ज्यू धर्म : (यहुदी धर्म).ज्यू धर्माच्याइतिहासाचे महत्त्वाचे साधन म्हणजेबायबलमधील ‘जुना करार’. या कराराच्या ऐतिहासिक काळात जेव्हा आपण पदार्पण करतो, तेव्हा मध्यपूर्वेत दोन राष्ट्रे अस्तित्वात असलेली आढळतात. एक इझ्राएलचे व दुसरे ज्यूडाचे. इझ्राएलचा राजा एहॅब याच्या विषयीचा उल्लेख इ.स. पू. ८५३ मध्ये आढळतो. ॲसिरियन लोकांनी हे इझ्राएल राष्ट्र इ. स. पू. ७२२ मध्ये जिंकले. यानंतर राहिले ते केवळ ज्यूडाचे राज्य. ज्यू लोकांच्या धर्माला ‘जूडाइझम’ असे नाव मिळण्याचे कारण ‘ज्यूडीया’ या प्रदेशात राहणाऱ्या  ज्यूडा लोकांचा धर्म, या विशिष्ट अर्थाने हा शब्द त्या काळी वापरला गेला. कालांतराने त्याला व्यापक असा ज्यू जमातीचा धर्म हा अर्थ प्राप्त झाला. १९४७ च्या अंदाजानुसार ज्यू धर्माच्या अनुयायांची  एकूण जागतिक संख्या १,४३,८६,५४० होती. इझ्राएलमधील ज्यूंची संख्या १९६९ मध्ये २४,५२,००० होती.

मूळ ज्यू धर्माविषयीचे जे उल्लेख आढळतात त्यांवरून या धर्मातील देव ⇨ येहोवा (जेहोवा) हा एक विशिष्ट जमातीचा देव होता. त्या काळात हा धर्म इतर देवही मानत असावा परंतु या जमातीत इ. स. पू. ५३० नंतर जे द्रष्टे जन्मले, त्यांनी या धर्मातील अनेकेश्वरता नाहीशी करून एकेश्वरवाद-येहोवा हाच एकमेव ईश्वर स्थापण्याचा अटोकाट प्रयत्न केला. जेरीमाइआ (इ. स.पू. सु. ६५०–५८५ ) व ईझीक्येल (इ. स. पू. सहावे शतक) या हिब्रू प्रेषितांचे प्रयत्न या बाबतीत उल्लेखनीय आहेत. अनेकेश्वरवादाचा आणि मूर्तिपूजेचा जेवढा धिक्कार करता येईल, तितका या प्रेषितांनी केला. ज्यूदेखील एके काळी मूर्तिपूजक असावेत, असे ईझीक्येलच्या लेखनावरून दिसते.

दुसरा नेबुकॅड्‌नेझर (? – इ. स. पू. ५६२) या बॅबिलोनियन राजाने इ. स. पू. ५८६ मध्ये जेरूसलेमवर हल्ला करून ज्यूंचे प्रार्थनामंदिर उद्‌ध्वस्त केले. तेव्हापासून ज्यूंच्या धर्माचे बाह्यांग बरेच बदलले असावे, असा इतिहासकारांचा अंदाज आहे. एके काळी ज्यू या प्रार्थनामंदिरात यज्ञ, होम वगैरे करीत परंतु मंदिर नष्ट झाल्यामुळे ते बंद पडले. तशात बॅबिलोनियन व नंतर पर्शियन जेत्यांच्या अंमलाखाली जेव्हा ज्यूंना रहावे लागले, त्या काळात त्यांच्या धर्मविधींना गुप्त स्वरूप आले. मंदिर जाऊन त्याऐवजी ⇨सिनॅगॉग  आले साऱ्या समाजाने एकत्र येण्याचा दिवस म्हणून ⇨शब्बाथचे महत्त्व वाढले इतर जमातींशी सामोपचाराने राहता यावे म्हणून सुंता करण्याची प्रथा अंमलात आली व डुकराचे मांस निषिद्ध मानण्यात आले.

ज्यू धर्म हा ख्रिस्ती किंवा इस्लाम धर्माप्रमाणे एका विशिष्ट धर्मप्रेषिताच्या शिकवणुकीवर आधारलेला नाही. काही अंशी हिंदू धर्माप्रमाणे आपल्या अनेक प्राचीन प्रेषितांची शिकवण वा उपदेश हेच त्यांचे आद्य धार्मिक साहित्य होते. बायबलमधील ‘जुन्या करारा’मध्ये त्यांना आपल्या जमातीचा इतिहास, आपले द्रष्टे प्रेषित व त्यांच्या आज्ञा या सर्वांचे एकीकरण करता आले व तेच त्यांचे ‘पवित्र पुस्तक’ ठरले. त्यांच्या द्रष्ट्यांना ईश्वरी साक्षात्कार होत असे व अशाच एका साक्षात्कारात पॅलेस्टाइनमधील सिनाई पर्वतावर ईश्वराने मोझेसला जे दहा नीतिनियम (धर्माज्ञा) सांगितले ते त्यांच्या धर्माचे मूळ नीतिशास्त्र ठरले. कोणीही द्रष्टा बनण्याचा नंतर प्रयत्न केलेला आढळत नाही आणि द्रष्ट्यांना जे काही स्फुरले, ती सारी नैतिक तत्त्वे. जिथे त्यांनी भविष्यवाणी केली आहे, ती केवळ त्या नीतितत्त्वांच्या अनुषंगाने.

