शुक्र : हा सूर्यकुलातील एक ग्रह आहे. हा सूर्यापासून मध्यममानाने १० कोटी ८२ लक्ष किमी. अंतरावर (पृथ्वी-सूर्य अंतराच्या ०·७२३३ पट) आहे. सूर्य आणि चंद्र यांखेरीज आकाशात नुसत्या डोळ्यांनी दिसणारा सर्वांत तेजस्वी खस्थ पदार्थ शुक्रच होय. हा अंतर्ग्रह (पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या परिभ्रमण कक्षेच्या आतील ज्याची परिभ्रमण कक्षा आहे, असा ग्रह) असल्याने तो सूर्याच्या पूर्वेस किंवा पश्चिमेस मर्यादित कोनात्मक अंतरापर्यंतच (४७) दूर गेलेला आढळतो. यामुळे काही दिवस तो सामान्यतः सूर्योदयापूर्वी पूर्व आकाशात ‘पहाटतारा’ किंवा सूर्यास्तानंतर पश्चिम आकाशात ‘सायंतारा’ म्हणून जास्तीत जास्त तीन तास दिसू शकतो. इतर वेळी उशिरा रात्री तसेच आकाशाच्या मध्यभागी दिसत नाही. अगदी प्राचीन काळी सकाळचा व सायंकाळचा असे दोन वेगळे तारे आहेत असे मानले जाई. ग्रीकांनी त्यांना फॉस्फरस किंवा ल्यूसिफर (पहाटतारा) आणि हेस्पेरस (सायंतारा) अशी नावेही दिली होती परंतु ⇨ पायथॅगोरस यांनी हे दोन्ही तारे भिन्न नसून एकच आहेत असे पटवून दिले. प्रेम आणि सौंदर्य यांकरिता प्रसिद्ध असलेल्या रोमन देवतेवरून या ग्रहाला ⇨ व्हीनस हे नाव पडले. खगोल शास्त्रात हा ग्रह  या चिन्हाने ओळखला जातो.

शुक्राची कक्षा विवृत्ताकार असली, तरी विवृत्तता (विकेंद्रता) सर्व ग्रहांत कमीत कमी (०·००७ म्हणजे पृथ्वीच्या ०·४ पट) आहे. म्हणजे कक्षा जवळजवळ वर्तुळाकृती आहे. त्यामुळे आपणास दिसते त्याहून दुप्पट मोठे सूर्याचे बिंब शुक्रावरून दिसेल पण त्यात बदल होणार नाही. साधारण ४४ मिनिटे कोनीय व्यासाचे सूर्यबिंब दिसेल. आधुनिक साधनांनी शुक्राचा व्यास १२,१०४ किमी. अचूक ठरविण्यात आला (पृथ्वीचा व्यास १२७५६ किमी. आहे). शुक्र जवळजवळ पृथ्वीएवढाच आहे. याचा ध्रुवीय चपटेपणा मुळीच लक्षात घेण्यासारखा नाही. क्रांतिवृत्ताशी याच्या कक्षापातळीचा कोन ३·४० आहे. याचे घनफळ पृथ्वीच्या घनफळाच्या ०·९२ पट, वस्तुमान पृथ्वीच्या ०·८२ पट, सरासरी घनता ५·२ ग्रॅ./घ.सेमी. (पृथ्वीच्या ०·९४ पट), पृष्ठभागावर ०·८६ गुरुत्वाकर्षण (पृथ्वी १), कक्षेतील वेग ३५ किमी./से. व मुक्तिवेग १०·३ किमी./से. (पृथ्वीच्या ०·९३ पट) आहे. पृथ्वीशी पुष्कळसे साम्य असल्याने याला पृथ्वीचा जुळा भाऊ म्हणता येईल.

ढग : शुक्रावरून येणारा आपणास दिसत असलेला प्रकाश पूर्णपणे दाट ढगांच्या थराने परावर्तित केलेला सूर्यप्रकाश असतो. या ढगांचा माथा शुक्राच्या पृष्ठभागापासून सु. ७० किमी. उंचीवर आणि तळ सु. ५० किमी. उंचीवर आहे. या ढगांचे शुक्रावर संपूर्ण आच्छादन आहे. पिवळ्या व लाल प्रकाशामध्ये हे ढग एकसमान भासतात. तथापि जंबुपार प्रकाशात पाहिले असता या ढगांचे पट्ट व ठिपक्यांसारखे आकृतिबंध दिसतात. शुक्रावरील ढगांमध्ये एक मायक्रोमीटर आकाराचे अतिसूक्ष्म कण मोठ्या प्रमाणात आहेत. हे कण जलविद्रावात तयार झालेल्या संहत सल्फ्यूरिक अम्लाचे आहेत.

