बसवेश्र्वर : (११३१-६७). वीरशैव धर्माचे पुनरूज्जीवन करणारी एक महान विभूती. कर्नाटक ही त्याची कर्मभूमी. धर्म, समाज, तत्त्वज्ञान, वाङ्-मय, राजकारण इ. क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य क्रांतिकारक स्वरूपाचे आहे.

बसवेश्र्वर

त्यांचा जन्म बागेवाडी (जि. विजापूर) येथे एका शैव ब्राह्मण कुळात झाला. काहींच्या मते तो इंगळेश्र्वर (जि. विजापूर) या गावी झाला असावा. त्यांच्या जन्मकाळाविषयी मतभेद असले, तरी सामान्यतः त्यांचा जन्म वैशाखातील अक्षय्य तृतीयेला झाल्याचे मानले जाते. दरसाल त्याच दिवशी बसवजयंती साजरी केली जाते. त्यांच्या आईचे नाव मादलांबिके व वडिलांचे मादिराज. लिंगायत लोक बसवेश्र्वरांना शिववाहन नंदीचा (काही वेळा स्वतः शिवाचाही) अवतार मानतात. बसव (सं. वृषभ  = बैल) या नावावरूनही हे सूचित होते. वयाच्या आठव्या वर्षी मुंजीची तयारी झाल्यावर ‘मला आधीच लिंगदीक्षा मिळाली आहे’ असे म्हणून त्यांनी मुंज करून घ्यावयाचे नाकारले आणि घर सोडून ते कूडलसंगम (जि. विजापूर) येथे निघून गेले. कूडलसंगम (कन्नड — कूडल = संगम) हे स्थान कृष्णा व मलप्रभा यांच्या संगमावर आहे. त्यांना लिंगदीक्षा कोणी दिली, याविषयी विद्वानांत मतभेद असून संगमेश्र्वर, जातवेदिमुनी इत्यादींची नावे या संदर्भात सांगितली जातात. जातवेदिमुनींनाच ईशान्य गुरू असेही म्हटलेले असून तेच कूडलसंगम या विद्याक्षेत्राचे स्थानपती होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बसवेश्र्वरांचे अध्ययन झाले, असे दिसते. अक्कनागम्मा ही त्यांची वडील बहीण. त्यांना देवराज मुनिप नावाचा थोरला भाऊ असल्याचाही उल्लेख आढळतो. कूडलसंगम येथे त्यांनी वेगवेगळ्या भाषा, धर्म, तत्त्वज्ञाने इत्यादींचा अभ्यास केला. तसेच येथे त्यांना संतसहवास मिळाल्यामुळे व त्यांनी कूडलसंगमेश्र्वराची उत्कट भक्ती केल्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व प्रगल्भ झाले. कूडलसंगम येथून ते मंगळवाड (सध्याचे मंगळवेढे,, जि. सोलापूर) येथे बिज्जल नावाच्या महामंडलेश्र्वराकडे गेले, असे, काही अभ्यासक मानतात. सांप्रदायिक पुराणांतून मात्र मंगळवाड या गावाचा निर्देश  वगळलेला  असून  ते  कल्याणसा  (सध्या बसवकल्याण, जि. बीदर) गेल्याचे म्हटले आहे. बिज्जल हा पुढे राजा बनला. बसवेश्र्वरांनी त्याच्याकडे कर्णिकाच्या (कारकुनाच्या) नोकरीपासून प्रारंभ केला व पुढे ते कोषागार-मंत्री बनले. ते बिज्जलाचे प्रधान मंत्री होते की नाही, याविषयी मतभेद आढळतात. त्यांचा मामा बलदेव हा बिज्जलाचा मंत्री होता. गंगांबिके ही बलदेवाची मुलगी व बसवेश्र्वरांची पत्नी होती. त्यांच्या दुसऱ्या पत्नीच्या नीलांबिका नावाविषयी मतभेद आढळतात. बालसंगय्य हे त्यांच्या मुलाचे नाव होते, असाही उल्लेख आढळतो. कल्याण येथे त्यांनी धर्मसुधारणेचे कार्य केले त्यांना यज्ञयागांतील पशुहत्या, वर्णभेद, वर्गभेद व जातीभेद मान्य नव्हते त्यामुळे सनातनी लोकांनी त्यांच्याविषयी बिज्जलाचे मन कलुषित केले. शेवटी बिज्जलाचे सैन्य वबसवेश्र्वरांचे अनुयायी यांच्यात झगडा सुरू झाला. तेव्हा या हिंसा-चाराला कंटाळून ते कूडलसंगम येथे गेले व त्यांनी तेथे समाधी घेतली. कूडलसंगम येथे त्यांची समाधी आहे. दरवर्षी श्रावण शु. प्रति- पदेला त्यांची पुण्यतिथी साजरी केली जाते.

