ऊर्ट, यान हेंड्रिक : (२८ एप्रिल १९००– ). डच ज्योतिर्विद. आकाशगंगेची संरचना व तीतील विविध घटकांचे गतिविज्ञान यांसंबंधीच्या संशोधनाकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म फ्रानेकर (नेदरर्लंड्स) येथे झाला. ग्रोनिंगेन विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर ते २ वर्षे अमेरिकेतील येल विद्यापीठात संशोधन साहाय्यक होते. १९२४ साली त्यांची लायडन वेधशाळेत नेमणूक झाली व १९४५ मध्ये ते या वेधशाळेचे संचालक झाले. लायडन येथे १९३५ मध्ये ज्योतिषशास्त्राच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली.

उच्च वेगाने भ्रमण करणाऱ्या ताऱ्यांसंबंधी त्यांनी प्रथम संशोधन केले. एका विशिष्ट वेगापेक्षा (सु. ६५ किमी. प्रतिसेकंद) जास्त वेग असलेले तारे आकाशाच्या एका गोलार्धाकडे जाताना आढळतात, तथापि यापेक्षा कमी वेगाच्या ताऱ्यांच्या बाबतीत मात्र अशी असममिती (एखाद्या अक्षापासून अंतराची असमानता) आढळत नाही असे त्यांनी दाखविले. ही असममिती कापटाइन यांनी मांडलेल्या सममिती प्रणालीच्या विरुद्ध आहे. आकाशगंगा ही सूर्यापासून बऱ्याच दूरवर असलेल्या केंद्राभोवती परिभ्रमण करीत असल्यामुळे ही सक्षममिती संभवते असे पुढे ऊर्ट व लिंडब्लाड यांनी दाखविले. या परिभ्रमणाचा प्रत्यक्ष निरीक्षणजन्य पुरावा ऊर्ट यांनीच शोधून काढला व आकाशगंगेचे आतील घटक बाहेरच्या घटकांपेक्षा कमी आवर्तकालात (एका प्रदक्षिणेस लागणाऱ्या कालात) परिभ्रमण करतात असे सिद्ध केले. कापटाइन प्रणाली ही आकाशगंगेचा एक अतिशय लहान भाग आहे, असे यावरून सिद्ध झाले. यानंतर ताऱ्यांच्या वेगांचे तसेच गांगेय प्रतल (आकाशगंगेच्या केंद्रातून जाणारी पातळी) व आकाशगंगेच्या केंद्रापासून असलेले त्यांच्या समूहांचे वितरण (वाटणी) यांसंबधी त्यांनी संशोधन करून सर्व आकाशगंगेतील गुरुत्व प्रेरणा आणि द्रव्यमापनाच्या वितरणाची प्रतिकृती यांविषयी आपले विचार मांडले. या संशोधनाकरिता दुसऱ्या महायुद्धानंतर नेदरर्लंड्समध्ये रेडिओ ज्योतिषशास्त्रीय संशोधनासाठी एक केंद्र स्थापन करण्यासाठी त्यांनी मोठी मदत केली. व्हॅन डी हूल्स्ट व इतर डच ज्योतिर्विदांच्या मदतीने ऊर्ट यांनी आंतरतारकीय अवकाशातील हायड्रोजनाच्या २१ सेंमी. तरंगलांबीच्या केलेल्या निरीक्षणांच्या आधारे आकाशगंगेतील वायूच्या वितरणाचा जवळजवळ संपूर्ण नकाशा तयार केला. आकाशगंगेच्या केंद्राजवळील भागातून तेथील वायू आकाशगंगेच्या परिभ्रमण वेगाइतक्याच वेगाने प्रसरण पावत आहे, असेही ऊर्ट यांना आढळले, याशिवाय त्यांनी आंतरतारकीय माध्यमातील लहान प्रमाणावर होणाऱ्या गतींसंबंधी, अतिदीप्त नवताऱ्याच्या प्रसरण पावत असलेल्या आवरणांचा आजूबाजूच्या माध्यमावर होणारा परिणाम, आंतरतारकीय अवकाशातील धन कणांची उत्पत्ती, धूमकेतूंच्या कक्षा व त्यांची उत्पत्ती, क्रॅब अभ्रिकेपासून येणाऱ्या प्रकाशाचे ध्रुवण (विशिष्ट प्रतलात होणारे कंपन) व त्यापासून मिळणाऱ्या प्रारणाचे (तरंगरूपी ऊर्जेचे) सिंक्रोट्रॉन प्रारण प्रकाराशी (सिंक्रोट्रॉन नावाच्या उपकरणात विद्युत् भारित कणांना चुंबकीय क्षेत्रात प्रचंड वेग प्राप्त करून दिल्याने मिळणाऱ्या प्रारण प्रकाराशी) असलेले साम्य इ. विषयांवर संशोधन केलेले आहे.

इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन या संस्थेचे ते १९३५–४८ या काळात सरचिटणीस आणि १९५८–६१ या काळात अध्यक्ष होते. त्यांना मिळालेल्या अनेक सन्मानांत ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ द पॅसिफिक या संस्थेचे ब्रूस पदक व अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे परदेशीय सदस्यत्व हे उल्लेखनीय आहेत.

भदे, व. ग.