वातावरण : शुक्राच्या वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइड या वायूचे प्रमाण ९६% आहे. तर शिल्लक वातावरणीय रेणूंमध्ये जवळजवळ नायट्रोजन (३·४%) आहे. निम्न वातावरणात लेश प्रमाणात सल्फर डाय-ऑक्साइड (~ १५० ppm म्हणजे भाग प्रतिदशलक्ष), पाण्याचे बाष्प (~ ५० ppm), कार्बन मोनॉक्साइड (~ ३० ppm), आर्गॉवन (~ ७० ppm), हीलियम (~ १० ppm), न्यूऑन (~ ७ ppm), हायड्रोजन क्लोराइड (~ ०·४ ppm) आणि हायड्रोजन फ्ल्युओराइड (०·००५ ppm) आहेत. यांपैकी पहिल्या दोघांची संहती नवीन सल्फ्यूरिक अम्ल तयार होत असल्यामुळे कमी होते. वातावरणाच्या आतील भागात उच्च तापमानामुळे रासायनिक रूपांतरणे घडून येत असतात. शुक्रावरील वातावरणीय वस्तुमान पृथ्वीवरील वस्तुमानापेक्षा जवळजवळ १०० पट आहे. शुक्र हा सदैव दाट व अपारदर्शक अशा वायूच्या वातावरणाने आच्छादिलेला आहे.

तापमान : शुक्राच्या पृष्ठभागापासून आलेल्या दीर्घ तरंगलांबीच्या उष्णता प्रारणाचे रेडिओ दूरदर्शकाच्या साहाय्याने अभिज्ञान झाले. या उपकरणांमुळे पृष्ठभागाचे तापमान ८५० फॅ. (७३० के.) असल्याचे प्रथम आढळून आले. रशिया आणि अमेरिका या देशांची अवकाशयाने शुक्राच्या वातावरणामधून खाली उतरत असताना त्यांनी वातावरणाच्या तापमानाचे प्रत्यक्ष मापन केले. ढगाच्या माथ्याजवळील दाब पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ असलेल्या एक विसांश असतो. तेथे वातावरणीय तापमान गोठणबिंदूपेक्षा खाली म्हणजे–१० फॅ. (२५० के.) असते. हे तापमान उंची कमी होत जाईल तसतसे वरून खाली हळूहळू वाढते आणि पृष्ठभागाजवळ ८५० फॅ. (७५० के.) ही पातळी गाठते. या ठिकाणी दाब पृथ्वीच्या पृष्ठभागावरील दाबापेक्षा ९० पट असतो.

शुक्रावरील ढगांचा थर सु. ७५% आपाती सूर्यप्रकाशाचे अवकाशात परावर्तन करतो. आपाती सूर्यप्रकाशापैकी अगदी थोडा भाग पृष्ठभागापर्यंत पोचतो (रशिया आणि अमेरिका या देशांच्या अवकाशयानांनी केलेल्या मापनांवरून सु. २·५% आपाती प्रकाश पोचतो). पृष्ठभागी निर्माण झालेल्या उष्णतेपैकी अत्यंत थोडी उष्णता अवकाशात प्रत्यक्षपणे बाहेर पडते. ढग आणि कार्बन डाय-ऑक्साइड यांमुळे होत असलेल्या अतिकार्यक्षम पादपगृह परिणामामुळे पृष्ठभागाचे तापमान अति-उच्च (सु. ७३० के.) आहे.

वातावरणविज्ञान : सौर तापन आणि शुक्राचे मंद गतीने फिरणे यांमुळे वातावरणात अभिसरण होते. त्यामुळे उष्ण कटिबंधात हवा वर जाते, हळूहळू ध्रुवांकडे जाते आणि तेथे खाली उतरते. ढगाच्या माथ्याजवळ असलेले वातावरण सु. १०० मी./से. वेगाने शुक्राच्या परिभ्रमण दिशेने म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरत असते. ते विषुववृत्तावरून ध्रुवाकडे फक्त सु. ५ मी./से. या वेगाने फिरते. शुक्राचा परिभ्रमण करणारा अक्ष कक्ष-पातळीशी जवळजवळ लंब आहे. त्यामुळे तेथील हवामानात मोसमी बदल अगदी थोड्या प्रमाणात होत असले पाहिजेत.

