वृश्चिक : राशिचक्रातील आठवी रास. या राशीत विशाखा [→ विशाखा – १] नक्षत्राचा शेवटचा चरण आणि ⇨अनुराधा  व ⇨ज्येष्ठा  ही दोन नक्षत्रे असा सव्वा दोन नक्षत्रांचा समावेश होतो. वृश्चिक म्हणजे विंचू आकाराने ही रास थेट विंचवासारखी असून विंचवाची नांगी  धनू राशीत गेली आहे. ही रास होरा १६ ता. ३० मि., क्रांती – ३०0 [→ज्योतिषशास्त्रीय सहनिर्देशक पद्धति] या क्षेत्राच्या दक्षिणोत्तर पसरलेली आहे. अत्यंत मनोहर व तेजस्वी असणाऱ्या एकंदर तारकासमूहांपैकी काही हिच्यात समाविष्ट असून या निरयन [→निरयन-सायन] राशीत सूर्य १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत असतो व ही रास जून-जुलै महिन्यांच्या सुमारास रात्री दिसते. आकाशगंगेचा पट्टा या राशीतून जात असल्यामुळे या क्षेत्रात गांगेय ⇨अभ्रिका  किंवा तेजोमेघ, कृष्णवर्णी मेघ आणि तारकागुच्छ दिसतात.

ज्येष्ठा (ॲंटारेझ) हा या राशीतील सर्वांत मोठा तारा ताम्रवर्णी असून तो महत्तम तारा [→ तारा] असल्यामुळे त्याला मंगळाचा प्रतिस्पर्धी हे नाव पडले. सूर्याच्या सापेक्ष याचा व्यास २८५ पट, वस्तुमान ३० पट व तेजस्विता ३०,००० पट असून त्याच्यामध्ये मंगळाची कक्षा समाविष्ट होऊ शकेल. हे तारकायुग्म असून त्याचा अंधुक दिसणारा हिरवट रंगाचा सहचर तारा त्याच्यापासून ३” अंतरावर आहे. मंगळाच्या वार्षिक फेरीत मंगळ व ज्येष्ठा एकमेकांशेजारी दिसतात. याशिवाय या राशीत पाच दुसऱ्या प्रतीचे व आठ तिसऱ्या प्रतीचे तारे आहेत [→ प्रत].

वृश्चिक राशीत आरआर स्कॉर्पी हा चल तारा २७९ दिवसांच्या आवर्तन कालात आपली तेजस्विता ५.६ प्रतीपासून ११.३ प्रतीपर्यंत बदलतो. ज्येष्ठा नक्षत्राच्या पश्चिमेस एम ४ हा झगझगीत तारकागुच्छ आहे. विंचवाच्या नांगीजवळ एम ६ व त्याच्या आग्नेय दिशेस एम ७ असे तारकागुच्छ आहेत. ज्येष्ठाच्या वायव्येस एम ८० हा गोलाकार गुच्छ आहे.

फलज्योतिषानुसार वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ असून ही आर्द्र, स्थिर, बहुप्रसव व स्त्रीत्वदर्शक अशी रास आहे. या राशीत केतू उच्चीचा असतो. बल, धैर्य, एकाग्रता, चोखपणा, प्रामाणिकपणा, क्रूरता व संशयी स्वभाव हे गुणदोष या राशींच्या व्यक्तींत असतात. ओरायन (मृग नक्षत्र) या शिकाऱ्याला विंचवाने (वृश्चिक राशीने) नांगी मारुन मारले, अशी एक ग्रीक पुराणकथा आहे. तिचा प्रत्यक्ष प्रत्यय म्हणजे वृश्चिक राशीचा उदय होतो तेव्हा मृग नक्षत्र मावळते.

पहा : राशीचक्र.                                       

ठाकूर, अ. ना.