बसवेश्र्वरांचा उदय होण्यापूर्वी कर्नाटकात हिंदू, जैन, बैद्ध इ. धर्म व कापालिक, कालामुख, शाक्त इ. पंथ प्रचलित होते. परंतु ही संयुक्त धर्मपरंपरा भ्रष्ट व अवनत अवस्थेतच होती. या पार्श्र्वभूमीवर बसवेश्र्वरांनी शिव हा एकमेव ईश्र्वर असल्याची घोषणा करून शिवोपासनेचा पुरस्कार केला. त्यांच्या उत्कट शिवभक्तीमुळे त्यांना भक्तिभांडारी असे नाव प्राप्त झाले. ते कूडलसंगम येथील संगमेश्र्वराचे निष्ठावंत भक्त होते. त्यांनी ज्ञान, भक्ती व कर्म यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. ‘ऊँ नमः शिवाय’ हा षडक्षरी मंत्र त्यांना अत्यंत प्रिय होता. त्यांनी दया, अहिंसा, सत्य, सदाचार, नीती, शील इत्यादींचा प्रचार केला. एकाच देवाची भक्ती करा, भूतदया बाळगा, प्रेमाने वागा, परोपकार करा अशी त्यांची शिकवण होती.


बसवेश्र्वर हे एक समर्थ योगी असल्यामुळे त्यांना ईश्र्वरी साक्षात्कार झाल्याचे व त्यांनी काही चमत्कार केल्याचेही उल्लेख आढळतात. उदा., पूर आलेला त्यांना कृष्णेने वाट करून दिली, त्यांनी बिज्जलाला गुप्त खजिना दाखविला, धान्यकणांचे रत्नांमध्ये रूपांतर केले इ. कथा सांगितल्या जातात. त्यांच्याकडे चोरी करण्यासाठी व दरोडे घालण्यासाठी आलेले लोकही त्यांचे शिष्य बनले, यावरून त्यांचा प्रभाव ध्यानात येतो.

बसवेश्र्वरांनी कल्याण येथे निर्माण केलेली शिवानुभवमंटप म्हणजेच अनुभवमंटप ही संस्था जागतिक धर्मेतिहासातील अनन्यसाधारण संस्था होय. वेगवेगळ्या जातींतील व व्यवसायांतील भक्त म्हणजेच शिवशरण येथे एकत्र जमत आणि विविध विषयांवर चर्चा करीत असत. बसवेश्र्वरांनी धर्मप्रसारासाठी संन्यास घेतला नाही, भाष्ये लिहिली नाहीत वा प्रवासही केला नाही परंतु मंटपातील चर्चेच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये जागृती केली. येथे परिसंवादाच्या स्वरूपाची जी चर्चा होत असे, तीच कन्नड साहित्यामध्ये वचनसाहित्याच्या रूपाने प्रसिद्ध झाली. या मंटपातील शून्यपीठाचे अध्यक्षपद ⇨अल्लमप्रभू (बारावे शतक) यांना देण्यात आले होते. येथे होणाऱ्या चर्चेच्या माध्यमातून बसवेश्र्वरांनी वेगवेगळ्या जातिजमातींच्या लोकांमध्ये बंधुभाव आणि विचार-स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण केली.

पारंपारिक भारतीय समाजातील वर्णजातिमूलक उच्चनीचता व विषमता यांची प्रखर जाणीव बसवेश्र्वरांना झाली होती. म्हणूनच त्यांनी चातुर्वर्ण्याला आव्हान देऊन सर्व मानवांना समान मानले. परिणामतः त्यांच्याभोवती सर्व वर्णातील व जातींतील अनुयायी जमा झाले. आंतरजातीय रोटीव्यवहार व बोटीव्यवहार करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. उदा., त्यांच्या अनुयायांमध्ये मधुवय्या नावाचा ब्राह्मण व हरळय्या नावाचा चांभार यांचा अंतर्भाव होता. त्यांनी मधुवय्याच्या मुलीचे हरळय्याच्या मुलाशी लग्न लावून दिले. त्यांनी शिवनागमय्या व ढोर कक्कय्य या अस्पृश्यांच्या घरी जाऊन भोजन केले होते. बाराव्या शतकात बसवेश्र्वरांनी सुरू केलेले हे कार्य निश्र्चित क्रांतिकारक होते.