अंतर्भाग : शुक्र आणि पृथ्वी यांच्या सरासरी घनता अगदी सारख्या असल्यामुळे पृथ्वीवरील खडक ज्या पद्धतीने तयार झाले, तसेच शुक्रावरील खडक तयार झाले असावेत. गुणात्मक दृष्ट्या शुक्र पृथ्वीसारखा असावा. शुक्राच्या केंद्रभागी लोहाचा गाभा असून मधले प्रावरण सिलिकॉन, ऑक्सिजन, लोह आणि मॅग्नेशियम यांचे अधिकाधिक प्रमाण असलेल्या खडकांचे बनलेले असावे. बाहेरील पातळ कवच सिलिकॉनचे प्रमाण जास्त असलेल्या खडकांचे असावे. तथापि पृथ्वीपेक्षा वेगळा असलेला शुक्राचा गाभा पूर्णपणे घनरूप किंवा द्रवरूप असावा. शुक्रावर चुंबकीय क्षेत्र विशेष आढळले नाही.    

परिभ्रमण : शुक्र सूर्याभोवती त्याच्या कक्षीय गतीच्या सापेक्ष विरुद्ध दिशेने परिभ्रमण करीत असतो. हा ग्रह इतक्या संथ गतीने फिरत असतो की, त्याच्या एका वर्षात फक्त दोनदा सूर्योदय आणि सूर्यास्त होतात. सूर्यामुळे शुक्रावरील पदार्थात व वातावरणात होणाऱ्या भरती-ओहोटींमुळे शुक्राच्या परिभ्रमणाच्या वेगराशीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली असावी. शुक्र ज्या ज्या वेळी पृथ्वीपासून सर्वांत जवळ अंतरावर येत असतो, त्या त्या वेळी शुक्राची एकच बाजू पृथीकडे असते. यावरून पृथ्वीमुळे निर्माण झालेल्या भरती-ओहोटीच्या प्रेरणासुद्धा शुक्राची चालू परिभ्रमण अवस्था जखडून ठेवण्यास मदत करत असाव्यात. शुक्र नक्षत्रांच्या सापेक्ष २४३ दिवसांत (पृथ्वीवरील दिवस) आणि सूर्याच्या सापेक्ष ११७ दिवसांत (पृथ्वीवरील दिवस) परिभ्रमण करतो.

जीवसृष्टी : शुक्रावर सध्या असलेले उच्च तापमान आणि ढगांची अम्लयुक्त संरचना यामुळे तेथे सजीवाचे अस्तित्व अशक्य आहे. जेव्हा सूर्य आताच्या पेक्षा कमी सौर उर्जा देत होता, अशा सुरुवातीच्या काळात शुक्रावर उष्ण पाण्याचे महासागर असावेत. त्या वेळेस जीवसृष्टी अस्तित्वात आली असण्याची शक्यता अस्पष्ट आहे. सुरुवातीस जीवसृष्टी असल्यास शुक्रावरील महासागर नाश पावल्यानंतर व पृष्ठीय तापमान उच्च झाल्यानंतर ती नष्ट झाली असावी.

