झ्यूस : ग्रीक देवतासमूहातील सर्वश्रेष्ठ देव. रोमन देवतासमूहात तो ⇨ज्यूपिटर म्हणून ओळखला जाई. मुळात तो हवामानाचा व आकाशाचा एक इंडोयूरोपियन देव होता. वैदिक ‘द्यावा-पृथिवी’ ह्या देवतायुग्मातील ‘द्यौ’ शी त्याचे साम्य आढळते. वेदांत ‘द्यौ’ चा एकेरी उल्लेख कोणाचा तरी पिता म्हणूनच येतो. द्यावा पृथिवी म्हणजे आकाश व पृथ्वी वा पिता व माता. भव्यता, विशालता व प्रकाशाचे प्रतीक म्हणून वेदांत त्यांचा निर्देश आहे. हिब्रूंच्या जेहोवा किंवा येहोवाशीची त्याचे बरेच साम्य असल्याचे काही अभ्यासक मानतात.

झ्यूस

ग्रीक पुराणकथेत दैदीप्यमान आकाशाचा देव म्हणून झ्यूसचे सूर्य, चंद्र, तारे, ग्रह, मेघ यांवर नियंत्रण असल्याचे म्हटले आहे. सर्व देवांचा व मानवांचा स्वामी आणि संरक्षक देव म्हणून त्याला ‘पिता’ म्हटले आहे. एका क्रीटन मिथ्यकथेनुसार टायटन्सचा राजा क्रोनस याला असे भविष्य कळले, की त्याला होणाऱ्या मुलाकडून त्याचे राज्य हिरावून घेतले जाणार आहे. म्हणून क्रोनसचे त्याची पत्नी रीया हिला होणारे प्रत्येक मूल जन्मतःच गिळून टाकण्याचा उपक्रम सुरू केला तथापि रीयाने तिलू झ्यूस होताच त्याला एका गुहेत लपवून ठेवले आणि त्याच्याऐवजी एक दगड कापडात गुंडाळून मूल म्हणून ठेवला. झ्यूसचे गुहेत पऱ्यांनी व देवदूतांनी संगोपन केले. झ्यूस तरुण झाल्यावर त्याने टायटन्सविरुद्ध उठाव करून क्रोनसचा पराभव केला आणि त्याचे राज्य आपल्या हेडीझ व पोसायडन ह्या दोन भावांत वाटून दिले. हेडीझला त्याने पृथ्वीचा व पोसायडनला सागराचा राजा बनविले. स्वतः झ्यूस मात्र स्वर्गाचा, आकाशाचा, सर्व देवांचा व मानवांचा स्वामी झाला. ही क्रीटन कथा पुढे ग्रीकांनीही स्वीकारली.

स्वर्गाचा सार्वभौम सम्राट म्हणून झ्यूसने देवांचे नेतृत्व करून राक्षसांचा पाडाव केला व स्वतःच्या विरोधात झालेले अनेक उठाव मोडून काढले. ग्रीसमधील सर्वोच्च अशा ऑलिंपस पर्वतावरच स्वर्ग असल्याचा व तेथेच हवामानाच्या देवतेचे म्हणजे झ्यूसचे निवासस्थान असल्याचा उल्लेख होमरने केला आहे.

ग्रीक पुराणकथेत झ्यूस हा क्रोनस व रीया यांचा सर्वांत धाकटा पुत्र म्हणून निर्देश आहे तथापि होमरने मात्र तो सर्व देवांचा व मानवांचा वयोवृद्ध पिता म्हणून त्याचा उल्लेख आपल्या साहित्यात केला आहे. ‘झ्यूस’ ह्या शब्दाचा अर्थच ‘स्वर्गीय दिव्य प्रकाश’ असा होतो. प्रकाशाचा जनक, आकाशाचा देव तसेच सर्व देवांत शहाणा, शक्तीमान व श्रेष्ठ देव म्हणून त्याचे वारंवार उल्लेख आलेले आहेत.

