉडियस टॉलेमस इ. स. सु. ९०–१६९). ग्रीक जोतिषशास्त्रज्ञ, गणिती, भूगोलशास्त्रवेत्ते आणि नैसर्गिक तत्त्वज्ञानी (निसर्गाचा सर्वसाधारण दृष्टिकोनातून विचार करणारा अभ्यासक). काहींच्या मते ते ॲलेक्झांड्रिया (ईजिप्त) येथे तर काहींच्या मते नाईल नदीवरील टॉलेमेइस हेर्मी येथे जन्मले. तथापि त्यांचे मुख्य कार्य ॲलेक्झांड्रिया येथेच घडले व तेथून जवळच एका देवळाच्या गच्चीवर त्यांची वेधशाळा होती. त्यांच्या कालखंडाबद्दलही मतभेद आहेत. त्यांच्याविषयी व्यक्तिगत अशी इतर काहीही माहिती उपलब्ध नाही, परंतु त्यांच्या कार्याची मात्र पूर्ण माहिती सर्वत्र पोहोचल्यामुळे ते सर्वांत अधिक परिचित असे प्राचीन ग्रीक ज्योतिषशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्या बहुतेक ग्रंथांची मूळ ग्रीकमधून अरबी भाषेत व नंतर त्यावरून लॅटिनमध्ये रूपांतरे झाली. Megale Syntaxis Tes Astronomias हे त्यांचे सर्वांत महत्त्वाचे पुस्तक असून त्यात पूर्वीच्या ग्रीक ज्योतिषशास्त्रज्ञांच्या कार्याचा त्यांच्या कल्पनेप्रमाणे गोषवारा दिलेला आहे. हे पुस्तक अरबांकडून यूरोपात Almagest या नावाने आले. मध्ययुगात हेच ज्योतिषशास्त्राचे पाठ्यपुस्तक म्हणून गणले जात होते. त्याचे १३ खंड असून त्यात पुढीलप्रमाणे विषय आले आहेत. पहिल्या खंडात विश्वरचनेची भूमध्य कल्पना व पुरावे दिले आहेत. गोल परंतु स्थिर अशी पृथ्वी विश्वाच्या मध्याशी असून चंद्र, ग्रह, सूर्य, तारे इ. तिच्याभोवती वर्तुळाकार कक्षांत फिरत असतात, हा टॉलेमी यांचा भूमध्य सिद्धांत होय. कोपर्निकस यांचा सूर्यमध्य सिद्धांत मांडला जाईपर्यंत सु. १,५०० वर्षे टॉलेमींचा सिद्धांतच सर्वमान्य होता. दुसऱ्या खंडात भूमितीय जीवांचे (कॉर्डसचे) तक्ते, गोलीय त्रिकोणमिती व मेनलेअस प्रमेय तिसऱ्यात सूर्याची गती व वर्षाचा कालावधी चौथ्यात चंद्राची गती व महिन्याचा कालावधी आणि पाचव्यात तिसऱ्या व चौथ्यामधील काही बाबींची अधिक माहिती असून सूर्य व चंद्र यांची अंतरे यांचे विवेचन आणि सूर्य किंवा तारे यांची क्षितिजापासून कोनीय उंची मोजण्याचे ॲस्ट्रोलेब हे उपकरण तयार करण्याची माहिती दिलेली आहे. सहाव्या खंडात सूर्यचंद्राची ग्रहणे, ग्रहांच्या युति-प्रतियुतींची माहिती आहे. सातव्या व आठव्या खंडांमध्ये स्थिर ताऱ्यांची माहिती, ⇨संपातचलनाविषयी चर्चा, ताऱ्यांच्या याद्या आणि खगोलाची प्रतिकृती तयार करण्याची पद्धती दिलेली आहे. ९ ते १३ या खंडांमध्ये ग्रहांची विविध माहिती व काही स्वतंत्र मौलिक संशोधनविषयक माहिती आलेली आहे.

टॉलेमी (क्लॉडियस टॉलेमस)

  

त्यांच्या कार्याची व्याप्ती ज्योतिषशास्त्र, गणित आणि भूगोलशास्त्र या विषयांत असून त्याची थोडक्यात माहिती खाली दिली आहे.

  

ज्योतिषशास्त्र : हिपार्कस यांच्या ८५० ताऱ्‍यांच्या यादीवरून टॉलेमी यांनी उत्तर खगोलातील १,०२२ ताऱ्‍यांची यादी तयार केली. ती मध्ययुगात सर्वत्र उपयोगात आणली जात होती. ताऱ्‍यांच्या भासमान तेजस्वितेवरून त्यांनी ताऱ्‍यांची ६ प्रकारांत किंवा प्रतींमध्ये विभागणी केली होती. थोड्याफार फरकाने हे प्रकार सध्याही प्रचारात आहेत. ग्रहांचे भ्रमण ⇨अधिवृत्तात व अधिवृत्तांचे मध्य पृथ्वीभोवती वर्तुळाकार कक्षेत भ्रमण करतात, या संकल्पनेचा उपयोग त्यांनी ग्रहमालेच्या उत्पत्तीच्या स्पष्टीकरणासाठी केला होता. काही अंतरावरील दोन ठिकाणांपासून केलेल्या निरीक्षणांच्या द्वारा दृक्‌च्युती (निरीक्षकाच्या स्थानात बदल झाल्यामुळे स्वस्थ गोलाच्या स्थानात होणारा भासमान बदल काढण्याच्या) पद्धतीने चंद्राचे अंतर पृथ्वीच्या त्रिज्येच्या ५९ पट असल्याचे त्यांनी सांगितले होते. चंद्राच्या कक्षेच्या विकेंद्रतेतील व गतीतील अनियमितपणा म्हणजे चांद्रपर्यास [⟶ चंद्र] त्यांनीच शोधून काढला. संपातबिंदूंना गती असल्याचे त्यांनी सिद्ध केले होते. वर्तुळाच्या एक चतुर्थांशावर आधारलेल्या कोनमापक तुरीय यंत्राचा त्यांनी शोध लावला. पृथ्वी, पाणी, अग्नीचा गोल, चंद्र अशा क्रमाने टॉलेमी विविध गोल मानीत. धूमकेतू व उल्का हे हवेतील आविष्कार आहेत, असे ते मानीत. खस्थ ज्योतींचे उन्नतांश मोजण्याचे ‘टॉलेमी-रूल्स’ हे उपकरणही त्यांनी बनविले होते. ग्रहांच्या गतीचे त्यांनी केलेले तक्ते जरी चूक ठरले, तरी सोळाव्या शतकापर्यंत ते वापरले जात असत. Hypothesis ton Planomenon (ग्रहांसंबंधींचे गृहीतक) या नावाचे त्यांचे पुस्तकही आहे.

