ॲडम्स, वॉल्टर सिडनी : (२० डिसेंबर १८७६–११ मे १९५६). अमेरिकन ज्योतिर्विद. खगोलभौतिकीत महत्त्वाचे कार्य. उत्तर सिरियातील अँटिऑक येथे त्यांचा जन्म झाला. डार्टमथ महाविद्यालयात आणि शिकागो व म्यूनिक या विद्यापीठांत त्यांचे उच्च शिक्षण झाले. १९०१ साली शिकागो येथील यर्कीझ वेधशाळेत साहाय्यक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. यानंतर १९०५ साली कॅलिफोर्नियातील मौंट विल्सन वेधशाळेत त्यांना घेतले गेले. येथेच १९१३–२३ या काळात ते उपसंचालक आणि १९२३–४६ या काळात संचालक होते. उपसंचालक असताना तत्कालीन संचालक जॉर्ज हेल यांना त्यांनी व्यवस्थापकीय कामात, सौरवेधसाधने (सूर्याचे वेध घेण्याची उपकरणे) बसविण्यास आणि ताऱ्यांचे वेध घेण्यासाठी १·५२ मी. (६० इंची) व २·५४ मी. (१०० इंची) आकारमानाच्या दुर्बिणी बसविण्यास बहुमोल मदत केली. कोलशूटर या ज्योतिर्विदांबरोबर त्यांनी ताऱ्यांच्या वर्णपटांवरून त्यांची अंतरे काढण्याची पद्धत शोधून काढली. पृथ्वीच्या वातावरणात बाष्पाचे जे प्रमाण आहे, त्याच्या काही अल्पांशानेच ते मंगळाच्या वातावरणात आहे असेही त्यांनी सिद्ध केले. तसेच डन्‌हॅम यांच्या मदतीने मंगळाच्या वातावरणात असलेले ऑक्सिजनाचे प्रमाण आणि शुक्रावरील वातावरणात असलेले बाष्पाचे प्रमाण इतके अल्प आहे की, अतिसंवेदनशील उपकरणाच्या साहाय्यानेही ते अजमावता येणे शक्य होणार नाही. मात्र शुक्राच्या वातावरणात कार्बन डाय-ऑक्साइडाचे प्रमाण पुष्कळच आहे, असे त्यांनी सिद्ध केले.

सूर्याचे व ताऱ्यांचे वर्णपट घेण्याच्या बाबतीत ते फार कुशल होते. वर्णपटांच्या साहाय्याने त्यांनी सूर्यावरील डाग, सूर्याच्या वेगवेगळ्या अक्षवृत्तांवरील परिभ्रमणाच्या वेगांची मोजमापे, ताऱ्यांची अंतरे व गती, विशिष्ट तारे  तसेच आंतरतारकीय अवकाशातील वायू यांसंबंधी महत्त्वाचे संशोधन केले. त्यांनी ज्योतिषशास्त्रविषयक अनेक निबंध व ३ ग्रंथ प्रसिद्ध केले. पॅसाडीना येथे त्यांचे देहावसान झाले.

मोडक, वि. वि.