आद्य रंगाचार्य : (२६ सप्टेंबर १९०४ — ). एक प्रसिद्ध कन्नड नाटककार. त्यांचे पूर्ण नाव आर्. व्ही. जागिरदार हे असून, ‘श्रीरंग’ ह्या टोपणनावाने त्यांनी आपले लेखन प्रसिद्ध केले. कन्नड साहित्यात ते ‘आद्य रंगाचार्य’ ह्या नावाने ओळखले जातात. त्यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील अगरखेड येथे झाला. शिक्षण मुंबई व लंडन या विद्यापीठांत. लंडन विद्यापीठाचे ते एम्. ए. असून रॉयल एशियाटिक सोसायटीचे सदस्य आहेत. सुरुवातीस धारवाड येथील कर्नाटक कॉलेजात ते संस्कृतचे प्राध्यापक होते. तेथे असताना त्यांनी महाविद्यालयीन रंगभूमीवरच आपली सुरुवातीची अनेक नाटके सादर केली. ह्या नाटकांमुळे ते प्रकाशात आले. त्यांच्या ह्या नाटकांपैकी हरिजन्वार (१९३२) हे नाटक विशेष गाजले आणि त्याने समाजात मोठी खळबळ उडवून दिली. 

यानंतर त्यांनी अनेक नाटके व एकांकिका लिहिल्या. त्यांची बहुतेक नाटके सामाजिक व वास्तववादी असून, त्यांत त्यांनी निर्भयपणे उपरोध, विडंबन, व्यंगदर्शन इत्यादींद्वारे समाजावर कोरडे ओढलेले आहेत. श्रीरंगांनी निर्माण केलेल्या सर्वच व्यक्तिरेखा अतिरिक्त बुद्धिमत्तेचे प्रदर्शन करतात, असा आरोप त्यांच्यावर केला जातो. शाब्दिक कसरत, अनुप्रासाचा हव्यास, श्लेषात्मक शब्दरचना आणि त्यांतून हास्यनिर्मितीचा प्रयत्‍न हे दोष त्यांच्या नाटकांत जाणवतात. त्यांच्या नाटकांत यामुळेच अभिनयाला व गतिमानतेला फारसा अवसर उरत नाही. शब्दबंबाळपणा व वैचारिक चर्चाही त्यांच्या संवादांत अधिक आढळते. म्हणूनच निर्भेळ कलादृष्ट्या त्यांची नाटके फारशी यशस्वी होऊ शकली नाहीत, असे मत अनेक टीकाकार व्यक्त करतात. 

असे असले तरी श्रीरंगांची नाटके बुद्धीला चालना देऊन सामाजिक समस्यांचे विदारक दर्शन घडविण्यात यशस्वी ठरली आहेत. या दृष्टीने त्यांची हरिजन्वार, संसारिग कंस, प्रपंचपाणीपत, नरकदल्लि नरसिंह, उदर वैराग्य इ. नाटके विशेष उल्लेखनीय होत. ही नाटके तशी विनोदी असली, तरी त्या विनोदालाही कारुण्याची किनार आहे. म्हणूनच ह्या नाटकांची गणना शोकसुखात्मिका म्हणून करणे उचित ठरेल.

स्वातंत्र्योत्तर काळात त्यांची दृष्टी राजकीय व सांस्कृतिक समस्यांकडेही वळली. ह्या काळातील त्यांच्या कृतींत त्यांची प्रतिभा परिपक्व, उदात्त व समतोल झाल्याचे दिसते. ह्या काळातील आपल्या नाट्यकृतींत त्यांनी आधुनिक पाश्चिमात्य नाट्यतंत्राचा अवलंब केल्याचे व कलात्मकतेकडे लक्ष पुरविल्याचे दिसते. पौराणिक वा सामाजिक दृश्ये समोरासमोर अथवा आलटून पालटून उभी करणे, विचित्र कथानक रचणे इ. तंत्रे त्यांनी आपल्या नाटकांतून अवलंबिली. ह्या दृष्टीने त्यांची जीवन जोकाली, जरासंधि, कर्तारन कम्मट, शोकचक्र, रंगभारत इ. नाटके उल्लेखनीय होत. केळु जनमेजय हे त्यांचे नाटकही विशेष महत्त्वाचे मानले जाते. 

श्रीरंगांच्या एकांकिका त्यांच्या नाटकांपेक्षा कलादृष्ट्या अधिक यशस्वी ठरल्या आहेत. अश्वमेध, यमन सोलु, शरपंजर, संपुष्ट रामायण, निरुत्तर कुमार इ. एकांकिकांचा या दृष्टीने आवर्जून उल्लेख करावयास हवा. त्यांनी आपल्या एकांकिकांत पौराणिक पात्रे व कल्पना यांचे प्रचलित सामाजिक संदर्भात लोकविलक्षण मिश्रण करून परिणामकारकता साधली आहे. श्रीरंगांची नाटके अथवा एकांकिका सर्वसामान्यांसाठी नसून, एका विशिष्ट दर्जाच्या सुशिक्षित वर्गासाठीच आहेत. स्वतंत्र विचारशक्ती, विदारक विडंबन व नवीन तंत्र यांबाबतीत ð टी. पी. कैलासम् यांच्या बरोबरीनेच श्रीरंग हे आधुनिक कन्नड नाट्यसाहित्याचे व रंगभूमीचे आद्य प्रवर्तक मानले जातात.

श्रीरंगांची ग्रंथनिर्मिती विपुल असून तीत पंचविसावर नाटके, अकरा कादंबऱ्या, पाच-सहा विडंबनपर प्रबंध, काही एकांकिका, एक कवितासंग्रह, दोन चरित्रे, नाट्यस्मृती, साहित्यसमीक्षा, भाषाशास्त्रीय व समाजशास्त्रीय सात-आठ स्वतंत्र व चार-पाच अनुवादित ग्रंथ इत्यादींचा अंतर्भाव होतो. गीतागांभीर्य हा त्यांचा गीतेवरील विवेचनात्मक ग्रंथही महत्त्वपूर्ण मानला जातो. यांशिवाय त्यांनी नाट्यशास्त्र व संस्कृत नाटके यांवर दोन इंग्रजी ग्रंथही लिहिलेले आहेत. सध्या त्यांचे वास्तव्य बंगलोर येथे आहे. 

मळगी, से. रा. (क.) कायकिणी, गौरीश (म.)