आळवार : दक्षिण भारतातील तमिळ भाषिक वैष्णव संतकवींच्या एका परंपरेस आळवार म्हणतात. आळवार म्हणजे मग्न झालेला अथवा

आळवार संत : (१) पोय्‌गै आळवार, (२) भूतत्ताळवार, (३) पेयाळवार, (४)तिरुमळिशै आळवार, (५) नम्माळवार, (६) मधुरकत्री आळवार, (७) कुलशेखर आळवार, (८) पॉरियाळवार (पेरियाळवार), (९) आंडाळ (गोदा) आळवार, (१०) तोंडरडिपोंडी आळवार, (११) तिरुप्पाण आळवार व (१२) तिरुमंगै आळवार

 ईश्वराच्या प्रेमसागरात बुडून गेलेला. तमिळ वैष्णवांत आधीची आळवारपरंपरा आणि नंतरची आचार्यपरंपरा असे दोन भेद आहेत. आचार्य परंपरेत अनेक आचार्यांचा अंतर्भाव होतो, तर आळवारपरंपरेत फक्त बाराच आळवारांचा समावेश केला जातो. आळवारांचा काळ आणि परंपरा यांबाबत विद्वानांत मतभेद आहेत तथापि श्रेष्ठ आचार्य वेदान्तदेशिक (सु. १२६९–सु. १३७१) यांनी दिलेली आळवारांची पुढील परंपरा स्वीकारावयास हरकत नाही. संस्कृत साहित्यातही आळवारांची नावे आलेली असून ती तमिळ नावांहून काहीशी भिन्न आहेत. तमिळ नावांपुढेच कंसात ही संस्कृत नावे दिली आहेत : (१) पोय्‌गै आळवार (सरोयोगी), (२) भूतत्ताळवार (भूतयोगी), (३) पेयाळवार (महदाहवयसूरि), (४) तिरुमळिशै आळवार (भक्तिसारमुनि), (५)नम्माळवार(शठकोप दिव्यसूरि), (६) मधुरकवी आळवार, (७) कुलशेखर आळवार, (८) पॅरियाळवार (विष्णुचित्त), (९) आंडाळ (गोदा), (१०) तोंडरडिपॉडी आळवार (भक्तांघ्रिरेणु), (११) तिरुप्पाण आळवार (पाणकवि)आणि (१२) तिरुमंगै आळवार (परकाल दिव्यसूरि).

वैष्णवांच्या सांप्रदायिक ग्रंथांतून आळवारांचा काळ ४२०३ ते २७०६ इ.स.पू. या दरम्यानचा दिलेला आढळतो. तो अर्थातच विश्वसनीय नाही. ऐतिहासिक आणि इतर अंतर्गत पुराव्यांवरून सर्वसाधारणपणे त्यांचा काळ इ.स. ५०० ते ८५० या दरम्यानचा मानला जातो. हे आळवार तमिळ प्रदेशातील विविध भागांतील होते. पहिले चार आळवार पल्लव राज्यातील, शेवटचे तीन चोल राज्यातील, कुलशेखर हा चेर राज्यातील आणि बाकीचे सर्व आळवार पांड्या राज्यातील रहिवासी होते. इ.स. ५०० ते ८५० ह्या कालखंडातील प्राचीन विभागात पहिले चार आळवार, मध्य विभागात मधले पाच आळवार  आणि उत्तर विभागात शेवटचे तीन आळवार होऊन गेल्याचे मानले जाते.

हे बारा आळवार स्वतः गूढ अंतर्ज्ञानात व भक्तीत निमग्न राहून शांतपणे कालक्रमणा करीत. त्याचप्रमाणे अन्य साधकांनाही उपदेश करून भक्तिप्रवण करीत. त्यांच्याबाबत अनेक आख्यायिका रूढ असून त्यांतील काही आळवारांनी अनेक अद्‌भुत चमत्कार करून दाखविल्याचेही सांगतात. नंतरच्या आचार्य-परंपरेतही आळवारांविषयी कमालीचा आदरभाव दिसून येतो. रामानुजांसारख्या तत्त्ववेत्त्यानेही आळवारांबाबत आपला आदरभाव व्यक्त केला आहे. श्रीरंगम् व इतर प्रमुख ठिकाणच्या देवालयांतील आळवारांच्या मूर्तींची स्थापनाही रामानुजांच्या सांगण्यावरूनच करण्यात आली असावी असे मानतात. दक्षिणेतील वैष्णव लोक आळवारांना आचार्यांहून अधिक मानतात. आळवार भगवंताचे भक्तिपुत्र आणि आचार्य ज्ञानपुत्र म्हणून ओळखले जातात.

