विष्णू : ब्राँझमूर्ती, पल्लव वंश, आठवे-नववे शतक.विष्णु : एक वैदिक आणि पौराणिक देवता. हिंदू जनमानसावर फार मोठा प्रभाव असलेल्या देवतांपैकी विष्णू हा एक असला, तरी ऋग्वेदातील सूक्तांचा विषय असलेल्या प्रमुख देवतांत विष्णूचा अंतर्भाव दिसत नाही. केवळ विष्णूची अशी फारच थोडी सूक्ते ऋग्वेदात आहेत.इतर काही देवतांच्या जोडीने-विशेषत: इंद्राबरोबर-विष्णूची स्तुती ऋग्वेदात केलेली आढळते परंतु विष्णूला कालांतराने जे महत्व प्राप्त झाले, ते त्याला ऋग्वेदकाली नव्हते, असे दिसून येते. वैदिक धर्म आणि अवैदिक द्राविड धर्म ह्यांचे कालौघात एकीकरण झाल्यानंतर आर्यांनी द्राविड धर्मातले जे देव स्वीकारले, त्यांत विष्णूचा अंतर्भाव करण्यात आला, असे दिसते. तमिळ भाषेतील ‘विण्’ (आकाश) हा शब्द आणि ‘विण्हु’ व ‘वेण्हु’ ह्या ‘विष्णू’ च्या प्राकृत रूपांचे निकटचे नाते दिसून येते त्यामुळे तो मूळचा आकाशदेव असण्याची शक्यता आहे. विष्णूचा वर्णही आकाशाप्रमाणे निळा मानलेला आहे. इंद्रपूजेला प्रखर विरोध करणारा ⇨कृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. त्यामुळे मूळ वैदिकतेवर धर्मात विष्णू आणि कृष्ण हे एकत्र असण्याची शक्यता आहे.ऋग्वेदात काही देवतांच्या जोडीनेही त्याचा निर्देश केलेला आढळतो. विशेषतः इंद्र व विष्णू ह्यांच्या जोडीचे एकत्र स्तवन केलेले आढळते (१·१५५).

विष्णूला ऋग्वेदात सूर्याचे एक रूप मानले आहे. डॉ. रा.ना. दांडेकर ह्यांनी वि=उडणे ह्या धातूला ‘स्‍नु’ हा प्रत्यय लागून ‘विष्णू’हा शब्द सिद्ध झाला, असे मत व्यक्त केले आहे. ‘उडणारा पक्षी’ हे विष्णू ह्या देवतेचे मूळचे प्रतीक असले पाहिजे पुढे सूर्यावर पक्षिस्वरूपाचा आरोप केला, असेही त्यांचे प्रतिपादन आहे. ‘विशाल विश्वाच्या कल्याणासाठी तीन पदक्षेपांमध्ये त्रैलोक्य व्यापणारा’ असा त्याचा निर्देश विष्णुसूक्तात आला आहे (१.१५५). ह्या त्रैलोक्यात कोणते तीन लोक अंतर्भूत आहेत, ह्याबद्दल दोन मते आढळतात: पहिल्या मतानुसार हे तीन लोक म्हणजे सूर्याचा उदय, मध्य आणि अस्त होत. दुसऱ्या मतानुसार पृथ्वी, अंतरिक्ष आणि द्युलोक हे ते तीन लोक. त्रैलोक्य म्हणजे अग्‍नी, विद्युल्लता आणि सूर्य असे प्रकाशाचे तीन आविष्कार, असेही म्हटले जाते. विष्णूचे तीन पदक्षेप हा साऱ्या विश्वाचा आधार होय, अशी श्रद्धा आहे. विष्णूचे तिसरे पद अत्यंत उंच असल्यामुळे ते जेथे आहे, तेथे कोणीही जाऊन पोहोचू शकत नाही. तीन पदक्षेपांमध्ये त्रैलोक्य व्यापणाऱ्या विष्णूचे गती हे एक महत्वाचे वैशिष्ट्य होय. सूर्यरूपी विष्णूच्या चौऱ्याण्णव गतींचा निर्देश ऋग्वेदातील उपर्यक्त सूक्ताच्या सहाव्या ऋचेत आलेला आहे. सायणाचार्यांच्या मते ह्या चौऱ्याण्णव गती म्हणजे एका वर्षात अंतर्भूत होणारे एक संवत्सर, दोन अयने, पाच ऋतू, बारा महिने, चोवीस पक्ष,महिन्यातील तीस अहोरात्री वा दिवस, दिवसातील आठ प्रहर आणि एका दिवसात बदलणारी बारा नक्षत्रे होत. विष्णूच्या त्रिपदस्थानी अनेक शिंगे असलेल्या गायी (म्हणजेच सूर्याची किरणे)  आहेत असे वर्णन ऋग्वेदात येते.