ज्यू धर्म कित्येक शतके एका राष्ट्रहीन जमातीचा धर्म म्हणून टिकला त्यामुळे त्याच्यात एक प्रकारचा नैतिक चिवटपणा जसा आढळतो, तसे त्यात स्वतःचे स्वत्व टिकविण्यासाठी वाढविलेल्या आधारनियमांचे प्राबल्यही फार आढळते. ज्यूंमध्ये साधू वा संन्यासी नाहीत. त्या धर्माची सारी जबाबदारी सामान्य गृहस्थाश्रमी लोकांवर असल्याने व घर हेच मंदिर बनल्यामुळे ज्यूंचा दिवस उजाडतो तो सकाळच्या प्रार्थनेने. या प्रार्थनेत ते मध्ययुगीन काळापासून प्रचलित असलेली धर्मगीते म्हणतात. शनिवार हा त्यांचा पवित्र दिवस म्हणजे शब्बाथ म्हणून मानला जातो. त्या दिवशी धर्मनियमांचे वाचन, सकाळच्या चार प्रार्थना व संध्याकाळच्या दोन प्रार्थना

(किद्‌दूश व मारिब) असता. यांशिवाय ज्यूंचे सात महत्त्वाचे सण आहेत. यांत पेसाह, शाबुओथ व सुक्कोथ हे सण प्रसिद्ध आहेत. ज्यूंचे उपवासाचे दिवस दोन प्रकारचे आहेत. कुठल्यातरी महत्त्वाच्या अथवा दुःखदायी प्रसंगाची आठवण म्हणून केलेला उपवास व नव्या वर्षाच्या पहिल्या दहा दिवसांचा उपवास. नव्या वर्षाचा दहावा दिवस प्रायश्चित्ताचा दिवस मानला जातो व त्या दिवशी  साऱ्या ज्यूंना प्रार्थना करावी लागते. ज्यूंच्या या विधीचे व प्रार्थनांचे ख्रिस्ती धर्मातील अँग्‍लिकन पंथाशी बरेच साम्य आहे. ज्यूंचा किद्‌दूश व अँग्‍लिकनांचा  ⇨ युखॅरिस्ट  जवळजवळ सारखेच आहे.

ज्यू धर्माचा उगम ⇨अब्राहमपासून झाल्याचे बायबलच्या जुन्या करारात म्हटले आहे. न्यायी, नीतिमान, सृष्टीकर्ता, शास्ता, नित्य अशा एकमेव ईश्वराची ओळख अब्राहमला चिंतनाने व साक्षात्काराने पटल्याचा निर्देश बायबलमध्ये (जेनिसिस १८·१९) आहे. अब्राहमने ज्यू धर्म स्थापिला तसेच अब्राहम ही एक ऐतिहासिक व्यक्ती होती, असे अलीकडे मरी येथे झालेल्या उत्खननावरून सिद्ध झाले आहे. अब्राहमचे जन्मस्थान अर असल्याचेही सांगितले जाते. अर हे त्या वेळी चंद्रोपासनेचे एक महत्त्वाचे केंद्र होते. अब्राहम अर सोडून पश्चिमेकडील केनन प्रदेशात इ.स.पू. विसाव्या शतकाच्या अखेरीस गेल्याचे बिब्‍लिकल कालगणनेवरून अभ्यासक मानतात.

ज्यू धर्मातील अतिशायी-नैतिक एकेश्वरवादाचा पाया अब्राहमने घातला. त्याने तत्कालीन इतर देवदेवतांचे अस्तित्व औपचारिकपणे नाकारले होते किंवा नाही, हा प्रश्न या संदर्भात फारसा महत्त्वाचा नाही. धर्माच्या दृष्टीने त्यातील एकच बाब विशेष महत्त्वाची आहे व ती म्हणजे अब्राहमच्या उपासनेतील एकमेव ईश्वर हा ‘पर्वतावरील देव’, अशा अर्थाच्या नावाने ओळखला जाई आणि तो कुठलाही प्रादेशिक देव नव्हता अथवा नैसर्गिक घटनेने बद्ध असा देव नव्हता. उलट तो एकमेव निर्माता, ज्याचे अस्तित्व केवल व वैश्विक स्वरूपाचे होते आणि जो न्यायी व नीतिमान असा देव होता. ह्यावरून इतर देवदेवतांचे अथवा दैत्यांचे अस्तित्व त्या काळी मानले जात असले, तरी त्यांची दखल अब्राहमला घेण्याची गरज वाटली नाही हेच स्पष्ट होते.