 त्यांनी बालविवाहाला विरोध केला तसेच विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता दिली. सर्व मानव समान आहेत, याचा अर्थ स्त्री व पुरूष हेही समान आहेत, असे त्यांचे मत होते. त्यांच्या अनुभवमंटपातील चर्चेत पुरूषांच्या बरोबरीने स्त्रियाही भाग घेत.

अक्कमहादेवी (बारावे शतक), सत्यक्का, नागम्मा यांच्या उदाहरणांवरून हे स्पष्ट होते. वीरशैव धर्मात स्त्री व पुरूष या दोघांनाही लिंगदीक्षा दिली जात होती. पुरूषभक्तांप्रमाणेच स्त्रीभक्तांनीही वचनसाहित्य निर्माण केले असून त्यात तीस-चाळीस कवयित्रींची वचने आढळतात.

बसवेश्र्वरांनी स्वतःचा उपनयन-संस्कार करून घ्यावयाचे नाकारले, यावरून बालपणापासूनच त्यांचा भावहीन कर्मकांडाला विरोध असल्याचे दिसून येते. भव्य मंदिरे बांधण्यावर खर्च करू नये, तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकता नाही यांसारख्या मतांवरूनही त्यांनी कृत्रिम कर्मकांडाला विरोध केल्याचे स्पष्ट होते.

आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मठ स्थापन केले आणि तेथे योग्य व्यक्तींची नियुक्ती केली. काश्मीरपासून केरळपर्यंतच्या, राजापासून रंकापर्यंतच्या आणि ब्राह्मणापासून अस्पृश्यापर्यतच्या अनुयायांचे एक मोहोळच त्यांच्याभोवती जमले होते, यावरून त्यांच्या समर्थ संघटनशक्तीची कल्पना येऊ शकते.

शारीरिक श्रम वा व्यवसाय हाच स्वर्ग (कैलास) आहे, अशी घोषणा  करणारा ‘कायकवे  कैलास’ हा  बसवेश्र्वरांनी  मांडलेला  एक  महान  सिद्धांत  आहे.  कोणत्याही  प्रकारचे  शारीरिक  श्रम  हे हीन दर्जाचे नाहीत, असे  सांगून त्यांनी श्रमप्रतिष्ठा वाढविली. प्रत्येक व्यक्तीने आपल्या श्रमावरच आपली उपजीविका चालवावी या बाबतीत जंगमांचाही अपवाद करू नये, असे त्यांनी आग्रहपूर्वक सांगितल्यामुळे त्यांच्या तत्त्वज्ञानात भिक्षावृत्तीला वाव राहिला नाही. परंतु त्यांनी कायक हे केवळ पैशासाठी सांगितलेले नाही. तसेच ते कर्मसिद्धांतावर आधारलेले नसून त्यात व्यक्तीला व्यवसायस्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. मोक्षासाठी अरण्यात पलायन करण्याची गरज नाही, असे हा सिद्धांत मानतो. श्रमप्रतिष्ठेबरोबरच गरजेनुसार संपत्तीची विभागणी करावी, ही विचारसरणी मांडल्यामुळे  बसवेश्र्वरांची  वृत्ती  समाजवादी  होती, असे  काही अभ्यासक मानतात.  बसवेश्र्वरांच्या  उपदेशामुळे  वेगवेगळ्या  व्यवसायांना, विशेषतः  ग्रामोद्योगांना, प्रोत्साहन  मिळाले आणि सर्व व्यावसायिकांमध्ये समभाव निर्माण झाला. उदा., त्यांच्या अनुभवमंटपात वेगवेगळ्या जातींचे संत जमत असत. ब्राह्मण मधुवय्या, चांभार हरवळ्या, ढोर कक्कय्य, नावाडी चौंड्या, सुतार बसप्पा, मांग चन्नया, न्हावी आप्पाण्णा, रणशिंगधारी ढक्कद वोमण्णा, सोनार किन्नरी ब्रह्मय्या, गुराखी रामण्णा, दोरखंड करणारा चंद्या, पारधी संगय्या इत्यादींचा त्या संतांमध्ये अंतर्भाव होतो.


बसवेश्र्वरांची समाधी, कूडलसंगम (जि. विजापूर).