तीन पदक्षेपांत त्रैलोक्य व्यापणाऱ्या  विष्णूच्या कथेवरून विष्णूने वामनावतार घेऊन बळीराजाला पाताळात लोटले, ह्या पौराणिक कथेची आठवण होते. पुराणातील ह्या कथेचे बीज शतपथ ब्राह्मणात आढळते. विष्णू हा वामन-म्हणजे छोटा-होता. देवांनी त्याच्या मदतीने सारी पृथ्वी प्राप्त करून घेतली, असे तेथे म्हटले असून विष्णूला ‘अग्‍नी’,‘यज्ञ’ अशी विशेषणे लावली आहेत.

विष्णूला ऋग्वेदात काहीसे गौण स्थान का प्राप्त झाले ह्याची कारणमीमांसा डॉ. रा. ना. दांडेकर ह्यांनी केली आहे. त्यांच्या मते विष्णूच्या मूळच्या रूपातील काही अंश वैदिक आर्यांच्या पुढारलेल्या कुटुंबातील कवींना रूचण्यासारखा नव्हता. म्हणून त्यांच्या अधिकृत देवतामंडळात विष्णूला त्यांनी सहजपणे स्थान मिळू दिले नाही आणि जेव्हा ते स्थान मिळाले, तेव्हा विष्णूच्या मूळ व्यक्तिमत्वातील काही अंश त्यांनी दडपून टाकला. हा दडपून टाकलेला अंश म्हणजे ‘शिपिविष्ट’ होय. विष्णूला ‘शिपिविष्ट’ असे एक नाव आहे. ‘वाढणारे, क्रियाशील, लहानमोठे होणारे पुरूषलिंग’ असा काहीसा त्या शब्दाचा मूळ अर्थ असावा. विष्णू ह्या देवतेचे प्राचीन लिंगसंबद्ध रूप ‘शिपिविष्ट’ ह्या नावातून सूचित होते. सुलमप्रसूत्व, प्रभूतफलत्व आणि अवंध्यत्व अशा – म्हणजे साधारणतः सर्जनाच्या कल्पनांशी – विष्णूचा पहिल्यापासून संबंध असला पाहिजे. विष्णूच्या लिंगसंबंद्ध स्वरूपाचा निर्देश वैदिक कवी अत्यंत सावधपणे आणि गूढतेने करतात.

विष्णूची फारच थोडी सूक्ते ऋग्वेदात असली, तरी त्यांच्या माहात्म्याचे वर्णन खूपच आदराने आणि भक्तीभावाने केलेले आहे. ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील बावीसावे सूक्त हे ‘अनेक देवता सूक्त’ आहे. त्यातील १६ ते २१ ह्या सहा ऋचा विष्णुस्तुतीपर आहेत. ऋग्वेदांच्या उपर्युक्त १६ ते २१ ह्या ऋचांपैकी एकोणिसाव्या ऋचेत असा आशय आलेला आहे, की ‘(हे मित्रांनो) ज्या ठिकाणाहून विष्णू (तुमची) कामे पाहतो, तेथे त्यांचे पराक्रम (तुम्ही) पहा. तो इंद्राचा जीवलग मित्र होय’. येथेही विष्णू म्हणजे सूर्यच माणसांची पापपुण्यादी कृत्ये आकाशातून पाहतो, असा भावार्थ दिसतो. इंद्र हा विष्णूचा जीवलग मित्र असल्यामुळे जेथे इंद्राची शक्ती कमी पडली, तेथे विष्णूने त्याला साहाय्य केले, असे इंद्र व वृत्रासुराच्या कथेवरून दिसते.