ज्यू एकेश्वरवादाचे आदर्श अब्राहमपासून आयझाक, याकोब (जॅकोब), ⇨मोझेस  यांच्यापर्यंत वेळोवेळी संक्रांत होत आले. सिनाई पर्वतावर मोझेसला दहा धर्माज्ञा प्रत्यक्ष येहोवाकडूनच प्राप्त झाल्याचे बायबलमध्ये (एक्सोडस– २०) म्हटले आहे. ज्यू धर्माच्या लोकांना मार्गदर्शन व्हावे म्हणून येहोवाने मोझेसला सांगितलेल्या दहा धर्माज्ञा अशा : (१) तू माझ्याशिवाय इतर कोणतेही देव मानू नये. (२) कुठल्याही देवमूर्ती तू तयार करू नये. (३) तू उगीच ईश्वराचे नाव उच्चारू नये. (४) पावित्र्य टिकावे म्हणून शब्बाथच्या दिवसाचे स्मरण करावे. (५) आई-वडिलांचा मान राखावा. (६) कोणाचीही हत्या करू नये. (७) व्यभिचार करू नये. (८) चोरी करू नये. (९) शेजाऱ्याविरुद्ध खोटी साक्ष देऊ नये. (१०) शेजाऱ्याच्या घराची, पत्नीची, सेवक-सेविकेची, बैलाची, गाढवाचीं अभिलाषा धरू नये. ह्या दहा आज्ञांतून ज्यूंच्या सामाजिक व नैतिक आचरणाचे नियम सांगितले आहेत.


ज्यू धर्माचा इतिहास सु. ४००० वर्षांचा आहे. या प्रदीर्घ काळात त्यांची अनेक स्थित्यंतरे झाली आहेत. या विशिष्ट स्थित्यंतरांतील ज्यू धर्माचे अंतर्गत स्वरूप जरी कायम राहिले, तरी त्यांचे बाह्यांग बरेच बदलले. अगदी सुरुवातीच्या अब्राहम, मोझेससारख्या द्रष्ट्यांना स्फुरलेला ज्यू धर्म नंतरच्या बंदिकाळातल्या, म्हणजे ज्यू लोक ईजिप्तमध्ये दास्यात होते त्या काळातल्या, ज्यू धर्मापेक्षा वेगळा होता तसेच राब्बींनी रचलेला ज्यू धर्म ग्रीक संस्कृतीत वाढलेल्या ज्यू धर्मापेक्षा वेगळा होता. मध्ययुगीन काळाच्या पूर्वीच ज्यू जमात साऱ्या यूरोपभर पसरली. त्यामुळे त्या धर्मावर त्या त्या राष्ट्रातील त्या त्या वेळच्या संस्कृतीचे ठसे उमटले. अरबांच्या तत्त्वज्ञानाच्या भूमीत रुजलेल्या ज्यू धर्म व फ्रान्स-जर्मनीतील मध्ययुगीन गूढवादाने प्रभावित झालेला ज्यू धर्म हे वेगळे वाटतात. आधुनिक काळातील ज्यू धर्मात पूर्वीची जीर्ण, मध्ययुगीन तत्त्वप्रणाली गळून पडली आहे आणि आधुनिक काळाला साजेसे नवे रूप त्याने धारण केले आहे. इतिहासकारांपुढे जेव्हा ज्यू धर्माचे हे असले बदलते स्वरूप प्रवाही उभे राहते तेव्हा ज्यू धर्म हा अपरिवर्तनीय स्वरूपाचा संस्थापित धर्म नसून नवनव्या धर्मकल्‍पनांना जन्म देणारा एक जिवंत संस्कृतिप्रवाह आहे, अशी जाणीव त्यांना होते. ज्यू धर्माने आपल्या प्रदीर्घ काळात जगातील दोन मोठ्या धर्माना-ख्रिस्ती व इस्लाम–जन्म दिला आहे. म्हणूनच ज्यू धर्म ही मध्यपूर्वेतील संस्कृतियोनी म्हटली जाते.

