मनी पंथ : मनी वा मणी नावाच्या एका इराणी संताने इ.स.तिसर्या शतकाच्या पूर्वार्धात स्थापन केलेला आणि एके काळी बराच प्रभावी असलेला एक धर्मपंथ. मनीचा जन्म दक्षिण बॅबिलोनियामध्ये इ.स. सु. २१५ वा २१६ मध्ये झाला. आपल्याला ईश्वरी साक्षात्कार झाला आहे, सर्वश्रेष्ठ धर्माची स्थापना करण्यासाठी ईश्वराने आपल्याला पाठविले आहे, देवदूताने आपल्याला दृष्टांत देऊन नवा धर्म स्थापन करावयास सांगितले आहे, आपण अखेरचे व सर्वश्रेष्ठ प्रेषित आहोत वगैरे विचार तो मांडत असे. त्याला लहानपणापासूनच असे वाटत असे आणि त्याने वयाच्या पंचविशीतच धर्मप्रचारास सुरूवात केली. इराणचा राजा पहिला शापूर याने त्याला आपल्या साम्राज्यात नव्या धर्माचा प्रचार करण्याची परवानगी दिली. त्याने धर्मप्रचारासाठी इराणी साम्राज्याचा पश्चिम भाग, चीन,भारत इ. ठिकाणी प्रवास केला. इराणमधील ⇨माजी (मगी) पुरोहित त्याचे कडवे विरोधक असल्यामुळे पहिल्या बारामच्या कारकीर्दीत त्यांनी राजाकडून त्याला अटक करविली आणि इ.स. २७४ ते २७७ या काळात केव्हा तरी त्याची हत्या घडवून आणली.

मनीने स्थापन केलेला पंथ सर्वमतसंग्राहक होता असे दिसते. ख्रिस्ती धर्म आणि इराणमधील माजी हा संप्रदाय यांचा आधार घेतल्याचे स्वतःमनीनेच म्हटले होते. त्याने ⇨ अवेस्ताचाही आधार घेतला होता आणि ⇨जरथुश्त्राला प्रेषित मानले होते. त्याने बुध्दीलाही प्रेषित मानले होते. नीतिशिक्षणाचे व अन्य काही विचार त्याने ⇨बुध्दाच्या उपदेशातून घेतले असावेत ,असे काही अभ्यासकांना वाटते. इराणमधील मिथ्र-उपासनेमुळे मनी पंथासाठी आवश्यक असलेली पार्श्वभूमी तयार झाली होती, असे काही विद्वानांचे मत आहे. [⟶ मिथ्र धर्म] .

मनी पंथाचे धर्मग्रंथ काळाच्या ओघात लुप्त झालेले असल्यामुळे या पंथाची माहिती ख्रिस्ती ,माजी, इस्लाम इ. इतर धर्माच्या वा पंथांच्या ग्रंथांवरून करून घ्यावी लागत होती. यांपैकी बहुतेक ग्रंथांनी या पंथावर टीका केली आहे. उदा. काही ख्रिस्ती ग्रंथांनी या पंथाच्या अनुयायाना अंधाराची अपत्ये म्हणून हिणवले आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्याविषयी पुरविलेली माहिती ऐतिहासिक दृष्ट्या सत्य असेलच असे नाही. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी मात्र चिनी तुर्कस्तानमध्ये (तुर्फान) या पंथांच्या ग्रंथांची काही हस्तलिखिते सापडली आहेत तसेच १९३० साली ईजिप्तमध्ये मनीच्या लेखनाची काही भाषांतरे सापडली आहेत. या शोधांमुळे पंथाचे मूळ स्वरूप समजण्यात मदत झाली आहे.

