कारंत, कोट शिवराम : (१० जानेवारी १९०२ – ). प्रसिद्ध कन्नड कादंबरीकार, नाटककार व निबंधकार. जन्म दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील कोट या गावी. कॉलेजच्या प्रथम वर्षात शिकत असतानाच ते स्वातंत्र्य आंदोलनात पडले. दक्षिण कॅनरा जिल्ह्यातील पुत्तूर या गावी सध्या ते राहतात.

कारंतांनी आतापर्यंत सु.चौतीस कादंबऱ्या लिहिल्या आहेत. त्यांच्या कादंबऱ्यांचे विषय सामाजिक असून वास्तवता व प्रादेशिक चित्रण ही त्यांच्या कादंबऱ्यांची वैशिष्ट्ये होत. चोमन दुडि (१९३३), सरसम्मन समाधि (दुसरी आवृ.१९४८) इ.त्यांच्या सुरुवातीच्या कादंबऱ्या होत. त्यांच्या अलीकडच्या कादंबऱ्यांत जीवनाच्या काही मूलभूत समस्यांचे दर्शन घडते. अशा कांदबऱ्यांत मरळि मण्णिगे (१९४२), बेट्टद जीव (१९४३), मुगिद्‌ युद्ध (१९४८), संन्यासिय बदुकु (१९४८), करुळिन करे (१९४९), कुडियर कूसु (१९५१), अळिद मेले (१९६०), आळ निराळ (१९६२), वंटि दनि (१९६६), मूकाज्जिय कनसुगळू (१९६८), स्वप्नद होळे (१९६८) इ. उल्लेखनीय होत.

कारंतांनी अनेक नाटके व एकांकिकाही लिहिल्या आहेत. विनोद व विडंबन ह्यांद्वारे साधलेली सामाजिक टीका त्यांत आढळते. त्यांच्या नाटकांत गर्भगुडि (१९३२) व बित्तिद बेळे (१९४७) ही विशेष प्रसिद्ध आहेत. गीत नाटके (१९४६), नवीन नाटके (१९४६) इ. त्यांचे एकांकिकासंग्रह विशेष उल्लेखनीय आहेत. सोमिय भाग्य, यारोअंदरू  मुक्ताव्दार  ह्या त्यांच्या उत्कृष्ट एकांकिका असून आपल्या नाट्यलेखनात त्यांनी पद्यनाट्य, गीतनाट्य आणि छायानाट्य असे प्रयोगही केले आहेत.

अबुविंदु बरामक्के (१९५०) व अपूर्व पश्चिम (१९५४) ही त्यांची प्रवासवर्णने कन्नड साहित्यात विशेष महत्त्वपूर्ण मानली जातात. पहिल्यात भारतातील विविध प्रदेशांचे वेधक वर्णन त्यांनी केले आहे. तर दुसऱ्यात यूरोपातील जीवन व कला यांचा परिचय त्यांनी घडविला आहे. हुच्चु मनस्सिन हत्तु मुखगळु (१९४८) ही त्यांची आत्मकथा व बाळवेये बेळकु (१९४७) हा वैचारिक स्वरूपाचा ग्रंथ. कन्नड भाषेतील पहिला सर्वविषयसंग्राहक विश्वकोश एकट्यानेच तयार करण्याचा विक्रमही त्यांनी केला आहे. तो बालप्रपंच नावाने तीन खंडात प्रसिद्ध झालेला असून (१९३७) विज्ञानप्रपंच  हा विज्ञानाचा विश्वकोशही त्यांनी चार भागांत (१९५९, ६०, ६२, व ६४) रचिला आहे. त्यांच्या यक्षगान-बयलाटा  (१९५७) ह्या कृतीमुळे दक्षिण कॅनराच्या यक्षगान ह्या जानपद नाट्यप्रकाराकडे सर्व जगाचे लक्ष वेधले गेले. स्वीडनच्या कला अकादेमीने प्रस्तुत कृतीला पारितोषिकही दिले. प्रस्तुत कृती साहित्य आकदेमीने प्रकाशित केली आहे. अखिल कन्नड साहित्य संमेलनाच्या म्हैसूर अधिवेशनाचे (१९५५) कारंत अध्यक्ष होते. कर्नाटक विद्यापीठाकडून ‘डॉक्टरेट’ व भारत सरकारकडून ‘पद्मभूषण’ हे सन्मानही त्यांना लाभले. आधुनिक कन्नड साहित्यात कारंतांना वास्तववादी व मानवतावादी श्रेष्ठ कादंबरीकार म्हणून महत्त्वाचे स्थान आहे.

मळगी, से.रा.(क.) कायकिणी, गौरीश (म.)