ज्यूंच्या इतिहासाचे जे दर्शन बायबलच्या ‘जुन्या करारा’त होते, त्यावरून ज्यू द्रष्ट्यांना आपल्या भोवतालच्या जगातील मानवाचा दुष्टपणा, त्याबद्दल त्याला भोगावे लागणारे दुःख व या सर्वांतूनही निर्माण होणारे कल्याणकारी मानवी जीवन यांबद्दल सतत खंत वाटत असलेली आढळते. ॲसिरिअन लोकांनी इझ्राएलच्या राज्याचा नाश केल्यापासून ज्यूंच्या वनवासाचा इतिहास  सुरू झाला. एकामागून एक अशा बॅबिलोन, पर्शिया व ग्रीक यांच्या राजकीय व सांस्कृतिक दाबाखाली ज्यूंना वाढावे लागले. ज्यूंचे स्वतःचे असे राष्ट्र नसले, तरी त्यांचा धर्म टिकवून ठेवण्याचे मुख्य श्रेय त्यांच्या द्रष्ट्यांना व त्यानंतर त्यांच्या राब्बींना द्यायला हवे. बायबलचा ‘जुना करार’, टॅलमुड (तलमूद) व तोरा (नियमावली)  हे ग्रंथ ज्यूं धर्माचे मुख्य आधारस्तंभ आहेत. त्यांत त्यांच्या धर्माचा विकास व त्याची मूलतत्त्वे, त्यांची नीती व आचरण, त्यांची समाजव्यवस्था यांचे दर्शन होते. या सर्व इतिहासपरंपरेतून व द्रष्ट्यांच्या लेखनातून ज्यू धर्माची जी मूलतत्त्वे हाती येतात, त्यांत ज्यू धर्माचे एकेश्वरत्व हे सर्वात मोठे व महत्त्वाचे तत्त्व होय. ज्या काळात मध्यपूर्वेत अनेकेश्वरवादी ईजिप्शियन धर्म अत्यंत बलाढ्य होता, अशा काळात मूठभर ज्यू लोकांनी ‘ईश्वर एकच आहे’, हे तत्त्व मांडले व त्यांच्या रक्षणार्थ अटोकाट प्रयत्न केले. ज्यूंचा ईश्वर एकच व तोही निराकार, ही गोष्ट तत्कालीन ईजिप्त व बॅबलोन मधील धर्मांच्या अनुयायांना न पटणारी होती. जितक्या हिरिरीने ज्यूंनी मूर्तिपूजक अनेकेश्वरवाद्यांवर हल्ले केले, तितकाच या मूर्तिपूजकांनी ज्यूंचा छळ केला. या झगड्यात ज्यूंना विजय मिळाला तो त्यांच्या धर्माच्या नैतिक बैठकीमुळे. मध्य पूर्वेतील सारे मूर्तिपूजक धर्म सुखवादी, पापाचरणी, क्रूर हिंसात्मक मार्गाचे अवलंबन करणारे होते. यज्ञ करणे, त्यांत पशूंची, मानवांची आहूती देणे, त्यांचे रक्त पिणे असल्या मार्गांनी  ईश्वर आपल्यावर संतुष्ट होतो, अशी त्यांची श्रद्धा होती. याउलट यज्ञयोगाऐवजी नीतिपूर्ण वर्तन, पापाचा अव्हेर या गोष्टी ज्यू धर्माने प्रतिपादन केल्या. ईश्वर हा भयप्रद नसून अभय देणारा, प्रेम करणारा, सन्मार्ग दाखविणारा आहे, अशी ज्यूंची प्रथमपासूनच श्रद्धा होती. अनेकेश्वरवादी धर्मांतील देवांची नावे ‘ठार मारणारा’, ‘रागीट’, ‘भयंकर’ या अर्थाची होती तर ज्यू धर्मातील ईश्वराचे नाव ‘दयाळू’, ‘प्रेम करणारा’, ‘पवित्र’, ‘न्यायी’ अशी होती. अनेकेश्वरवादी धर्मांतील सृष्टिकल्पना त्या धर्मांना साजेशी होती. पर्शियन वा पारशी धर्माने ईश्वर आणि सैतान हे द्वैत मांडले इतर धर्मांनी सारे विश्व स्वामित्वासाठी धडपडणाऱ्या अनेक रक्तपिपासू शक्तींची समरभूमी आहे, असा दृष्टिकोन मांडला परंतु ज्यूंचा ईश्वर मात्र सारे विश्व प्रथमपासून शेवटपर्यंत सुसंगतपणे चालवितो. ईश्वराच्या बरोबरीला आसुरीतत्त्व मानणे, या धर्माला मान्य नाही. ‘ईश्वर हा प्रकाश आणि अंधःकार यांचा निर्माता आहे, शांती व पाप यांना बनविणारा तोच आहे’, अशी या ज्यू धर्माची श्रद्धा आहे. विश्व हे पापाने परिपूर्ण आहे, या विचारसरणी विरुद्ध ज्यू धर्माची श्रद्धा आहे. विश्व हे पापाने परिपूर्ण आहे, या विचारसरणी विरुद्ध ज्यू धर्माची भूमिका ‘देवाने विश्वामागून विश्वे निर्माण केली आणि शेवटी त्याला हे विश्व निर्माण करून समाधान वाटले’, अशी आहे.

