सेक्की, प्येअत्रो आंजेलो : (२९ जून १८१८-२६ फेब्रुवारी १८७८). इटालियन जेझुइट धर्मगुरू व खगोलभौतिकीविद. त्यांनी ताऱ्यांच्या वर्णपटांचे सर्वेक्षण प्रथम केले. ताऱ्यांच्या वर्णपट प्रकारावरून त्यांचे वर्गीकरण करता येईल, असे सेक्की यांनी सुचविले होते.

सेक्की यांचा जन्म रेज्जिओ नेल एमिलिया ( मोडेना डची, आता इटली) येथे झाला. ते सोसायटी ऑफ जीझस या संस्थेत १८३३ मध्ये दाखल झाले. १८३९ मध्ये ते इटलीतील लोरेटो येथील जेझुइट कॉलेजामध्ये भौतिकी व गणित या विषयांचे व्याख्याते झाले. १८४४ मध्ये रोमला परत आल्यावर त्यांनी आपला धर्मविद्येचा अभ्यास पूर्ण केला व रोमन कॉलेजात व्याख्याने दिली.

जेझुइट लोकांना रोममधून १८४८ मध्ये घालवून देण्यात आल्यावर सेक्की इंग्लंडमधील लँकाशर परगण्यातील क्लिथेरो येथील स्टोनी हर्स्ट कॉलेजात आणि नंतर वॉशिंग्टन डी. सी. (अमेरिका) येथील जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीत गेले. ज्योतिर्विद म्हणून असलेली ख्याती लक्षात घेऊन १८४९ मध्ये त्यांना रोमला परत येण्याची परवानगी मिळाली. तेथे ते रोमन कॉलेजामध्ये ज्योतिषशास्त्राचे प्राध्यापक व वेधशाळेचे संचालक झाले. त्यांनी नवीन वेधशाळा उभारली व तेथे त्यांनी तारकीय वर्णपटविज्ञान, भूचुंबकत्व व वातावरणविज्ञान या विषयांमध्ये संशोधन केले. तेथे त्यांनी मोठा वैषुविक दूरदर्शक बसविला.

सेक्की यांनी तारकीय वर्णपटांचे बारकाईने निरीक्षण केले होते. वर्णपटांवरून ताऱ्यांचे चार वर्ग करता येतील, असा निष्कर्ष त्यांनी या निरीक्षणाद्वारे काढला. यासाठी त्यांनी ४,००० ताऱ्यांच्या वर्णपटांचा अभ्यास करून त्यांचे पुढील चार प्रकारांत वर्गीकरण केले होते : (१) वर्णपटांत हायड्रोजनाच्या तेजस्वी रेषा असणारे व्याधासारखे तारे, (२) वर्णपटांत अरुंद रेषा असणारे सूर्यासारखे तारे, (३) वर्णपटांत रुंद पट्ट व तांबड्या रंगाच्या बाजूला रेखीवपणा असणारे शौरीसारखे तारे आणि (४) जांभळ्या रंगाच्या बाजूला रेखीवपणा असणारे कार्बन तारे. या जगन्मान्य झालेल्या वर्गीकरणाचा विस्तार करून नंतर साध्या तापमान श्रेणीवर आधारलेली ताऱ्यांची हार्व्हर्ड वर्गीकरण पद्धती तयार करण्यात आली. सूर्यग्रहणाच्या वेळी दिसणारी तेजःशृंगे ही खुद्द सूर्यावर असलेली रूपे (बाबी) आहेत, हे त्यांनी सिद्ध केले. शिवाय त्यांनी तेजःशृंगांच्या वर्तनाच्या अनेक अवस्था, तसेच लहान तेजःशृंगांसारखे वायूंचे झोत शोधून काढले. या झोतांना झोतगुच्छ म्हणतात. [⟶ सूर्य].

वर्णपटीय निरीक्षणावरून सेक्की यांनी बिंबाभ्रिका आणि लंबगोल व अनियमित असे तेजोमेघ यांचेही वर्गीकरण केले. शनी ग्रहाचा ध्रुवांकडील चपटेपणा व त्याच्याभोवतीच्या कड्यांची विकेंद्रता, चंद्राच्या पृष्ठभागावरील कोपर्निकस नावाच्या विवराचे चित्रण, गुरूवर होणारी वादळे व त्याच्या उपग्रहांवरील डाग, सूर्याच्या पृष्ठभागावरील विविध ठिकाणी असलेली तापमाने व त्यांच्यातील अन्योन्य संबंध, सूर्याच्या प्रारणाचे (तरंगरूपी ऊर्जेचे) मापन, धूमकेतूंची विरलता इ. गोष्टींचे वेध घेऊन त्यांनी संशोधन केले होते. दूरदर्शकात वस्तुभिंगापुढे काचेचा लोलक बसविण्याचे तंत्र त्यांनी सुरू केले व नंतर ते रूढ झाले.

सेक्की यांचे रोम (इटली) येथे निधन झाले.

ठाकूर, अ. ना.