कुर्तकोटी, लिंगनगौडा : (२० मे १८७९–२९ ऑक्टोबर १९६७). भारतीय तत्त्वज्ञानाचे व्यासंगी अभ्यासक आणि हिंदुधर्म-प्रचारक. जन्म कुर्तकोटी (जि. धारवाड) गावी. त्यांचे संपूर्ण मूळ नाव लिंगनगौडा मेलगिरीगौडा पाटील. धारवाड येथून ते १८९३ मध्ये मॅट्रिक झाले. काशी, कलकत्ता, शृंगेरी इ. ठिकाणी संस्कृत धर्मग्रंथांचे अध्ययन. काशी येथे त्यांना

डॉ. कुर्तकोटी

‘विद्याभूषण’ पदवी लाभली. गोंदवलेकर महाराज आणि प्रा. रा. द. रानडे यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. द हार्ट ऑफ भगवद्‌गीता ह्या ग्रंथामुळे त्यांना अमेरिकेतील एका विद्यापीठाची पीएच्. डी. मिळाली. विविध महत्त्वपूर्ण संस्थांच्या उभारणीस त्यांनी हातभार लावला. लोकमान्य टिळकांच्या इच्छेवरून त्यांनी ३ जून १९१७ रोजी करवीरपीठाचे श्रीमत् जगद्‌गुरू शंकराचार्य हे पद स्वीकारले. १९२१  ते १९३९ या काळात नासिकला वास्तव्य. १९२१ मध्ये त्यांच्या अध्यक्षतेखाली नासिक येथे ‘महाराष्ट्रीय हिंदुधर्म परिषद’ झाली. हिंदुमहासभेच्या प्रयाग व लाहोर अधिवेशनांचे ते अध्यक्ष होते. हिंदुधर्माच्या प्रचारार्थ त्यांनी विपुल प्रवास केला व अनेक व्याख्याने दिली. त्यांच्या ग्रंथांतून व व्याख्यानांतून त्यांच्या त्यागी, ध्येयवादी, कल्पक व व्यासंगी व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय येतो. स्वधर्म (साप्ताहिक), हिंदू हेराल्ड (साप्ताहिक), ओरिएंटल थॉट (त्रैमासिक) ही मराठी–इंग्रजी नियतकालिकेही त्यांनी काढली. त्यांनी हजारो जणांना शुद्ध करून परत हिंदुधर्मात घेतले आणि काही परधर्मीयांनाही हिंदुधर्माची दीक्षा दिली. ‘दुसरे विद्यारण्य’, ‘श्रीविद्याशंकरभारती’, ‘महाभागवत’ इ. बहुमानाच्या पदव्या त्यांना लाभल्या. नासिक येथे त्यांनी १९२३ मध्ये ‘आचार्य मठ’ आणि ‘संस्कृत पाठशाळा’ ह्या संस्था तसेच १९६४ मध्ये ‘शंकराचार्य धार्मिक-शैक्षणिक विश्वस्त समिती’ स्थापन केली. नासिक येथे ते कालवश झाले.

सराफ, श्री. शं.