हॅली, एडमंड : (८ नोव्हेंबर १६५६–१४ जानेवारी १७४२). इंग्रज ज्योतिर्विद व गणिती. त्यांनी एका नवीन धूमकेतूची कक्षा आकडे-मोड करून प्रथम निश्चित केली, त्यामुळे त्यांच्या नावावरून त्या धूमकेतूचे ‘हॅली धूमकेतू’ असे नामकरण करण्यात आले. हॅली यांनी सर आयझॅक न्यूटन यांचा Philosophiae Naturalis Principia Mathematica(इं. शी. ‘मॅथेमॅटिकल प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल फिलॉसॉफी’) हा ग्रंथ १६८७ मध्ये प्रकाशित करण्यासाठी मोठे आर्थिक सहकार्य केले. तसेच सदर ग्रंथाच्या संहितेचे संपादन केले.

 

हॅली यांचा जन्म लंडनजवळील हॅगरस्टोन येथे झाला. आधुनिक विचारांची पायाभरणी झालेल्या काळात त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सेंटपॉल्स स्कूल (लंडन) येथे झाले. १६७३ मध्ये ते क्वीन्स कॉलेज (ऑक्सफर्ड) येथे दाखल झाल्यानंतर त्यांची ओळख राजज्योतिषी जॉन फ्लॅमस्टीड यांच्याशी झाली. फ्लॅमस्टीड हे रॉयल ग्रिनिच ऑब्झर्व्हेटरीत काम करीत असत. त्यांनी खगोलार्धातील ताऱ्यांची अचूक यादी संकलित करण्यासाठी दूरदर्शक वापरला होता. त्यांच्याच प्रोत्साहनामुळे हॅली ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त झाले व त्यांनी दक्षिण खगोलार्धातील ताऱ्यांची अचूक यादी संकलित करण्याचे ठरविले.

 

एडमंड हॅलीहॅली यांनी राजे दुसरे चार्ल्स यांच्याकडून आर्थिक साहाय्य घेऊन ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजातून नोव्हेंबर १६७६ मध्ये प्रवास सुरू केला. ब्रिटिशांच्या ताब्यातील दक्षिण अटलांटिकमधील दक्षिणेला असलेल्या सेंट हेलीना या बेटापर्यंत ते गेले. जानेवारी १६७८ मध्ये ते जेव्हा परतीच्या प्रवासासाठी जहाजावर चढले, तेव्हा त्यांनी ३४१ ताऱ्यांचे शर व भोगि [→ खगोलीय अक्षांश व रेखांश → ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] काढले सूर्यबिंबावरून होणारे बुधाचे अधिक्रमण (ओलांडणे) पाहिले, लंबकाची असंख्य निरीक्षणे केली आणि काही तारे प्राचीन काळापेक्षा अधिक मंद झाल्याचेही त्यांच्या लक्षात आले. त्यांची दक्षिण खगोलार्धातील ताऱ्यांची यादी १६७८ च्या अखेरीस प्रसिद्ध झाली. दूरदर्शकाच्या मदतीने स्थाननिश्चिती केलेल्या दक्षिण खगोलार्धातील ताऱ्यांची अशी ही पहिलीच यादी होती व तिच्यामुळे ज्योतिर्विद म्हणून ते परिचित झाले. १६७८ मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली. त्यांना राजाच्या मध्यस्थीने ऑक्सफर्ड विद्यापीठाची एम्.ए. पदवी देण्यात आली.

 

हॅली व सर आयझॅक न्यूटन यांची केंब्रिज विद्यापीठात १६८४ मध्ये भेट झाल्यामुळे गुरुत्वा-कर्षणाच्या सिद्धांताच्या विकासात हॅली यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सूक्ष्मदर्शकतज्ञ रॉबर्ट हुक, प्रसिद्ध वास्तुविशारद सर क्रिस्टोफर रेन व हॅली हे रॉयलसोसायटीतील त्रिमूर्ती होते. ग्रहांना कक्षेत ठेवणारी प्रेरणा ही त्यांच्या-तील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात कमी होते, हे हुक व हॅली यांनी गणिताने काढले. मात्र, या परिकल्पनेवरून ग्रहांच्या निरीक्षित गतींशी जुळणारी सैद्धांतिक कक्षा काढणे त्यांना शक्य झाले नाही. हॅली त्यानंतर न्यूटन यांना भेटले तेव्हा न्यूटन यांनी ही समस्या आपण आधीचसोडविली असल्याचे सांगितले. ही कक्षा म्हणजे विवृत्त असेल, हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या आकडेमोडी चुकीच्या वाटेने जाणाऱ्या ठरल्या. हॅली यांनी प्रोत्साहन दिल्याने न्यूटन यांनी आपले खगोलीय यामिकीवरील अध्ययन अधिक व्यापक करून Principia या ग्रंथाची निर्मिती केली.