या धर्मात मानव आणि ईश्वर यांचा संबंध इतर धर्मांपासून पुष्कळ वेगळा आहे. इतर धर्मांत मानव हा ईश्वराचा दास आहे, ईश्वराची मर्जी संपादन करणे हे त्याचे कर्तव्य आहे व त्यात तो चुकला, तर त्याबद्दल त्याला शिक्षा भोगावी लागते असे प्रतिपादन आढळते. ज्यू धर्माप्रमाणे मानव हा ‘ईश्वरी आकृती ’ आहे ईश्वराच्या या साऱ्या सृष्टीची तो अंतिम कलाकृती आहे ईश्वराचा तो प्रतिनिधी आहे सत् आणि असत् यांमध्ये कोणते पसंत करावयाचे, याचे स्वातंत्र ईश्वराने त्याला बहाल केले आहे. बुद्धीची महान देणगी ईश्वराने त्याला दिली आहे व या देणगीनेच ईश्वराने त्याला जगाचा स्वामी  बनविला आहे.

मानवाला शरीर आणि शरीराच्या इंद्रियसुखाची लालसा वाटून तो पापाकडे प्रवृत्त होतो परंतु पाप त्याच्या स्वभावाशी निगडित आहे, असे मात्र नाही. ज्यू धर्माला मानवी पापवृत्ती ही त्याच्या शरीरधर्माशी निगडित आहे असे वाटत नाही, तसेच ख्रिस्ती धर्मातील ‘आदिपापाच्या सिद्धांतावर’ ही त्याचा विश्वास नाही. ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो याचा ‘शरीर हे आत्म्याची बंदिशाळा आहे’, हा विचार ज्यू धर्मीयांना कधीच रुचला नाही. ज्यू धर्माप्रमाणे मानव हा स्वतंत्र आहे, चांगले व वाईट याची निवड त्याने करावयाची असते. त्याच्या शरीरव्यवस्थेत किंवा त्याच्या मूलभूत जन्मात ईश्वराने कुठलीही विकृती ठेवलेली नाही. ज्यू धर्माची पापाची कल्पना ‘सदाचरणापासून स्खलन’ एवढीच आहे. तसे होण्याचे कारण मानवी मनाची दुर्बलता हे होय. या पापाची जाणीव मानवाला होते, पश्चात्तापाने तो सदाचरणाकडे वळतो परंतु स्वाभाविक पाप, पापासाठी पाप करणे, ही अनैतिकता ज्यू धर्माला मान्य नाही.

ईश्वराच्या एकत्वाप्रमाणे मानवाच्या एकत्वावरही ज्यू धर्माचा विश्वास आहे. मानवांमध्ये जरी वैविध्य आढळले (‘बाबेलचा मनोरा’ ही बायबलमधील गोष्ट याचा आधार आहे) तरी सारी मानवजात केव्हातरी एक होईल, ही आशा या धर्मात आढळते. मनुष्याला ही एकी साधायची आहे व ती साधली तरच या पृथ्वीवर ‘ईश्वराचे साम्राज्य’ येईल, अशी कल्पना ज्यू धर्मात आहे. ईश्वराने ही सृष्टी  मानवासाठी निर्मिली आहे व या सृष्टीवर सुखसमृद्धीचे  राज्य नांदावे म्हणून ईश्वराने सिनाई पर्वतावर आपला संदेश दिला आहे. तो संदेश साऱ्या मानवजातीकरता होता परंतु इझ्राएलच्या लोकांनीच तो शिरसावंद्य मानला व तो खरा करण्याकरिता ते धडपडू लागले. इतर मानवजातीला मार्गदर्शन करण्यासाठी इझ्राएल हे राष्ट्र ईश्वराने पसंत केले. ‘ईश्वराचा संदेश काय ते जाणून घेण्यासाठी आणि त्या मार्गाने अनुसरण करण्यासाठी सारी मानवजात इझ्राएलच्या ईश्वराच्या मंदिरात येईल’, अशी आशा प्राचीन ज्यू धर्मद्रष्ट्यांना वाटली व यामुळेच आपल्या राष्ट्राचे हे अध्यात्मतेज कुठल्याही दुःखाने किंवा छळाने न करपू देण्याची दक्षता त्यांनी घेतली. ज्यू धर्माने सत्य आणि न्याय यांच्यावर आधारलेले विश्व केव्हातरी निर्माण होईल, ही आशा निर्माण करून मानवजातीसाठी व इतिहासासाठी एक दिव्य ध्येय निर्माण करून ठेवले, असे इतिहासकार म्हणतात. इतर धर्मानी सृष्टीचा ऱ्हास होणार, नाश होणार, ती रसातळाला जाणार व मग तिचा उद्धार करण्यासाठी ईश्वर अवतार घेणार, अशी दैववादी भूमिका स्वीकारली होती. ज्यू धर्माने या सृष्टीच्या अंतिम उन्नतीची सारी भिस्त माणसावर ठेवली आहे व मानव सत्य व न्याय यांचा ईश्वरी आदेश मान्य करून ती उन्नती घडवून आणू शकेल, असा आशावाद स्वीकारला आहे. इतर धर्मांप्रमाणे नव्या सृष्टीची वा ख्रिस्ती धर्माप्रमाणे परलोकाची कल्पना ज्यू धर्माला मान्य नाही. त्यात याच सृष्टीची, याच मानवजातीने, परिश्रमाने, अधिकाधिक ईश्वरांश आपणात आणण्याने उन्नती साधण्याचा आशावादी वास्तववाद आढळून येतो. याच आशावादी वास्तववादावर या धर्माचा नैतिक आचरणाची उभारणी झाली आहे.


