नागवर्मन्, दुसरा : (बारावे शतक). प्राचीन काळातील एक प्रमुख कन्नड कवी व शास्त्रीय ग्रंथकार. तो चालुक्य राजा जगदेकमल्ल (कार.११३८–५०) याच्याकडे ‘कटकोपाध्याय’ (सेनाध्यापक) म्हणून होता. प्रसिद्ध कन्नड कवी जन्न याचा गुरू म्हणूनही तो प्रसिद्ध आहे. त्याने कन्नड काव्याच्या अभ्यासासाठी आवश्यक असलेले व्याकरण, अलंकार, कोश, छंदःशास्त्र इ. विषयांवर कर्णाटक भाषाभूषण, काव्यावलोकन, अभिधान वस्तुकोश (संस्कृत-कन्नड शब्दकोश) आणि छंदोविचिति ह्या ग्रंथांची निर्मिती केली. त्याच्या ह्या लेखनात ह्या विषयांचे सखोल शास्त्रीय ज्ञान, संकलनकौशल्य, रसग्रहणशक्ती इ. गुणांचा आढळ होतो. त्याच्या काव्यावलोकन ह्या काव्यशास्त्रावरील पद्यात रचलेल्या ग्रंथाच्या आरंभीच्या ‘शब्दस्मृति’ नावाच्या व्याकरणविभागाचाच विस्तार करून केशिराजाने (सु.१२६०) शब्दमणिदर्पण हा ग्रंथ रचला. याच ग्रंथातील रसप्रकरणाचा आधार घेऊन साळव (सु. १५५०) याने आपल्या रसरत्नाकराची रचना केली. कन्नड भाषेत व्याकरणशास्त्र लिहिणारा पहिला पंडित दुसरा नागवर्मन्‌ हाच होय. संस्कृत भाषेत सूत्ररूपाने (२६९ सूत्रे) रचिलेल्या त्याच्या कर्णाटक भाषाभूषण ह्या ग्रंथास अनुसरून भट्टाकलंकदेवाने (सु.१६०४) शब्दानुशासन नावाचा बृहत्‌ व्याकरणग्रंथ रचला. अभिधान वस्तुकोश हा त्याचा ग्रंथ कन्नडमधील आद्य शब्दकोश असून तो त्याने विविध वृत्तांत लिहिला आहे. ह्या कोशास अनुसरूनच पुढे मंगराज (सु.१३९८) व देवोत्तम (सु.१६००) यांनी आपापले कोशग्रंथ रचल्याचे मानतात. त्याने एक जैन पुराणही लिहिले असावे तथापि ते उपलब्ध नाही.

मळगी, से. रा. (क.) कायकिणी, गौरीश (म.)