पुट्टप्प, के. व्ही. – ‘कुवेंपु’ : (२९ डिंसेबर १९०४ – ). भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात कन्नड कवी व अष्टपैलू लेखक. त्यांचा जन्म कुप्पळ्ळी (ता. तीर्थहळ्ळी,जि.शिमोगा) या गावी एका प्रतिष्ठित व सुसंस्कृत अशा शेतकरी कुटुबांत झाला. वेंकटप्प गौडा हे त्यांचे वडील. कुप्पळ्ळी, वेंकटप्प व पुटप्प या तीन नावांची आद्याक्षरे घेऊन ‘कुवेंपु’ हे काव्यनाम त्यांनी धारण केले व ह्या टोपणनावानेच ते कन्नड साहित्यात विशेष प्रसिद्ध आहेत. प्राथमिक शिक्षण कुप्पळ्ळी येथे पूर्ण केल्यावर त्यांनी म्हैसूर येथे माध्यमिक व उच्च शिक्षण घेतले. म्हैसूर विद्यापिठीतून १९२९ मध्ये ते कन्नड साहित्यात एम.ए. झाले व त्याच विद्यापीठात कन्नडचे प्राध्यापक झाले. पुढे १९५६ ते १९६० या कालवधीत ते म्हैसूर विद्यापीठाचे कुलगुरू होते.

के. व्ही. पुट्टप्प ऊर्फ 'कुवेंपु'

त्यांना म्हैसूर, कर्नाटक व बंगलोर विद्यापीठांनी अनुक्रमे १९५६,१९६६ व १९६९ साली सन्मान्य डी.लिट्. पदव्या देऊन त्यांच्या साहित्यसेवेचा व शैक्षणिक कार्याचा गौरव केला. १९५५ मध्ये साहित्य अकादेमीचा पुस्कार, १९५७ मध्ये धारवाड येथे भरलेल्या कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, १९६४ मध्ये कर्नाटक सरकारकडुन ‘राष्ट्रकवि’ हा किताब, १९६७ मध्ये भारतीय ज्ञानपिठाचा पुरस्कार इ. बहुमान त्यांना मिळाले.के. व्ही. पुट्टप्प ऊर्फ 'कुवेंपु'

कुवेंपु यांनी आजपर्यंत कविता, कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, समीक्षा इ.वाड‌्मयप्रकार हाताळले असले, तरी मुख्यत्वेकरून ते कवी आहेत. बिगिनर्स म्यूझ (१९२२) नावाचा इंग्रजीत लिहिलेल्या कवितांचा संग्रह हे त्यांचे पहिले पुस्तक तथापि नंतर ते कन्नड माध्यमाकडे तात्काळ वळले आणि १९३० मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कोळलु या काव्यसंग्रहाने दक्षिण कर्नाटकाचे अग्रगण्य आधुनिक कवी म्हणुन ते पुढे आले. याच वेळी द.रा.बेंद्रे हे उत्तर कर्नाटकातील प्रमुख कवी म्हणून मान्यता पावले होते. बी.एम्.श्रीकंठय्या यांनी इंग्रजीतील स्वच्छंदतावादी कवींच्या काव्याचे भाषांतर (इंग्लिश गीतेगळू) करून सुरू केलेला स्वच्छंदतावादी संप्रदाय कुवेंपु यांनी पुढे नेला व वाढीस लावला.आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या सु.वीस काव्यसंग्रहांचे पांचजन्य (१९३३), नविलु (१९४३), कोगिले मत्तु सोव्हिएट रशिया (१९४४), प्रेमकाश्मीर (१९४६) हे संग्रह विशेष महत्त्वाचे आहेत असे म्हणता येईल. सर्वसाधारपणे निसर्ग, प्रेम, अध्यात्म, काव्य आणि सामाजिक क्रांती हे त्यांच्या काव्याचे प्रमुख विषय आहेत. संस्कृतप्रचुर व प्राचीन कन्नड शब्द वापरण्याच्या त्यांच्या हव्यासामुळे त्यांच्या एकंदर काव्यात शब्दावडंबर आढळते. मिल्टनसारख्या महान कवीप्रमाणे आपण ‘रसऋषि’ व्हावे ही त्याची प्रेरणा होती. या महत्त्वाकांक्षेतून चित्रांगदा (१९४९) व श्रीरामायणदर्शनम् (१९४९) ही दोन महाकाव्ये त्यांनी लिहिलेली आहेत. श्रीरामायणदर्शनम् या महाकाव्यारचनेसाठी ‘कुवेंपु’ यांना भारतीय ज्ञानपीठपुरस्कार मिळाला आहे. हे महाकाव्य ‘कुवेंपु’ यांच्या दहा वर्षांच्या साधनेचे फळ आहे. तेवीस हजार ओळींचे हे महाकाव्य चार संपुटांत व पन्नास सर्गांत विभागले आहे आणि ते ‘महाछंद’ नावाच्या छंदात लिहिलेले आहे. मिल्टनने वापरलेल्या ‘ब्लँक व्हर्स’ ची आठवण करून देणारा हा महाछंद कन्नड साहित्यात एक अभूतपूर्व प्रयोग ठरला आहे.श्रीरामायणदर्शनम् हे सर्व द्दष्टीने व्हर्जिल किंवा मिल्टन यांनी लिहिलेल्या महाकाव्यांप्रमाणे एक वाडमयीन महाकाव्य (लिटररी एपिक) आहे. या महाकाव्यामध्ये वैयक्तिक द्दष्टीकोनातून घडवलेले जीवनदर्शन व सर्वकालीन वैश्विक जीवनदर्शन यांचा जणू मिलाप आढळतो. त्यामध्ये मधुनमधुन आधुनिक संघर्षमय जीवनाचे दर्शन तसेच आगामी कालाचे भविष्यदर्शनही आविष्कृत झाले आहे, ‘कुवेंंपु’ यांनी रेखाटलेले श्रीरामचंद्रांचे व्यक्तिमत्त्व हे महर्षी अरविंदांच्या ‘पुरुषोत्तम’ (सुपरमॅन) संकल्पनेशी मिळतेजुळते आहे.