 

हॅली यांच्या अंगी मोठ्या प्रमाणावरील माहिती अर्थपूर्ण संक्षिप्त रूपात मांडण्याची क्षमता होती. १६८६ मध्ये त्यांचा जगाचा नकाशाप्रसिद्ध झाला व त्यात महासागरावरील तेव्हा असलेल्या वाऱ्यांचीवाटणी दाखविली होती आणि प्रसिद्ध झालेला तो पहिला वातावरण-वैज्ञानिक चार्ट होता. त्यांच्या ब्रेस्लौ शहरासाठीच्या मृत्युसारण्या १६९३ मध्ये प्रसिद्ध झाल्या. लोकांमधील मृत्यू दर व आयुर्मान यांतील परस्परसंबंध दर्शविण्याचा हा पहिला प्रयत्न होता. याचा भावी काळातील जीवनविमाविषयक सारण्यांच्या विकासावर परिणाम झाला [→ विमा].नौ-अधिकरणाच्या सूचनांनुसार त्यांनी पारमुर पिंक या एककाठी युद्ध-गलबताचे १६९८–१७०० दरम्यान आधिपत्य केले. वैज्ञानिक कामांसाठी या गलबताची ही पहिली सागरी मोहीम होती. दक्षिण अटलांटिकमध्ये होकायंत्रातील नोंदींत होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करणे आणि ते ज्या बंदरांना भेटी देणार होते, त्या बंदरांचे अचूक अक्षांश-रेखांश ठरविणे हाया मोहिमेचा हेतू होता. १७०१ मध्ये त्यांनी अटलांटिक व पॅसिफिकक्षेत्रांचे पहिले चुंबकीय चार्ट प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी वक्र रेषांद्वारे महासागराच्या त्या भागांतील होकायंत्रातील एकसारखे असलेले बदल दर्शविले होते. असे चार्ट उपलब्ध असलेली सर्व निरीक्षणे आणि आपल्या अनेक सागरी मोहिमांत त्यांनी स्वतः घेतलेली निरीक्षणे यांतून संकलित केले होते. नाविक मार्गनिर्देशनाच्या दृष्टीने या चार्टचे व्यावहारिक मोलमोठे होते आणि ते त्यांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षे वापरात होते [→ मार्गनिर्देशन]. फ्लॅमस्टीड यांचा विरोध डावलून हॅली यांची १७०४ मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठात भूमितीचे सॅव्हिलिअन प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली.

 

हॅली यांनी आपले निरीक्षणात्मक ज्योतिषशास्त्रातील पायाभूत कार्य पुढे चालू ठेवले. १७०५ मध्ये त्यांनी सिनॉप्सिस ऑफ द ॲस्ट्रॉनॉमी ऑफ कॉमेट्स हे पुस्तक प्रसिद्ध केले. १३३७ – १६९४ या काळात पाहण्यात आलेल्या २४ धूमकेतूंच्या अन्वस्तीय कक्षांचे वर्णन हॅली यांनी यापुस्तकात केले होते. १५३१, १६०७ व १६८२ या वर्षी पाहण्यात आलेले तीन ऐतिहासिक धूमकेतू गुणवैशिष्ट्यांच्या बाबतीत इतके एकसारखे होते की, ते तीन वेगळे धूमकेतू नसून एकाच धूमकेतूचे लागोपाठ झालेले दर्शन होते, असे त्यांनी दाखविले. शिवाय १७५४ मध्ये तो परत दिसेल असे अचूक भाकीतही त्यांनी केले होते. याच धूमकेतूला त्यांच्या नावावरून’ हॅली धूमकेतू’ म्हणतात व त्याचा परत दिसण्याचा आवर्तकाल ७६ वर्षे आहे. २०५२ मध्ये हा धूमकेतूू दिसण्याची शक्यता आहे.

 

हॅली यांनी १७१६ मध्ये भाकीत केल्याप्रमाणे १७६१ व १७६९या वर्षी दिसणाऱ्या शुक्राच्या सूर्यबिंबावरून होणाऱ्या अधिक्रमणाचे निरीक्षण करण्यासाठी एक पद्धत तयार केली व त्यामुळे सूर्यापासूनचे पृथ्वीचे अंतर सौर पराशयाद्वारे (दृक्च्युतीद्वारे) अचूकपणे काढता येणार होते. हॅली हे फ्लॅमस्टीड यांच्यानंतर १७२० मध्ये ग्रिनिच येथे राजज्योतिषी झाले. तेथे त्यांनी याम्योत्तर वृत्तावरून होणाऱ्या चंद्राच्या अधिक्रमणाचे काळ ठरविण्यासारखी निरीक्षणे केली. याचा उपयोग अखेरीस समुद्रात असताना स्थळाचे रेखांश ठरविण्याकरिता होईल, अशी त्यांची अपेक्षा होती.

 

मार्गनिर्देशनातील समस्या यांसारख्या विज्ञानाच्या व्यावहारिक उपयोगांविषयी हॅली यांना कळकळ वाटत होती. त्यांना अनेक गोष्टींतरस होता. मात्र, त्यांची व्यावसायिक क्षमता अधिक उठून दिसल्यामुळेत्यांची खास वैज्ञानिक कामगिरी झाकली गेली. न्यूटन यांच्या कार्याचेत्यांनी केलेले समंजस मूल्यमापन आणि त्यासाठी केलेले मार्गदर्शन यादोन बाबींमुळे पाश्चात्त्य विचारसरणी प्रगत करण्याच्या बाबतीत त्यांचेस्थान महत्त्वाचे मानले जाते.

 

हॅली यांचे ग्रिनिच (लंडन) येथे निधन झाले.

ठाकूर, अ. ना.