ग्रीक पुराणकथेत झ्यूसच्या सर्वश्रेष्ठतेसोबतच त्याचे कामुक व विलासी जीवनही वर्णिले आहे. झ्यूसच्या ह्या कामुक व लंपट वृत्तीमुळे त्याचे व त्याची पत्नी हेरा (स्वर्गाची सम्राज्ञी, झ्यूसची बहीण व पत्नी) हिच्याशी नेहमी खटके उडत. त्याचे अनेक स्त्रियांशी असलेले प्रेमसंबंध पुराणकथांत वर्णिलेले आहेत. ह्या सर्वच कथांना आकाश व पृथ्वी यांच्या मीलनाचा वा पवित्र विवाहविधीचा व्यापक व प्रतीकात्मक अर्थ असावा पण तो नंतर नष्ट झाला, असे अभ्यासक मानतात. आपली कामवासना तृप्त करून घेण्यासाठी तो विविध रूपे धारण करतो. हेरावर बलात्कार करताना त्याने कोकिळेचे रूप घेतले, तर यूरोपाला पळवून नेताना त्याने बलाचे रूप घेतले आणि तिचा उपभोग घेतला. त्याला विविध स्त्रियांपासून अनेक मुले झाली. लीटोपासून अपोलो व आर्टेमिस स्पार्टाच्या लीडापासून हेलेन व डायोस्कूराय डीमीटरपासून पर्सेफोन मीटिसला खाऊन टाकल्यावर अथीना हेरापासून हीपास्टस, हीबी, आरीझ व ईलायथिया प्लाइड मायपासून हर्मीझ सेमलीपासून ⇨ डायोनायसस  इ. अनेक मुले झ्यूसला झाली.

प्राचीन काळात क्रीटन लोक झ्यूसची उपासना शेते चांगली पिकविणारा देव म्हणून करीत. तो त्यांचा सुफलतादेव होता आणि त्याच्या विषयीचा आदरभाव व्यक्त करण्यासाठी ते दर वर्षी त्याचा जन्मोत्सव नृत्य करून साजरा करीत.

झ्यूसच्या अंगी असलेल्या अनेक गुणांसाठी व विविध शक्तींसाठी त्याची प्राचीन ग्रीसमध्ये उपासना होत होती. निसर्गातील वादळे, गडगडाट, विद्युत्‌पात, पर्जन्य, निरभ्र, आकाश, शीतल वारा इ. बदल त्याच्याच इच्छेने घडून येतात. ऑलिंपस पर्वत त्याचे निवासस्थान मानले जाई. ग्रीसमध्ये तो ‘ऑलिंपियन झ्यूस’ म्हणून पूजिला जाई व त्याच्या बाबतचा पूज्यभाव व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय उत्सव साजरा होई. ह्या उत्सवात दर वर्षांनी ऑलिंपिक सामने भरविले जात. निसर्गशक्तींच्या स्वरूपात त्याची ॲटिका येथे उपासना होई आणि अत्यंत कोपिष्ट तसाच कृपाळू देव म्हणून त्याला संतुष्ट केले जाई. जगच्चालक देव म्हणून सर्वशक्तिमान, सर्वसाक्षी व सर्वज्ञ असे त्याचे स्वरूप होते. जगताचे जीवनचक्र तसेच निसर्गक्रमावर त्याचे नियंत्रण असे. केवळ भूत व वर्तमानच नव्हे, तर भविष्याचेही त्याला ज्ञान होते.

दाढी व सुंदर केस असलेली त्याची अनेक सुरेख शिल्पे इ. स. पू. सातव्या शतकापासून आढळतात. ऑलिव्ह वृक्षाच्या पानांनी केस सुशोभित केलेली त्याची उभी व बसलेली शिल्पेही आढळतात. दैवी, प्रतिष्ठित, शांत व कृपाळू भाव त्याच्या चेहऱ्यावर असून हातात वज्र वा ‘एजिस’ हे ढालीसारखे शस्त्र आहे. गरुड पक्षी व ओक वृक्षाशी त्याचे साहचर्य असून ती त्याला प्रिय म्हणून पवित्र मानली जात.

संदर्भ : Cook, A. B. Zeus : A Study in Ancient Religion, 3 Vols., Cambridge, 1914–40.

सुर्वे, भा. ग.