आळवारांनी तमिळ भाषेत सु. चार हजार पद्ये रचली. ही सर्व पद्ये वैष्णवांनी मौखिक परंपरेने जतन केली आहेत. नवव्या शतकाच्या अखेरीस नाथमुनीने ही सर्व पद्ये मोठ्या परिश्रमपूर्वक संकलित करून त्यांच्या संग्रहाला दिव्यप्रबंधम् अथवा अरुळिच्‍चॅयल असे नाव दिले. नालायिर–दिव्य–प्रबंधम् (चार हजार दिव्य पद्ये) ह्या नावाने प्रस्तुत पद्यसंग्रह आज प्रख्यात आहे. प्रत्येकी सु. हजार हजार पद्यांच्या चार भागांत प्रबंधम्ची विभागणी केली आहे. पहिल्या भागास ‘तिरुमोळि’ हे सामान्य नाव असून त्यात पॅरियाळवार, आंडाळ, कुलशेखर, तिरुमळिशै, तोंडरडिपॉडी, तिरुप्पाण आणि मधुरकवी ह्या आळवारांची पद्ये आहेत. दुसऱ्या भागाचे नाव ‘पॅरिय तिरुमोळि’  असून त्यात तिरुमंगै आळवाराची पद्ये आहेत. तिसऱ्या भागाचे नाव ‘इयल्पा’ असून त्यात पहिल्या तीन आळवारांची तसेच तिरुमळिशै, नम्माळवार आणि तिरुमंगै ह्या आळवारांची पद्ये आहेत. चौथा भाग ‘तिरुवायमोळि’  हा असून त्यात नम्माळवाराची दिव्यसूक्ती आहे. प्रबंधम्च्या ह्या चार स्थूल भागांतही परत उपभाग असून त्यांनाही विशिष्ट नावे आहेत. प्रबंधम्मधील ही चार हजार पद्ये आजही तमिळ वैष्णव मंदिरांतून मोठ्या आवडीने व भक्तिभावाने गातात. प्रस्तुत ग्रंथ तमिळ वैष्णवांत वेदांप्रमाणेच महत्त्वाचा व पूज्य मानला जातो. दिव्यप्रबंधम्, दिव्यसूरी आणि दिव्यदेश अशी तीन प्रधान तत्त्वे आहेत. आळवारांनी जी पद्यरचना केली ती दिव्यप्रबंधम् दिव्यप्रबंधम् ज्यांनी रचले ते दिव्यसूरी आणि ज्या पुण्यस्थळांसंबंधी त्यांनी ती गायिली ती स्थळे म्हणजे दिव्यदेश. प्रबंधम् मधील ‘तिरुवायमोळि’ हा नम्माळवाराच्या पद्यांचा भाग अत्यंत महत्त्वाचा असून त्याला ‘सामवेदसार’ आणि ‘द्राविड-वेद’ म्हटले जाते. तसेच तिरुमंगै आळवाराच्या सहा कृतींना ‘सहा वेदांगे’ म्हणतात. प्रबंधम्मध्ये सर्वाधिक पद्ये (सु. १३६०)तिरुमंगै याची असून, त्याखालोखाल नम्माळवाराची (११०२) आहेत. पहिल्या तीन आळवारांची प्रत्येकी १०० पद्ये, तिरुप्पाणाची १० पद्ये, आंडाळची १७३ पद्ये, मधुरकवीची १० पद्ये इत्यादींचा त्यात समावेश आहे.