असे असले, तरी ऋग्वेदकाली विष्णूला इंद्राएवढे मोठे स्थान नव्हते. यजुर्वेदाच्या काळात मात्र त्याचा महिमा वाढू लागला आणि ब्राह्मणग्रंथांच्या काळात विष्णूला परमस्थान प्राप्त झाले. देवांमध्ये अग्‍नी सर्वात खालचा आणि विष्णू सर्वात वरचा असे ऐतरेय ब्राह्मणात म्हटले आहे.यज्ञ म्हणजे विष्णू आणि यज्ञ करणारा यजमान हे विष्णूचेच रूप होय असे मानले जाऊ लागले. विष्णूच्या तीन पदक्षेपांना विष्णुक्रम असे म्हणतात. यजमानाने वेदीवर तीनदा पदक्षेप करून विष्णुक्रमाचे अनुकरण करण्याचा विधी निर्माण झाला. उपनिषदांच्या काळात ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या त्रिमूर्तींची कल्पना प्रस्थापित झाली. महाभारतानेही विष्णूचे माहात्म्य वाढवले ⇨भागवतपुराण व अन्य पुराणांनी विष्णूचा महिमा परकोटीस नेला. विष्णू आणि परब्रह्म एकच मानले. विष्णू, त्याचा परिवार, त्याची पूजापद्धती ह्यांचे एक सुबद्ध चित्र पुराणांनी निर्माण केले. ह्या चित्रानुसार विष्णूला चार हात असून शंख, चक्र, गदा, पद्म त्याने त्या हातांत धारण केलेले असते. ⇨ लक्ष्मी ही विष्णूची पत्‍नी असून गरूड हे त्याचे वाहन आहे. वेदांमध्ये मात्र लक्ष्मी ही विष्णूची पत्‍नी म्हणून कोठेही दाखवलेली नाही. ⇨महालक्ष्मी ही मात्र कधी विष्णुपत्‍नी, तर कधी शिवपत्‍नी म्हणून संबोधिली जाते. पितांबर, वनमाला, किरीटकुंडले आणि श्रीवत्स ही त्याची आभूषणे होत. तो शेष नावाच्या नागावर शयन करतो. वैकुंठ हे त्याचे निवासस्थान होय. जय-विजय हे दोघे वैकुंठाच्या द्वाराचे रक्षक असून ते फक्त विष्णूभक्तांना वैकुंठात प्रवेश देतात. वैकुंठातून वाहणाऱ्या विरजा नदीच्या तीरी विष्णुभक्त ध्यानधारणा करतात. हिंदू धर्मात अवतारकल्पनेचा आविष्कार शिव आणि विष्णू ह्यांच्या संदर्भात विशेष झालेला असून विष्णूच्या अवतारांचा प्रभाव हिंदूंच्या मनांवर अधिक आहे. पुराणांनी विष्णूचे प्रमुख दहा अवतार मानले असले, तरी भागवतपुराणात मात्र विष्णूचे बावीस अवतार सांगितले आहेत. हरिवंशात विष्णूचे आठ अवतार सांगितले असून महाभारतात त्यांची संख्या नऊ सांगितली आहे. [पहा : मराठी विश्वकोश, खंड १ चित्रपत्र ७९].

विष्णुप्रीत्यर्थ पुरूषसूक्ताच्या आधारे केल्या जाणाऱ्या यागास विष्णुयाग असे म्हणतात. विष्णुलक्षनमस्कारव्रत, विष्णुलक्षप्रदक्षिणाव्रत, विष्णुलक्षवर्तिव्रत इ. विष्णुप्रीत्यर्थ करावयाची व्रते आहेत. मार्गशीर्षातील शुद्ध सप्तमी ही विष्णुसप्तमी असते. त्या दिवशी रक्तचंदन आणि रक्तपुष्पांनी विष्णूची पूजा करतात. विष्णुसहस्त्रनाम ह्या १०७ श्लोकांच्या स्त्रोत्रात विष्णूची एक सहस्त्र नामे दिलेली आहेत.

पहा : अवतार दशावतार वैष्णव संप्रदाय.

कुलकर्णी, अ. र.