ज्यू धर्माची मांडणी करताना त्याच्या द्रष्ट्यांचे लक्ष दोन गोष्टींवर केंद्रित झालेले आढळते : (१) या धर्माचे इतर धर्मांपेक्षा व्यापकत्व आणि (२) या धर्माची इझ्राएल या राष्ट्राच्या गौरवाप्रीत्यर्थ विशिष्ट रचना. इतर धर्मांपेक्षा हा धर्म वेगळा व व्यांपक करण्याच्या प्रयत्नात त्याचे तात्त्विक व नैतिक स्वरूप अधिकाधिक सुस्पष्ट होत गेले व कर्मकांडापेक्षा नीतिनियम व विशाल मानवतावादी दृष्टिकोन हे महत्त्वाचे ठरले. असा दृष्टिकोन स्वीकारण्यात प्राचीन धर्मद्रष्ट्यांपुढे ज्यू माणूस व्यक्ती म्हणून उभा नसून मानव म्हणून उभा आहे, हे उघड आहे. आपला धर्म साऱ्या मानवजातीला जीवन देण्याकरता आहे, जीवन हिरावून घेण्याकरता नाही, ही काळजी त्यांनी सदोदित बाळगली आहे. ‘तुला जे आवडत नसेल, ते तू शेजाऱ्याच्या बाबतीत करू नकोस’, हे सांगण्यात त्यांची व्यापक मानवतावादी दृष्टी स्पष्ट होते. या दृष्टीने पाहिले, तर ज्यू धर्म हा मानवसहिष्णुतेने भरलेला, न्याय, प्रेम या नीतितत्त्वांवर आधारलेला, कर्मकांडापेक्षा हृदयाच्या शुद्धतेवर भर देणारा एक व्यापक विश्वधर्म वाटतो. यामुळेच या धर्माने तलवारीच्या जोरावर आपला प्रसार व्हावा, अशी आकांक्षा न बाळगता शिक्षण व संस्कृती यांद्वारा मानवाचा विकास साधून तो आपल्याप्रत यावा अशी आशा केली आहे. ज्ञान आणि शिक्षण यांना ज्यू धर्मात फार मोठे स्थान आहे. इतर धर्मीयांनी आपले सामाजातील वर्चस्व व आपल्या धर्माचा महिमा टिकावा म्हणून सामान्य माणसांना मुद्दाम अज्ञानात ठेवून धर्माविषयी भीतियुक्त श्रद्धा निर्माण केली आहे. या उलट ज्यू धर्मात आईवडीलांना, समाजातील वडीलधाऱ्यांना शिक्षणाचे महत्त्व अहर्निश पटविले जाते. या जीवनाचा त्याग करून ईश्वर किंवा मोक्ष मिळतो, असे ज्यू धर्माला वाटत नाही. उलट विवाह करून संसार करणे, ही या सामजात आवश्यक गोष्ट मानली जाते. धर्माचे पुरोहित असलेल्या राब्बींनादेखील विवाह करणे आवश्यक असते. सारी मानवजात विवाह, कुटुंब, बालकांचे पालनपोषण या सामान्य माणसाच्या जीवनमार्गानेच सुदृढ सामाजिक जीवन जगते, यावर ज्यू धर्माची अढळ श्रद्धा आहे. यामुळेच ब्रह्मचर्य, संन्यास, पुरोहितांचे खास अधिकार यांचा या धर्मात उल्लेख नाही. धर्म ही ऐहिक गोष्ट न मानता पराकोटीची पारमार्थिक गोष्ट मानण्याने कित्येक धर्मात जी जगविन्मुखता शिरली, तसा प्रकार ज्यू धर्मात झाला नाही. ख्रिस्ती, हिंदू किंवा बौद्ध धर्मांतील तपस्व्यांसारखे तपस्वी या यती ज्यू धर्मात नाहीत. ज्यू धर्म हा आनंदाचा धर्म आहे. त्यांच्या मते ईश्वराने ही सृष्टी मानवाच्या आनंदासाठी निर्माण केली आहे. मानवांनी एकत्र यावे, आनंद निर्माण करावा, दुसऱ्याना आनंद द्यावा हाच जीवनाचा उद्देश आहे आणि म्हणूनच या धर्मातील शब्बाथसारखे पवित्र दिवस आणि इतर सण हे आनंदाचे सण आहेत, त्यात कर्मठपणा कुठेही नाही. ज्यू  धर्मात पापाचा विचार जरी केलेला असला, तरी माणसाला आपण पापी आहोत, अशी जी ख्रिस्ती धर्माने ‘पापात्मता ’ दिली, तशी ती ज्यू धर्मात कधीही दिली गेली नाही. सारे जीवन पवित्र आहे, असा ज्यू धर्माचा विश्वास आहे. यामुळे शरीराच्या शारीरिक क्रियांत अपवित्रपणा आहे  व केवळ देवपूजा ही पवित्र गोष्ट आहे, असे द्वैत त्याने मानवी मनात निर्माण केले नाही. बऱ्याचशा नीतिमार्गी धर्मांच्या बाबतीत असे झाल्यामुळे, मानवाने आपल्या शारीरिक क्रिया करण्यात एक प्रकारचे पाप आहे तसेच त्यांचा चोरटा विचार, दाबलेल्या भावना व विकृत परिपूर्ती या गोष्टी त्यात निर्माण झाल्या आहेत, असे आजचे मनोविश्लेषण सांगते

