फकीर"फकीर : मुसलमान साधू व भिक्षेकरी. ‘फकीर’ या अरबी शब्दाचा मूळ अर्थ गरीब व गरजवंत असा आहे. ⇨ कुराणानुसार अल्ला हा एकटाच ‘गनी’ (श्रीमंत) आणि बाकी सर्व लोक फकीर आहेत. फकीर हा ईश्वरावलंबी असतो. तत्त्वतः त्याला ईश्वराच्या दयेची गरज असते, धनसंपत्तीची नव्हे. ‘मला फक्रचा (फकिरीचा, गरिबीचा) अभिमान आहे’, या हजरत मुहंमदांच्या उद्‌गाराला अनुसरून फकीर संन्यस्तवृत्ती बाळगतात. काही इस्लामी राष्ट्रांत फकीर या अर्थाने ‘दरवेश’ हा फार्सी शब्द वापरला जातो. बहुधा ⇨ सूफी पंथाच्या अनुयायांना दरवेश म्हणतात. दैनंदिन व्यवहार सांभाळणाऱ्या, परंतु नेहमी ईश्वराचे स्मरण करणाऱ्या ईश्वरावलंबी दरवेशांना सालिक, तर तल्लीन, विचारमग्न दरवेशांना मज्‌झूब म्हणतात. [⟶ दरवेशी पंथ]. बहुतेक धर्मनिष्ठ मुसलमान हे सूफींच्या कोणत्या ना कोणत्या पंथाचे अनुयायी असतात.

अब्दुल कादिर जीलानी (सु. १०७८–११६६) ह्यांनी बाराव्या शतकात स्थापन केलेला ‘कादिरीया’ हा पहिला पंथ आहे. त्याच सुमारास सय्यद अहमद रिफाई (सु. ११०६-सु. ११८३) यांनी स्थापन केलेला रिफाई हा पंथही प्रारंभीच्या पंथांपैकी एक होय. तुर्कस्तानमध्ये चौदाव्या शतकात सुलतान वल्‌द (१२२६–१३१२) यांनी आपले वडील जलालुद्दीन रूमी (सु. १२०७–७३) यांच्या नावागर मौलविया पंथ स्थापन केला. याच शतकात तुर्कस्तानमध्ये बेकताशी नावाचा एक पंथ सुरू झाला. विसाव्या शतकात मुस्ताफा केमाल पाशाने नवीन सरकार स्थापन केल्यानंतर (१९२५) हे दोन्ही पंथ रद्द केले. मौलविया पंथ सर्व वर्गांमध्ये, तर बेकताशी पंथ विशेषतः जैनिसरी म्हटल्या गेलेल्या सैनिकांमध्ये लोकप्रिय होता. मौलविया पंथाच्या सभांमध्ये संगीताचा वापर केला जात होता. मौलवी लोक एक प्रकारचे नृत्यसुद्धा करीत. याकरिता यूरोपियन लोकांनी त्यांना नृत्यकार दरवेश म्हटले आहे. बेकताशी यांच्या तत्त्वांत ख्रिस्ती तत्त्वांचे मिश्रण आढळते. १८४३ मध्ये उत्तर आफ्रिकेमध्ये स्थापित झालेला ‘सन्यूसी’ पंथ सून्नी असून त्याचा राजकारणाशी घनिष्ठ संबंध आहे.

मध्यकालीन भारतात बहीउद्दीन झकारीया (सु. ११८२–१२६२) यांनी सुऱ्हावर्दीया (सुहरवरदी) पंथ स्थापन केला. ह्या पंथाने समकालीन शासकांवर प्रभाव टाकला. ⇨ ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती (सु. ११४२–१२३६) यांनी स्थापन केलेला चिश्तिया पंथ भारतात फार लोकप्रिय होता. संगीतातील ⇨ कव्वालीचा प्रकार त्यांच्या प्रोत्साहनाने आजसुद्धा कायम आहे. चिश्तिया पंथातील संतकवींनी अस्तित्वाची एकता या सिद्धांताच्या प्रभावाने आपल्या सुंदर अशा कवितांमधून हिंदुमुसलमानांमध्ये असलेले भेदभाव नाकारले आहेत. या संतकवींपैकी महाराष्ट्राचे गुलाम हुसेन एलीचपुरी यांचे हिंदु-मुस्लिम यंकरंगनामा ह्या नावाचे काव्य उल्लेखनीय आहे.

निजामुद्दीन औलियाच्या नावाने प्रसिद्ध असलेला निजामिया पंथ हा चिश्तियाचीच एक शाखा आहे. ख्वाजा बहाउद्दीन नक्षबंदी (१३१७-१३८९) ह्यांच्या नावाने स्थापन झालेला नक्षबंदिया पंथ शेख अहमद सरहिंदी (?–१६२४) यांच्या प्रयत्नाने भारतात दृढ झाला.

शेख अहमद यांच्या नावाने मुजददीदिया पंथ सुरू झाला. भारतात कादिरिया, चिश्तिया, निजामिया, नक्षबंदिया आणि मुजददीदिया हे सूफी पंथ कार्यरत आहेत. काही भागांत रिफाइया, मदारिया आणि मुसासुहागी ह्या पंथांचे फकीर दिसून येतात. रिफाई फकीर हे आगीतून चालणे, अंगात शस्त्र खुपसणे यांसारख्या वैचित्र्यपूर्ण कृती करतात. मुसासुहागी फकीर हे स्त्रियांसारखा पोषाख घालून फिरतात. फकीराच्या निवासस्थानाला ‘खानकाह’ म्हणतात. येथे पंथाची दीक्षा आणि शिक्षण दिले जाते. या विविध पंथांमध्ये गुरूचा आदर करणे, ईश्वराच्या नावाचा जप करणे इ. बाबतींत सारखेपणा आढळून येतो. जली (मोठ्यांदा) व खफी (मनातल्या मनात) हे जपाचे दोन प्रकार आहेत. जिक्रमध्ये पठण, ध्यान व अल्लाच्या ९९ नावांचा उच्चार केला जातो. चिश्तिया हे जली तर नक्षबंदिया हे खफीपद्धतीने जिक्रचे आचरण करतात.

मुसलमानांची धर्मश्रद्धा दृढ करणे हा फकिरांचा उद्देश दिसतो. मध्ययुगात इस्लामी राष्ट्रांवर या पंथाचा धार्मिक, सामाजिक व काही वेळा राजकीय प्रभावही पडला आहे. अनेक हिंदू लोकही मुसलमान फकिरांविषयी आदर बाळगतात.

संदर्भ : Huges, Thomas Patrik, Dictionary of Islam, New Delhi, 1977

नईमुद्दीन, सैय्यद साळुंखे, आ. ह.