बसवराजदेवररगळे : हरिहर या वीरशैव कवीचा रगळे छंदातील प्रसिद्ध कन्नड काव्यग्रंथ. बसवेश्र्वर (११३१-६७) यांनी वीरशैव लिंगायत मतप्रचारासठी पारंपरिक ग्रांथिक पद्धतीच्या कवितांऐवजी ‘वचन’ हा सुटसुटीत आणि सहज समजणारा प्रासयुक्त गद्यप्रकार रूढ केला व पुढील वीरशैव साहित्यिकांनी तो समृद्ध केला. त्याचबरोबर तेराव्या शतकाच्या पूर्वार्धात वीरशैव कवींनी वचनांहूनही सोपा असा दुसरा एक काव्यप्रकार प्रचारात आणला होता पण या प्रकाराला साहित्यात गौरवाचे स्थान बहाल केले ते ⇨हरिहर (सु. ११८०-१२२०) या वीरशैव कवीने. त्याने या वृत्ताला ‘रगळे किंवा रघट बंध’ असे नाव ठेवले. हे वृत्त काहीसे निर्यमक रचनेसारखे आहे. हरिहराने परंपरागत वृत्ताप्रमाणेच साहित्याच्या आशय-अभिव्यक्तिविषयक रूढ संकेतांतही क्रांती घडवून आणली.

वीरशैव मताचे उत्कृष्ट मंडन झाले होते व त्याबद्दल आदरही निर्माण झाला होता. नव्या परिस्थितीचा अंदाज घेऊन त्याने वरील विषयांवर महाकाव्य, लहानसहान कविता आणि रगळेसारखे निर्यमक रचनेचे साहित्य यांची निर्मिती केली. शिव महादेव हा अनाद्यनंत असल्यामुळे आणि शिवशरण हे अमर असल्याने, त्यांचे माहात्म्य चिरंतन साहित्याचा विषय होय, असा त्याचा दृष्टिकोन होता. हरिहराच्या काव्यनिर्मितीमुळेच कन्नड भाषेतील वास्तववादी काव्य रचना मान्य व रूढ होत गेली. कथानायकांच्या बाबतीतही त्याने परंपरागत महापुरूषांऐवजी ऐतिहासिक आणि समकालीन संतसज्जनांचे चरित्रच काव्यविषय म्हणून निवडले. यामुळेच कर्नाटकातील आणि वीरशैव धर्मातील वीरपुरूषांच्या चरित्राबद्दल त्याच्या रगळे या काव्यप्रकारातून भरपूर माहिती मिळू शकते. बसवराजदेवररगळे या निर्यमक रगळे वृत्तातील काव्यात बसवेश्र्वरांचे वर्णन आहे व त्यांच्या जीवनातील प्रमुख प्रसंगांबद्दलची माहिती यात आहे. बसवेश्र्वरांना त्याने एक अनुभवी महापुरूष म्हटले आहे. हा ग्रंथ त्याने लिहिला नसात, तर बसवेश्र्वर हेही पौराणिक व्यक्तिरेखांसारखे अनैतिहासिक महापुरूष ठरले असते. हरिहराने बसवेश्र्वरांव्यतिरिक्त प्रमुख वीरशैव संत, अल्लमप्रभू, अक्कमहादेवी, नम्वियण्ण इत्यादिकांच्या चरित्रांबद्दलही शिवगणद रगळेगळु ह्या ग्रंथाची रगळे केली आहे. त्यामुळे इतिहासाच्या पार्श्र्वभूमीवर कर्नाटकाचे सामाजिक जीवन, जैन संप्रदायाचा अभ्युदय व अवनती, वीरशैव मताच्या तत्त्वांची मीमांसा इत्यादींबद्दल सुस्पष्ट कल्पना येणे सोपे होते. त्याच्या ह्या अतिशय सुलभ अशा रगळे प्रकाराच्या यशस्वितेमुळे त्यालाच स्वतःला आपण परंपरागत काव्यप्रकारांतही काही कमी निपुण नाही, हे दाखवून देणे आवश्यक वाटले आणि म्हणूनच त्याने गिरिजाकल्याण हे चंपूकाव्य पारंपरिक शैलीत लिहिले. त्याशिवाय लोकजागृतीसाठी त्याने लिहिलेली ‘शतके’ (पंपाशतक, रक्षाशतक) आणि अक्षरमाले व अष्टकेही प्रसिद्ध आहेत. कर्नाटकातील काव्यप्रवृत्तींना धक्का देणारे आणि नवीन दृष्टिकोन, साहित्यसंकेत आणि आशय यांच्याबद्दल आस्था उत्पन्न करणारे साहित्य म्हणजे रगळे आणि सर्व ‘रगळे’ मध्ये बसवराजदेवररगळे हे अत्यंत लोकप्रिय व श्रेष्ठ प्रतीचे काव्य होय. त्यात कवीने अनन्य दासभक्तीचे सरस वर्णन केलेले आहे. बसवेश्र्वरांचे जीवनचरित्र व कवीची भक्तिभावना यांचा सुरेख समन्वय यात आढळतो. या रगळे ग्रंथात एकूण २५ रगळे (अध्याय) होते पण आज त्यांपैकी फक्त सुरूवातीचे तेराच उपलब्ध आहेत. उर्वरित १२ रगळे विजयनगरचे साम्राज्य नाश पावल्यावर हंपी येथील १०१ विरक्त शिवशरणांची जी वाताहत झाली, त्यात नष्ट झाले असावेत, असा अभ्यासकांचा तर्क आहे. हरिहरानंतर कन्नडमधील भीमकवीचे बसवपुराण (१३६९) प्रचारात आले व हे हरिहररचित ‘रगळे’ मागे पडले.

दिवेकर, गु. व्यं. संकनवाडे-पाटील, शि. वा.