विठ्ठलभक्त वारकऱ्‍यांची दिंडी

दिंडी : पालखीच्या बरोबर एका अधिकारी संत व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चालणारा वा राहणारा वारकऱ्‍यांचा समूह.  संतांची किंवा दिंडी काढणाऱ्‍यांची नावे दिंड्यांना असतात.  दिंडी शब्दाचा ‘वीणा’ वा ‘वीणेसारखे एक वाद्य’ असाही एक अर्थ आहे. आषाढी एकादशीस महाराष्ट्रातून निरनिराळ्या संतांच्या व देवांच्या पालख्या पंढरपुरास पांडुरंगाच्या भेटीकरिता जात असतात.  ठराविक वेळी देवाच्या भेटीस जाणे याला ‘वारी’ म्हणतात. यावरून दिंडीतील लोकांना वारकरी असे म्हणतात. पालख्यांच्या बरोबर ठरलेल्या क्रमाप्रमाणे दिंड्या एकामागे एक चालत असतात. दिंडीमध्ये स्त्रिया व मुलेही असतात. तसेच सर्वांच्या हातांत भगव्या पताका असतात.  दिंडीत चालताना वारकरी टाळ, मृदंग वाजवीत, भजन करीत आणिप्रसंगी नाचतही जात असतात. या नाचाला दिंडीनृत्य असे म्हणतात. या भजनात संतांचे अभंग किंवा गौळणी गातात. हातात वीणा घेतलेला मनुष्य दिंडीचा सर्वाधिकारी असतो. नवीन दिंडी काढताना पालखीच्या अधिकाऱ्याची मान्यता घ्यावी लागते. ‘दिंडी’ शब्दाचा अर्थ लहानसा दरवाजा असाही आहे त्यामुळे दिंडीत राहून भजन करीत जाणाऱ्‍यांकरिता स्वर्गातील दिंडी दरवाजा उघडतो, अशी समजूत आहे.  मोरगावच्या गणपतीसारख्या इतर देवांना भेटायला जाण्यासाठीही दिंडी घेऊन जाण्याची पद्धत आहे.

जोशी, रंगनाथशास्त्री