आपले विचार सर्वसामान्य लोकांपर्यत पोहोचावेत म्हणून त्यांनी संस्कृतऐवजी कन्नड भाषेतून आपला उपदेश केला. त्यासाठी त्यांनी आधीच प्रचलित असलेल्या वचननामक साहित्यप्रकाराचा अवलंब केला. शैलीदार, प्रभावी व अंतःकरणाला भिडणारा असा हा साहित्यप्रकार असल्यामुळे त्याला वचनभेद, वचनशास्त्र इ. नावे प्राप्त झाली आहेत. कन्नड साहित्याच्या क्षेत्रात बसवेश्र्वरांचे योगदान म्हणूनच अंत्यत महत्त्वाचे ठरले. बसवेश्र्वरांच्या पट्स्थलवचन, कालज्ञान, मंत्रगौप्य, शिखारत्नवचन या ग्रंथांना श्रेष्ठ धर्मग्रंथांचे अमरत्व कन्नडमध्ये प्राप्त झालेले आहे.

कांचीचे शंकराराध्य (अठरावे शतक) यांनी संस्कृतमध्ये बसवपुराण नवाचा ग्रंथ लिहिला आहे. महाभारतकार व्यासांच्या नावावर असलेला परंतु चौदाव्या शतकानंतर दुसऱ्याच कोणी तरी लिहिलेला बसवपुराण नावाचा आणखी एक संस्कृत ग्रंथ आढळतो. हा ग्रंथ करिबसवशास्त्री यांनी लिहिला असे म्हणतात. तमिळमध्ये बसवपुराण (सु. सतरावे शतक), प्रमुलिंग लीले (मराठी अनु. कविब्रह्मदासकृत लीलाविश्र्वंयभर) आणि बसवपुराणपट्कम अशा तीन ग्रंथांतून बसवेश्र्वरांचे चरित्र आढळते. ⇨हरिहर (सु. ११८०-१२२०) नावाच्या कवीने कन्नडमध्ये ⇨बसवराजदेवररगळे या नावाने त्यांचे चरित्र लिहिले आहे. तसेच ⇨पाल्कुरिकी सोमनाथ (बसवेश्र्वरांना समकालीन) यांनी तेलुगूमध्ये बसवपुराण लिहिले असून भीमकवी यांनी त्याचे कन्नडमध्ये भाषांतर केले आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी इ. भाषातूनही बसवेश्र्वरांची चरित्रे लिहिण्यात आली आहेत. बसवेश्र्वर जयंतीच्या दिलशी बसव वागेवाडी व कूडलसंगम, बसवकल्याण, उळवी (जि. कारवार) इ. ठिकाणी यात्रा भरतात. बसवेश्र्वरांच्या नावांनी चालणारी ग्रंथालये, शिक्षणसंस्था, बँका, प्रकाशने इत्यादींच्या रूपाने त्यांची अनेक स्मारके करण्यात आली आहेत.

भारतातील मध्ययुगीन धार्मिक प्रबोधनाच्या चळवळीत बसवेश्र्वरांचे कार्य अधिक क्रांतिकारक स्वरूपाचे होते व त्यामागे एक अलौकिक द्रष्टेपणा होता, हे सर्वमान्य होण्यासारखे आहे.

पहा : वीरशैव पंथ.

संदर्भ:    १. Hardekar, Manjappa : Trans, Mailara Rao. A. Basava : The Dimension of Universal Man, Dharwar, 1966.

            २. Jatti, B. D. : Trans. Sundarraj Theodore, A. &amp Hakari, Devendra Kumar,Thus Spoke Basava, Bangalore, 1966.

            ३. Wodeyar, S. S. Ed. Sri Basavesvara : Eighth Centenary Commemoration Volume, Government of Mysore, Bangalore, 1967.

            ४. अरळी, श्रीकांत, लिंगतत्त्वदर्पण और बसव, कोल्हापूर, १९६६. 

            ५. कोठावळे, कुमार घोंडो गंगाधर, महात्मा बसवेश्र्वर, बेळगाव१९६६.

            ६. बसवण्णा मराठी अनु. लिगाडे, जयदेवीताई, बसव- दर्शन, सोलापूर, १९५४.

            ७. मोगलेवार, सुधाककर, मराठी ओवीबद्ध बसवपुराण, नागपूर, १९७५.

            ८. सार्दळ, शं. धों. संपा. कवि ब्रह्मदासकृत लीलाविश्र्वंभर, बेळगाव, १९६४.

 

पाटील, म. पु. संकनवाडे-पाटील, शि. वा.