सूर्यदेवता

सूर्यदेवता : सूर्य हा रात्रीचा अंधार संपवून प्रकाशाकडे नेणारा असल्यामुळे, त्याचप्रमाणे त्याच्या झगझगीत, तेजस्वी रुपामुळे मानवाला वंद्य वाटत आलेला आहे आणि त्या भावनेतून अनेक संस्कृतींनी सूर्याला देवता मानलेले आहे. उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहणारा सूर्य हा कठोर न्यायदाता, तो प्रज्ञेचा स्रोत, तो सार्वभौम, तो परोपकारी अशी भावना सूर्याबद्दल व्यक्त केली जाते. प्राचीन ईजिप्तमध्ये सूर्यदेवतेचे नाव ‘रा’ (रे) असे होते. ईजिप्शियन संस्कृतीतील देवताविश्वात ‘रा’ एक प्रभावी देवता होती. एका प्राचीन ईजिप्शियन मिथ्यकथेत तरुण सूर्यदेव स्वर्गीय सागरावरुन जलपर्यटनास निघतो. माध्यान्हीला तो शेखरबिंदूच्या ठिकाणी दृश्यमान होतो, तेव्हा त्याचे बिंब पूर्ण विकसित स्वरुपात असते. तो ‘रा’ झालेला असतो आणि संध्याकाळी पश्चिमेस तो वृद्घ सूर्यदेवाचे – अतुमचे – रुप धारण करतो, असे दाखविलेले आहे. सुमेरियन आणि अकेडियन धर्मांत सूर्यदेवतेला मध्यवर्ती स्थान आहे. इंडो-यूरोपीय संस्कृतीत सूर्य ही अत्यंत लोकप्रिय देवता होती किंबहुना सूर्य हे ईश्वरी शक्तीचे प्रतीक होते. मध्ययुगीन इराणमध्ये इस्लामपूर्व काळापासूनचा सांस्कृतिक वारसा म्हणून सूर्योत्सव साजरे केले जात. कुष्ठरोग ही सूर्य-देवतेने, तिच्या बाबतीत केलेल्या पापाबद्दल माणसाला दिलेली शिक्षा होय, अशी समजूत पर्शियनांमध्ये असल्याचे प्राचीन ग्रीक इतिहासकार हीरॉडोटस ह्याने नमूद केले आहे. चार शुभ घोड्यांच्या रथातून भ्रमण करणाऱ्या सूर्यदेवतेची कल्पना इंडो-यूरोपीय संस्कृतीत आहे. रोमनांच्या इतिहासातील उत्तर कालखंडात सूर्यपूजेला फार महत्त्व आले होते. उत्तर अमेरिकन इंडियन लोक सूर्याला सर्व प्रमुख देवता मानीत.

वैदिक साहित्यात ऋग्वेदातील सूर्यदर्शन काही सुंदर ऋचांमधून प्रकट झाले आहे. त्यांतील काही ऋचांचा आशय असा : (१) ‘सर्वांना दिसण्यासाठी त्या सर्वदर्शी सूर्यदेवाला किरण वाहून आणत आहेत’. (२) ‘सर्वदर्शी सूर्यापुढे नक्षत्रे काळोखासह चोराप्रमाणे पळून गेली आहेत’. (१·५०) (३) ‘देवांचे सुंदर मुख, वरुणाचा व अग्नीचा डोळा, स्थावरजंगमांचा जीव उगवला आहे . आकाश, पृथ्वी व अंतरिक्ष यांना त्याने भरुन टाकले आहे’. (४) ‘पुरुषाने युवतीच्या मागे लागावे, तसा सूर्य शोभिवंत उषादेवीच्या मागे लागला आहे. या देवाची पूजा करीत, माणसे ह्या कल्याणप्रद देवाकरिता मंगल मार्गाने आपल्या पिढ्यांचा विस्तार करीत असतात’ (१·११५).

वैदिक साहित्यात सूर्याला सवितृ, विवस्वत्, पूषन् अशी विविध नामे दिली आहेत. सूर्याच्या विविध अवस्थांना प्रतीकरुप मानून अशी निरनिराळी नावे सूर्याला दिली असणे शक्य आहे. उदा., सायणभाष्यानुसार ऋग्वेदात उगवत्या सूर्याला सवितृ म्हटले आहे. ऋग्वेदात सूर्याला विश्वाचा आत्मा म्हटलेले आहे (१·११५·१).

सूर्योपासना भारतात प्राचीन काळापासून रुढ आहे. सूर्योपासनेसंबंधीचा विश्वामित्र ऋषींचा गायत्री मंत्र प्रसिद्घ आहे. उपनिषदांपैकी सूर्योपनिषद सूर्योपासनेशी संबंधित आहे.

पौराणिक साहित्यात कश्यप ऋषींना सूर्याचे प्रतिरुप मानले आहे. अदिती व दिती ह्या त्यांच्या दोन पत्नी. त्या अनुक्रमे दिवस आणि रात्र ह्यांचे प्रतिनिधित्व करतात. कश्यप ऋषींचा पुत्र अग्नी हा पृथ्वीवरील सूर्याचा प्रतिनिधी मानला जातो.

संदर्भ : जोशी, लक्ष्मणशास्त्री, वैदिक संस्कृतीचा विकास, वाई, १९९३.

कुलकर्णी, अ. र.