फ्लामाऱ्याँ, कामीय : (२६ जानेवारी १८४२-४ जून १९२५). फ्रेंच ज्योतिर्विद. मंगळाविषयीचे त्यांचे संशोधन वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांनी सामान्यजनांसाठी सुबोध शास्त्रीय (विशेषतः ज्योतिषशास्त्रीय) साहित्य निर्माण केले. त्यांचा जन्म माँतीन्ये-ल-र्‌वा (फ्रान्स) येंथे झाला. तेथे त्यांनी थोडे प्राथमिक शिक्षण घेतले. वयाच्या पाचव्या (१८४७) व नवव्या (१८५१) वर्षीच त्यांनी सूर्यग्रहणांचे निरीक्षण केले. तसेच अकराव्या वर्षापर्यंत त्यांनी वातावरणविज्ञानविषयक अवलोकनेही केली होती. घरगुती अडचणींमुळे १८५६ साली त्यांना पॅरिसला जावे लागले. तेथे उत्कीर्णक (कोरीवकाम करणारा) म्हणून उमेदवारी करून त्यांनी पॉलिटेक्निक ॲसोसिएशनच्या संध्याकाळच्या वर्गात शिक्षण घेतले. नंतर पॅरिस वेधशाळेत त्यांनी यूर्‌बँ झां झोझेफ लव्हेऱ्ये यांच्या मार्गदर्शनाखाली १८५८-६२ मध्ये व १८६७ साली काम केले. १८६२-६५ या काळात त्यांनी ब्यूरो ऑफ लाँजिट्यूड या संस्थेत काम केले. La Pluralite des mondes habites हे त्यांचे पहिले पुस्तक १८६१ साली प्रसिद्ध झाले व त्यामुळे त्यांची आकर्षक लेखनशैली व सुगमता लोकांच्या लक्षात आली. त्या नंतर त्यांनी अनेक पुस्तके व लेख लिहून, तसेच व्याख्याने देऊन जनसामान्यांत ज्योतिषशास्त्राविषयी व एकूणच शास्त्रीय विषयांविषयी गोडी निर्माण केली. १८८० साली त्यांचे सर्वात महत्त्वाचे पुस्तक Astronomie Populaire हे प्रसिद्ध झाले. त्याच्या अनेक आवृत्या निघाल्या व विविध यूरोपीय भाषांत त्याचे अनुवादही करण्यात आले. या पुस्तकाला फ्रेंच ॲकॅडेमीचे पारितोषिकही मिळाले होते. १८८३ साली त्यांनी झ्यूव्हीझी-स्यूर-ऑर्झ येथे एक खाजगी वेधशाळा स्थापली व तेथे मंगळासंबंधीचे वेध घेतले. त्यांचे मंगळाविषयीचे संशोधन महत्त्वाचे असून त्यांचे La Planete Mars हे पुस्तक तेव्हा प्रमाण मानले जाई. याशिवाय १६३६ पासून मंगळाविषयीचे जेवढे वेध घेतले गेले होते, त्या सर्वांचे संकलन करून त्यांनी एक पुस्तक १९०९ मध्ये प्रसिद्ध केले. १८८७ मध्ये त्यांनी फ्रेंच ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी स्थापन केली. शिवाय त्यांनी हौशी लोकांसाठी ज्योतिषशास्त्राचे एक पुस्तक लिहिले होते. या दोन सोयींमुळे हौशी लोकातून कित्येक ज्योतिर्विद निर्माण झाले. अभ्रिका (तेजोमेघ) व तारकागुच्छ यांची चार्ल्‌स मेसियर (१७३०-१८१७) यांनी तयार केलेली यादी फ्लामाऱ्याँ यांनी सुधारली. चंद्र, शुक्र व मंगळ यांच्या भूपृष्ठाचे स्वरूप, तसेच युग्मतारे व ताऱ्यांची बहुकूटे यांचा त्यांनी अभ्यास केला. युग्मताऱ्यांची यादी आणि चंद्र व मंगळ यांचे नकाशेही त्यांनी प्रसिद्ध केले होते. १८६७-८० या काळात बलूनमधून उड्डाणे करून त्यांनी वातावरणातील आविष्कांराचा अभ्यास केला. यांशिवाय त्यांनी ज्वालामुखी व जलवायुविज्ञान यांविषयीही संशोधन केले होते. त्यांनी विविध विषयांवर नियतकालिकांमधून लेखन केले व पुस्तकेही लिहिली. त्यांची काही पुस्तके पुढीलप्रमाणे होत : L’Atmosphere (१८७१), Les terres du ceil (१८७७), Les Phenomenes de la Foudre (१९०५), La Mort et son Mystere (१९२०-२१) वगैरे. यांशिवाय शास्त्रीय पार्श्वभूमी असलेल्या काही कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या होत्या. शेवटी शेवटी त्यांना अतींद्रिय मानसशास्त्राची गोडी लागली होती. १९२२ मध्ये त्यांना कमांडर ऑफ द लीजन ऑफ ऑनर हा किताब देण्यात आला. ते झ्यूव्हीझी-स्यूर-ऑर्झ येथे निधन पावले.

फडके, ना. ह.