सर्वज्ञ : ( सतरावे शतक ). कन्नड निर्गुणोपासक संतकवी. समाजसुधारक म्हणून जास्त प्रसिद्ध. ह्याच्या चरित्राविषयी तसेच त्याच्या मूळ नावाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही मात्र त्याच्या वचनांतून काही माहिती मिळते. सर्वज्ञ परमेश्वराला अनुलक्षून त्याने आपल्या पदांमध्ये ‘ सर्वज्ञ ’ हे नाव मुद्रिकेसारखे वापरले आहे. त्याच्या पदांचा समावेश असलेल्या एका हस्तलिखितावर इ. स. १६४३ असा कालनिर्देश आढळतो, त्यावरून त्याचा काळ इ. स. सु. सतरावे शतक मानला जातो. त्याच्या काही पदांमध्ये त्याच्या पित्याच्या संस्कार भट्ट या नावाचा उल्लेख आढळतो, तथापि तो जन्माने बाह्मण असल्याचे सिद्घ करण्यासाठी हा उल्लेख त्याच्या पदांमध्ये मागाहून घातला असावा, असेही एक मत आहे. तो वीरशैव पंथाचा अनुयायी होता. त्याने बालवयातच गृहत्याग करून देशाटन व तीर्थक्षेत्रांच्या यात्रा केल्या ठिकठिकाणच्या समाजस्थितीचा बारकाईने अभ्यास करून स्वत:चे एक वैशिष्टयपूर्ण तत्त्वज्ञान बनविले व अनेक पदे रचून त्यांद्वारा लोकांना उपदेश केला. लोककाव्यातील त्रिपदी ( तीन ओळींची पदरचना ) ह्या साध्या, सोप्या व अल्पाक्षरी छंदाचा समर्थपणे वापर करून त्याने सु. २,००० पदे रचली. त्यांत समाजातील गुणदोषांचे मार्मिक चित्रण आढळते. सर्वज्ञाने आपल्या त्रिपद्यांतून मूर्तिपूजा, जातिभेद, वंशाभिमान, अंधश्रद्धा, दांभिकता इ. सामाजिक दोषांवर औपरोधिक शब्दांत कडाडून हल्ले चढविले. त्याच्या मते, अंतरंगशुद्घी तेवढी खरी बाकी बाह्य रंगरंगोटी निरर्थक होय. तीर्थयात्रा, जपजाप्य यांपेक्षा मनोमय भक्तीच श्रेष्ठ, असे त्याने आवर्जून सांगितले. त्याची ही परखड पण अंतरीच्या उमाळ्याने उत्कट भाव लाभलेली पदे व वचने अत्यंत लोकप्रिय ठरली. त्रिपदी म्हणजे सर्वज्ञाचीच, असे समीकरण त्यातून रूढ झाले. त्याच्या काही त्रिपदया तत्त्वचिंतनपर आहेत तर काही सामाजिक जीवनातील दोष, वैगुण्य यांवर मुक्त भाष्य करणाऱ्या आहेत. उच्च नैतिक मूल्ये व शुद्ध आचरण यांची शिकवण त्यांत आढळते. त्यांतून त्याचे मानवतावादी तत्त्वज्ञान प्रकट होते. मानवाच्या अंतरात्म्यात वास करणाऱ्या परमेश्वराला डावलून केवळ मूर्तिप्रतिमा व मंदिरे यांचे स्तोम माजविणाऱ्या मूर्तिपूजकांचा त्याने पुढील त्रिपदीमध्ये तीव उपहास केला आहे : ‘ कल्लु कल्ल्ने ओट्टि कल्ल्निलि मनेकट्टि मनेकट्टि । कल्ल्मेलकल्ल् कोळुव मानवरेल्ल् । कल्ल्निंतहरू सर्वज्ञ’ ( भावार्थ : दगडाचे मंदिर बनवून त्यात दगडाची मूर्ती स्थापन करणारा माणूस हा स्वत:च एक दगड म्हटला पाहिजे .). सर्वज्ञाची तुलना तेलुगू साहित्यातील वेमना व तमिळ साहित्यातील तिरूवळ्ळुवर या संतकवींशी केली जाते.

इनामदार, श्री. दे.