समाधि : समाधी ही संकल्पना पातंजल योग, बौद्धदर्शन तसेच वेदान्त दर्शन यांत प्रामुख्याने वापरली गेली आहे. पातंजल योगा त समाधी ही मध्यवर्ती संकल्पना आहे. कैवल्यप्राप्तीसाठी साधकाने करावयाच्या ⇨ अष्टांगयोग साधनेतील ती शेवटची पायरी मानली गेली आहे. किंबहुना योगाची ‘चितवृत्तिनिरोध’ (चित्ताच्या सर्व वृत्ती रोखल्या जाणे वा त्या नाहीशा होणे) अशी जी व्याख्या ⇨ पतंजली ने केली आहे, त्यातूनही पतंजलीला ‘योग’ या शब्दाने समाधीच अभिप्रेत आहे असे मानले जाते. योगसाधनेच्या आठ अंगांचे बहिरंग व अंतरंग असे वर्गीकरण केले जाते. पैकी अंतरंग योगात धारणा, ध्यान व समाधी यांचा अंतर्भाव होतो. धारणेत चित्त कोणत्या तरी भागावर/प्रदेशावर स्थिर केले जाते. ध्यानात या भागातच चित्ताची एकतानता साधली जाते. तर समाधी अवस्थेत चित्त ध्येयविषयाशी इतके एकरूप होते की जणू फक्त विषयच शिल्लक राहतो. अर्थात ही ‘संप्रज्ञात-समाधी’ झाली. ज्यावेळी विषयाचेही भान होत नाही, अशी चित्ताची अवस्था म्हणजे असंप्रज्ञात समाधी. सबीज समाधी आणि निर्बीज समाधी असेही समाधीचे वर्गीकरण पतंजलीने केले आहे. सबीज समाधीत पूर्वकर्मांचे संस्कार बीजरूपाने शिल्ल्क असतात, तर निर्बीज समाधीत तेही नष्ट झालेले असतात. निर्बीज समाधी ही योगसाधनेची परमोच्च पायरी होय. निर्बीज समाधीतूनच योग्याला कैवल्यप्राप्ती होते.

अव्दैत वेदान्ताने ही योगदर्शनातील समाधि-संकल्पना स्वीकारली असून तिला अव्दैताचे वेगळे परिमाण दिले आहे. यानुसार समाधिस्थितीत केवळ चित्तवृतींचा निरोध होतो, असे नसून शेवटी चित्ताचाच विलय होतो. अव्दैत वेदान्तात समाधीचे वर्गीकरण सविकल्प समाधी व निर्विकल्प समाधी असे केले जाते व निर्विकल्प समाधीलाच ब्रह्मसाक्षात्कार मानले जाते.

बौद्ध तत्त्वज्ञानानुसारही निर्वाणप्राप्तीच्या ‘आर्य अष्टांगिक मार्गा’तील सम्यक् समाधी हा महत्त्वाचा टप्पा आहे. समाधी म्हणजे चित्ताची एकागता. सम्यक् समाधी म्हणजे मनाची निर्मळता व एकागता साध्य करणे. या आर्य अष्टांगिक मार्गाचीच विभागणी काही वेळा शील, समाधी व प्रज्ञा या तीन घटकांत केली जाते. शील म्हणजे सदाचरण, समाधी म्हणजे चित्ताच्या एकाग्रतेचा अभ्यास व या दोन्हींच्या साहाय्याने जगाविषयी आणि जीवनाविषयी विकसित होणारी अंतदृष्टी म्हणजे प्रज्ञा होय.[→ बौद्ध दर्शन].

पहा : अष्टांगयोग योगदर्शन.

गोखले, प्रदीप