अवकाशयाने : शुक्राचे समन्वेषण इतर कोणत्याही ग्रहापेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात झाले आहे. अमेरिका आणि रशिया या देशांनी ३१ अवकाशयाने शुक्रावर पाठविली (यांपैकी ९ अयशस्वी झाली). रशियाच्या व्हेनेरा आणि व्हेगा या अवकाशयानांच्या मालिकांमुळे शुक्राच्या पृष्ठभागाचे व वातावरणाचे संघटन आणि उच्चतर वातावरणातील गतिकी यांसंबंधी माहिती मिळाली. शुक्र पृथ्वीच्या जवळ आला असताना रशियाने व्हेनेरा –९ व व्हेनेरा – १० ही दोन अवकाशयाने फक्त सहा दिवसांच्या फरकाने शुक्राकडे पाठविली. या यानांतून एकाच वेळी दोन पेटिका एकमेकांपासून सु. २,२०० किमी. अंतरावर उतरविण्यात आल्या. त्यांतील उपकरणांनी पृष्ठभागाचे सरासरी तापमान ५००० से., तर दाब पृथ्वीवरील हवेच्या ९० पट असल्याची नोंद केली. अमेरिकेच्या पायोनियर–१० व इतर अवकाशयानांनी १९७५ ते १९८४ या काळात शुक्रावरील सु. ३,००० छायाचित्रे घेतली व पृथ्वीकडे पाठवून दिली. अमेरिकेच्या मॅगेलन या अवकाश यानाने १९९२ अखेर जवळजवळ ९८% पृष्ठभागाचे नकाशे तयार केले. या मॅगेलन चित्रण मोहिमेमुळे शुक्रावरील एकमेव गोलाकृती ज्वालामुखी आणि भूसांरचनिक पद्धती यांसंबंधी माहिती मिळाली. विस्तीर्ण ज्वालामुखींमुळे निर्माण झालेल्या सपाट मैदानांनी शुक्राच्या पृष्ठाभागाचा सु. ८५% भाग व्यापलेला आहे. उरलेला उंच भूप्रदेश वली आणि विभंग याच्या जटिल प्रणालींनी बनलेला आहे. आता शुक्रावर जागृत ज्वालामुखी नसल्याचे आढळून आले आहे. एका सिद्धांतानुसार ५० कोटी वर्षांपूर्वी वर्तुळाकृती ज्वालामुखीची घटना घडली असावी.


शुक्राची अंतर्युती व बहिर्युतीकला : शुक्र ग्रहाच्या कला पृथ्वीच्या चंद्राप्रमाणे दिसतात, ही गोष्ट सर्वांत प्रथम १६१७ मध्ये ⇨ गॅलिलीओ यांना स्वतःच तयार केलेल्या दुर्बिणीमुळे आढळून आली. पृथ्वी व सूर्य यांच्या मधे शुक्र येतो, तेव्हा अंतर्युती असते. या वेळी तो पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ सु. ४ कोटी २ लक्ष किमी. येतो आणि त्याचा कोनीय व्यास मोठ्यात मोठा ६४ सेकंद असतो परंतु त्याची काळोखी बाजू पृथ्वीकडे असते. त्यानंतर आकाशात तो सूर्यापासून दूरदूर दिसू लागतो आणि जास्तीत जास्त ४७० उंचीवर दिसू शकतो. अशा परिस्थितीला परम इनापगम (मॅग्झिमम इलाँगेशन) म्हणतात. त्यानंतर तो आकाशात सूर्याच्या जवळजवळ येऊ लागतो, पण पृथ्वीपासून दूरदूर जाऊन बहिर्युती होते, तेव्हा तो पृथ्वीपासून सु. २५ कोटी किमी. असतो. कोनीय व्यास ९·५ सेकंद होतो व बिंब पूर्ण प्रकाशित असते पण सूर्यसान्निध्यामुळे अशा वेळीही शुक्र दिसत नाही. त्यानंतर पुन्हा सूर्यापासून दूर जाऊन परम इनापगम होतो आणि नंतर अंतर्युतीपर्यंत तो सूर्याजवळ येऊ लागतो. नक्षत्रसापेक्ष याची अंतर्युतीपासून बहिर्युतीपर्यंत कला वाढत जाते परंतु बिंबाचा व्यास कमी होत जातो आणि बहिर्युतीपासून अंतर्युतीपर्यंत कला कमीकमी होत जाते व बिंबाचा व्यास वाढत जातो. या कला डोळ्यांनी दिसत नाहीत पण लहानशा दूरदर्शकातून अगर द्विनेत्री दूरदर्शकामधूनही चांगल्या दिसतात. एक प्रदक्षिणा सु. २२४ दिवसांत होते, परंतु त्याचा (सूर्यसापेक्ष) सांवासिक काल (किंवा कलांचे एक चक्र) ५८४ दिवस आहे.

परम इनापगम ही स्थिती अंतर्युतीच्या ७२ दिवस अगोदर अगर नंतर असते. पूर्व परम इनापगम झाल्यापासून २०·५ आठवड्यांनी पश्चिम परम इनापगम होतो आणि पश्चिम परम इनापगमापासून सु. ६३ आठवड्यांनी पूर्व परम इनापगम होतो. शुक्राची कमाल तेजस्विता अंतर्युती, बहिर्युती आणि परम इनापगम या स्थितीत नसते. तो सूर्यापासून ३९ दूर असताना म्हणजे अंतर्युतीच्या ३५ दिवस अगोदर आणि नंतर त्याची जास्तीत जास्त प्रत ऋण ४·४ असते. अशा वेळी शुक्राचा ३०%च भाग प्रकाशित असतो व बिंबाचा व्यास ६५ सेकंद असतो. या वेळी त्याची कोर शुद्ध पंचमीच्या चंद्रकोरीएवढी असते. अशा वेळी तो व्याध ताऱ्याच्या १२ पट तेजस्वी असून दिवसाही दिसू शकतो आणि काळोख्या रात्री त्याच्या प्रकाशात सावल्याही पडू शकतात. अंतर्युतीच्या अगोदर अगर नंतर परम इनापगमापर्यंत दुर्बिणीतून शुक्रकोरीचे दृश्य मनोवेधक दिसते.

