रन्न : (दहावे शतक). एक श्रेष्ठ कन्नड महाकवी. पंप, पोन्न व रन्न (संस्कृत ‘रत्न’ चा अपभ्रंश) या महाकवींना दहाव्या शतकाचे ‘रत्नत्रय’ वा ‘मणित्रय’ म्हणण्याचा कन्नड साहित्यात परिपाठ आहे. ‘कविजनांमध्ये रत्नत्रय’ असे स्वतः रन्ननेच म्हटले आहे. ही त्याची आत्मप्रौढी नव्हे, तर या तिन्ही कवींची काव्यशक्त्ती ओळखून केलेली ती मार्मिक उक्त्ती आहे. रन्न कवीचा जन्मकाळ इ. स. सु. ९४९ असून त्याचे जन्मस्थान विजापूर जिल्ह्यातील ‘मुदुवोळलु’ म्हणजे आजचे मुधोळ हे होय. धर्माने तो जैन वैश्य व जातीने ‘बळेगार’ (बांगड्या विकणारा कासार) होता. मातापिता अव्वलव्वे-जिनवल्लभ. दृढबाहू, रेचण व यारमय्य हे त्याचे थोरले बंधू. सर्वांत धाकटा रन्न यास लहानपणापासूनच लिहिण्यावाचण्याची व काव्याची आवड होती. तारुण्यात आपला गाव सोडून तो गंगराज्यात श्रवणबेळगोळ येथे जाऊन गंगराजाचा मंत्री चामुण्डराय याच्या आश्रयास राहिला. तेथे त्याने संस्कृत, प्राकृत व कन्नड भाषा-साहित्यांचे सखोल अध्ययन केले व एक श्रेष्ठ महाकवी व मोठा वैयाकरणी म्हणून लौकिक संपादन केला. गंगमंडळातील अजितसेनाचार्यांचा शिष्य बनून जैन धर्माची तत्त्वेही त्याने आत्मसात केली. त्याच्या आरंभीच्या बहुतांश कृती (परशुरामचरित, चक्रेश्वरचरित रन्नकंद नावाचा निघंटू) याच काळात (९८१ च्या सुमारास) त्याने रचल्या असाव्यात पण त्या आज तरी उपलब्ध नाहीत. पुढे काही काळाने पश्चिम (कल्याणीच्या) चालुक्य राज्याचा पुनरुत्थापक आहवमल्ल तैलप (कार. ९७३–९७) याच्या आश्रयास तो आला. तैलप याचा सेनापती नागदेव याच्या ‘दान-चिंतामणी’ उपाधी प्राप्त झालेल्या अत्तिमब्बे ह्या पत्नीच्या आज्ञेवरून रन्नाने अजिततीर्थंकरचरित किंवा अजितपुराण नावाचे धार्मिक काव्य ९९२ च्या सुमारास रचले. यामध्ये दुसरे तीर्थंकर अजितनाथ व दुसरा चक्रवर्ती सगर यांचे चरित्र वर्णिले आहे. रन्न चालुक्य राजा आहवमल्ल तैलप व त्याचा मुलगा सत्याश्रय (कार. ९९७–१००८) यांच्या आश्रयास असताना त्याने आपले शेवटचे महाकाव्य साहसभीमविजय अथवा गदायुद्ध रचले. या महाकाव्यात सत्याश्रयाला भीमसेनाच्या जागी कल्पून त्याला कथानायक केले आहे. येथे रन्नाने आदि पंपाचेच अनुकरण केले आहे. इतकेच नव्हे तर गदायुद्ध हे पंपभारताच्या तेराव्या आश्वासाधारेच त्याने रचले. असे असले, तरी

त्यामुळे त्याच्या गदायुद्धाला कमीपणा मात्र आला नाही. उलट पंपभारतामध्ये अगदी त्रोटक रूपाने असणारा गदायुद्धाचा प्रसंग रन्नाने आपल्या नाट्यानुकूल उत्तुंग प्रतिभाशक्त्तीने दहा आश्वासांपर्यंत विस्तारून अद्भुत व कलात्मक महाकाव्य रचले. रन्न हा कन्नड साहित्यात ‘शक्त्तिकवी’ म्हणून आणि त्याचे गदायुद्ध महाकाव्य ‘कृतिरत्न’ म्हणून गौरविले जाते.

पहा : गदायुद्ध.

मळगी, से. रा. (क.) कायकिणी, गौरीश (म.)