या पंथाने सत् (चांगले) व असत् (वाईट) या तत्वांच्या द्वैतावर आपला धर्म व तत्वज्ञान यांची उभारणी केली आहे. ही दोन तत्वे शाश्वत आहेत. ती एकमेकांपासून वेगळी व एकमेकांना विरोधी आहेत. सत हे तत्व प्रकाशाच्या स्वरूपाचे तर असत हे तत्व अंधाराच्या स्वरूपाचे आहे. प्रकाशाचे साम्राज्य वरच्या बाजूला असून तेथे ईश्वराची सत्ता चालते. तर अंधाराचे साम्राज्य खालच्या बाजूला असून तेथे ईश्वराची सत्ता चालते, तर अंधाराचे साम्राज्य खालच्या बाजूला असून तेथे सैतानाची सत्ता चालते. सध्याच्या जगात या दोन्ही तत्वांचे मिश्रण झाले आहे. जेव्हा अंधाराच्या बंधानातून प्रकाशाची मुक्तता होईल, तेव्हा सर्व जगाचा नाश होईल आणि पुन्हा प्रकाश व अंधार यांची राज्ये वेगवेगळी व स्वतंत्र होतील. हाच मोक्ष होय. या सिध्दांताच्या आधारे या पंथाने अनेक पुराणकथा निर्माण केलेल्या असून त्यांमधून ईश्वर व सैतान यांचे युध्द, जगातील विविध पदार्थाची व मानवादी प्राण्यांची निर्मिती इ. विषय हाताळले आहेत.

मनी पंथाचे आचाराविषयीही अनेक नियम घातले होते. मद्य, मांस वगैरे पदार्थ निषिध्द मानले होते. अंधाराचे प्रतीक असलेल्या पदार्थापासून दूर राहावयास सांगितले होते तसेच विषयवासनेची तृप्तीही वर्ज्य मानली होती. दिवसातून चार वेळा स्नान करून प्रार्थना म्हणावी आणि प्रार्थना म्हणताना प्रकाशतत्वाकडे म्हणजे सूर्याकडे वा चंद्राकडे तोंड करावे, असा नियम होता. मनीची पुण्यतिथी सण म्हणून साजरी केली जात असे तसेच अनेक उपवासही केले जात असत. सर्वसामान्य अनुयायांना कठोर व्रतांचे पालन जमणार नाही हे ओळखून,संसारी लोकांचा एक व निवडक लोकांचा एक असे दोन गट करून त्यांच्या आचारविषयक नियमांत फरक करण्यात आला होता.

मनीने स्वतः अनेक ठिकाणी जाऊन आणि आपल्या अनुयायांना पाठवून धर्मप्रचार केला होता. या पंथाच्या धर्मगुरीचे पीठ प्रारंभी बॅबिलन येथे होते. परंतु नंतर ते समरकंद येथे गेले. इराण, मेसोपोटेमिया ईजिप्त, रोम ,उत्तर आफ्रीका, तुर्कस्तान, चीन, भारत इ. अनेक ठिकाणी या धर्मापंथाला खूप अनुयायी मिळाले होते. ख्रिस्ती संत ⇨ ऑगस्टीन हा ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यापूवी काही वर्ष (इ.स.३७३ ते ३८२) मनी पंथाचा अनुयायी होता. या पंथाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असला, तरी त्याच्या अनुयायांचा माजी मताचे पुरोहित, ख्रिस्ती, अनुयायी, मुसलमान इत्यादींकडून बराचसा छळही झाला होता. रोमन साम्राज्य व चीन येथे काही काळ त्याच्यावर बंदीही घालण्यात आली होती. तेराव्या शतकात मंगोल टोळ्यांनी आशियावर आक्रमणे केली आणि त्यानंतर हा पंथ पूर्णपणे निष्प्रभ झाला.

संदर्भ : 1. Burkitt, F.C. The Religion of the Manlchees, London, 1925.

2. Jackson, A.V.W. Researches in Manicheism, New York, 1932.

3. Widengren Geo, Eng, Trans, Mani and Manichaelsm, London, 1965.

साळुंके, आ.ह.