अमावास्या : (आवस, दर्श). चंद्राच्या शेवटच्या कलेचे नाव. अमान्त महिन्याची शेवटची तिथी [→ महिना]. या कालात चंद्र व सूर्य एकाच नक्षत्रात असल्यामुळे (अमा = एकत्र, वस् = राहणे) हे नाव पडले. वास्तविक अमावास्या हा एकच क्षण असून त्या क्षणाला चंद्र आणि सूर्य युतीत असतात [→ युति]. अमावास्येला चंद्र व सूर्य यांचे उदयास्त साधारणपणे एकदमच होतात. या वेळी चंद्राचा पृथ्वीकडील भाग अप्रकाशित असल्यामुळे चंद्र दिसत नाही. सूर्यग्रहण अमावास्येलाच असते. सोमवती (सोमवारी येणारी), पिठोरी (श्रावणातील), सर्वपित्री (भाद्रपदातील), अशा अमावास्या, तसेच दिवाळीतील लक्ष्मीपूजन हा अमावास्येला येणारा सण, हे दिवस धार्मिक महत्त्वाचे आहेत.

ठाकूर, अ. ना.