वक्री (पूर्वेकडून पश्चिमेकडे भासमान) गती: पृ - पृथ्वी, मं - मंगळ, शु-शुक्र.वक्री : क्रांतिवृत्ताच्या उत्तर कदंबाग्राकडून [⟶ क्रांतिवृत्त] पाहिल्यास पृथ्वी आणि ग्रह सुर्याभोवती अपसव्य (घड्याळाच्या काटांच्या दिशेच्या विरूद्ध दिशेने) फिरताना दिसतील त्यास मार्गी गती असे म्हणतात. या नित्याच्या दिशेच्या विरूद्ध दिशेतील गतीस वक्री गती असे म्हणतात. पृथ्वीवरून पाहताना आकाशातील स्थिर ताऱ्यांच्या पार्श्वभुमीवर ग्रहाचा जो मार्ग दिसतो तो पृथ्वीच्या व ग्रहांच्या कक्षीय गतीचा एकत्रित परिणाम असतो. ग्रह सामान्यपणे ताऱ्यांच्या सापेक्ष पश्चिमेकडून पूर्वेकडे म्हणजे मार्गी गतीने सरकताना दिसतात. काही वेळा याउलट म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे दिसणारी त्यांची सरक ही वक्री गती होय. अशा गतीने जाणाऱ्या ग्रहास वक्री ग्रह असे म्हणतात. कोणताही ग्रह जेव्हा पृथ्वीच्या जवळून जातो तेव्हा तो पृथ्वीवरून पाहताना वक्री गतीने जातो असे दिसते. वक्री गती हा केवळ आभास आहे. 

पृथ्वी ३० किमी./ सेकंद आणि मंगळ २४ किमी./ सेकंद या गतीने सूर्याभोवती प्रदक्षिणा करतात. जेव्हा हे दोन्ही ग्रह सूर्यांच्या एकाच अंगास येऊन त्यांना सांधणाऱ्या रेषेवर सूर्य येतो, तेव्हा मंगळ प्रतियुतीत आहे असे म्हणतात. या वेळी मंगळ पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ येतो व निरीक्षणास अनुकूल असतो. या स्थितीत सूर्याच्या व मंगळाच्या खगोलीय रेखांशांत (भोगांशांत) १८०° चा फरक असतो. प्रतियुती होण्यापूर्वी व नंतर काही दिवस पृथ्वीची व मंगळाची आपापल्या कक्षांवरील सरक एकाच दिशेत होत असते. या वेळी सावकाश जाणारा मंगळ हा जलद जाणाऱ्या पृथ्वीच्या मागे पडतो आणि तो उलट दिशेत माघारी जातो म्हणजे वक्री होतो, असे पृथ्वीवरून पाहताना दिसते. बाकीच्या बहिर्ग्रहांच्या (मंगळाच्या कक्षेपेक्षा अधिक मोठी कक्षा असलेल्या ग्रहांच्या) बाबतीत प्रतियुतीच्या आसपास असेच घडून ते वक्री दिसतात. 

बुध व शुक्र अंतर्ग्रह (पृथ्वीच्या कक्षेपेक्षा लहान कक्षा असलेले ग्रह) आहेत. त्यांची कक्षीय गती अनुक्रमे ४८ किमी./से. व ३५ किमी से, अशी असून प्रत्येकाची गती पृथ्वीच्या गतीहून जास्त आहे, म्हणजे दोन्ही ग्रह अंतर्युतीच्या (भासमान अंतर किमान असतानाच्या) आसपास पृथ्वीला जवळ असताना पृथ्वीच्या पुढे जातात व सूर्याच्या दिशेतील आकाशाच्या पार्श्वभूमीवर पूर्वेकडून पश्चिमेकडे सरकून वक्री झाल्यासारखे दिसतात. सूर्याच्या एकाच बाजूस असताना ग्रह आणि पृथ्वी यांपैकी ज्याची गती दुसऱ्याहून कमी असेल, तोच फक्त काही वेळ स्थिर आहे. असे मानल्यास (अंतर्ग्रहांचा विचार करताना पृथ्वी आणइ बहिर्ग्रहांच्या बाबतीत बहिर्ग्रह स्थिर मानल्यास) पृथ्लीसापेक्ष ग्रहाची गती पूर्वेकडून पश्चिमेकडे वक्री होत असल्याचे सहज लक्षात येऊ शकते.

मार्गी असेलेला ग्रह वक्री होण्यापूर्वी, त्याची मार्गी गती कमी होत जाऊन ग्रह पृथ्वीच्या गतीच्या दिशेत येऊन स्थिर दिसतो, त्यास ग्रहांची स्तंभी स्थिती असे म्हणतात. यानंतर ग्रहास वक्री गती येते. या वेळी ग्रहाचे खगोलीय अक्षांश (शर) बदलत असल्यास आकाशीय पार्श्वभूमीवर ग्रहाचा मार्ग फासासारखा होतो. याप्रमाणेच वक्री ग्रह पुन्हा मार्गी होण्यापूर्वी मध्यंतरी पुन्हा एकदा स्तंभी झाल्यासारखा दिसतो. अंतर्ग्रह अंयर्युतीपूर्वी आणि बहिर्ग्रह प्रतियुतीपूर्वी काही दिवस वक्री होऊन वक्री गती युतीनंतर काही दिवसांपर्यंत टिकते. मंगळ प्रतियुतिरपूर्वी सु. ५ आठवडे व नंतर सु. ५ आठवडे मिळून एकंदर ७३ दिवस वक्री असतो. याप्रमाणे गुरू सु. ४ महिने, प्रजा पती सु. ५ महिने तसेच बुध २३ दिवस व शुक्र ४२ दिवसांपर्यंत वक्री स्थितीत असावा. ग्रहांच्या कक्षा लंबवर्तुळाकार असल्यामुळे वरील कालवधीत थोडे फरक होऊ शकतात. जसजसे ग्रहांचे सूर्यापासूनचे अंतर वाढत तसतसा ग्रहांचा वक्री असण्याचा कालावधी वाढत जाताना दिसतो.

अंतर्ग्रह व बहिर्ग्रह वक्री कसे होतात व त्या वेळी त्यांचे आकाशात दिसणारे मार्ग कसे असतात, ते आकृतीत दाखविले आहे.

सूर्य व चंद्र हे नेहमीच मार्गी असतात. याउलट काही धूमकेतू, काही ग्रहांचे उपग्रह हे नेहमीच वक्री गतीने भ्रमण करतात. शनीचा नववा उपग्रह, गुरूचे आठवा व नववा उपग्रह, वरुणाच्या दोन उपग्रहांपैकी पहिला उपग्रह यांची भ्रमणे वक्री आहेत.

नेने, य. रा. गोखले, मो. ना.