ज्यू धर्माची इझ्राएल या राष्ट्राच्या गौरवाप्रीत्यर्थ जी रचना झाली, तीत इझ्राएलचे राष्ट्र, ही कल्पना फार महत्त्वाची आहे. केवळ या कल्पनेवरच सारा ज्यू समाज अनेक हालअपेष्टांतही आशावादीपणाने जगत होता. थीओडोर हेर्ट्‌झलने (१८६०–१९०४) जेव्हा Der Judenstaat (१८९६, म.शी. ज्यूंचे राष्ट्र) हे पुस्तक लिहून  ज्यूंच्या राष्ट्रवादाचा आधुनिक काळात पाया घातला, तेव्हा साऱ्या ज्यू सामाजाला भूतकाळातील आपली ही कल्पना साकार होणार, असे मनोधैर्य आले [→ ज्यू राष्ट्रीय आंदोलन]. ज्यू धर्म हा केवळ त्यांच्या ज्यू राष्ट्राचा धर्म आहे, अशी जी ज्यू वर टिका केली जाते, ती त्यांचा हा राष्ट्रवाद नीटपणे न समजल्यामुळे केली जाते. ज्यूंना गेल्या तीन हजार वर्षांत राष्ट्र म्हणून प्रत्यक्षात जरी जगता आले नाही, तरी कल्पनेत ते राष्ट्र म्हणून जगत होते. आपला धर्म व्यापक सहिष्णू नीतितत्त्वावर आधारलेला आहे, म्हणून आपण या स्वार्थी राजकारणाच्या युगात आपले राष्ट्र उभारू शकत नाही, याची बोचरी जाणीवही त्यांच्या पुढाऱ्यांना होती. ज्यू धर्म स्वमतप्रसाराच्या कुठल्याही खटपटीत कधीच पडला नाही. स्वतःच्या अस्मितेवर त्याला आपली सारी शक्ती खर्च करावी लागली आहे. कुठल्याही परिस्थितीत स्वत्व व श्रद्धा अढळपणे टिकवणे हाच त्यांचा खरा धर्म होता. स्वत्वरक्षणाचे हे कार्य हाच ज्यूंचा धर्म बनला. यामुळेच ज्यू धर्माचे नियम, शब्बाथचे आचरण, खाण्यापिण्यातील नियम इ. गोष्टींत जरी धर्म नसला, तरी त्या या ‘धर्माभोवतालचे कुंपण’ (टॅलमुडमधील कल्पना ) बनल्या. इतिहासक्रमात हे कुंपण बांधणे, हे या जमातीचे आवश्यक कर्तव्य बनले पण असले कुंपण घालणे म्हणजे धर्माचरण नव्हे, खरा धर्म सत्कृत्य आचरण्यात आहे, हे ज्यू धर्मद्रष्ट्यांनी बजावून सांगितले आहे. आज ज्यू जमातीला स्वतःचे राष्ट्र मिळाले आहे, कुंपण बांधण्याची आता जरूरी नाही.