  

गणित : टॉलेमी हे पहिल्या दर्जाचे भूमितिशास्त्रज्ञ होते. Harmonics  या त्यांच्या पुस्तकात त्यांनी ग्रीक गणिताचा आणि त्रिकोणमितीचा विस्तार दिलेला आहे. प्रतल भूमितीमधील वर्तुळासंबंधीचा सिद्धांत टॉलेमी सिद्धांत म्हणून प्रसिद्ध आहे. ज्या (त ±थ) आणि कोज्या (त ±थ) यांची विस्तारसूत्रे तयार करण्याची पद्धती व भूमितीच्या साध्या सिद्धांतांच्या द्वारा जिवांचा तक्ता बनविण्याची पद्धती त्यांनी शोधून काढली. वर्तुळाचे ६० व प्रत्येक विभागाचे आणखी ६० भाग करून त्यांनी गणिताचे काम सोपे केले. Analemma &amp Plani sphaerium या त्यांच्या पुस्तकांत बिंदूंच्या निरनिराळ्या प्रक्षेपणांची माहिती दिली आहे. याशिवाय भूमितीवर दोन आणि यामिकीवर (प्रेरणांची वस्तूंवर होणारी क्रिया व तीमुळे निर्माण होणारी गती यांसंबंधीच्या शास्त्रावर) तीन पुस्तके त्यांनी लिहिली.

भूगोलशास्त्र : त्यांनी भूगोलाला शास्त्राचे स्वरूप दिले. Geographike Hyphegesis (भूगोलशास्त्राचा मार्गदर्शक) हे त्यांचे ऐतिहासिक महत्त्वाचे पुस्तक पंधराव्या शतकापर्यंत भूगोलाचे अधिकृत पुस्तक मानले जाई. त्यात पृथ्वीच्या आकारमानाविषयी आकडेमोड भूपृष्ठाचे वर्णन देश, खंड वगैरेंचे संक्षिप्त वर्णन अक्षांश-रेखांशासह ८,००० स्थलांची यादी इ. माहिती आहे. यांशिवाय त्यात जगाचा एक आणि इतर २६ नकाशे आहेत. त्यामुळे हा पहिला ॲटलास व टॉलेमी हे मानचित्रण कलेचे संस्थापक ठरतात. पुस्तकातील वर्णने व नकाशे यांत फरक आहे. अंतरे चुकीची, विषुववृत्त अधिक उत्तरेला सरकलेले, असे यात दिसते. या भूगोलाच्या पुस्तकाचे सात भाग आहेत. पहिल्यात सर्वसामान्य स्पष्टीकरणे, नकाशाचा प्रश्न, तो काढणे व प्रक्षेपणांची खुलासेवार माहिती आहे. पुढच्या विभागांत स्थलांची यादी असून आठवा विभाग नकाशांचा आहे. नकाशात समुद्रासाठी हिरवा, डोंगरासाठी तांबडा किंवा पिवळा व जमिनीला पांढरा असे रंग त्यांनी वापरले.

  

इतर कार्ये :Tetrabiblos हे फलज्योतिषावरील पुस्तक त्यांनी लिहिले होते व ते पाठ्यपुस्तक समजले जाई. Optics या पुस्तकात प्रणमन (एका माध्यमातून दुसऱ्‍या माध्यमात जाताना प्रकाशकिरणाच्या दिशेत होणारा बदल, वक्रीभवन) आणि प्रकाशाविषयीच्या इतर आविष्कारांची माहिती व तक्ते आहेत. निरीक्षणांवर व प्रयोगांवर आधारलेला हा पहिलाच प्रयत्न समजण्यात येतो. त्यांनी एक पंचांग (Phaseis aplanon asteron) तयार केले होते व त्यात संधिप्रकाशातील ताऱ्‍यांचे उदयास्त व हवामानविषयक माहिती दिली होती. त्यांनी संगीतावर तीन खंडांचा Harmonica नावाचा ग्रंथ लिहिला होता.

  

टॉलेमी यांच्या सन्मानार्थ चंद्रावरील एका मोठ्या तटाने वेढलेल्या मैदानाला त्यांचे नाव (टॉलेमियस) देण्यात आले आहे.

ठाकूर, अ. ना.