आळवारांत ब्राह्मण-शूद्रादी वर्णांचे लोक होते. आंडाळ ह्या एका स्त्रीचाही त्यात समावेश असून तिला ‘दख्खनची मीरा’ म्हटले जाते. तिरुप्पाण हा शूद्र होता, तर नम्माळवार जातीने वेळ्ळाळ व तिरुमंगै हा कळ्‌ळ (लुटारू) होता. कुलशेखराने राजपदाचा त्याग करून श्रीरंगम् येथे श्रीरंगनाथाची सेवा केली. पॅरियाळवार हा ब्राह्मण असून कल्पसूत्राचा भाष्यकारही होता.आळवारांनी पुरस्कारिलेला भक्तिमार्ग सर्व वर्ण, जाती, पंथ व धर्मांच्या लोकांना खुला होता. जो सर्वभावे ईश्वरास शरण जातो, त्याचे ईश्वर रक्षण व उद्धार करतो. अकिंचन आणि अनन्यगतिक होऊन शरणागती पतकरणाऱ्या जीवासाठी ईश्वरभक्तीचा मार्ग त्यांनी प्रतिपादन केला. पांचरात्र  पथांतील परमेश्वराची परम, व्यूह, विभव, अर्चा व अंतर्यामी ही पाच रूपे आळवारांना मान्य असली, तरी त्यांचा विशेष भर त्यांतील अर्चारूपावर आहे. वेद आणि वैष्णवागम यांतील तत्त्वज्ञानाचा समन्वय त्यांच्या भक्तिमार्गात साधलेला दिसतो. त्यांनी प्रसृत केलेला भक्तिमार्ग वरवर सोपा दिसत असला, तरी तो प्रत्यक्ष आचरण्यास दुष्कर आहे, असे म्हटले जाते. भक्तिभावनेबरोबरच त्याला ज्ञानाचीही जोड (भक्तिरूपापन्न ज्ञान) आवश्यक आहे. ईश्वराचे अस्तित्व प्रत्येक व्यक्तीच्या व विश्वातील प्रत्येक वस्तूच्या ठिकाणी आहे. म्हणूनच मनुष्याने आपले शरीर हे मंदिर मानून अंतर्यामी असलेल्या परमेश्वराची सर्वशराणागत भावाने भक्ती करावी, अशी त्यांची शिकवण आहे. रामानुजांचे प्रपत्तितत्त्वज्ञान आळवारांच्या ह्या शरणागतभावावरच आधारलेले आहे.

आळवार हे गूढगुंजनवादी संत व रससिद्ध कवी होतेत्यांचे काव्य उत्कट भावनेने व भक्तीने ओतप्रोत भरलेले आहे. त्यांच्या काव्यातून त्यांचे गूढानुभव आणि भक्तिपर तत्त्वज्ञान सुबोध भाषेत व्यक्त झाले आहे. त्यांच्यानंतर होऊन गेलेल्या आचार्यांवर आणि वैष्णव साहित्यावर त्यांचा फार मोठा प्रभाव पडला. आळवारांनी सुरू केलेल्या भक्तिपंथाची दार्शनिक बाजू पुढे अनेक थोर आचार्यांनी खूपच विकसित केली आणि भारतभर भक्तिपंथाचा प्रसार केलाभक्तिपंथाची सुरुवात सर्वप्रथम आळवारांनी केली आणि नंतर त्याचा प्रसार सर्व भारतभर झाला, असे मत काही विद्वान प्रतिपादन करतात. त्यांच्या मते भक्तिपंथाचा मूलस्रोत श्रीमद्‌भागवत  हा ग्रंथ नसून आळवारांचा प्रबंधम् हा ग्रंथच होय. कारण भागवताची  रचना नवव्या शतकांनतरची असून त्यातील भक्तिपर तत्त्वज्ञानावर प्रबंधम्चा प्रभाव आहे तथापि हे मत विवाद्य आहे.

दिव्यप्रबंधम्चा संस्कृतमध्ये अनुवाद झालेला आहे. कन्नड, तेलुगू व हिंदीतही प्रबंधम् मधील काही भागांचे अनुवाद झालेले आहेत.प्रबंधम्वर आणि आळवारांच्या जीवनावरही अनेक भाष्ये आणि वाङ्‌मय निर्माण झाले आहेत.

सुर्वे, भा. .