रॉस, विल्यम पार्सन्स : (१७ जून १८००−३१ ऑक्टोबर १९६७). आयरिश ज्योतिर्विद आणि रॉसचे तिसरे अर्ल. त्यांनी एकोणीसाव्या शतकातील मोठ्या व्यासाच्या आरशाचे परावर्ती दूरदर्शक (दुर्बिणी) स्वतः तयार करून त्यांमधून आकाशाचे वेध घेतले. त्यांचा जन्म यॉर्क येथील एका लॉर्ड घराण्यात आकाशाचे वेध घेतले. त्यांचा जन्म यॉर्क येथील एका लॉर्ड घराण्यात झाला. ट्रिनिटी व मॅग्डालीन (ऑक्सफर्ड) कॉलेजांतून शिक्षण घेतल्यावर १८२२ साली ते पदवीधर झाले. १८४१ साली वडिलांचे अर्लपद व इतर अधिकार त्यांना वारसा हक्काने प्राप्त झाले व १८४५ पासून संसदेच्या वरिष्ठ उमराव सभागृहात ते आयर्लंडचे प्रतिनिधित्व करू लागले. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव लॉरेन्स पार्सन्स हेही ज्योतिर्विद होते व आपल्या वडिलांनी बनविलेल्या दुर्बिणीने वेध घेण्याचे काम त्यांनी पुढे चालू ठेवले होते. ⇨चार्ल्स अल्जेरनॉन पार्सन्स हे वाफ टरबाइनच्या शोधासाठी प्रसिद्ध असलेले अभियंतेही विल्यम यांचे पुत्र होत.

समाजसेवेची आवड असतानाही विल्यम यांनी आपला बराच वेळ ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासास दिला. विल्यम यांनी आपला बराच वेळ ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासास दिला. विल्यम हर्शेल यांनी बनविलेल्या १२० सेमी. व्यासाच्या भिंगाच्या दूरदर्शकापेक्षा मोठा व अधिक प्रकाश ग्रहण करणारा दूरदर्शक बनविण्याचे रॉस यांनी ठरविले. मोठ्या व्यासाची काचेची भिंगे व द्रवभिंगे बनविण्यात यश मिळत नाही, हे पाहून रॉस यांनी आपले लक्ष आरशाच्या परावर्ती दूरदर्शक बनविण्याकडे वळविले. आरशासाठी वापरावयाची योग्य मिश्रधातू ठरविण्यासाठी त्यांनी ५ वर्षे प्रयोग केले. शेवटी ४:१ या प्रमाणात तांबे व कथिल यांचे अणू असलेली मिश्रधातू त्यांनी यासाठी निवडली. अशा तऱ्हेने १६ पातळ पट्ट्या वापरून त्यांनी सु. ९० सेंमी. व्यासाचा आरसा बनविला. नंतर याच आकारमानाचा अखंड आरसाही त्यांनी तयार केला. १८४२ साली त्यांनी सु. १८० सेंमी. व्यासाचा व ४ टन वजनाचा आरसा बनवून तीन वर्षांनी नवीन दूरदर्शक पूर्ण केला. गुरुत्वाकर्षणाने वक्रता येऊ नये म्हणून त्याला २७ ठिकाणी आधारासाठी टेकू द्यावे लागले होते व वार्याणचा त्रास होऊ नये म्हणून त्याचाय दोन्ही बाजूंस १८ मी. उंचीच्या भिंती बांधल्या होत्या. शिड्या, कप्प्या व इतर साधनसामग्री वापरून १६ मी. लांबीचा दूरदर्शक ‘लेव्हिएनाथ’ (ऑफ पार्सन टाउन) या नावाने ओळखला जाऊ लागला. त्याचे केंद्रांतर सु. १६ मी. व वर्धनक्षमता ६,००० होती. त्याचा उपयोग ⇨अभ्रिकांचे वेध घेण्यासाठी करण्यात आला. अशा प्रकारे अभ्रिकांचे तपशीलवार निरीक्षण केल्यावर यांपैकी काही अभ्रिका या आकाशगंगेप्रमाणे स्वतंत्र दीर्घिका किंवा तारकांचे मोठे समूह असल्याचा महत्त्वाचा शोध रॉस यांनी लावला. अशा काही अभ्रिका भोवऱ्या सारख्या आकाराच्या आणि भव्य असून त्यांच्या अधिक तेजस्वी गाभ्यापासून बाहेर जाणाऱ्या सर्पिलाकृती शाखा दिसतात, ही नवीन माहिती मिळाली. १८४६ पर्यंत ५० अभ्रिकांचे वेध घेऊन त्यांनी त्या दीर्घीकांसारख्या असल्याचो निदर्शनास आणून दिले. एका वायुरूप अभ्रिकेचा अभ्यास करून तिच्या खेकड्यासारख्या आकारावरून त्यांनी तिचे ‘क्रॅब अभ्रिका’ असे नामकरण केले. मृगशीर्ष नक्षत्रातील मोठ्या अभ्रिकेचाही त्यांनी अभ्यास केला. कॅलिफोर्नियातील माउंट विल्सन वेधशाळेत सु. २५० सेंमी. व्यासाला दूरदर्शक १९१७ साली उभारण्यात आला तोपर्यंत रॉस यांचा लेव्हिएथान हा सर्वांत मोठा दूरदर्शक होता.

ब्रिटिश ॲसोशिएशनच्या अधिवेशनाचे (१८४३) आणि रॉयल सोसायटीचे (१८४९−५४) अध्यक्षपद, रॉयल पदक (१८५१), डब्लिन विद्यापीठाचे कुलपतिपद वगैरे सन्मान त्यांनी मिळाले होते. परावर्ती दूरदूर्शक व त्याची रचना तसेच अभ्रिकांचे वेध या विषयांवरचे त्यांचे काही निबंध प्रसिद्ध आहेत. रॉस मंक्साटाउन येथे मृत्यू पावले.

ठाकूर, अ. ना.