कालिय : (ड्रॅको). उत्तर खगोलार्धातील सर्पाकृती तारकासमूह. हा सप्तर्षी व लघूसप्तर्षी यांच्यामध्ये आणि शौरीच्या उत्तरेस दिसतो. याच्यामध्ये सहा प्रतीपर्यंतचे [ → प्रत ] ३३ तारे आहेत. यातील आल्फा म्हणजे थुबन ( प्रत ३·६) हा तारा इ.स.पू. ३४४० ते २१६० दरम्यान ध्रुवतारा होता. या सुमारास ईजिप्तमधील पिरॅमिड बांधले गेले. मैत्रायण ब्राह्मणोपनिषदातील ध्रुवाचा उल्लेख यालाच उद्देशून असावा असे जर्मन पंडित याकोबी यांचे मत आहे. यातील गॅमा ( एल्तेनिन) ताऱ्याच्या निरीक्षणांवरून ब्रॅडली यांनी प्रकाशाच्या विपथनाचा ( स्वस्थ गोल व निरीक्षक यांचा सापेक्ष वेग आणि प्रकाशाचा वेग यांच्या संयोगामुळे खस्थ गोलाच्या स्थानामध्ये होणाऱ्या भासमान बदलाचा) शोध लावला (१७२९). हा तारा ग्रिनिचच्या खमध्याच्या जवळून जाणारा सर्वांत तेजस्वी तारा आहे म्हणून याच्या वेधांना महत्त्व आहे. हल्लीचा उत्तर कदंब (सूर्याच्या भासमान वार्षिक) गतिमार्गापासून म्हणजे क्रांतिवृत्तापासून ९० अंतरावर असलेला खगोलावरील बिंदू) व ड्रॅकोनीड उल्कावृष्टीचा [उल्का व अशनि] उद्‌गमबिंदू यांचे स्थान या तारकासमूहात आहे. ड्रॅको हा सोनेरी सफरचंदांच्या हेस्पेराइड बागेचा रक्षक होता हर्क्युलीझने मारल्यावर त्याला आकाशात स्थान मिळाले, अशा याच्यासंबंधी ग्रीक पुराणात पुष्कळ दंतकथा आहेत.

ठाकूर, अ. ना.