अगस्त्य : एक गोत्रप्रवर्तक व सूक्तद्रष्टा ऋषी. मित्रावरुणांचा कुंभोद्भव पुत्र वसिष्ठाचा भाऊ. ‘अगस्ति’ असेही त्याचे नाव आढळते. समुद्रात लपलेल्या कालकेय राक्षसांच्या नाशासाठी त्याने समुद्रपाशन केले उत्तरेकडून दक्षिण भारतात जाण्याच्या मार्गातील प्रचंड विंध्य पर्वताला त्याने नमवून उत्तरदक्षिण दळणवळण सुरू केले. त्याच्याबाबातच्या अनेक कथा आहेत. त्याच्या पत्नीचे नाव लोपामुद्रा व पुत्र दृढस्यू अथवा इध्मवाह. ऋग्वेदात ‘अगस्त-लोपमुद्रा संवाद’ आहे. रामायणातही त्याचे पराक्रम वर्णिले आहेत. अथर्ववेद, महाभारत तसेच पुराणांतही त्याचे उल्लेख आढळतात. दक्षिण भारतात त्याचे माहात्म्य विशेष आहे. तामिळ भाषेचा जनक तसेच अगत्तियम्  नावाच्या तमिळ व्याकरणग्रंथाचा त्याला कर्ता मानतात. अगस्त्यगीता, अगस्त्यसंहिता, शिवसंहिता इ. ग्रंथ त्याचे मानतात.  

केळकर, गोविंदशास्त्री