कॅल्व्हिन, जॉन:(१० जुलै १५०९ – २७ मे १५६४).  ल्यूथरप्रणीत विचारसरणीचा एक फ्रेंच धर्मशास्त्रवेत्ता व धर्मसुधारक. त्याचे धर्मशास्त्र `कॅल्व्हिनवाद’ म्हणून ओळखले जाते.  त्याचा जन्म फ्रान्समधील न्वायाँ, पिकर्दी येथे झाला. सुरुवातीस त्याने धार्मिक शिक्षण घेतले.  १५२८ मध्ये तो एम्‌. ए. झाला.  नंतर ऑर्लेआं येथे कायद्याचा अभ्यास करीत असता तो ⇨ प्रॉटेस्टंट पंथाच्या विचारांकडे आकृष्ट झाला. कायद्यात पीएच्‌. डी. घेऊन तो पॅरिसला परत आला.  तथापि तेथे वकिली न करता तो भाषा-साहित्याचे अध्यापनलेखन करू लागला. १५३२ मध्ये त्याने सेनीका (इ. स. पू. सु. ५४ — इ. स. ३९) याच्या De clementia हया ग्रंथावर उत्कृष्ट लॅटिन टीका लिहून प्रसिद्ध केली.

मार्टिन ल्यूथर (१४८३ —१५४६) याने ख्रिस्ती धर्मात जी सुधारणावादी क्रांती घडवून आणली, तिची पूर्ती बऱ्याच अंशी कॅल्व्हिनने केली.  पॅरिस येथे असताना १५३३ मध्ये त्याने आपली खळबळजनक विचारप्रणाली मोठ्या‌ आवेशाने प्रतिपादन केली.  त्यामुळे राेषास कारण होऊन त्याला पॅरिस सोडून स्वित्झर्लंडमध्ये जावे लागले. प्रथम तो बाझेल येथे गेला.  १५३६ मध्ये त्याने बाझेल येथून आपला Institutioreligionis Christianae (इं. भा. इन्स्टिट्यूट्‌स ऑफ द क्रिश्र्चन रिलिजन) हा महत्त्वपूर्ण लॅटिन ग्रंथ प्रसिद्ध केला.  या ग्रंथातच त्याचे धर्मशास्त्र प्रामुख्याने आलेले आहे.  नंतर तो जिनीव्हा येथे गेला. तेथे जी. फारेल (१४८९—१५६५) नावाचा धर्मसुधारक पोपविरुद्ध प्रभावी प्रचार करीत होता.  कॅल्व्हिनने त्याच्याशी संपर्क साधून आपल्या बुद्धिमत्तेच्या व संघटनाचातुर्याच्या जोरावर तेथे प्रचंड धर्मजागृती घडवून आणली व अखेरपर्यंत तिचे नेतृत्व स्वतःकडे ठेवले.  चर्चच्या कारभारातील सुधारणा आणि जिनीव्हा शहराचा कायापालट करण्यात कॅल्व्हिनचा वाटा फार मोठा होता.

रोमन कॅथलिक पंथातील पोपचे सर्वोच्च स्थान व त्याची प्रमादरहितता तसेच प्रॉटेस्टंट पंथातील बायबलचे सर्वोच्च स्थान व प्रमादरहितता ह्या दोहोंनाही कॅल्व्हिनने विरोध करून, परमेश्र्वराला मानवाच्या धार्मिक जीवनात केंद्रस्थानी मानले आणि परमेश्र्वराचीच सत्ता सर्वंकष मानणारे धर्मशास्त्र प्रतिपादिले.  तो स्वतः गाढा विद्वान, शिक्षणतज्ञ व कायदेपंडित होता.  त्याने जिनीव्हाच्या नागरिक जीवनाला चांगले वळण लावून जिनीव्हा हे प्रॉटेस्टंट पंथाचे एक महत्त्वाचे केंद्र बनविले.

धर्मसुधारक म्हणून त्याची योग्यता ⇨ मार्टिन ल्यूथर याच्या खालोखाल मानली जाते.  चर्चसंघटनेबाबत त्याने प्रस्थापित केलेली पद्धती स्वित्झर्लंड, स्कॉटलंड इ. देशांत आजही प्रचलित आहे.  धर्मसुधारणेच्या काळातील तो एक श्रेष्ठ धर्मशास्त्रवेत्ता व प्रभावी विचारवंत मानला जातो.  जिनीव्हा येथे त्याचे निधन झाले.

संदर्भ : Duffield, G. E. Ed. John Calvin, London, 1966.

आयरन, जे. डब्ल्यू. साळवी, प्रमिला