‘कुवेंपु’ यांची महाकाव्याची प्रेरणा त्यांनी लिहिलेल्या कानूरुसुब्बमा हेग्गडती (१९३६) आणि मलेगळल्ली मदुमगळु (१९६७) या दोन महान कादंबऱ्यांतही व्यक्त झालेली आहे. ‘मलेनाडू’ प्रदेशातील संपुर्ण वास्तव जीवनदर्शन घडविणाऱ्या या कादंबऱ्या  आहेत. कानूरुसुब्बमा हेग्गडती या कादंबरीला तिच्यातील नायकाच्या रम्य आदर्शवादामुळे काहीसे उणेपण आले आहे परंतु मलेमगळली मदुमगळु ही कादंबरी या दोषापासून मुक्त असून लेखकाने एका विशिष्ट मुक्त संवेदनशीलतेने त्या प्रदेशातील सर्व स्तरांवरील मानवी व अमानवी जीवन तीत रेखाटले आहेत. या सर्व जीवनमात्रात प्रकृती हीच प्रेरक शक्ति आहे असे जाणवते. या कादंबरीत केलेल्या व्यामिश्र आणि मुर्त जीवनाविष्कारामुळे आणि त्यातील प्रस्तुत समकालीनतेमुळे, आधुनिक समीक्षकांच्या मते, ही कादंबरी श्रीरामायनणदर्शनम्‌ पेक्षाही श्रेष्ठ आहे.

‘कुवेंपु’ यांनी अनेक नाटके, एकांकिका व संगीतिका लिहिलेल्या आहेत. त्यांपैकी जलगार (१९२८),यमनसोल (१९२८), बेरळ्गे कोरळ‌् (१९४७), शूद्रतपस्वी मत्तु बलिदान (१९४८) ह्या कृती उल्लेखनीय आहेत. त्याचे रक्ताक्षी (१९३२) हे हॅम्लेटचे स्वैर रूपांतर असुन त्यातील काव्यामुळे ते आकर्षक झाले आहे.

याखेरिज दोन कथासंग्रह, विपुल आणि दर्जदार बालवाड‌्मय, रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांची चरित्रे, अनेक निबंधसंग्रह व समीक्षणात्मक ग्रंथ यांनी लिहीलेले आहेत. त्यांची एकूण ग्रंथसंपदा साठावर आहे.

म्हैसूर विद्यापिठाचे कुलगुरु असताना त्यांनी केलेले कार्यही महत्त्वाचे आहे. या विद्यापीठातील ‘मानसगंगोत्री’ हे पदव्युत्तर अध्ययन– संशोधनाचे केंद्र हे त्यांच्या दूरदृष्टीचे आणि परिश्रमाचे प्रतीक म्हणावे लागेल. कर्नाटकातील महाविद्यालयांतून माध्यम-भाषा म्हणून कन्नडला मान्याता प्राप्त करून देण्यातही त्यांचे प्रयत्न कारणीभूत आहेत.

देसाई, शांतिनाथ