ज्यू धर्म हा प्रसार पावण्याऐवजी मध्यपूर्वेतील इतर धर्मांची जननी बनला, ही या धर्माची खरी थोरवी मानायला हवी. मध्यपूर्वेस प्रथम ख्रिस्ती व नंतर इस्लाम हे धर्म ज्यू धर्मातून उगम पावले. या दोन धर्मांनी ज्यू धर्माकडून काय स्विकारले, यावरून ज्यू धर्माच्या श्रेष्ठतेची कल्पना येईल. ख्रिस्ती धर्माची सारी पार्श्वभूमी ज्यू इतिहासाची आहे, हे उघड आहे. बायबल चा ‘जुन्या करार’ ही जशी ज्यू धर्माने ख्रिस्ती धर्माला दिलेली महान देणगी आहे, तशी दुसरी देणगी म्हणजे येशू ख्रिस्त. येशू व त्याचे समकालीन शिष्य ज्यू होते. तत्कालीन रोमन धर्माच्या भीतीने ज्यू धर्म इतका अंतर्मुख बनला होता, की मध्यपूर्वेत येऊन राहणाऱ्या नव्या जमतींना त्याचा आश्रय घ्यायचा झाला, तरी ज्यू धर्मीयांना ते धोक्याचे वाटे. अशा नव्या जमातींत काही ग्रीक होते व त्यांचा पुढारी पॉल होता. या लोकांना ज्यू धर्माचे आकर्षण वाटणे साहजिक होते परंतु ज्यूंमध्ये त्यांना प्रवेश मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत येशूच्या पुनरागमनाची एक वार्ता, ही एका नव्या पंथाची कोनशिला बनली आणि या गोष्टींवर श्रद्धा ठेवणारे ख्रिस्ताचे अनुयायी बनले. ख्रिस्ती धर्म हा मुळात ज्यू धर्माचा पंथ होता. या पंथाला ज्यूंच्या धार्मिक इतिहासाची व आचाराची फारशी जरूरी नव्हती जरूर होती ती ज्यू धर्माच्या नीतितत्त्वांची. ज्यूंच्या ‘जुन्या करारा’तील ‘फारिसी’ कोण होते, ‘साद्युसी’ का तिरस्करणीय  होते, याच्याशी ख्रिस्ती धर्माला काही कर्तव्य नव्हते. ख्रिस्ती लोकांनी फारशा खोलात न शिरता ज्यूंचा ‘जुना करार’ इतिहास म्हणून, पुराण म्हणून मान्य केला पण ज्यूंच्या नैतिक तत्त्वज्ञानाला मात्र त्यांनी उजाळा दिला. हे करण्यात मूळ ज्यू धर्माची भूमिका काय होती, यांची त्यांनी पर्वा केली नाही. येशू हा ईश्वराचा दूत बनला स्वर्ग, पृथ्वी व पाताळ यांच्या कल्पना मांडल्या गेल्या मानवाच्या पातकामुळे जगात मृत्यू शिरला आणि येशू हा मानवाला देवाची ओळख करून देणारा ‘ईश्वराचा पुत्र’ ठरला. ख्रिस्ती धर्माचे सारे पुराण वेगळे रचले गेले पण ज्यू धर्माने आपली नीतितत्त्वे त्याला बहाल केली नसती, तर हे सारे पुराण पोकळ ठरले असते.

ज्यू आणि ख्रिस्ती धर्माच्या एकेश्वरवादाचा परिणाम मुहंमदांच्या इस्लामवरही झाला परंतु या धर्मांना जसे बायबल  लाभले, तसे मुहंमदांच्या धर्माजवळ काही नव्हते. मुहंमदांच्या काळात ज्यू आणि ख्रिस्ती यांच्यात झगडे होत होते व मुहमदांना त्यांच्यातील वैमनस्याची चांगली जाणीवही होती. ‘जुन्या करारा’तील अब्राहम हाच काय तो ‘देवाचा मित्र’ (खलील) म्हणून उरतो. ज्यू व ख्रिस्ती या दोघांनाही तो मान्य होता आणि अब्राहम हा इस्माइलचा पिता आणि इस्माइलपासून सर्व अरब जन्मले. याच अब्राहम आणि इस्माइलने मक्केतील काबा बांधविला. अशा रीतीने ज्यू आणि ख्रिस्ती यांच्या झगड्यातून मुहंमदांनी नवी वाट काढली आणि आपल्या अरब अनुयायांना खूप जुनासा दिसावा असा नवा धर्म बहाल केला. ज्या ईश्वराच्या धर्मप्रेषिताची वाट ज्यू धर्मीय लोक बघत आहेत, तो प्रेषित आपणच आहोत, असे सांगून मुहंमदांनी इस्लामची उभारणी केली.

याप्रमाणे ख्रिस्ती व इस्लाम या दोन्ही धर्मांनी ज्यू धर्मांतून स्वतःची आकृती बनविली. दोन्ही धर्मांनी प्रत्यक्ष वास्तवातील परिस्थितीच्या अंदाजाने आपणाला जे हवे ते ज्यू धर्मातून घेतले, नको ते टाकून दिले व बाकी सारे आपापल्या जमातीला रुचेल व मानवेल ते जमवून गॉस्पेलकुराण  यांची रचना केली. ज्यू धर्माला आता आपल्या नव्या ज्यू राष्ट्रात आपल्या खऱ्याखुऱ्या स्वरूपाचे दर्शन घडेल, असा विश्वास ज्यू तत्त्वज्ञांना वाटत आहे.

संदर्भ :

1. Baeck, Leo, Essence of Judaism, New York, 1948.

2. Epistein, Isidore, Judaism, London, 1945.

3. Epistein, Isidore, The Faith of Judaism, London, 1954.

4. Finkelstein, Louis, Ed. The Jews : Their History, Culture and Religion, 4 Vols., New York, 1955.

5. Schechter, Solomon, Studies in Judaism, 3 Vols., Philadelphia. 1896.

6. Universal Jewish Encyclopaedia, 10 Vols., New York, 1948.

माहुलकर, दि. द.