अयनांश: निरयन कालगणनेत [⟶ निरयन—सायन] रेवती तारकापुंजातील ‘निःशर’(क्रांतिवृत्तावरचा) तारा (पाश्चात्य नाव ‘झीटा पीशियम’) हे प्रारंभस्थान मानण्यात येते. या प्रारंभस्थानी खगोलीय विषुववृत्त व क्रांतिवृत्त यांचा छेदनबिंदू (संपात)  नेमका येत नाही. नि:शर तारा आणि ( वसंत ) संपातबिंदू  यांमध्ये पडणाऱ्‍या क्रांतिवृत्तीय अंशात्मक अंतराला (किंवा भोगाला) ‘अयनांश’ म्हणतात. या संपातबिंदूचे चलन उलट म्हणजे पश्चिम दिशेकडे होत असते. संपाताची अशी प्रदक्षिणा पूर्ण होण्यास सु. २५,७८० वर्षे इतका प्रदीर्घ काल लागतो. निःशर ताऱ्‍यापासून संपातबिंदूचे अंतर जसजसे वाढत जाते तसतसे अयनांश वाढत जातात. सायन पंचांगात संपात हे आरंभस्थान मानण्यात येत असल्यामुळे त्यात अयनांश येतात. याउलट निरयन पंचांग अयनांशविरहित आहे. मात्र वसंतसंपातापासून प्रारंभस्थान किती अंशावर आहे हे प्रत्येक पंचांगात दिलेले असते.

 

प्राचीन काळी ⇨संपातचलनाची गती प्रतिवर्षी ६० विकला अंदाजण्यात आली होती. इ.स.पू. १३० च्या सुमारास हिपार्कस या ग्रीक ज्योतिर्विदांनी प्रथम संपातचलनाचा शोध लावला. त्यानंतर संपातचलनाची ही गती टॉलेमी, ट्यूको ब्राए, लालांद, ॲलांबेर, अरबी ज्योतिर्विद अल् बातानी यांनी अनुक्रमे ३६, ५१, ५०·५, ५०·१ व ५५·५ विकला अशी निरनिराळी अंदाजली. सध्या ही गती ५०·७ विकला निश्चित करण्यात आलेली आहे. भारतात सूर्यसिद्धांतकार संपाताचे चलन मानीत असले तरी त्याची संपूर्ण प्रदक्षिणा त्यांना मान्य नव्हती. निःशर ताऱ्याच्या पूर्वेस २७ पासून पश्चिमेस २७ पर्यंत संपातबिंदू आंदोलित होतो असे मानीत. पृथ्वीच्या परांचन गतीमुळे [⟶ अक्षांदोलन] संपातचलन होते व अयनांश सतत वाढत जातात हे आता ⇨यामिकी ने सिद्ध झाले आहे.

 

शके ४४४ म्हणजे इ.स. ५२२ मध्ये हा संपात निःशर ताऱ्यापाशी होता, असे गणेश दैवज्ञ यांचे मत आहे. राजमृगांक, करणकुतूहल,करणप्रकाश वगैरे ग्रंथांत हे वर्ष शके ४५५ असे दिलेले आहे. भास्वातीकरणात ४५०, द्वितीय आर्यसिद्धांतात ५२७, पराशर सिद्धांतात ५३२ इ. निरनिराळी मतेही आढळतात. संपातचलन केवळ काही विकलांइतकेच सूक्ष्म असल्यामुळे तसेच वेधसाधने तुटपुंजी असल्यामुळे ही मतभिन्नता स्वाभाविक होती.

 

आधुनिक गणित-पद्धतींवरून हे वर्ष इ.स. ५७४ असल्याचे दिसून आलेले आहे. संपातचलनाच्या गतीसंबंधीचे जुने मत ६० विकला व नवे मत ५०·२७ विकला असल्यामुळे नव्या-जुन्या मतांत आता सु. १,४००  वर्षांनंतर ४ पेक्षा जास्त फरक पडला आहे.

 

कोळेकर, वा. मो.