जून : ग्रेगरियन पंचांगातील सहावा महिना. जूनो देवतेवरून हे नाव पडले असावे. जुन्या रोमन पंचांगात हा चौथा महिना होता व त्यात २६ दिवस होते. याचे रोग्युलस यांनी ३०, न्यूमा यांनी २९ आणि ज्यूलियस सीझर यांनी पुन्हा ३० दिवस केले. अँग्लो-सॅक्सन लोक याला Sere Monath (ड्राय मंथ) म्हणत. २१ जून या दिवशी सूर्य उत्तर संस्तंभी असतो म्हणून हा उत्तरायणान्त दिन समजला जातो. या महिन्यात १४ तारखेस सूर्य मिथुन राशीत प्रवेश करतो. तसेच ७ जूनला सूर्याचा मृग नक्षत्रात प्रवेश असतो आणि महाराष्ट्रात पावसाळा सुरू होतो, असे समजण्यात येते. हिंदू पंचांगाप्रमाणे जून महिना सामान्यतः ज्येष्ठ-आषाढ महिन्यांत येतो.

ठाकूर, अ. ना.