अंतर्युतीच्या अगोदर कोरीची रुंदी कमीकमी होत टोके किंवा शृंगे वाढत जातात. ती बिंबापेक्षा तेजस्वी दिसतात, कधी बिंबापासून किंचित अलग तर कधी अग्रावर टोपी घातल्यासारखी दिसतात. सूर्यापासून  ५० च्या आत आल्यावर शृंगे जुळत जाऊन एकत्रही होतात. मधला भाग किंचित राखी रंगाचा दिसतो, या प्रकाशाला आशन प्रकाश म्हणतात. शृंगामुळेच शुक्राच्या वातावरणाचा शोध लागला.    

अधिक्रमण : एखाद्या मोठ्या खस्थ ज्योतीच्या बिंबावरून तीपेक्षा लहान खस्थ ज्योती जाताना दिसली, तर त्या घटनेस अधिक्रमण असे म्हणतात. क्रांतिवृत्ताशी शुक्राच्या कक्षापातळीचा कोन ३·४ इतका अल्प असल्यामुळे अंतर्युती जर पाताजवळ झाली, तर त्या वेळी सूर्यबिंबावरून शुक्राचे ⇨ अधिक्रमण होते. या वेळी एक काळा ठिपका सूर्यबिंबावरून सरकत जातो व हे सरकणे चार-पाच तास चालू असते.

मोडक, वि. वि.

शुक्राची काही अधिक्रमणे 

अंतर

वर्ष

महिना

८ वर्षे

१६३१

डिसेंबर 

१६३९ 

१२१·५ वर्षे 

————————- 

८ वर्षे 

१७६१ 

जून 

१७६९ 

१०५·५ वर्षे 

————————- 

८ वर्षे 

१८७४ 

डिसेंबर 

१८८२ 

१२१·५ वर्षे 

————————- 

८ वर्षे 

२००४  

जून 

२०१२ 

१०५·५ वर्षे 

———————— 

८ वर्षे 

२११७ 

डिसेंबर 

२१२५ 

 

साधारणमानाने ही अधिक्रमणे ७ जून किंवा ८ डिसेंबरच्या आसपास होतात. आठ वर्षांत सांवासिक वर्षे होतात आणि जास्त सूक्ष्मपणे २४३ वर्षांत १५२ सांवासिक वर्षे होतात. २४३ वर्षांत ४ वेळा अधिक्रमणे होतात परंतु एकाच पातावर एकदा अधिक्रमण होऊन गेल्यावर २३५ वर्षे पुन्हा अधिक्रमण होत नाही. आठ वर्षांच्या अंतराची अधिक्रमणाची डिसेंबरची एक जोडी येऊन गेली म्हणजे त्यानंतर १२१·५ वर्षांनी जूनची जोडी येते आणि जूननंतरची डिसेंबरची १०५·५ वर्षांनी येते. हा नियम कोष्टकावरून पडताळता येईल. [→ अधिक्रमण].   

संदर्भ : 1. Cattermole, P. Venus : A New Geology, 1994.           2. Cooper, H. S. (Jr.) The Evening Star : Venus Observed, 1994.

मोडक, वि. वि.

 

 

पश्चिम गोलार्थ

 

पूर्व गोलार्थ

 

मॅगेलन रडार-चित्रण मीशनकडून मिळालेल्या शुक्राच्या पृष्ठभागाच्या प्रतिमा : (अ) लक्ष्मी प्लॅनम या २-५ ते ४ किमी. उंच पठाराच्या दक्षिण सीमेवरील भागाचे दृश्य. (आ) अग्रभागी खचदारी आणि क्षितिजाजवळ गुला मॉन्स (उजवीकडे) व सिफ मॉन्स (डावीकडे) हे ज्वालामुखी आहेत