अपगम : एखादा ग्रह किंवा चंद्र आणि सूर्य यांच्यातील पृथ्वीवरून मोजलेल्या कोनीय अंतरास ‘अपगम’ म्हणतात. ही संज्ञा मुख्यत: बुध किंवा शुक्र या अंतर्ग्रहांचे सूर्यापासून कोनीय अंतर दर्शविण्यासाठी वापरतात. सूर्यापासूनच त्यांच्या अशा अंतराला ‘इनापगम’ व जास्तीत जास्त अंतराला ‘परम इनापगम’ म्हणतात. परम इनापगमाच्या वेळी पहाटे किंवा संध्याकाळी हे ग्रह —विशेषत: बुध—चांगले दिसतात. बुध व शुक्र  परम इनापगम अनुक्रमे सु. २८ आणि ४७ असतात. चंद्राचा किंवा बहिर्ग्रहाचा अपगम ० ते १८० असू शकेल.

गुरू किंवा शनी व त्यांचे उपग्रह यांतील कोनीय अंतरासही ‘अपगम’ म्हणतात. पृथ्वीच्या दैनिक अक्षीय परिभ्रमणामुळे कोणताही तारा ध्रुव बिंदूभोवती भ्रमण करताना दिसतो, तेव्हा त्या ताऱ्‍याचे जास्तीत जास्त पूर्व अगर पश्चिम ⇨दिगंश  म्हणजे त्या ताऱ्‍याचा अपगमच होय.

मराठे, स. चि.