कुमारव्यासभारत : धारवाड जिल्ह्यातील गदगजवळील कोळवाड येथे होऊन गेलेल्या कुमारव्यास या कवीने लिहिलेले हे महाकाव्य, गदगभारत  वा कर्नाटक भारत  कथा ह्या नावांनीही ओळखले जाते. कुमारव्यास या कवीविषयी निश्चित अशी माहिती प्रकाशात आलेली नाही. त्याचे नाव नारणप्पा असावे, असे मानले जाते.  कवीच्या कालाविषयी संशोधकांत मतभेद असून बाराव्या ते पंधराव्या शतकांपर्यंतच्या निरनिराळ्या कालावधींविषयी वेगवेगळी मते पुढे मांडण्यात येतात. त्यामुळे हा ग्रंथ या काळाच्या दरम्यान लिहिला गेला असावा. गदग येथील श्रीवीरनारायणाचे आपण भक्त असून त्याच्याच कृपाप्रसादाने हा ग्रंथ लिहिला आहे, असे कवीने प्रारंभीच म्हटले आहे. ग्रंथाच्या पूर्वपीठिकेत कवीने या काव्याचा भारत मंजुळमंजरि, कृष्णकथा, भारतकथा  असाही उल्लेख केला आहे.  कर्नाटकात वीरशैव साहित्याचे प्राबल्य असताना गदगच्या वीरनारायणाला आळवून वैष्णव साहित्याची मुहूर्तमेढ रोवणारा कवी कुमारव्यासच होय.

महाभारतातील अठरा पर्वांपैकी दहा पर्वांची कथा या ग्रंथात विस्ताराने आली आहे. कन्नड साहित्यात

पंप  कवीनंतर महाभारताची कथा निरूपण करणारे काव्य कुमारव्यासाकडूनच लिहिले गेले.  भामिनीषट्‌पदी या मात्रावृत्तात लिहिलेले हे काव्य सुबोध व सहज अशा कन्नडमध्ये लिहिले असून त्या वेळच्या लोकजीवनात प्रचलित असलेली भाषाच कवीने त्यात वापरली आहे. कुमारव्यासभारत हे व्यासभारताचा केवळ अनुवाद नव्हे, तर ती एक प्रतिनिर्मिती आहे. या काव्याचे वैशिष्ट्य कवीने वीर, करुण, शृंगार, रौद्र, हास्य इ. रसांचा परिपोष करताना दाखविलेल्या स्वतंत्र प्रतिभेमध्ये, उत्कट भक्तीच्या परमोत्कर्षामध्ये आणि लोकभाषेतील अर्थवाही शब्दांच्या चपखलपणे केलेल्या वापरामध्ये आहे.

कुमारव्यासाची शैली सहज, स्वतंत्र व ओजस्वी असून त्याच्या कल्पनाशक्तीची झेप व व्यक्तिचित्रणातील कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. ‘रूपक साम्राज्याचा चक्रवर्ती’ असे त्यास संबोधिले जाते, ते त्याच्या रूपकाने परिपूर्ण असलेल्या शैलीमुळेच. लोकभाषेतील वाक्प्रचारांत दडलेले रूपकांचे भांडार या कवीने आपल्या काव्यातून खुले केले. मराठी भाषेतील शब्दही त्याने त्यात वापरले आहेत. उदा., मराठीतील ‘णे’, ‘पण’ हे प्रत्यय खेळमेळ, हळूहळू, बाष्कळ, खरे इ. शब्द प्रचलित कन्नड भाषेत रुळलेल्या मराठी शब्दांची साक्ष देतात.

कुमारव्यासाचा प्रभाव मराठी साहित्यावरही पडलेला दिसतो.  मुक्तेश्वरकृत (१५७४–१६४५) महाभारताच्या सभापर्वाची प्रस्तावना कुमारव्यासाच्या भारत–प्रस्तावनेचे भाषांतरच वाटते.

चंद्रात्मज रुद्र (सु. सतरावे शतक) या मराठी कवीने, कुमारव्यासभारताचा मराठीत अनुवाद केल्याचे आढळते.  प्रास्ताविकात कवी म्हणतो :  

“मज संस्कृत नाही अभ्यास । कर्णाट कवि कुमारव्यास । 

त्याचेनि आधार ग्रंथविलास । प्रारंभियेला ।” 

कन्नड व मराठी भाषांच्या परस्पर देवाणघेवाणीचे हे एक सुंदर उदाहरण होय. कुमारव्यासाच्या प्रासादिक वाणीने आणि अलौकिक प्रतिभेने सकार झालेले हे महाकाव्य कन्नड साहित्याचे एक अमोल लेणे मानले जाते. 

वर्टी, आनंद